गुरु नव्हे, मित्रवर्य/मित्रश्रेष्ठ : एक आकलन

*गुरु नव्हे, मित्रवर्य/मित्रश्रेष्ठ : एक आकलन*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने)
----------------------------------
       सध्याच्या या उजाखा*प्रणित सत्योत्तर तथा संगणकीय अशा कृत्रिम प्रज्ञेच्या आवेगात मानवाच्या विचारक्षमतेलाच आव्हानित करीत असलेल्या वर्तमान युगाच्या कालपर्वात गुरु-शिष्य ही इतिहास-सिद्ध परंपरा व संकल्पना कालविसंगतच नव्हे तर अनुपयोगी, अरिष्टकारक व अर्थभ्रष्ट सुद्धा ठरत असल्याचे माझे अल्पबुद्धि-आकलन आहे. 
         सध्याच्या या व्यामिश्रतम तथा अवास्तवसदृश्य वास्तवाच्या कालपर्वात आता गुरूच्या ऐवजी मित्रवर्य किंवा मित्रश्रेष्ठ ही द्विधृवात्मक/द्विदलात्मक संकल्पना उपयोजिली व अनुसरली जात असल्याचे सर्वत्र दिसून येत असून मी सुद्धा याच संकल्पनेचा पाईक आहे, हे स्वीकार करण्यात मला कोणताही संकोच वाटत नाही. आणि म्हणूनच माझा कोणी गुरु नाही किंवा मी सुद्धा कोणाचाही गुरु नाही तसेच मी कोणाचा शिष्य नाही किंवा माझा सुद्धा कोणी शिष्य नाही, हे मी माझ्यासाठी एक ब्रीदवाक्यच स्वीकारले/ठरवले आहे. अर्थातच अशा या सध्याच्या व्यामिश्रतम आणि अवास्तवाने संपृक्त वास्तवाच्या कालपर्वात मला यथाविहित व यथाशक्ती मार्गदर्शन करू शकणारे मित्रवर्य व/वा मित्रश्रेष्ठ भेटावेत अशी माझी स्वाभाविकच मनिषा आहे.
            मनुष्य हा आजीवन एक विद्यार्थी असतो/असावा असे जे म्हटले जाते, ते मला सुद्धा पटते/भावते. आणि म्हणूनच मी स्वतःला नेहमीच एक विद्यार्थी समजत/मानत आलो आहे. माझ्या अशा विचार प्रक्रियेचा मी पाठलाग/अनुपालन करू लागतो तेव्हा मला जाणवते व मी तसे मानतोही, की मी अजूनपर्यंत तरी कोणत्याही एखाद्या विशिष्ट विचारवाद व/वा विचारसरणीच्या चक्रव्यूहाला शरण गेलेलो नाही. त्यामुळेच कदाचित माझ्यातील कुतूहल-वृत्ती सतत जागृत असते. याचे काही स्थलकालसापेक्ष दुष्परिणाम सुद्धा माझ्या साहित्य-प्रवासातच नव्हे तर जीवन-प्रवासातही अनाहूतपणे जाणवत असतात. तथापि हे तथाकथित दुष्परिणाम मला मागे न खेचता माझ्या पुढ्यातील तद्जनित अडसर व अडथळ्यांवर मात करण्यास मला साह्यभूतच ठरत असतात, मला आव्हानित करीत असतात. 
       माझ्या अशा या व्यामिश्रतम विचारधारेच्या प्रवाहात मी बुडून, माझ्या नाकातोंडात असहमतीचे कटूजल जाऊन मी घाबरून, गुदमरून जाऊ नये म्हणून मला यातून सहीसलामत पार पाडण्यात माझ्या काही मित्रवर्य व मित्रश्रेष्ठांचे मार्गदर्शनात्मक साह्य मला लाभू शकले हे माझे परमभाग्यच. अशा माझ्या या विचार-प्रवासात ज्या समक्ष/परोक्ष व्यक्तींचे सहकार्य व मित्रवत मार्गदर्शन मला लाभू शकले त्या मित्रवर्य व मित्रश्रेष्ठांत जागतिक ख्यातीचे भाषाविज्ञानी डाॅ.अशोक केळकर, सुप्रसिद्ध विचारवंत व समीक्षक/साहित्यिक डाॅ.म.सु.पाटील आणि सुप्रसिद्ध कविताविमर्शक प्रा.पुरुषोत्तम पाटील या तीन निसर्ग-शरण झालेल्या मान्यवरांचा समावेश होतो.
           शिवाय यात अजून एका मान्यवरांचे अप्रत्यक्ष सहकार्य व मित्रवत मार्गदर्शन मला लाभू शकले ते डाॅ.प्रभाकर बागले होत. या चौघांपैकी कोणालाही मी माझे गुरुवर्य मानत नसून मित्रवर्य व/वा मित्रश्रेष्ठ असेच मानत/समजत आलो आहे. या चौघांपैकी प्रथम नमूद तीन, माझे प्रत्यक्षाप्रत्यक्ष मार्गदर्शक/मित्रवर्य/मित्रश्रेष्ठ आता आज हयात नाहीत. हे तीनही आदरणीय मान्यवर हयात असेपर्यंत दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी त्यांना चलभाषद्वारे माझा सादर प्रणाम कळवीत असे. या तिन्ही मान्यवरांसोबत माझे काही मूलभूत मतभेद सुद्धा होते. त्यासंदर्भात माझे त्यांच्याशी वैचारिक स्वरूपाचे पत्र-भांडण सुद्धा होत असत. असे असले तरी त्यांच्या-माझ्यात कधीच मनभेद मात्र झाले नाहीत. त्या तिघांनी आपले अनन्यसाधारण असे जागतिक ख्यातीचे आवरण सहज बाजूला सारून अगदी शेवटपर्यंत माझ्यासारख्या एका सामान्य वाचकावरील/माझ्यावरील अकृत्रिम लोभ व स्नेह कायम सहृदयपणे प्रदर्शित करून मला उपकृत करून ठेवले आहे. या तिघांपैकी कोणाशीच किंवा चौथे डाॅ.प्रभाकर बागले यांच्याशी सुद्धा माझी प्रत्यक्ष समोरासमोर भेट झालेली नव्हती/नाही, माझ्या-त्यांच्यात फक्त लिखित पत्रव्यवहारच होता. त्या पत्रव्यवहारातूनच माझी त्यांच्याशी 'भेट' व्हायची, जी माझ्यासाठी आजही तितकीच ताजी आणि महत्त्वाची ठरत/ठरली आहे. 
      या माझ्या चार मित्रवर्य/मित्रश्रेष्ठांपैकी सध्या हयात असलेल्या डाॅ.प्रभाकर बागले यांचा "वर्णमुद्रा"च्या मार्च-एप्रिल 2024च्या अंकात प्रकाशित लेख (ज्ञानर्षी डाॅ.बाबासाहेब : एक अनावृत्त पत्र) वाचून/त्यात नमूद नाविन्यपूर्ण असे विचारप्रवर्तक विचार वाचून मला माझ्या आत डोकावण्याची तथा माझ्या विचारप्रवासात वाटचालीची एक पुनर्संधी लाभली व मी माझे हे मनोगत/स्वगत व्यक्त करायला जणू बाध्य झालो. 
       धन्यवाद डाॅ.प्रभाकर बागले सरांचे आणि ''वर्णमुद्रा"चे संपादक मित्रवर्य मनोज सुरेन्द्र पाठक यांचे!
¤ (#580)
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया.
(29 मे 2024)
(*उजाखा = उदारीकरण,जागतिकीकरण, खाजगीकरण)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन