पोवार समाज आणि सांस्कृतिक परंपरा : एक नम्र प्रकटन

*पोवार समाज आणि सांस्कृतिक परंपरा : एक नम्र प्रकटन* 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
      कोणत्याही विषयाची सखोल माहिती न घेता, अर्धवट किंवा ऐकीव ज्ञानाच्या आधारे एखाद्या समाजाच्या प्राचीनतम सांस्कृतिक परंपरेला नावे ठेवणे, अमान्य करणे किंवा तिला अयोग्य ठरवणे हे ज्ञानपरंपरेत कधीच मान्य केले गेलेले नाही/केले जात नाही. कारण अशा भ्रामक, कपोलकल्पित व अज्ञानावर आधारित टिका-टिप्पण्या, त्या सांस्कृतिक परंपरेचा धारक व पाईक असलेल्या समाजाला; त्याच्या अवनतीचे, ऱ्हासाचे व जेनेटिक अनावस्थेचे बळजबरीने/मुजोरीने डोस पाजण्याचेच द्योतक असते. 
      वस्तूतः जगातील प्राचीनतम मानला गेलेल्या ऋग्वेद या ग्रंथात ज्या समाजाला ब्रह्मक्षत्र अशी संज्ञा दिल्याचे दिसून येते, त्या संज्ञेचे कालक्रमित अवस्थांतर होऊन ते पौर, प्रवर , प्रवार, पावार व (सुमारे 1000 वर्षांपूर्वी) संस्कृतनिष्ठ परमार, प्रमार, >> पोवार, पंवार व क्वचित पवार असे संज्ञापन झाल्याचे सुद्धा या विषयातील तज्ज्ञ संशोधक-इतिहासकार मांडतात. याच समाजातील काही विदुषी महिला, ऋषी या संज्ञेला पात्र ठरून त्यांना स्फुरलेल्या मंत्रादि काव्यरचना ऋग्वेदादि ग्रंथात ग्रथित झाल्याचेही तज्ज्ञ संशोधक-इतिहासकार मांडतात/सांगतात.
         प्राचीनतम वैदिक समुदायात स्त्री नेहमीच सन्मानित राहिली असून "नारी"ला देवीच्या रूपात पूजले जात असल्याचे अनेक दाखले मिळतात. शिवाय प्रक्षिप्त व स्वार्थप्रेरित लिखाणाने, मूळ ग्रंथ विकृत करण्यात आल्याची शंका उपस्थित करण्यात येत असलेल्या 'मनुस्मृती' या ग्रंथातील नारीविषयक विचार सुद्धा यासंदर्भात विचारणीय ठरतात. त्यानुसार ---
"यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। 
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः।।" 
(अर्थात - "जहाँ स्त्रियों की पूजा होती है, वहाँ देवता निवास करते हैं और जहाँ स्त्रियों की पूजा नही होती, उनका सम्मान नही होता, वहाँ किए गए समस्त अच्छे कर्म भी निष्फल हो जाते हैं ।" - हिन्दी अनुवाद) एकंदरीत ह्या समाजात नारी ही देवीरुपात पूजली जात असल्याची बाब प्राचीनतम काळापासूनच आचरली जात असल्याचे हे स्पष्ट होत आहे.
        शिवाय पौराणिक/प्राचीन असो वा मध्ययुगीन असो, या इतिहासाचा संशोधनात्मक धांडोळा घेतल्यास त्या त्या कालावधीत सुद्धा या समाजातील महिला शक्तीचा, जीवनाच्या कित्येक क्षेत्रातील सक्रिय व सक्षम सहभाग कोणाही अभ्यासकाला सहज पडताळून पाहता येईल. यासंदर्भात प्रकर्षाने नमूद करण्यात येत आहे की, सुमारे 1000 वर्षांपूर्वी याच समाजाचा सुप्रसिद्ध घटक असलेल्या तत्कालीन चक्रवर्ती महाराजा भोज यांची पत्नी राणी लीलादेवी यांनी पतीच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदवत स्त्री-शिक्षणाबाबत उल्लेखनीय कार्य केले आहे. सम्भवतः मध्ययुगीन कालावधीत स्त्री-शिक्षणाचा पाया रचणाऱ्या त्या प्रथम भारतीय महिला असण्याची बाब तद्विषयक इतिहासकार नमूद करतात. शिवाय आजही या समाजातील आई-वडील, ज्येष्ठ-कनिष्ठ बंधू हे कन्येचे पाया पडतात, कन्येचे वय कितीही असो ती कन्या आई-वडीलांचे व ज्येष्ठ-कनिष्ठ बंधूंचे पाया पडत नाही, हे सुद्धा आवर्जून नमूद करण्यात यावे असे या समाजाचे त्यांच्या सांस्कृतिक परंपरेतील एक वैशिष्ट्य आहे.
        एवढेच नव्हे तर या समाजातील महिला शक्तीचा आधुनिकोत्तर प्रवास व प्रवाह सुद्धा त्यांच्या प्राचीनतम ऐतिहासिक वस्तुस्थितीला पूरकच असल्याचे दिसून येते. भारतातील मुंबई, पुणे, बंगलोर सारख्याच नव्हे तर विदेशी धरतीवरील अमेरिका, कॅनडा, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया सारख्याही ठिकाणच्या आयटी, वैद्यकीय, अभियांत्रिकी व स्वतंत्र व्यवसाय यासारख्या क्षेत्रात या समाजातील महिलांचे सक्षम योगदान कोणालाही अभ्यासता, तपासता येईल. शिवाय भारतातील मध्यम शहरांपासून मेट्रो सिटींपर्यंतच्या वर नमूद क्षेत्राचा आढावा घेतल्यास त्यातही या समाजातील महिलांचा सक्रिय व सक्षम सहभाग सहज दिसून येईल. एवढेच नव्हे तर भारतातील प्रशासनिक व पोलीस विषयक क्षेत्रातील या समाजातील महिला शक्तीचा सहभाग सुद्धा समजून घेता येईल. 
      असे असले/आहे म्हणून या प्राचीनतम समाजाने आपले सांस्कृतिक वैभव, आपली सांस्कृतिक परंपरा/रितीरिवाज व सांस्कृतिक वैशिष्ट्य सोडून हिमनगपृष्ठवादी अशा तकलादू व मेंदू-विज्ञानातील वैज्ञानिक वस्तुस्थितीला नाकारून उभारलेल्या भ्रमपोषक व क्षणभंगुर विचारवादाला अनुसरावे, तसेच वर्तन करावे/असू द्यावे हे जेनेटिक विज्ञानाला सुद्धा मान्य(!) नसल्याचे संशोधन रोजच पुढे येतेय. 
       यात एक बाब आणखी प्रकर्षाने नमूद करावीशी वाटते की, मी (या प्रकटनाचा प्रकटक) याच प्राचीनतम समाजाचा एक क्षुल्लकसा घटक असून, ऑक्टोबर 2008 ते डिसेंबर 2012 या कालावधीत माझ्यावर यमराजाचे जे विविध गंभीरतम असे अटॅक्स (Attacks) झालेत, त्यांना यशस्वी पद्धतीने तोंड देत व त्या सर्व अटॅक्सना परतवून लावत, आधुनिकोत्तर (सत्यवानाच्या) सावित्रीपणाचे यशस्वी, सुफल उदाहरण स्थापित करणारी/केलेली माझी पत्नी सुद्धा या प्राचीनतम समाजातील महिलाशक्तीची एक साकार वस्तुस्थितीच सिद्ध करती झाली आहे. त्यामुळेच माझ्या फेसबुक पेजवर एके ठिकाणी एका अनभ्यासक प्रतिक्रियकाच्या प्रतिक्रियेतील, ... 'अर्धांगिनीने लग्नाच्या वर्षगांठ प्रसंगी पतीचे पाया पडण्याची कृती पटली नाही' ... या आशयाचे ||(पण पतीनेही अभिवादन केल्याच्या कृतीचा जाणीवपूर्वक उल्लेख टाळून)|| केलेले विधान, या समाजाच्या प्राचीनतम सांस्कृतिक परंपरेचा अज्ञानमूलक असा विपर्यास करणारे असून वस्तुस्थितीच्या व तद्विषयक अभ्यासातील अज्ञानाच्या भारामुळेच उगवले असावे असे सविनय प्रकट करण्यात येत आहे. कृपया कोणीही अन्यथा न घेता या समाजाच्या व तत्संबंधित येथे नमूद विषयाच्या, प्राचीनतम ते अद्यावत, ऐतिहासिक वस्तुस्थितीच्या प्रकाशात, अभ्यासाचा प्रयास करावा, (व नंतरच ‘अभ्यासोनी प्रकटावे’) असे मी नम्रपणे सुचवू इच्छितो. 
¤ (#675)
@ॲड.लखनसिंह कटरे.
(03.06.2024)
~~~~~~~~~~~~||ॐ||~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन