ॲब्सर्डिझम आणि मनुष्याचे "असणे".....!

Adv.Lakhansingh Katre
ॲब्सर्डिझम आणि मनुष्याचे "असणे".....!
December 21, 2020
□मित्रवर्य गणेश कनाटे द्वारा संपादित व मित्रवर्य मनोज पाठक द्वारा प्रकाशित "बेकेट : आय डोन्ट नो म्हणतो म्हणून" हे पुस्तक वाचताना......... व त्यानंतर......!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
👇
*ॲब्सर्डिझम आणि मनुष्याचे "असणे".....!*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
         वेळेचा छोट्यात छोटा अंश, सेकंदाचा कोट्यांश किंवा त्यापेक्षाही कितीतरी पटीने छोटा वेळांश/काळांश सुद्धा कायम स्थिर नसतो, तो सतत व कायम परिवर्तनमय असतो. अशा परिवर्तनमय वेळांश/काळांश बद्दल किंवा या काळांशात घटित होणारा/झालेला कोणताही प्रसंग, घटना, ..... काहीही बद्दल "मी जाणतो" असे विधान करणारी व्यक्ती सपशेल खोटे(!) बोलत असते. वस्तूतः "मला काहीही माहिती नाही" -- "I do not know." हेच विधान काही प्रमाणात तरी वस्तुस्थिती-निदर्शक असते. कारण "जाणणे" ही संकल्पनाच ॲब्सर्ड असून तिला यथार्थ स्वरूपात परिभाषित करताच येत नाही. तसेच मानवी जीवन सुद्धा Absolute/निरपेक्ष नसून "सापेक्ष"शील/(Relative to some known/unknown references) असल्याने ते सुद्धा ॲब्सर्डच आहे, हे मला पटते. 

     सॅम्युएल बेकेट व त्याचे विचार/लिखाणाबद्दल बोलताना डाॅ.दिपक बोरगावे लिहितात की, "अनर्थकता (absurdity) ही मानवी अस्तित्वाला घेरून राहिली आहे. एक chaos किंवा अनाकलनीय विसंगतता हा एक छळ (anguish) आहे जगण्याचा, यातून आपली सुटका नाही. ... ॲब्सर्डने मानवी जीवनातील अतार्किकता, निरर्थकता, विसंगती, शून्यवाद जरी मांडला असला तरी प्रामुख्याने त्याने मानवी जीवनाच्या आशा, आकांक्षा आणि सकारात्मकता या मूल्यांना अधोरेखित केले आहे, हेही लक्षात घ्यावे लागते."

     एकंदरीत प्राचीन भारतीय संस्कृतीतील "मी कोण?" या अनादि-अनंत प्रश्नाला सुद्धा ॲब्सर्डिझमची ही संकल्पना संपूरक असल्याचे जाणवू(?) लागते. या आदिम/अनादि-अनंत प्रश्नाचे एकमेव उत्तर "अहं ब्रह्मास्मि" असे सांगितले गेले/जात असले तरी "ब्रह्म" ही संकल्पना निर्विवादपणे अजूनही स्पष्ट झालेली/करण्यात आलेली नाही किंवा निदान मला तरी तसे निदर्शनास सुद्धा आलेले नाही. म्हणजे "ब्रह्म" ही संकल्पना सुद्धा ॲब्सर्डच म्हणता येईल की!

      मानवी जीवनात घडणाऱ्या कितीतरी घटना ह्या फक्त आणि फक्त ॲब्सर्ड याच नावाने संबोधित व परिभाषित करता येतील, अशा असतात. कित्येक परिणाम हे कोणत्याही प्रकट/स्पष्ट कारणाशिवाय घटित होतात, तेव्हा आपण अक्षरशः गोंधळून जातो. भौतिकशास्त्रातील हायझेनबर्ग-आदि वैज्ञानिकांनी प्रसृत केलेले "अनिश्चिततेचे तत्त्व" कोणत्याही मनुष्याच्या जीवनात सुद्धा कितीदा तरी अनुभवायला येतात. अशा अनाकलनीय/अतार्किक घटना घडतात/घडल्या असतात, तेव्हा त्यांना परिभाषित करण्यासाठी "नियती"सारख्या दुसऱ्या एका ॲब्सर्ड संकल्पनेचाच आश्रय घ्यावा लागतो.

     माझ्या मराठी/हिंदी/इंग्रजी च्या विविध साहित्य-वाचनाच्या आणि अल्पस्वल्प लिखाणाच्या प्रवासात मला हायडेगर, चाॅम्स्की, देरिदा सारखे काही पाश्चात्य तर चिं.त्र्यं.खानोलकर(आरती प्रभू), मर्ढेकर, ग्रेस(माणिक गोडघाटे), विलास सारंग, जी.ए., ....... सारखे काही मराठी साहित्यिक, विचारवंत, तत्त्वचिंतकांचे थांबे लागले असले तरी अंतिम लक्ष्य काय/कोठे/कोण याचा मला थांगपत्ताच लागत नव्हता. माझ्या अल्पस्वल्प वाचन-लेखन प्रवासादरम्यान मी "विश्रांती व तकव्या"साठी वापरलेले किंवा मला भेटलेले थांबे मला काही ना काही अवश्य देत गेले असले तरी माझ्या समग्र वृत्तीच्या विचार-पूर्वजांशी मात्र माझी ओळख होऊ शकली नव्हती. आणि त्यामुळे मला माझी "पहचान"/"ओळख" पटवताना खूपच अडचणीचे व आव्हानात्मक ठरायचे. मला अशी पहचान/ओळख संप्रेषित करताच येत नसल्याने किंवा अशाप्रकारे "संप्रेषण" साधण्यासाठी माझा "अभ्यास" कमी पडत असल्याने, विशेषतः मराठी साहित्य जगतात मी परका, उपरा, कच्चा, नवशिक्याच ठरू लागलो होतो.

       माझ्या अशा या असमंजस व डावाडोल अवस्थेत जुलै-ऑगस्ट-2019 दरम्यान सर्वश्री.वसंत आबाजी डहाके, मनोज पाठक, दा.गो.काळे, गणेश कनाटे, दिनकर मनवर, ... हे माझ्या गावी बोरकन्हारला आले व मला त्यांच्यासोबत सुमारे पाच-सात तास घालवता आले. याच भेटीतून या मंडळींनी सुरू केलेल्या ज्ञानयज्ञातून उगवलेल्या सॅम्युएल बेकेट च्या "परिचयात्मक" चर्चासत्र-->>त्याचे पुस्तक बाबत माहिती मिळाली. ते पुस्तक प्रकाशित होताच मी ते मागवले व दि.04.10.2019 पासून ते पुस्तक "वाचू" लागलो. आणि आश्चर्यच घडले.

       माझ्या वृत्तीचा माझा लांबचा विचार-पूर्वज तत्त्वज्ञ-चिंतक-लेखक-कवी-नाटककार सॅम्युएल बेकेट हा माझ्यासारख्या त्याच्या अतिदूरच्या अल्पज्ञ विचार-वंशजाला "भेटला." ॲब्सर्डिझम हा माझ्या जीवनातील एक वारंवार उद्भवलेला प्रसंग-संघात असल्याने मला बेकेट माझा "संगी"च वाटला व माझ्या या "संगी"च्या भेटीने मी अक्षरशः पुनरूज्जीवितच झालो.

      1996-97 च्या दरम्यान मी तत्कालीन भंडारा या अविभाजित जिल्ह्यातील अर्जुनी/मोरगांव या तालुकास्थळी तालुका सहकार निबंधक या राजपत्रित पदावर सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचा तालुकाप्रमुख म्हणून कार्यरत होतो. (जून-1995 ते फेब्रुवारी-2003 पर्यंत दीर्घ कालावधीकरिता मी तेथे कार्यरत होतो!!!) जवळच्या/लगतच्या लाखांदूर तालुक्यातील सहकार निबंधक निवृत्त होत असल्याने तेथील अतिरिक्त प्रभार कोणाला द्यावा, याबाबत भंडारा येथील जिल्हा सहकार निबंधकांच्या कार्यालयात खल सुरू होता. कारण लाखांदूर तालुका सहकार निबंधकांच्या कार्यालयात कार्यरत एक अधीनस्थ तृतीय श्रेणीचा कर्मचारी अतिशय वाह्यात, भ्रष्टाचारी, शिवीगाळसमृद्ध, अरेरावीसंपन्न, खोट्या/फसव्या तक्रारींचा तक्रारसम्राट,...... अशा विविध (ऋणात्मक) वैशिष्ट्यांनी विभुषित असल्याने शिवाय त्याने निवृत्त होऊ घातलेल्या सहकार निबंधकाला कार्यालयातच, त्यांच्या कक्षातच आई, बहीण, पत्नी, कन्या यांच्या नावाने अत्यंत अश्लील शिवीगाळ केल्याचे ऐकिवात असल्याने, तेथील अतिरिक्त प्रभार घ्यायला कोणताच तालुका सहकार निबंधक तयार नव्हता. साधारणपणे लाखांदूर तालुक्याचा अतिरिक्त प्रभार पवनी किंवा साकोली या लगतच्या तालुक्यांतील संबंधितांकडे सोपविण्याची अलिखित प्रथा होती. पण पवनी व साकोली येथील तालुका सहकार निबंधकांनी आपली असमर्थता दर्शविल्याने शेवटी मला न विचारताच व मला विश्वासातही न घेता तो अतिरिक्त प्रभार माझ्याकडे/अर्जुनी-मोरगांव कडे सोपविण्यात आला.

     मी माझ्या स्वभावानुसार कोणतेही आढेवेढे न घेता तो अतिरिक्त प्रभार स्वीकारला व माझ्या पद्धतीने तेथील कारभार पाहू लागलो. लवकरच मला त्या कर्मचाऱ्याच्या पूर्वघोषित ऐतिहासिक इतिहासाच्या पुनरावृत्तीचा अनुभव येऊ लागला. मी माझ्या परीने त्याला समजावण्याचा, त्याला सांभाळून(?) घेण्याचा प्रयत्न करू लागलो. पण शेवटी ते घडलेच, ज्याची सगळ्यांना भिती वाटत होती. भंडारा जिल्हा सहकार निबंधक या जिल्हाप्रमुखांच्या कार्यालयात भर मासिक सभेत, सर्व तालुका सहकार निबंधकांच्या उपस्थितीत त्या कर्मचाऱ्याने मला अकारणच आई-बहिणीवरून शिवीगाळ केली. मला अनावर क्रोध येऊनही मी अगदी महत्प्रयासाने शांत होतो. कारण मी त्यात सहभाग घेतला(?) असता तर हाथापायीपर्यंत पाळी येऊन परिस्थिती आणखी चिघळली असती. अशा या संपूर्ण एपिसोड दरम्यान सभेत उपस्थित सारे अधिकारी/कर्मचारी मात्र भीष्म-द्रोणसारखे मूक होऊन बघत होते, कोणीही त्याला टोकण्याची व अडवण्याची हिंमत करू शकला नव्हता.

     शेवटी मी हे प्रकरण रेकाॅर्डवर घेऊन त्या कर्मचाऱ्याच्या शिस्तभंग/निलंबनाचा प्रस्ताव संपूर्ण पुरावे व आवश्यक कागदपत्रांसह तयार करून जिल्हा सहकार निबंधक कार्यालयात पुढील सबमिशनसाठी सादर केले. ते सर्व दृष्टीने परिपूर्ण असलेले प्रकरण त्यातील काही महत्वाची कागदपत्रे गहाळ(?) होऊन त्याच कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी माझ्याकडे वारंवार परत यायचे. म्हणजे "त्या" कर्मचाऱ्याची पोहोच(?), मैत्री(?), पाठिंबा-शक्ती किती जबरदस्त(?) होती व वरीष्ठ कार्यालयातही "ती शक्ती" कशी कार्यान्वित(?) होती, हे मला खूप खूप आश्चर्याचेच वाटले. जिल्हा सहकार निबंधकांना या बाबीची कल्पना दिल्यावरही ते प्रकरण नियोक्ता अधिकारी म्हणून विभागीय प्रमुख असलेल्या विभागीय सहकार निबंधक कार्यालयात पोचण्यासाठी सुमारे सात-आठ महिने लागले होते.

      विभागीय कार्यालयाचे तत्कालीन प्रमुख माझ्या चांगल्या संबंधातील व परिचयाचे असूनही तिथे ते प्रकरण बाजूला पाडण्यात आले. मी सतत पाठपुरावा करूनही त्यावर कोणतीही कार्यवाही होतच नव्हती. इकडे तो कर्मचारी सांगायचा की, ते विभागीय कार्यालयाचे प्रमुख त्याचे लंगोटिया-यार व दारू-मित्र असून कितीही प्रकरण पाठविले तरी काहीच होणार नाही. त्याच्या या बरळण्यातील तथ्य मात्र आश्चर्यकारकच रित्या सत्य ठरू लागले होते. अखेर लवकरच ते विभागीय प्रमुख बदलून त्याठिकाणी पुण्याहून दुसरे अधिकारी बदलून आले. आणि अखेर त्या प्रकरणाला चालना मिळून चौकशी कार्यवाही सुरू झाली. पुढे काय झाले, हे मी सांगू इच्छित(??) नाही.

       वर नमूद भंडारा जिल्हा कार्यालयातील शिवीगाळ ते चौकशी सुरू होणे, या कालावधीत त्या कर्मचाऱ्याने मी/स्मरणलेखकच कसा भ्रष्टाचार करतो, याचे खोटे, छद्मी, प्रच्छन्न व भ्रामक पुरावे तयार करून माझ्या विरोधात तक्रारींचा सपाटाच सुरू केला. त्यानुसार (1)जिल्हा सहकार निबंधक, (2)जिल्हाधिकारी, (3)जिल्हा पोलीस अधीक्षक, (4)एसीबी चे अधिकारी, (5)सहकार आयुक्त, (6)सहकार सचिव, (7)राज्यपाल, (8)प्रधान मंत्री-कार्यालय व या सर्वात हाईट म्हणजे (9)राष्ट्रपती-कार्यालय या सर्वांकडून माझी सखोल चौकशी करण्यात आली. (अनावश्यक व निराधार अशा जीवघेण्या चौकशीच्या जाचाला कंटाळून मला एसीबी च्या चौकशी अधिकाऱ्यांना जीवनात प्रथमच मोठी बक्षीसी(?) देणे भाग पडले होते. त्यासाठी माझ्या वडीलांनी मला आर्थिक मदत केली होती.)

          अशातच मी दिवाळी साठी ट्रेन ने सपरिवार गावाकडे जात असताना माझ्या संपूर्ण परिवाराला संपवण्यासाठी सुपारी घेतलेल्यांनी आम्हाला ट्रेनमध्ये घेरले. मी काॅलेज मध्ये शिकत असताना विद्यार्थी निवडणूकीदरम्यान मी ज्या टीम(?)चा सहनायक होतो, त्या टीममधील काहींची दुसरी एक सुपारी टोळी कार्यरत होती. त्या टोळीचा नायक, माझा काॅलेजचा जुना मित्र सुद्धा योगायोगाने त्याच ट्रेनमध्ये त्याच डब्यातून प्रवास करीत होता. अखेर त्याच्या मदतीने माझ्या परिवाराला जीवदान मिळू शकले. या घटनेनंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने एक महिना सुटी घेऊन मला माझ्या खेडेगावातच थांबावे लागले होते. मुलांची शाळा सुद्धा महिनाभर बुडवावी लागली होती. अखेर माझ्या पत्नीच्या हिंमतीने मी आपल्या कामावर रूजू झालो. पण मी कार्यालयात, दौऱ्यावर, लाखांदूर ला जाताना माझ्या स्कूटरवर माझ्यासोबत बाजार समितीचा एक हट्टाकट्टा कर्मचारी (सोबत) ठेवायचो.

     इतकेच नव्हे तर येथे सांगताच येणार नाहीत असे अतिशय खराब, गंभीर प्रसंगांना सुद्धा मला व माझ्या संपूर्ण कुटुंबाला या प्रकरणी सामोरे जावे लागले. नागपूरहून प्रकाशित होणाऱ्या एका हिंदी साप्ताहिकात माझ्याविरोधात खोट्यानाट्या बातम्यांची लेखमालिकाच प्रकाशित होऊ लागली होती. कितीही साधार निवेदन/खुलासे दिले तरी ती लेखमाला थांबली/थांबत नव्हती.

     या साऱ्या एपिसोडची यथार्थ कारणमीमांसा कोणाला करता/सांगता येईल काय? या साऱ्या एपिसोडला एक ॲब्सर्ड घटित किंवा घिस्यापिट्या शब्दात नियती शिवाय दुसरा योग्य शब्द आहे काय, कोणत्याही भाषेत? या एपिसोड वर आधारित "आदिम प्रकाशचित्रे" हा माझा खूप नावाजला गेलेला ग्राफिक कवितासंग्रह प्रसिद्ध आहे.

     अशाच किंवा यापेक्षाही भयानक व गंभीर/जीवघेण्या अशा आणखी चार-पाच घटना (घटिते) माझ्या जीवनात आजपर्यंत घडल्या आहेत. (त्याबद्दल पुन्हा कधीतरी!) त्या घटितांमागील यथार्थ कारणमीमांसा करताच येत नाही. त्यासाठी ॲब्सर्ड व/वा नियती या शब्दांशिवाय अन्य योग्य शब्द मला अजूनही मला ज्ञात असलेल्या कोणत्याही भाषेत आढळून आलेले नाहीत.

     माझ्या जीवनातील अशा अतार्किक, अनाकलनीय, अकारणीय, निरर्थक, विसंगती-संपृक्त, ... घटनांच्या बाहुल्यामुळेच कदाचित माझ्या लिखाणात ॲब्सर्डिझम असतोच असतो. आणि माझ्या अशा लिखाणाला सॅम्युएल बेकेट सारख्या माझ्या दूरच्या विचार-पूर्वजाचा साधार पाठिंबा मिळवून देऊन मी बेकेटचा अतिदूरचा विचार-वंशज आहे, याची मला जाणीव करून दिल्याबद्दल मी गणेश भाऊ, मनोज भाऊ आणि त्यांच्या टीम-टोळी(???)चा ऋणी आहे व सदैव ऋणी राहीन. (#1270)

@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया.
(06.10.2019)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

सहकारी अर्थरचना : एक संक्षिप्त आकलन वगैरे (सुधारित)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)