18 जानेवारी 2009

*18 जानेवारी 2009*
~~~~~~~~~~~~~
       02 जून 2008 ला मी स्वेच्छेने यवतमाळ येथून बदली करून घेऊन गडचिरोली येथे जिल्हा उपनिबंधक(डीडीआर), सहकारी संस्था या महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या जिल्हा प्रमुख पदावर रुजू झालो. 
       गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलप्रभाव खरोखरच समाप्त करावयाचा/व्हावयाचा असेल तर त्यासाठी सहकार ही संकल्पना रामबाण उपाय ठरू शकते, हे मी यापूर्वीच अभ्यासले होते. त्या दृष्टीकोनातून मी माझ्या कामाची आखणी करून त्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म.गडचिरोलीचे मा.अध्यक्ष श्री प्रंचित पोरेड्डीवार, संचालक श्री पोरेड्डीवार, बँकेचे सरव्यवस्थापकद्वय श्री मुद्देशवार व श्री चौधरी आणि त्यांचे वरिष्ठ सहकारी तथा तत्कालीन जिल्हाधिकारी श्री निरंजन कुमार सुधांशु यांच्या सक्रिय सहकार्याने कामकाजाला सुरुवात केली होती. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा, अहेरी भागात परंपरागत पद्धतीने कापूस पीक घेण्यात येत असले तरी तोवर महाराष्ट्र शासनप्रणित कापूस खरेदी योजनेचे एकही केंद्र गडचिरोली जिल्ह्यात सुरूच करण्यात आले नव्हते. त्यामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा कापूस विकण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट आणि आंध्रप्रदेशात जाणे भाग पडत होते. अर्थातच ही बाब कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व भौगोलिक दृष्ट्या सुद्धा अत्यंत अडचणीची, त्रासाची व नुकसानीची ठरत होती. त्यासाठी मी तत्कालीन जिल्हाधिकारी महोदयांच्या मदतीने सिरोंचा येथे, गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच, महाराष्ट्र शासनप्रणित कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात सफल झालो होतो. 
       अशी सहकारप्रणित विविधलक्षी व विविधांगी कामे सुरू असतानाच चामोर्शी बाजार समितीची सार्वत्रिक निवडणूक लागली. या बाजार समितीची निवडणूक नेहमीच अतिशय अटीतटीची, गडबडीची, जिकीरीची वगैरे त्रासदायक ठरत असल्याचा पूर्वेतिहास होता. मी जिल्हा निवडणूक अधिकारी असल्याने मला त्यादृष्टीने अतिशय सावधगिरी बाळगून ही सार्वत्रिक निवडणूक पार पाडणे क्रमप्राप्त होते. त्यादृष्टीनेच मी ह्या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री धोटे या कार्यक्षम, कोणत्याही अनुचित दबावाला बळी न पडणाऱ्या अशा अभ्यासू सहायक निबंधकाची नियुक्ती केली होती. असे असले तरी माझ्या कार्यालयातील सहायक निबंधक श्री गणवीर यांनी तेथील निवडणुकीचा कठीणतम पूर्वेतिहास कथन केल्याने मी मतदानाचे दिवशी, दि.18 जानेवारी 2009 ला, सर्व मतदान केंद्रावर जातीने लक्ष ठेवून होतो. अखेर मतदान सुरळीत पार पडले व मी गडचिरोलीकडे मुख्यालयी यायला परत निघालो. 
        निवडणूक कार्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, गडचिरोलीच्या टाटा सुमो गाडीचा मी वापर करीत होतो. त्याच वाहनाने माझा, माझे सहायक श्री गणवीर यांचेसोबत, गडचिरोलीकडे परतीचा प्रवास सुरू झाला. गडचिरोलीच्या जवळील सेमाना देवस्थान पार करून आमचे वाहन गडचिरोली गावात न जाता सरळ कार्यालयीन काॅम्प्लेक्सकडे जाणाऱ्या अरुंदशा बायबासला लागले. दोनेक फर्लांग अंतर कापल्यानंतर त्या अरुंदशा रोडवर एक काॅलेज कन्यका आपल्या स्कूटीसह अगदी अचानक रोडच्या मधोमध आमच्या वाहनासमोर धडकली. आमच्या ड्रायव्हरने कसेतरी त्या कन्यकेला वाचवले पण या धांदलीत आमचे वाहन त्या अरुंदशा व जमिनीपासून सुमारे एक मीटर उंच रोडवरून रोडच्या डाव्या बाजूला असलेल्या बोल्डर-गिट्टीच्या ढिगावर फेकले गेले व आदळले. माझ्या डोळ्यादेखत टाटा सुमोचा समोरचा काच निखळून पडला, समोरचा एक्सल तुटला, वाहनाची ऐशीतैशीच झाली. मी ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसलो होतो आणि नेमका त्याच दिवशी सीटबेल्ट बांधला नव्हता. वाहनाची अपघातग्रस्तता ध्यानात घेऊन माझ्याही नकळत मी डाव्या हाताने डाव्या बाजूस सीटच्या वर असलेल्या हँडलला करकचून धरून ठेवल्याने मी वाहनाबाहेर फेकला गेलो नाही. पण या धकाधकीत माझ्या डाव्या हातावर प्रचंड प्रेशर पडून माझा डावा हात खांद्यापासून निखळला. चामडे न तुटल्याने तो असह्य वेदनेसह लटकत राहिला. ही घटना दि.18 जानेवारी 2009 ची, म्हणजेच आजपासून पंधरा वर्षांपूर्वीची असली तरी माझ्या डोळ्यांसमोर ती अजूनही जिवंत आहे.
        ड्रायव्हर आणि माझा सहायक यांना साधे खरचटले असले तरी त्यांना काहीच मार वगैरे लागला नव्हता. तरी माझी अवस्था पाहून ते दोघेही किंकर्तव्यमूढ होऊन फक्त पाहतच राहिले. अखेर मीच त्यांना मला उचलून वाहनाबाहेर काढण्यास सांगितले. अपघात पाहून काही बघे तेथे आले असले तरी, 'किती मेले' असे फक्त विचारून ते निष्क्रियच राहिले. मला वाहनाबाहेर काढून खाली जमिनीवर लेटवण्यात आले. मला असह्य वेदना होत असून हलताडुलताही येत नव्हते. तशातही माझ्यात कोठून हिंमत अवतरली माहित नाही, मी माझ्या उजव्या हातानेच उजव्या खिशातून मोबाईल काढला व सर्वप्रथम नागपूर येथे एम.बी.ए. करीत असलेल्या मुलाला अपघाताची कल्पना देऊन तेथे एखादे हाॅस्पिटल पाहून ठेवायला सांगितले. पण नागपूर येथे पोचायला विलंब होण्याची शक्यता लक्षात घेऊन जवळच्या चंद्रपूर येथेच जाण्याचे निश्चित करून बँकेला मोबाईल वरून ॲम्बुलन्स पाठवण्याची व्यवस्था करायला सुचना केली. मी चंद्रपूर येथे पूर्वी डीडीआर होतो, तेथील स्टाफला मोबाईल करून तेथील डाॅ.गाडेगोणे (शल्यचिकित्सक) यांच्याकडे पूर्वतयारी करून ठेवायला सांगितले. 
     अखेर असह्य वेदना सहन करीत करीत सहायक श्री गणवीर सोबत ॲम्बुलन्सने चंद्रपूर येथील डाॅ.गाडेगोणे यांच्या स्वाधीन झालो. त्यानंतरच पत्नीला कळवायला सांगून तिला बोलावून घेतले. (या अपघातामुळे मला संचेती हाॅस्पिटल पुणे ची सहा महिने सलग सेवा(?) घ्यावी लागली होती, तोवर मी रजेवरच होतो.) 
      अशी ही माझी 18 जानेवारी 2009 ची संक्षिप्त कथा आहे. (#685)
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया.
(18.01.2024)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन