"पोवारी" बोली/भाषेविषयी.... : एक संक्षिप्त टिपण
*"पोवारी" बोली/भाषेविषयी.... : एक संक्षिप्त टिपण*
******************************************
(Revised on 17.06.2024)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
@पूर्व विदर्भातील झाडीपट्टीचे मुख्य जिल्हे म्हणजे भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, तथा नागपूर, वर्धा जिल्ह्यांचा काही भाग आणि जुन्या सी.पी.आणि बेरार मधील तथा आताच्या मध्यप्रदेशातील बालाघाट व सिवनी ह्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात झाडीबोली खालोखाल बोलली जाणारी बोली/भाषा म्हणजे ही प्राचीनतम "पोवारी" बोली/भाषा होय. या पोवारी बोली/भाषेत भोयरी/पवारी बोलीचाही समावेश केल्यास ह्या दोन्ही बोली बोलणाऱ्या पोवार व भोयर/पवार समाजाची या भागातील लोकसंख्या दुर्लक्षित करता येणार नाही इतकी मोठी आहे. यातील भोयरी/बोली बोलली जाण्याचे प्रमुख स्थान म्हणजे नागपूर, वर्धा हे महाराष्ट्रातील तथा बैतुल व छिंदवाडा हे मध्यप्रदेशातील जिल्हे आहेत. पोवारी आणि भोयरी/पवारी(?) या एकाच मूळ समुहाच्या बोलीभाषा आहेत की हे दोन्ही समूह/समाज मूलतः वेगवेगळे आहेत याबद्दल तद्विषयक संशोधकांमध्ये प्रामाणिक मतभेद असून त्यात काही सूक्ष्म व/वा मोठे फरक कालांतराने व स्थलभेदाने पडले आहेत किंवा कसे हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे. यासंदर्भात तद्विषयक प्रामाणिक व वास्तविक संशोधनाला आता कुठे प्रारंभ झाला आहे. तद्विषयक दोन भिन्नभिन्न मत असून त्याबरहुकुम पुढील संशोधनाची दिशा निश्चित होणार आहे/व्हावी. [यासंदर्भात सध्यातरी सक्षम व बिनतोड असा (सकारात्मक/नकारात्मक) पुरावा मिळू शकला नसला तरी काही प्रामाणिक संशोधकांना गवसलेल्या प्राचीन ग्रंथातील विश्लेषणात्मक आधारावर या दोन्ही समाजातील फरकच सध्यातरी दृष्टिगोचर होत असल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. तथापि इतिहासाचे संशोधनात्मक पुनरावलोकन करणे क्रमप्राप्तच असून माहीत असलेल्या जुन्या माहितीबाबत नवीन तथ्ये सापडली, तर त्या माहितीत भर घालता येते आणि अगोदरच्या माहितीचे विश्लेषण अधिक चांगल्या आणि कधी कधी पूर्णपणे वेगळ्याही पद्धतीने करता येते, हे ऐतिहासिक संशोधनाचे तथ्यात्मक रूप तद्विषयक संशोधकांचे जणू ब्रीदवाक्यच असते, हे विसरता कामा नये.]
भारत सरकारच्या सर्वेक्षणानुसार हिंदी ची उपभाषा म्हणून पोवारी बोलीचा/भाषेचा उल्लेख भाषासूचीत केलेला आहे. त्यानुसार पोवारी बोलणाऱ्या भाषकांचा क्रमांक 42 वा असून 38-40(?) लक्ष लोकसंख्या असलेल्या पोवार समाजातील 4,25,745 पोवार लोक बोलचालीत अजूनही पोवारी बोली/भाषेचा वापर करतात. (ही आकडेवारी जुनीच असून अप्रमाणित असावी अशी शंका सुद्धा व्यक्त होत आहे.)
पोवारी बोली/भाषेवर सर्वप्रथम इंग्रजी भाषातज्ज्ञ सर जाॅर्ज अब्राहम गियर्सन यांनी संशोधन केलेय. दुसरे इंग्रजी विद्वान आर.व्ही.रसेल यांनी त्यांच्या "CASTS AND TRIBES OF C.P. AND BERAR" या ग्रंथात पोवारी बोली/भाषेचा आणखी थोडासा अभ्यास मांडला. नागपूर विद्यापीठातील डाॅ.सु.बा.कुलकर्णी यांनी प्रथमच, 1972 मध्ये पोवारी बोली/भाषेचा शास्त्रोक्त अभ्यास करून Ph.D. साठी प्रबंध सादर केला व त्यांना नागपूर विद्यापीठाद्वारे ती पदवी प्रदान करण्यात आली. 1999 मध्ये डाॅ.मंजू अवस्थी यांनी बालाघाट जिल्ह्यातील बोलींचा (पोवारी ही मुख्य बोली) अभ्यास सादर करून रायपूर विद्यापीठाची D.Lit. पदवी प्राप्त केली. तथापि त्यांच्या तद्विषयक काही काल्पनिक व निराधार निष्कर्षांवर साधार व सडेतोड आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी आपले ते काल्पनिक व निराधार निष्कर्ष विनाशर्त परत घेतले आहेत. या कार्यात पोवार समाजातील सुविद्य जाणकारांनी व महनीय व्यक्तींनी अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे. याशिवाय नागपूर विद्यापीठाचे निवृत्त डीन डाॅ.ज्ञानेश्वर टेंभरे यांनी 2011 पासून पोवारी बोली/भाषेचा भाषावैज्ञानिक पद्धतीने अभ्यासाचा विडा उचलला असून त्यांनी "पवारी ज्ञानदीप" हा अतिशय महत्वाचा असा आधार-ग्रंथ सिद्ध केला आहे. नागपूरचेच स्व.जयपालसिंह पटले यांनी "पवार गाथा" तथा अन्य 5-6 पुस्तके पोवारी बोली/भाषेत प्रकाशित/अनुवादित केली आहेत.
पोवारांचा विदर्भ संपर्क ही एक दीर्घकालीन स्थलांतराची प्रक्रिया आहे. अकराव्या शतकात नागपूरकडील प्रदेश मध्यप्रदेशातील धारच्या परमारवंशीय राजांच्या (राजा भोजशी संबंधित) मांडलिकीखाली होता. याची साक्ष भांदक येथील शके 1068 च्या नागनाथ मंदिरातील मराठी शिलालेखात आढळून येते. या शिलालेखात धर्मशील राजा पवार याने मंदिराचा जीर्णोद्धार व नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली असे म्हटले आहे. नागपूरकर भोसल्यांच्या कारकीर्दीत तर अनेक पोवारांनी कटकपर्य॔त स्वा-या करून समशेर गाजविली आणि आपण शूर राजपूत/क्षत्रियांचे वंशज आहोत हे सिद्ध केले. समशेरीप्रमाणेच नांगर धरण्यातही पोवारांचा हात कोणी धरणार नाही. त्यांनी पूर्व विदर्भात व पश्चिम मध्य प्रदेशात गावोगावी तलाव बांधून वैनगंगेचे खोरे सुजलाम आणि सुफलाम करून टाकले आहे.
पूर्व वैदर्भीय पोवारांच्या या दीर्घकालीन विदर्भ वास्तव्यामुळे त्यांच्या भाषेचा मूळ तोंडवळाच बदलून गेला आहे. तिचा घाट जरी माळवी असला तरी थाट मात्र नागपूरी (झाडीबोलीय) आहे.
पोवारी बोली/भाषेची स्वर व्यवस्था अधिकांश हिंदी भाषेप्रमाणेच आहे. या बोलीत "ळ" हा ध्वनी नाही. मराठी ऋणशब्दातील "ळ"काराचा "र"कार करण्याची प्रवृत्ती दिसून येते. यामुळे होळीची होरी आणि शेळीची सेरी होते. कधीकधी "ळ" चा "ड" देखील होतो. उदा. उथळ चे उथड व धर्मशाळा चे धरमसाडा असे रूप होते. शब्दारंभीच्या "व" चा "ब" होतो. जसे:- वेळू चा बेरू, वाळू चा बारू, विहीर चा बिहीर इ.
पोवारांच्या बोली/भाषेत "श" हा ध्वनी नाही. "श"काराचा "स"कार करण्याची प्रवृत्ती दिसून येते. त्यामुळे शिंगाचे सिंग व शेंगेचे सेंग होते. दन्त्य व तालव्य स्पर्शसंघर्षी ध्वनींमध्येही व्यवच्छेद आढळत नाही. प्रायः मुक्त-परिवर्तनच आढळते. यामुळे मराठीतील चांदी, चाळण, चवळी, जांभई, जावई, जुना, झाकणी यासारखे शब्द पोवारीत चांदि, चारनि, चवरि, जांबइ, जवाई, जुनो, झाकनि याप्रमाणे उच्चारले जातात. या बोली/भाषेत "ण" हा ध्वनी नसल्याने बाणाचा बान बनतो व वेणीची बेनी बनते. शब्दारंभीच्या ए आणि ओ या स्वरांना य आणि व असे आगम होतात. यामुळे एकाचा येक व ओठाचा वठ होतो.
पोवारीत हिंदीप्रमाणे पुल्लिंग आणि स्त्रीलिंग अशी लिंगे आहेत. या बोली/भाषेत आंगन, कनिस, घुबड, चमडा, जंगल, जांबुर इ. मराठीत नपुसकलिंगी असणारे शब्द पुल्लिंगी आहेत. तर नाक, पदक, परसाद, सरन, मालिस यासारखे शब्द स्त्रीलिंगी आहेत. सामान्यतः पुल्लिंगी नामे अकारान्त व स्त्रीलिंगी नामे इकारान्त असतात. विशेष म्हणजे, या बोली/भाषेत नामांना वचनविकार होत नाही. यामुळे येक घर, दुय घर, येक टुरा, दुय टुरा असेच अविचल रूप राहते. नामांचे सामान्य रूपही होत नाही. षष्ठीचा प्रत्यय "को" तर सप्तमीचा प्रत्यय "मा" असा आहे. जसे:- उनको नवकर, वको भाई, हातमा, बगीचामा, इ.
अशा या ऐतिहासिक पोवारी बोली/भाषेतील; परंतु आधुनिक विचारधारेशी संबंधित काही कविता आता मराठीतील नामांकित नियतकालिकांतून (खेळ-39, संपादक-मंगेश नारायणराव काळे) सुद्धा प्रकाशित होऊ लागल्या आहेत. शिवाय 'प्रतिष्ठान' (संभाजीनगर), 'पंचधारा' (हैदराबाद), 'खेळ' (मुंबई/पुणे) या साक्षेपी वाचकांद्वारे वाचल्या जाणाऱ्या नियतकालिकांतून पोवार समाज व पोवारी बोली विषयक डाॅ.ज्ञानेश्वर टेंभरे व ॲड.लखनसिंह कटरे यांचे लेखही प्रकाशित झाले/करण्यात आले आहेत. अशा या धाडसी व सातत्यपूर्ण प्रयोगांद्वारे पोवार समाज व पोवारी बोली/भाषेबद्दल जाणकारांना पुढील सखोल व प्रामाणिक संशोधनाची प्रेरणा व दिशा मिळू शकेल/मिळावी अशी अपेक्षा आहे.
शिवाय राष्ट्रीय पोवारी/पवारी बोली साहित्य कला संस्कृती मंडळाची रीतसर नोंदणी करण्यात आली असून दि.03 फेब्रुवारी 2019 ला पहिले अखिल भारतीय पोवारी बोली साहित्य संमेलन तिरोडा, जि.गोंदिया येथे यशस्वीपणे पार पाडण्यात आले. कोरोना-प्रभावामुळे दि.22 मार्च 2020 ला नियोजित असलेले दुसरे संमेलन स्थगित करावे लागले. अखेर दुसरे अखिल भारतीय पोवारी बोली साहित्य संमेलन-2021 हे नागपूर येथे ॲड.लखनसिंह कटरे यांच्या संमेलनाध्यक्षत्वाखाली,19 डिसेंबर-2021 ला यशस्वीरीत्या पार पाडण्यात आले आहे. तसेच तिसरे संमेलन मध्यप्रदेशातील पांढुरणा येथे व चौथे संमेलन मध्यप्रदेशातीलच कटंगी येथे अनुक्रमे गझलकार व बहुभाषिक कवी ॲड.देवेंद्र चौधरी आणि नागपूर विद्यापीठातील निवृत्त डीन, प्राणीशास्त्र/Zoology विषयातील संशोधक/लेखक/प्राध्यापक व सुविद्य समाजसेवक डाॅ.ज्ञानेश्वर टेंभरे यांच्या सक्षम संमेलनाध्यक्षत्वाखाली यशस्वीरीत्या, (अनुक्रमे दि.11.12.2022 व दि.24.12.2023 ला) पार पाडण्यात आले आहे. अशा ह्या आजवर मुख्यतः मौखिक रूपातच काहीसे अस्तित्व टिकवून असलेल्या एका प्राचीनतम बोलीला/पोवारी बोलीला आता लिखित रूपात स्थापित/प्रस्थापित करण्याचे कार्य सुरू झाले आहे. या सर्व संमेलनात भोयरी/पवारी बोलीच्या साहित्यिकांचाही सक्रिय व सक्षम सहभाग असतो, हे अधोरेखित करणे आवश्यक ठरेल.
¤
(आधार व आभार:- डाॅ.सु.बा.कुलकर्णी, डाॅ.ज्ञानेश्वर टेंभरे, ॲड.मनराज पटले, जयपालसिंह पटले)
¤
(ता.क.:- परंतु दुर्दैवाने पद्मगंधा प्रकाशनाद्वारे प्रकाशित "भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण : महाराष्ट्र" या श्री.अरुण जाखडेजी संपादक व डाॅ.गणेश देवीजी (जागतिक किर्तीचे भाषावैज्ञानिक, संशोधक/विचारवंत) मुख्य संपादक असलेल्या ग्रंथात मात्र, आमच्या एका परम मित्रानेच अनधिकार व अनधिकृत पद्धतीने, आमच्या या "पोवारी" बोली/भाषेबद्दल काही फसव्या, भ्रामक, आभासी, त्रूटीपूर्ण, एकांगी, महत्वाच्या घटना व व्यक्तींचा (कदाचित जाणीवपूर्वक) अनुल्लेख असलेल्या, अशा बदनामीकारक नोंदी घेऊन "पोवारी" बोली/भाषेबद्दल संशोधक व विद्वानांमध्ये भ्रमजनक "रुप" सादर करून एक प्रमाद केलेला आहे, असे प्रथमदर्शनी दिसून येते. मी यावर दोन्ही संपादकांकडे आक्षेप नोंदविलेला असून माझा तद्विषयक पाठपुरावा सुरूआहे.)
(शब्दसंख्या : सुमारे 1230)
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902,
ता.आमगांव(SEC RLY), जि.गोंदिया
(विदर्भ-महाराष्ट्र) (सुधारित-17.06.2024)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment