दीपाली चव्हाण आणि प्रशासनिक मानसिकता...

*दीपाली चव्हाण आणि प्रशासनिक मानसिकता : एक संक्षिप्त आकलन*  
(स्वानुभवाधारित अल्पबुद्धि-आकलन !!!)
----------------------------------------------------------------
>> लेडी सिंघम म्हणून वन विभागात सुप्रसिद्ध होऊनही अखेर आत्महत्येला शरण गेलेली एक शेरनी काळाच्या पडद्याआड गेली, एवढीच छोटीशी ही कहाणी नाही. वन विभागातील सरंजामशाही व अमानुष वागणुकीचा तथा ब्रिटिशकालीन प्रशासनिक मानसिकतेचा हा परिपाक आहे. असाच एक प्रसंग माझ्या प्रारंभिक जीवनातही मला अनुभवायला मिळाला होता. झाले असे की, महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रित सेवेत येण्यापूर्वी मी शिक्षक होतो. मी ज्या आदिवासीबहुल गावात शिक्षक होतो येथील एका मुस्लिम आरएफओ ची दोन मुले माझ्याकडे गणिताच्या मार्गदर्शनासाठी येत असत. एका सुटीच्या दिवशी त्या मुलांनी आग्रहच धरला की त्यांच्या वडिलांनी मला नाश्त्यासाठी बोलावले असून मी त्यांच्या बंगल्यावर यावे. माझ्या तोळामासा तब्येतीचा हवाला देऊन अगदी साधा नाश्ता घेण्याच्या अटीवर मी त्यांच्याकडे गेलो. मुलांचे गणित शिक्षक या नात्याने आरएफओ नी माझे चांगलेच आगतस्वागत केले. व थोड्याच वेळात आम्ही नाश्ता करू लागलो. 
>> इतक्यातच जवळच्याच/परिसरातच असलेल्या कार्यालयात एक गाडी/चारचाकी आली, आणि डीएफओ आल्याची वार्ता तेथे पोचली. आरएफओ नी मला त्यांच्या घरच्या मंडळींच्या ताब्यात(!) आदरसत्काराकरिता(!) सोपवले आणि ते तात्काळ बाजूच्याच कार्यालयात निघून गेले. तेथे डीएफओ समोर आरएफओची लाचारी व मजबूरी मी तेथूनच प्रत्यक्ष पाहिली/अनुभवली. त्या डीएफओचे आरएफओ वर डाफरणे, एकेरी/घालून-पाडून बोलणे, वगैरे सुद्धा मी 'याचि डोळां याचि कानी' पाहिले व ऐकले. आणि माझ्या एमपीएससी-परीक्षांच्या यादीतून आरएफओ हे पद मी बाद करून टाकले. (त्यानंतर माझ्या सोबतचे तीन शिक्षक आरएफओ म्हणून एमपीएससी मार्फत निवडले गेले तरी माझ्या इतर पदांसाठीच्या प्रयत्नांना यश आले नव्हते. त्यामुळे मी आरएफओ ची परीक्षाच उत्तीर्ण होऊ शकणार नसल्याने मी आरएफओ होणार नाही असे (आंबट द्राक्षे?) म्हणतो, असे माझ्या काही छुप्या मित्रां(?)चे मत माझ्या कानावर आले. व केवळ हा आळ धुवून काढण्यासाठी मी आरएफओ च्या परिक्षेला बसलो व उच्च गुणांनी उत्तीर्ण सुद्धा होऊन दाखवले. पण त्या नोकरीसाठी पुढची प्रक्रिया मात्र केलीच नाही, कारण मला वन विभागातील नोकरीच नको होती. असो. ह्या विषयांतरासाठी क्षमस्व.) 
>> नंतर लवकरच मी एमपीएससी ची परीक्षा उत्तीर्ण झालो. पण पोस्टिंग देण्यापूर्वीच मला विचारणा करण्यात आली की, माझ्या पहिल्या पसंतीक्रमावरील DTO हे पद भरण्यास मा.उच्च न्यायालयाने तूर्त स्थगिती दिली असल्याने मी मा.उच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयापर्यंत पोस्टिंगसाठी थांबायला तयार आहे की मला दुसर्‍या पसंतीक्रमावरील पद स्वीकृत असेल? मी देवरी येथील तत्कालीन स्थायी आरटीओ चेकपोस्टवर जाऊन तेथील अधिकाऱ्यांना, DTO पदाच्या भरतीवरील स्थगितीबद्दल, विचारणा केली असता त्यांनी (तेथील वाहन निरीक्षकांनी) मला या पदाची प्रतीक्षा न करता पसंतीक्रमातील दुसरे पद स्वीकारण्याचा सल्ला दिला. पर्यायाने मी माझ्या पसंतीक्रमातील दुसरे पद म्हणजे तालुका सहायक निबंधक, सहकारी संस्था हे पद स्वीकृतीबद्दल कळवून त्यानुसार मे-1984 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या तत्कालीन कृषी व सहकार तथा वर्तमान सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागात रुजू झालो. अशाप्रकारे माझा महाराष्ट्र शासनाच्या प्रशासनात सहभाग/शिरकाव(?) सुरू झाला. 
>> त्यानंतर सुमारे 19 वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्याच्या व कार्यालयीन लालफितीशाहीच्या अवरोधात्मक कालावधीनंतर मार्च-2003 मध्ये माझी पदोन्नती होऊन मी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचा जिल्हा प्रमुख, डीडीआर म्हणून, निवृत्तीपर्यंत (फेब्रुवारी-2013 पर्यंत) कार्यरत होतो.
>> महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रित/तालुका प्रमुख ते जिल्हा प्रमुख पदावरील सेवेच्या सुमारे 30 वर्षांच्या कालावधीत माझा पंधरा-वीस जिल्हाधिकारी, तेवढेच जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच चंद्रपूर, गडचिरोली सारख्या आदिवासी जनता/लोकसमूह व वन विभागाचे बाहुल्य असलेल्या जिल्ह्यांत सेवा झाल्याने काही एटीसी, आरएफओ, डीएफओ, सीएफ, वगैरे पदांवरील सनदी(?) अधिकाऱ्यांशी जवळून संबंध आला. अशा या विविध सनदी(?) अधिकाऱ्यांसोबतचा माझा अनुभव मात्र, काही मोजकेच सन्माननीय अपवाद वगळता, दीपाली चव्हाणच्या अनुभवासारखाच (थोड्याबहुत फरकाने) होता. 
>> बहुतेक विविध विभागातील सनदी(?) अधिकारी "असे"(?) का वागतात, याचा मी माझ्या परीने थोडासा अभ्यास केला असता मला असे आढळून आले की, याचे मूळ हे ब्रिटिशकालीन प्रभावाने ग्रसित "प्रशासन" या मुख्यतः परकीय/पाश्चात्य संकल्पनेत व त्यानुसारच्या त्यांच्या पंचतारांकित प्रशिक्षण व्यवस्थेतच आहे. पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या सत्तांतरानंतर सुद्धा ब्रिटिशकालीन प्रशासन(?) व्यवस्थाच, फक्त नाम बदलून (आयसीएस चे आयएएस वगैरे) कायम ठेवण्यात आली. महात्मा गांधींच्या अकाली निघण्या(?)मुळे तत्कालीन शासननियंत्रकांना गांधी प्रणित ''सुशासना"चा सोयीस्कर विसर पडला व ब्रिटिशांचे जुनेच/वसाहतकालीन प्रशासन(?) मात्र कायमच राहिले. ब्रिटिशांच्या काळात सनदी अधिकारी हे ब्रिटनच्या राजा-राणीचे मालक-प्रतिनिधी/प्रतिमालकच होते. अर्थात King can do no wrong या वृत्तीने ते सर्व अधिकारी संपृक्त होते आणि त्याकाळच्या परतंत्र वस्तुस्थितीनुसार ते वाजवी सुद्धा म्हणता येईल. पण सत्तांतरानंतरही तीच प्रशासन-व्यवस्था कायम ठेवण्यात/राखण्यात आल्याने ते सनदी(?) अधिकारी लोकशाही सुशासनातील लोकसेवक न होता ब्रिटिशकालीन लोकमालकच राहिले, हे आज पदोपदी/कार्यालयोकार्यालयी पाहता व अनुभवता येते. 
>> विविध विभागातील सनदी(?) अधिकाऱ्यांचे मसूरी येथील तसेच बहुतेकदा विदेशातील "पंचतारांकित" प्रशिक्षण म्हणजे "आम्ही सर्वज्ञ आहोत" असे समजून वागण्याचा जणू एक हिडन अजेंडाच असतो. आणि तो हिडन अजेंडा दुसऱ्या शब्दात सांगावयाचा म्हणजे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष -- "All Civil SERVANTs are the KING, and KING CAN DO NO WRONG" असाच/हाच असतो. ही #BitterReality जोवर बदलत/बदलली जात नाही, तोवर अशा कितीतरी दीपाली चव्हाण (स्त्री-पुरुषही) बळी जातच राहणार. आणि ज्यांच्यामुळे असे बळी जातात/जातील त्यांचे मात्र काहीच बिघडत/बिघडविले जावू शकत नाही. काही दिवस थातुरमातुर कार्यवाही/कारवाईचा "चकवा" उभारला(?) जाईल आणि अचानक एखादे दिवशी असा "चकवा" अंतर्धान पावेल.
>> यावर एक सोपा उपाय मला सुचतो. तो असा की, युपीएससी तून उत्तीर्ण झाल्यावर सर्वच/विविध विभागातील तथाकथित सनदी(?) अधिकाऱ्यांना सध्यासारखी पंचतारांकित "मसूरी-ट्रेनिंग"(?) न देता त्यांना महात्मा गांधी, विनोबा भावे, नानाजी देशमुख, डाॅ.विकास बाबा आमटे, डाॅ.प्रकाश-डाॅ.मंदाकिनी आमटे, डाॅ.अभय-डाॅ.राणी बंग, ... सारख्यांच्या "आश्रमा"त अनिवार्यपणे "ठेवण्यात येऊन" शुद्ध भारतीय पद्धतीच्या लोक-सहभागी सुशासनाचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था व्हावी. याने शंभर टक्के बदल कदाचित नाही होऊ शकला तरी आजची सरंजामशाहीची अ-लोकशाही परंपरा हळूहळू का होईना खंडित होण्यासाठी याचा हातभार अवश्य लागेल, असे माझे अल्पमतीचे आकलन आहे.  
¤
(या संक्षिप्त टिपणात मी प्रशासनातील पुरुषी मानसिकतेचा अलाहिदा उल्लेख केलेला नाही. तो एक वेगळाच भयंकर विषप्रयोग आहे. त्यावर सुद्धा एक वेगळे टिपण लिहिण्याचा माझा मानस आहेच.) 
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
(निवृत्त डीडीआर)
बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902, जि.गोंदिया 
(09.04.2021)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन