माझी फूफीआजी : शिवलाबाई (एक अस्फुट स्मृतिचिन्ह) (3)
*माझी फूफीआजी : शिवलाबाई*
*(एक अस्फुट स्मृतिचिन्ह)*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
माझा एक वडील भाऊ होता,
शुकदेव त्याचे नाव
अडीच-तीन वर्षाचा झाल्यावर
त्याला लिव्हर-रोग जडला
माझ्या आई-वडीलांनी
खूप/विविध उपचार केले त्याच्यावर
तत्कालीन उपचार पद्धतीनुसार
पण त्याचा असाध्य लिव्हर-रोग
आला नाही आटोक्यात
अखेर साडेतीन वर्षाचा होऊन
अकालीच निसर्गशरण झाला तो.
वडील भावाच्या अशा
अकाली निघून जाण्यानंतर
तीन-चार वर्षे मी यायचा थांबलो(?) होतो,
माझ्या आईच्या पोटी,
दुसरा पुत्र होऊन.
आईच्या मोठ्या नवसासायासाने
तिच्या जप-जाप व हवन-पूजनाने
द्रवित झाले निसर्ग आणि नियती,
झाला म्हणतात मग माझा जन्म
अगदी महाशिवरात्रीच्या दिवशी.
अर्थातच वाढलोय मी लाडाकोडात,
क्वारंटाईन मध्ये ठेवल्यासारखा.
माझ्या बालपणी,
मी रांगू लागलो तेव्हा एकदा
मी झोपलेल्या अंधाऱ्या खोलीत
मी झोपेतून उठून
खाटेवरच रडत असताना
सरपटत घुसला
एक नाग साप त्या खोलीत.
माझ्या **फूफीआजीला
दिसला तो साप घुसताना
मी झोपलेल्या त्या अंधाऱ्या खोलीत
आणि
घुसली ती घाबरून
रायखाय त्या खोलीत,
मला उचलून घेण्यासाठी खाटेवरून.
कडेवर घेऊन मला
बाहेर येताना अंधारात
पडला तिचा पाय सापावरच
डसला तो साप
तिच्या पायाला अंधारात.
सोपवून मला आईकडे
निघाली ती तडक
घेऊन डोईवर
एक लहानसा दगड
गावातील सर्प-वैद्याच्या घराकडे
जडीबुटीच्या औषधीसाठी.
आई-वडील व आजीही
धावले तिच्या मागोमाग
सर्पवैद्याच्या घराकडे
दिली सर्प-वैद्याने औषध जडीबुटीची
बोलावण्यात आले *''बारी" गाणाऱ्यांनाही तिथेच
गायिली त्यांनी पारंपरिक "बारी"
सर्पविष उतरवणारी लगेच.
सर्प-वैद्याकडील जडीबूटीची औषधी घेऊन,
आणि...
"बारी" गाणाऱ्यांच्या बारीचा 'जप' जागून
अखेर संध्याकाळी परतली ती घरी,
सर्व कुटुंबाच्या गराड्यासह.
माझ्या वडिलांच्या खांद्यावर हात टेकवून,
धीरगंभीर झाली ती क्षणभर
तिला कळून चुकले होते कदाचित
तिच्या भावी निसर्ग-शरणाचे गुपित.
त्यानंतर अंतिम श्वासापर्यंत
ती पूर्ण बरी झालीच नाही
झेलत राहिली
सर्पविषाची आहुती,
अखेरपर्यंत.
काही वर्षाच्या कालावधीनंतर,
मी असेन चारेक वर्षाचा
तेव्हा एके दिवशी
मी खेळत असता एक बालखेळ
माझा पुकारा झाला
आईच्या घाबऱ्याघुबऱ्या आवाजात.
मी गेलो धावतच माझ्या आईकडे.
आईच्या मांडीवर डोके ठेवून
अंतिम श्वास घेत होती
माझी फूफी-आजी
माझ्या हातून
गंगाजल पिण्याची आस धरून.
अखेर अंतिम घोट गंगाजलाचा
घेऊन माझ्या चिमुकल्या हाताने,
निघून गेली ती क्षितिजापलीकडे! ()
¤
@ॲड.के.एम.लखनपाल सिंह,
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया.
(11.11.2022)
¤
(*बारी = सापाचे विष उतरवण्यासाठी पूर्वी गावांतून गायिला जाणारा एक लयबद्ध सांगीतिक गीतगायनाचा प्रकार,
**फूफीआजी > माझ्या वडिलांची आत्या. निपुत्रिक विधवा असलेली ही माझी फूफीआजी. तिच्या गावातील शेतीवाडी व घरदार विकून ती आमच्या गावी आमच्या घरीच रहायला आली होती.)
¤
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment