मैत्रीण(?) : एक न उलगडलेले कोडे

*मैत्रीण(?) : एक न उमगलेले कोडे*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
           मैत्रीण हा माझ्यासाठी एखादा शब्द नसून ती एक अनबुझ/अनाकलनीय(?) अशी व्यामिश्रतम संकल्पना आहे. सुमारे चाळीस वर्षे होत आहेत, माझ्या मैत्रीणीसोबत अखेरची भेट झाल्याला! तरी अजूनही "ती माझी मैत्रीण" ही संकल्पना मला आकळताच येत नाही. "मैत्रीण" या संकल्पनेची व्याख्याही मला व्याख्यायित करता येत नाही. जाणवते सर्व पण ती व्यक्त/शब्दांकित करण्यासाठी माझी आकलनशक्ती व प्रकटनशक्ती माझ्या मदतीला धावून येत नाही. अव्यक्तातील व्यक्त मला खेटून जात असला तरी मला तो गवसत नाही.
        अशी ती माझी मैत्रीण! तिची माझी पहिली भेट झाली 1979 साली. पहिले सहा-सात महिने मला आमच्या मैत्रीचे गुपित(?) कळले/आकळलेच नव्हते. एके दिवशी अचानक माझा एक मित्र मला विचारता झाला, की ती तुझ्याकडे जरा वेगळ्याच दृष्टीने का देखत/निरखत असते? तोवर मला खरोखरच तसे काही जाणवले नसले तरी ती मला अनायासेच आवडायची, हे मात्र मला नाकारता येणार नाहीच. या आवडण्याला मी बळी न गेल्याने त्यातील गम्य व गोम मला तोवर आकळलीच नव्हती. आजच्या या उजाखोत्तर व अतिव्यामिश्र अशा सर्वव्यापक सत्योत्तर अशा संगणक व मोबाईलच्या तंत्र युगात ही बाब शंभर टक्के खोटी/बनावटी वाटेल/ठरेल. पण 1979-80 च्या त्या काळात, आणि त्या/तशा अतिमागास, आदिवासी क्षेत्रात अशा कितीतरी बाबींचा अकाली गर्भपात झाल्याचे तत्कालीन तरुण-तरुणी जाणून आहेत. 
       तर माझ्या त्या मित्राच्या वारंवारच्या विचारणा-सत्राने मला जाणवू लागले की मी सुद्धा नकळतच तिच्याकडे सायास देखू लागलो होतो. आमच्या वयात सुमारे 9-10 वर्षाचा फरक असला तरी आमच्या तत्कालीन स्टेटस(!)च्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व शैक्षणिक वास्तवाचे आमचे भान कधी मावळले हे आम्हा दोघांनाही कळलेच नाही. 
       मी प्लेटोच्या प्लॅटोनिक लव्ह या संकल्पनेचा अल्पस्वल्प अभ्यासक असल्याने माझ्या त्या अगदी तरुण वयातही माझ्या तिच्याप्रतीच्या मैत्रीभावात सेक्स या संकल्पनेचा वास नव्हता, हे मी आजही विश्वासपूर्वक व ठामपणे सांगू शकतो. अशी आमची अनामिक व अव्यावहारिक(?) मैत्री अर्थातच कोणत्याही खतपाण्याशिवाय बहरू लागली. अर्थातच हा बहर काहींना खुपणे तर काहींना तो आवडणे हे स्वाभाविकच म्हणावे लागेल. 
        या प्रसंगमालिकेच्या लगतच्या वर्षातच मी दुसर्‍याच एका वेगळ्याच नोकरीनिमित्ताने मुंबईला गेलो. माझी ती मैत्रीण मात्र आपल्या गावातच होती. त्या दूरवरच्या नोकरीत स्थिरस्थावर होताना मला माझ्या त्या मैत्रीणीचा विरह(?) आडवा आला. मी योगाभ्यास, प्राणायामादिचा विद्यार्थी व अध्यात्माकडे आकर्षित असूनही मला त्या मैत्रीणीचा असा विरह(?) आत्मसात करता/पचवता आलाच नाही. नाईलाज झाला माझा आणि मी ती नोकरी तात्काळ सोडून तिच्या सान्निध्यात परत आलो. 
        दरम्यान माझ्यातील तिच्याप्रतीचा मैत्रभाव वृद्धिंगत होतच राहिला. तिचा माझ्याप्रतीचा लगाव मात्र मित्रभावाचा होता, की सखाभावाचा होता, की प्रणयभावाचा होता याबद्दल माझ्या भावविश्वात वादळ उठायचे. तिची देहबोली वाचताना मी सपशेल भ्रमित व्हायचो. तिच्या वागण्या-बोलण्यातील भावदर्शनाचा भेद जाणून घेणे शक्य व्हावे म्हणून मी स्वभावशास्त्र व मानसशास्त्राचा अल्पस्वल्प अभ्यासही आरंभला. पण मला तिच्या मना/मेंदूतील खरेखुरे भाव ओळखता/शोधता आले नाहीत. असे असले तरी व मी तिच्या मैत्रभावात गुंतत चाललो होतो तरी, माझ्या मनात चुकूनही तिच्याप्रती सेक्सभाव जागृत होत नव्हता, हे मात्र मी आजही ठामपणे सांगू शकतो. 
        असेच दिवस, महिने, वर्ष आले आणि गेले. आमच्यातील मैत्रभाव मात्र कायम राहिला. आमच्यातील या मैत्रभावाबद्दल माझ्या मनात व विचारात कोणताही विभ्रम, संशय वा अपसमज नसला तरी तिच्या मना-विचारात याबद्दल काय चालले आहे, हे मात्र मला निश्चित कळत नव्हते. तिला कदाचित माझ्याकडून प्रणयभाव अपेक्षित असावा असे काही अनाकलनीय प्रसंग वारंवार घडत असत. माझे दोन अभिन्न मित्र (एक वयस्कर व दुसरे समवयस्क) याबाबत मला चाचपडतही असत, तिच्या वागण्या-बोलण्याचे विश्लेषणही मांडत असत. पण आमच्या तिघांनाही याबाबत निश्चित समाधान सापडत नसे किंवा आमचे पूर्वग्रह आम्हाला कोणत्याही निष्कर्षाप्रत येऊ देत नसत असेही असेल. मी मात्र माझ्या आईच्या शिकवणूकीला ठाम चिकटून राहिल्याने आमच्यातील अशा चर्चा मला बिचकवत नसल्या तरी चलबिचल अवश्य करून जात, ही वस्तुस्थिती नाकारण्यात अर्थ नाही. 
         अखेर ती निर्णयक्षम वयात प्रवेशली व तिच्यातील आमच्या मैत्रभावातील आक्रमकता वाढू लागल्याचे मला जाणवू लागले. तिच्याकडून आमच्यातील मैत्रभावात प्रणयभावाची लागण तर उगवत नाही ना, अशी मला व माझ्या त्या दोन्ही अभिन्न मित्रांना शंका भेडसावू लागली. माझी प्लॅटोनिक लव्हची संकल्पना सुद्धा कधीकधी डगमगू लागली. अशातच आमच्या या पवित्रतम मैत्रभावात गुरु-शिष्यासारखा तरतमभाव सुद्धा पाय पसरत असल्याचे चिन्ह उमटू लागले. वस्तूतः अस्तित्वात नसलेले किल्मिष आमच्या मैत्रभावात कालवले जात असल्याचे अनाहूत प्रसंग, आपली उपस्थिती दर्ज करू लागल्याचे दिसून येऊ लागले. व्याख्यायित व विश्लेषित करता येऊ न शकणाऱ्या घटनांनी आमच्यातील मैत्रभावाला आवळण्यास सुरुवात केली. अखेर एका अन्यमनस्क अशा अनाकलनीय मनःस्थितीत मी विवाहबद्ध होण्याचे ठरवून अन्यत्र विवाहबद्ध झालोही. कारण आमच्या मैत्रभावात, विवाह आणि अर्थातच सेक्स ही संकल्पना मी स्वीकारूच शकत नव्हतो. लवकरच ती सुद्धा अन्यत्र विवाहबद्ध झाली. 
       आजच्या घडीला सुमारे चाळीस वर्षे होताहेत, आमची प्रत्यक्ष भेट झाल्याला. तरी तो मैत्रभाव मात्र मी अजूनही जपून आहे, कोणत्याही शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक बंधनात त्या मैत्रभावाला न अडकवता! (शब्दसंख्या : सुमारे 690)
¤
@लखनपाल सिंह कटरे 'अपराधी' 
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया.
(11.03.2024)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*मैत्री-दिनाच्या निमित्ताने...(सहा स्फुटं)*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
गणिताच्या 'भाषे'चा मी सख्खा मित्र 
मला सहज शक्य होते,
आठला गुणून चारने चौसष्ट पर्यंत पोचणे 
परंतू विसाव्या शतकाच्या 
त्या आठव्या-नवव्या दशकातील चकव्याने 
घेरले मला अकस्मात नैतिकतेच्या नावाखाली,
अखेर ... 
अव्हेरले मला माझ्या या प्राणप्रिय गणिताने,
त्या चकव्याच्या अगम्य/प्राचीनतम प्रभावात,
आणि
चुकले माझे गणित नेहमीसाठी. 
¤
चौसष्ट कला आणि चौदाही विद्या 
सहज साध्य होतात गणिती-वृत्तीला 
पण जेव्हा मित्रवर्य गणितच अव्हेरतो 
आपली जन्मापासूनची मैत्री 
आणि 
तीक्ष्ण स्तंभ वारंवार लवचीक होतो 
नैतिकेच्या मौन-रहस्यात 
तेव्हा 
बृहन्नडा झालेल्या अर्जुनाची शिष्या उत्तरा 
कालबाह्य झालेली असते.
¤
कालबाह्य झालेल्या काही कालातीत परंपरा 
रूढीप्रिय नैतिकेला वाकुल्या दाखवूनही 
गणिताला रढीग्रस्त करून सोडतात  
आणि 
मैत्रीच्या आवरणाखाली मौनाला दडवून 
गणितावरच आरूढ होतात 
तेव्हा 
देहोत्सवाच्या पलीकडचे वास्तव 
निसटून गेलेले असते.
¤
वसंत-ग्रीष्म-वर्षा सारे आवर्तनमुक्त ऋतू 
कामप्रेरणेच्या आवारात विलंबित असताना 
नैतिकतेचे सारे अनुत्तरीत गणित 
महास्वप्नाच्या भलेपणात विलीन होऊन 
मैत्रीभावाला पारखे होतात 
आणि 
इतिहासात दाखल होता होता सारे आभास 
अचानक दृष्टिगत होतात.
¤ 
निवृत्तीला एकच पायरी शेष असताना 
सत्तावनावे पथभ्रमित अवतरण 
इंद्राच्या दरबारात नैतिकतेचे धडे गिरवत 
साऱ्या 'दैवी' अप्सरांच्या साक्षीने 
मैत्रीच्या गणिताला 'कबीरा'पुढे ठेवते 
आणि 
भकास झालेला प्रच्छन्न विद्रोह 
दोन घोड्यांवर स्वार होऊन 
खाणाखुणा पुसत जातो.
¤
पुसता पुसत नाहीत त्या खाणाखुणा; 
गणितासारखा सख्खा मित्रही फितूर होतो 
उत्तरांना लकवा मारून जातो 
स्थल-काल विरचित होत जातात 
आणि 
नैतिकतेचे सडू लागलेले शव सावरत 
आधुनिक अर्जुन उत्तरेलाच बृहन्नडा करू लागतो,
तेव्हा 
आदिम मैत्रीभाव त्याच्या स्वयंभू अभावानेच 
नैतिकतेची शिकार ठरू लागतो.
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया 
(01.08.2021)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~






Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन