एक स्मरणरंजन असेही...!
*एक स्मरणरंजन असेही...!*
~~~~~~~~~~~~~~~~
>> ब्रिटिश आमदानीत इ.स.1930 साली डेप्युटी डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चर, छत्तीसगढ रिजन या वरीष्ठतम पदावरून निवृत्त होऊन स्वातंत्र्योत्तर काळात इ.स.1960 साली निसर्गशरण झालेले व रायबहादूर पदवीने सन्मानित करण्यात आलेले, पोवार समाजातील एकमेव ठरलेले, टुंडीलाल पोवार (तुरकर) हे माझे आजेसासरे.
>> त्यांच्या दोन पुत्रांपैकी वडील पुत्र श्री यदुराजसिंह यांनी नागपूर येथील तत्कालीन हिस्लाॅप काॅलेज येथून गणित व विज्ञानाचे पदवी-शिक्षण अर्धवट सोडून, वडीलांच्या इच्छेखातर, वडीलांनी मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात कमावलेली शेती करण्या/सांभाळण्यास सुरुवात केली. पायलट म्हणून प्रशिक्षणाची चालून आलेली संधी सोडून मध्यप्रदेशातील एका आडवळणावरील छोट्याशा खेडेगावात शेती करून/सांभाळून एक मोठी (सुमारे 40-50 एकरात) आमराई उभारण्यात सुद्धा यशस्वी ठरले.
>> कनिष्ठ पुत्र ॲड.श्री रामकुमार यांनी वकीलीची परीक्षा उत्तीर्ण करून वकीली-कम-शेतीऔजार (ट्रॅक्टरादि) व्यवसायात आपला जम बसवत मध्यप्रदेशातीलच जिल्हास्थळ असलेल्या बालाघाट या शहरात आपला स्थायी निवास कायम केला. जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे अध्यक्षपदही भूषविले. परंतु एका अपघाती श्वानदंशाने त्यांचा जीवनप्रवासच बदलून टाकला व त्यांना उर्वरित जीवनात एकप्रकारे स्थानबद्ध स्वरूपाचा शहरी वानप्रस्थाश्रमच अवलंबावा लागला.
>> अशा या परिवारातील वडील पुत्राची, श्री यदुराजसिंह यांची, सातपैकी मधली, एक कन्या जून 1982 मध्ये माझी अर्धांगिनी होऊन माझ्या सन्यस्त जीवनाचा आधार झाली. माझ्या जीवघेण्या अपघातग्रस्ततेच्या व लगतच्याच तदनंतरच्या माझ्या किडनी कॅन्सरच्या कठीणतम कालावधीत जणू यमराजाशी पौराणिक सावित्रीच्या आवेशाने लढली ती अगदी हिंमतीने/धैर्याने.
>> मध्यप्रदेशातील, हा माझा सासुरवाडीचा परिवार, पूर्णतः हिंदी भाषिक. आणि माझे गाव मराठी भाषक महाराष्ट्रातील असले तरी विदर्भाच्या अगदी पूर्वटोकावर असून मध्यप्रदेश-सीमेला कवटाळून असल्याने माझा परिवार मात्र स्वाभाविकरीत्याच पोवारी-कम-झाडीबोली-कम-मराठी-कम-हिंदी भाषिक. असे असले तरी मी मात्र माझ्या सहाव्या वर्गापासूनच पुणे आणि वर्धा येथील हिंदी भाषा विषयक विविध परीक्षा उत्तीर्ण करून हिंदी भाषा व साहित्याचा, अल्प का असेना, अभ्यासक राहिल्याने माझे शुद्ध व साहित्यिक प्रणालीचे हिंदीतील पत्रलेखन माझ्या सासुरवाडीत खूप वाखाणले जायचे.
>> आज आता माझे आजेसासरे, आजेसासू (110 वर्ष जगून), सासरे, सासूबाई, काकेसासरे हे सर्व निसर्गशरण झालेले असले तरी त्यांच्या जीवनप्रवासातील स्वानुभव ऐकून, वाचून, पाहून मी आजही प्रभावित होत असतो. शून्यातून विश्व उभारणारी एक विजयगाथा जगून माझ्या सासुरवाडीतील ज्येष्ठांनी आपली यशस्वी जीवनयात्रा सुफल संपूर्ण केली.
जय हो!
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया.
(01.08.2022)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment