(BOSS) : आरोप, आक्षेप, सल्ला-सूचना आणि साधे विधान

(BOSS : Blame(Allegation), Objection, Suggestion, Simple Statement.) 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
□आरोप, आक्षेप, सल्ला-सूचना आणि साधे विधान.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
     @ॲड.लखनसिंह कटरे. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
     जेव्हा जेव्हा एकापेक्षा अधिक व्यक्ती-व्यक्तींमध्ये संवाद/communication होतो; तेव्हा तो संवाद संप्रेषणाच्या दृष्टीने प्रामुख्याने चार प्रकारात मोडतो. व्याख्यान, प्रवचन, कीर्तन, चर्चा, साधा संवाद, भांडण,... वगैरे कोणत्याही प्रकारे होणारा संवाद हा या चार प्रकारात व्याख्यायित करता येऊ शकतो. "बोलणारी" व्यक्ती या चार पैकी कोणत्या "प्रकारात" व्यक्त होत आहे, हे "ऐकणाऱ्याला" योग्यप्रकारे ओळखता न आल्यास "बोलणाऱ्याच्या" हेतूबद्दल विचित्र शंका व अपसमज/गैरसमज "उत्पन्न" केल्या(!) जातात. आणि अर्थाचा अनर्थ होऊन "शांती-भंगा"ची व "द्वेष-निर्मिती"ची परिस्थिती उद्भवते. "बोलणाऱ्याचा" हेतू ओळखता न आल्याने, बोलणारा व ऐकणारा यांच्यातील चांगले सुविद्य संबंध सुद्धा दुरावतात/ऋणावतात आणि हे दुरावलेले/दुरावणारे संबंध एखाद्या अनंत विश्वयुद्धा(?)तही तबदील होऊ शकतात. म्हणून संवादाचे आणि संवादकाच्या हेतूचे हे प्रमुख चार प्रकार संवाद-संप्रेषणाच्या दृष्टीने समजून घेणे प्रत्येक विचारी व्यक्तीला आवश्यक ठरते, असे माझे प्राथमिक निदान आणि आकलन आहे.
    माझ्या मते संवादकाच्या हेतू-दर्शक "संवाद-निष्कर्षा"चे (संवाद-संप्रेषणाचे) प्रमुख चार प्रकार म्हणजे... 
1)आरोप (Blame/Allegation),
2)आक्षेप (Objection),
3)सल्ला-सूचना (Suggestion), 
आणि 
4)साधे विधान (Simple Statement) हे आहेत. 
(इंग्रजीतील संक्षिप्त रूप : BOSS)
      संवादकाचा हेतू पुष्कळदा, बहुतांश प्रकरणी सल्ला-सूचना किंवा साधे विधान या दोन प्रकारातच मोडणारा असतो. परंतु ऐकणाऱ्याच्या तत्कालीन मनःस्थितीच्या प्रभावात ऐकणाऱ्याला तो "संवाद" म्हणजे त्याच्यावरील आरोप किंवा आक्षेप असल्याचे वाटू लागण्याची/वाटण्याची संभाव्यता बळावते. आणि पर्यायाने असा साधासुधा, निर्भेळ व निर्विष संवाद सुद्धा ऐकणाऱ्याच्या मनात मात्र विष-निर्मितीला कारणीभूत होतो. विष-निर्मिती नंतर विष-वमन सुद्धा ऐकणाऱ्याच्या बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक पात्रतेनुसार क्रमप्राप्त(?)च ठरते. या विष-वमनाने जगात आजवर कितीतरी व्यक्ती-व्यक्ती, व्यक्ती-कुटुंब, व्यक्ती-समाज, व्यक्ती-समष्टी,... आणि देशा-देशांतीलही... सुगम-संबंध दुरावले असून दुर्दैवाने ही प्रक्रिया प्रबोधन, प्रशिक्षण आणि शुद्ध संवादनाअभावी दिवसेंदिवस फोफावतच चालली असल्याचे आढळून येते.
       रोजच्या दैनंदिन व्यक्ती-जीवनात आणि समाज-विचरणातही आपण अनुभवतो की, समाजात साधारणतः सल्ला-सूचना आणि साधे विधान असा साधा सरळ हेतू असलेल्या निर्विष व निर्भेळ संवादाचेच बाहुल्य असले व आरोप आणि आक्षेप असा विषधारी हेतू असलेल्या संवादांचे प्रमाण जरी अत्यल्प/नगण्य असले तरी सर्वच संवादांना आरोप आणि आक्षेपच समजून अविचाराने वेगवान प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या व्यक्ती आणि व्यक्ती-समूहाची संख्या मात्र आजच्या या उजाखा*प्रणित सत्योत्तरकालीन संगणकीय व कृत्रिम-बुद्धिमत्तामय युगात वाढतच असल्याचे प्रत्ययास येत आहे. 
     तसेच याला आणखी एक पक्ष/बाजू सुद्धा आहेच. काही अल्पसंख्य व्यक्ती आणि/किंवा व्यक्ती-समूह त्यांचे विखारी असलेले आरोप आणि आक्षेप प्रकारातील मत/विचार संवादताना त्यावर संवाद-संप्रेषणाच्या सल्ला-सूचना आणि/किंवा साधे विधान या प्रकाराच्या मुलाम्यात/आवरणात लपेटून व्यक्त करतात. त्यांचा हा शर्करावगुंठीत कावा ओळखून त्यांची कानउघाडणी केली तर ते आवाजी/अक्राळविक्राळ आकांडतांडव करून--- "माझ्या संवादित मत/विचारांचा चूकीचा अर्थ लावण्यात आला/येतो" अशी लंगडी आणि बहुधा छद्मी सफाई मोठ्या आवेशाने पेश करतात. परंतु त्यांच्या या कृतीने जे दुरगामी दुष्परिणाम करावयाचे ते "साधलेले" असते. अशा मूलतः अल्पसंख्य असलेल्या व्यक्ती आणि व्यक्ती-समूहाची संख्या, वर नमूद केल्याप्रमाणे, सध्याच्या या उजाखो*त्तर व सत्योत्तरकालीन संगणकीय युगात सतत वाढताना दिसून येते.      
       असे प्रकार आजच्या या उजाखा*(उदारीकरण, जागतिकीकरण, व खाजगीकरण) च्या प्रकाशात आणि सत्योत्तर (POST-TRUTH) च्या अत्याधुनिक (Ultra-Modern) आवारात कां वाढत आहेत, यावर विशेषतः समाजशास्त्रज्ञ, राजनिती-शास्त्रज्ञ आणि निष्पक्ष/निरपेक्ष न्यायविदांनी प्राथम्याने व साकल्याने अभ्यास करून यावर यथोचित तोडगा त्वरित शोधणे आवश्यक व अनिवार्य सुद्धा ठरत आहे, असे मला वाटते. म्हणूनच हा लेखन-प्रपंच!
(*उजाखा = उदारीकरण, जागतिकीकरण व खाजगीकरण)
(शब्द संख्या : सुमारे 510)
(ॲड.लखनसिंह कटरे, 
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया)(चलभाष:-7066968350/ 09.06.2019)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

सहकारी अर्थरचना : एक संक्षिप्त आकलन वगैरे (सुधारित)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)