मी : एक वाचक

*मी : एक वाचक*
~~~~~~~~~~
    1966-1968 या वर्षांत मी वर्ग 6 व 7 चा विद्यार्थी होतो. आमच्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील पाचवी व सहावीचे वर्ग जिल्हा परिषदेने शैक्षणिक सत्राच्या मध्यातच बंद केल्याने मी या कालावधीत आमच्या गावापासून 3 किमी अंतरावरील अंजोरा येथील जिल्हा परिषद शाळेत गावून पायी जाणे-येणे करीत असे. 
      याच दरम्यान माझ्या आईला असह्य दातदुखी होऊ लागली. आमच्या गावाजवळील आमगांव व गोंदिया येथे त्याकाळी दंतवैद्यकांची सुयोग्य सुविधा नसल्याने उपचारासाठी आम्ही सहकुटुंब नागपूर येथील तत्कालीन किंग्स वे रस्त्यावरील डाॅ.गुमास्ता या सुप्रसिद्ध दंतवैद्य डाॅक्टरकडे गेलो होतो. माझ्या वडिलांचे आतेभाऊ नागपूर येथील पोलीस मुख्यालयात कार्यालय अधीक्षक होते व ते रविनगरात शासकीय निवासस्थानी सहकुटुंब राहत होते. आम्ही सहकुटुंब त्यांच्याकडेच थांबलो होतो. (आज हे किती हास्यास्पद व अशिष्ट वाटते.)
       आम्ही ज्यांच्याकडे थांबलो होतो त्यांचा लहान मुलगा माझ्यापेक्षा चार-पाच वर्षाने मोठा असला तरी त्याच्यासोबत माझी गट्टी जमली. मी त्याच्यासोबत सायकलवर सीताबर्डी येथे सहज फिरायला गेलो असता मोदी नंबर तीन मधील दि न्यू बूक डेपो मला आकर्षून गेला व मी तेथून तीन-चार वह्या व एक गुरुकिल्ली खरेदी केली. त्यांनी त्यासाठी त्यांच्या बुक डेपोच्या नावाचे छापील मजकूर असलेले पुठ्ठे/कव्हर दिले, ते मला खूपच आवडले व मी दोन-तीन जास्तीचे पुठ्ठे मागितले असता माझा ग्रामीण वेश पाहून त्यांनी ते मला सहर्ष(!) दिले सुद्धा! 
      त्यानंतर आम्ही जवळच्याच हनुमान गल्लीत गेलो. तिथे एक न्यूज एजन्सी होती. (नाव आठवत नाही, क्षमस्व.) तेथे ठेवलेले विविध वर्तमानपत्रांचे व नियतकालिकांचे अंक पाहून मी हरखून गेलो व तेथून एक-दोन अंक व महाराष्ट्र टाईम्स हे वर्तमानपत्र विकत घेतले. मी 1965 पासूनच तरुण भारत, नागपूर चा नियमित वाचक असल्याने मला महाराष्ट्र टाईम्स हे नाव ऐकून/वाचून मला कदाचित माहित/ज्ञात असावे. 
        आईच्या दंतोपचारासाठी या कालावधीत आम्ही दोन-तीनदा नागपूरला जाऊन आलो. मी दरवेळेस दि न्यू बूक डेपो व हनुमान गल्लीतील ती न्यूज एजन्सी यांना भेटतच असे. एका भेटीत मी त्या न्यूज एजन्सीच्या व्यक्तीला सहजच विचारणा केली की, मला माझ्या गावात महाराष्ट्र टाईम्स कसा प्राप्त करता येईल. माझा पूर्ण पत्ता विचारल्यावर माझ्या गावात मटा मिळण्याची शक्यताच त्याने फेटाळून(!) लावली. मी त्याला विनंती केली की, किमान रविवारचा मटा मला पाठवावा, त्याची पोस्ट खर्चासह आगामी रक्कम मी मनीऑर्डरने पाठवून देईन. त्याला काय वाटले माहीत नाही, पण त्याने माझी विनंती मान्य करून मला सुमारे वर्षभर रविवारचा मटा पोस्टाने पाठवला आणि महत्त्वाचे म्हणजे त्या सज्जन पुरुषाने त्यासाठी माझ्याकडून एक पैसाही घेतला नाही. आणि माझे दुर्दैव हे, की मी त्या गृहस्थाचे नावही जाणत नाही. 
      अशा या रविवासरीय मटा व नियमित तरुण भारत यांच्या वाचनातूनच मला 'ललित' मासिकाची तोंडओळख झाली. आणि मी 'ललित'चा नमुनांक मागवून बसलो. मला 'ललित' मासिक खूप आवडून गेले व मी माझ्या वडिलांच्या मागे लागून 'ललित'ची वार्षिक वर्गणी भरून 1968-69 दरम्यान 'ललित'चा वर्गणीदार-वाचक झालो ते आजतागायत. (माझ्या जीवघेण्या अपघाताच्या कालावधीत व लगेचच्या किडनी कॅन्सर च्या कालावधीत, 'ललित'च्या नेमक्या सुवर्ण महोत्सवी वर्षात, मात्र मी 'ललित'चा वर्गणीदार-वाचक राहू शकलो नव्हतो, तेवढाच अपवाद.) 
       असा मी तत्कालीन रविवासरीय मटा, तरुण भारत व ललित च्या संसर्गजन्य वाचनभूकच्या आहारी जाऊन नंतर विविध मराठी, हिंदी व इंग्रजी नियतकालिकांचा/अनियतकालिकांचा वैयक्तिक वर्गणीदार-वाचक झालो तथा विविध विषयांवरील विविध पुस्तके खरेदी करून वाचत गेलो व आपली भस्म्यारोगीसम वाचनभूक भागवण्याचा प्रयत्न/प्रयोग करू लागलो. अजूनही 2024 मध्येही माझा हा प्रयत्न/प्रयोग सुरूच असून सध्या मी 54 नियतकालिक/अनियतकालिकांचा वैयक्तिक वर्गणीदार-वाचक आहे. शिवाय चार वर्तमान पत्रांचा सुद्धा मी वैयक्तिक वर्गणीदार-वाचक आहे. माझ्या वैयक्तिक ग्रंथसंग्रहात सुमारे 8-10 हजार पुस्तके/ग्रंथ असावेत. (मी मोजले नाहीत, क्षमस्व.) असो.
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902, ता.आमगांव,
जि.गोंदिया (विदर्भ-महाराष्ट्र)
दि.04.04.2024
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

 

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन