आकलन : एक बहुआयामी/Multidimensional विचार प्रक्रिया.

*आकलन : एक बहुआयामी/Multidimensional विचार प्रक्रिया*
-------------------------------------------------------------
     तीन वर्षात प्राप्त करावयाची बी.एससी.(पीसीएम) ची पदवी मी पाच(🤔) वर्षात, जून-1977 मध्ये अखेर प्राप्त केलीच! नंतरच्या शिक्षणासाठी एम.एससी.(फिजिक्स) मध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याने (ही वेगळीच स्टोरी आहे!) नाईलाजास्तव मला एलएल.बी. साठी प्रवेश घ्यावा लागला. एन.एम.डी.काॅलेज गोंदिया येथे एलएल.बी. चे वर्ग सायंकाळी सहा ते नऊ असे लागायचे(!). मी एलएल.बी. चा पूर्णवेळ विद्यार्थी असल्याने मी प्रथम वर्षाच्या सुरुवातीपासूनच प्रत्येक पिरीएड ला उपस्थित राहून, माझ्यासाठी एकदम नवा असलेला, विषय पूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न करीत असे. 

     आमच्या लाॅ विभागाचे प्रमुख श्री.राव सर हे अतिशय नावाजलेले असे विधी-प्रवीण प्राध्यापक होते. त्यांचा एकही पिरीएड मी चुकूनही चुकवत नसे. अगदी सुरुवातीला त्यांनी लाॅ विषयाबद्दल जे सांगितले ते मी कधीच विसरू शकत नाही. ते म्हणाले होते की, कोणत्याही कायद्यात/अधिनियमात काय सांगितलेले/लिहिलेले आहे, हे समजून घेण्यासाठी तुमची फक्त इंग्रजी भाषेवर चांगली हुकूमत असली तरी पुरेसे आहे. तुम्ही टेक्स्ट बूक आणि काही गाईड्स वाचून, पिरीएड्स अटेण्ड न करताही, सहज एलएल.बी. उत्तीर्ण होऊ शकाल. पण कदाचित उत्तम वकील/अधिवक्ता मात्र तुम्ही बनू शकणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला कायद्यात/अधिनियमात "काय सांगितलेले/लिहिलेले नाही" हे समजून घेणे अत्यावश्यक व अनिवार्य ठरते. आणि त्यासाठी तुमची फक्त इंग्रजी भाषेवरील हुकूमतच पुरेशी नसून तुम्हाला लक्षपूर्वक सर्व पिरीएड्स सुद्धा अटेण्ड करावे लागतील.  

     माझ्या एलएल.बी. नंतर लवकरच मी एमपीएससी द्वारे निवड होऊन महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागात (तत्कालीन कृषी व सहकार विभागात) राजपत्रित अधिकारी म्हणून रुजू झाल्यावर प्रत्यक्ष कामकाज पार पाडताना, न्यायिकवत (Quasi-Judicial) बाबींचा वैधानिक निपटारा(!) करताना, राव सरांची शिकवण पदोपदी उपयोगी असल्याचे जाणवू लागले. समोर असलेल्या/आलेल्या विषयावर व प्रश्नावर/बाबीवर सुनावणी घेताना प्रत्येक पक्ष-प्रतिपक्षाचे वकील युक्तिवाद करीत तेव्हा एकाच विषयाला/एकाच प्रश्नाला/एकाच बाबीला किती विविध बाजू/पर्याय/पैलू असू शकतात व त्यांच्याकडे कसे विविध दृष्टिकोनातून पाहिले जाते/पाहिले जाऊ शकते, याची अचंबित करणारी जाणीव प्रत्यक्ष होऊ लागली. आणि राव सरांची शिकवण किती महत्त्वाची व सयुक्तिक होती हे कळू लागले. 

     सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागात तालुका प्रमुख ते जिल्हा प्रमुख म्हणून मी तीस वर्षे काम केले आहे. या दरम्यान माझ्यासमोर हजारो न्यायिकवत (Quasi-Judicial) प्रकरणे सुनावणीसाठी व निर्णयासाठी आली. या प्रकरणी पक्ष-प्रतिपक्षाकडून युक्तिवादासाठी तालुका स्तरापासून ते उच्च न्यायालयात वकीली करणाऱ्या सफलतम वकीलांचा युक्तिवाद ऐकण्याची व त्यावर त्यांना उलटसुलट संबंधित प्रश्न विचारून निर्णयाप्रत येऊन अंतिम निर्णय/आदेश पारित करण्याची संधी मला मिळू शकली, ही माझी जीवनातील ताळेबंदाची जबरदस्त संपत्तीच (Asset) ठरली आहे. या संपत्तीमुळे माझा व्यावहारिक, प्रशासनिक, वैधानिक, विचारात्मक फायदा(?) असा झाला की, मी पारित केलेल्या हजारो न्यायिकवत (Quasi-Judicial) निर्णय/आदेशांपैकी एकही निर्णय/आदेश अन्य कोणत्याही वरीष्ठ "न्यायालया"तून रद्दबातल ठरवला गेला नाही. काही निर्णय/आदेश तर मा.उच्च न्यायालयात व मा.सर्वोच्च न्यायालयातही आव्हानित झाले व तेथेही कायम ठरविले गेले. 

      माझ्या या अनुभवाचा फायदा मला माझ्या वैयक्तिक जीवनात तथा सामाजिक, सांस्कृतिक, प्रशासनिक, साहित्यिक, आध्यात्मिक, कौटुंबिक क्षेत्रातही भरपूर झाला व आताही होतच आहे. मेरे मुर्गीकी एक ही टांग, मीच तेवढा बरोबर बाकीचे चूक, मी व्यक्त केलेले मतच अंतिम त्याला आणखी एखादी दुसरी--तिसरी बाजू किंवा अन्य पर्याय/पैलू असूच शकत नाही, समोरच्याच्या म्हणण्याचा/विवेचनाचा जो अर्थ मी काढला तोच योग्य व बरोबर, माझ्या मतावर टीकात्मक बोलणारा/लिहिणारा तू कोण टिकोजीराव, ... अशा अनैसर्गिक व एककल्ली/एकतर्फी विचारवाद व विचारसरणीला मी त्यामुळे बळी पडू शकत नाही/बळी पडू शकलेलो नाही. (असे माझे नम्र आकलन आहे.)

      .... पण माझ्या "या" विचारधारेचा मात्र, मी बळी ठरू लागलो. मी एखाद्या विषयावर/बाबीवर/लिखाणादिवर व्यक्त केलेले भिन्न मत म्हणजे मतभेद असू शकतात/असतात, विभिन्न मत व्यक्त करणे म्हणजे द्वेष व/वा मनभेद नव्हे, कोणत्याही विषयाला एकाहून अधिक बाजू व पैलू असू शकतात, द्वेषमुक्त पण कठोर खंडनमंडनाद्वारे काही अस्फुट व अस्पष्ट बाबी स्पष्ट करता येऊ शकतात, वैचारिक स्वातंत्र्याच्या सौंदर्य व सातत्यावर विश्वास ठेवूनही विचार करता येऊ शकतो, DISSENT : THE VOICE OF PROGRESS, ... असे नानाविध पैलू समजून घेण्याची कदाचित क्षमता नसल्याने म्हणा व/वा तसे शिक्षणच न घेतल्याने किंवा तशी शिकवणच नसल्याने किंवा मी-पणाच्या अतिरेकी विचारपद्धतीने म्हणा, मी माझ्या काही (बोटावर मोजण्याइतक्या) निकटच्या मित्रांच्याही मित्र-यादी(!)तून अकारण(?)च बाद ठरू लागलो. एखादे मत न पटल्यास/चुकीचे वा भ्रमपूरक वाटल्यास ते मत खोडून काढण्यासाठी/खंडनमंडनासाठी कधीकधी कठोर पुरावे -- कठोर शब्दातच मांडावे लागतात, हे आजच्या आधुनिक विधीशास्त्रातीलच नव्हे तर प्राचीन भारतीय वादशैलीचेही अभिन्न अंगच आहे/होते. प्राचीन भारतीय वादशैली विश्लेषणापेक्षा संश्लेषणालाच प्राधान्य देते, ... परंतू दुर्दैवाने बहुतेकांना याची जाण/जाणीव नसल्याने भल्याभल्यांचे सुद्धा माझ्या बाबतीत अकारणच गैरसमज होतात. असे गैरसमज दूर करणे सुद्धा महाकठीण कर्म असते, हे सुद्धा ओघाने आलेच. असो.

     ...तर अशी ही एखाद्या विषय/बाबीच्या विविध (दुसरी, तिसरी, ... आदि) बाजूंच्या/पैलूंच्या आकलनाची एक संक्षिप्त अशी, माझ्या अल्पबुद्धीची, कथा/कहाणी आहे. ही कथा/कहाणी जो कोणी ध्यानपूर्वक ऐकेल/वाचेल त्याचे आकलनाचा देवाधिदेव(???) भले करो! 😀😤🤔😃 
जय आकलन-देवता!
>> माझ्या या लिखाणात भूल-चूक, अव्यापारेषु व्यापार किंवा लहान तोंडी मोठा घास या त्रयींचा आढळ आढळून आल्यास त्रिवार क्षमस्व. 
🙏🙏🙏
("...एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस आपल्याला विश्वाबद्दलच्या सगळ्या गोष्टी समजून घेणं शक्य झालं आहे असं आपल्याला वाटलं. त्याला आपण पारंपरिक नियम असं म्हणतो. पण, ... एकविसाव्या शतकात असं दिसून आलं की, ऊर्जा सुट्या पाकिटांच्या रूपात येते, ज्याला 'क्वांटा' असं म्हणतात आणि त्यातून मॅक्स प्लँक आणि इतर जणांनी नवा सिद्धांत -- 'क्वांटम मेकॅनिक्स' मांडला. यातून वास्तवाचं पूर्णतः वेगळं चित्र समोर आलं ज्यात गोष्टींना एकच एक असा एकमेवाद्वितीय इतिहास नसतो, तर प्रत्येक शक्य इतिहासाला स्वतःची अशी एक शक्यता असते. ..." -- विश्वरचनाशास्त्रज्ञ स्टीफन हाॅकिंग यांच्या या विधान-समूहाला आधाराला घेऊन, "विचार = एक ऊर्जा प्रकार", या विज्ञानसंमत बाबीनुसार सुद्धा आपण "विचारांचा विचार" करू शकलो पाहिजे, म्हणजे आपल्या नेमक्या आकलनात गफलतींचे प्रमाण ऋणावत राहील, असे माझे अल्पबुद्धीचे आकलन आहे. असो.🤔) (#865)
¤
@ॲड.लखनसिंह कटरे 
बोरकन्हार, जि.गोंदिया 
(29.08.2020)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन