गायत्री परिवार, चार वेद व मी : एक चौमिती अनुबंध

*गायत्री परिवार, चार वेद व मी : एक चौमिती अनुबंध*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
         माझे आजोबा स्व.उकनजी पाटील कटरे. त्यांच्या पहिल्या पत्नीला दोन मुली झाल्यावर अकस्मात त्यांच्या पत्नीचे निधन झाले. माझ्या आजोबाचे आईवडील त्यापूर्वीच निधन पावले होते. त्यामुळे आमच्या वाड्यात माझे आजोबा व त्या दोन अजाण मुली असे तिघेच उरले. खाण्यापिण्याची, स्वैंपाकाची गंभीर समस्या उद्भवली. बाजूच्या वाड्यातील माझ्या आजोबांच्या चुलतभावाचा परिवार अडीअडचणीला मदत अवश्य करायचे. पण ते या गंभीर समस्येचे कायम समाधान नव्हतेच. अखेर माझ्या आजोबांनी दुसरे लग्न केले. या लग्नाद्वारे त्यांना चार अपत्ये झाली. एक पुत्र व तीन पुत्री. त्यातील माझे वडील मोहनलाल कटरे हे मोठे व तिन्ही बहिणी लहान. अशा मला पाच आत्या होत्या. त्यापैकी चार आत्या निवर्तल्या असून वडीलांच्या पाठची दुसरी आत्या पण चौथे स्त्री अपत्य असल्याने चौथी आत्या सध्या असून तीचे वय 89 वर्षे आहे. परवा तिला भेटायला गेलो होतो, तेव्हा माझ्या स्मृतीपटलावरील एक *त्रिमीत* अनुबंध पुनर्जागृत झाला. 
      झाले असे की, माझी ही चौथी आत्या (हुलसनबाई राजाराम गौतम) संयुक्त/एकत्र कुटुंबातच रहायची. माझ्या आत्याचे व तिच्या दिराचे कुटुंब त्यावेळेस एकत्रितच रहायचे. त्यांचे हे संयुक्त कुटुंब पं.श्रीराम शर्मा आचार्य यांच्या गायत्री परिवाराचे घटक होते. गायत्री परिवाराच्या तत्कालीन मुख्यालय असलेल्या मथुरा येथील साधकांचे त्यांच्याकडे जाणेयेणे असायचे. अशाच साधकांच्या जाण्यायेण्यातून माझ्या आत्याच्या कुटुंबात गायत्री परिवाराद्वारे प्रकाशित अन्य ग्रंथांसह चारही वेदांच्या हिंदी अनुवादाचे खंडही जमा झाले होते. चारही वेदांचे हे खंड पूजेच्या बासनात बांधून ठेवले असायचे. कधीतरी श्रावण महिन्यात त्यांना बाहेर काढले जाण्याची व यथाशक्य वाचण्याची त्यांच्याकडे प्रथा होती. अन्यवेळी हे वेदांचे खंड बासनात बांधूनच असायचे. 
       इकडे माझ्याघरी माझ्या आईला धार्मिक व इतर ग्रंथवाचनाची हौस असल्याने आमच्या घरी मराठीतील रामविजय कथासार, पांडवप्रताप कथासार सारखे रामायण, महाभारताचे लघुरूप तथा हिंदीतील काही धार्मिक ग्रंथ व आईने तत्कालीन इलाहाबादहून आणलेले स्त्रीसुबोधिनी सारखे काही अन्य ग्रंथही होते. आईचे मार्गदर्शनात मलाही वाचनाची आवड निर्माण झाली. माझ्या वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत मी हे सारे ग्रंथ कितीदातरी वाचले असावेत. चौथीच्या वार्षिक परीक्षेनंतरच्या उन्हाळी सुट्टीत माझ्या ताऊकडून हिंदीतील महाभारत आणून मी तो पूर्ण वाचून काढला. तरी माझी वाचनभूक काही शांत होईना.
        अशा उन्हाळ्याच्या सुट्टीतच माझ्या पाचही आत्या आपल्या अपत्यांसह माहेरपणाला येऊन पंधरा-वीस दिवस आमच्याकडा थांबत असत. हे दिवस आमच्यासाठी अतिशय आनंदाचे असत. माझ्या चौथीच्या परीक्षेनंतरच्या सुट्टीतही अशाच सर्व आत्या आमच्याकडे माहेरपणाला आल्या असता माझी वाचनभक्ती पाहून अचंबित व्हायच्या. अशातच माझ्या त्या चौथ्या आत्याचा लहान मुलगा, जो माझ्याच वयाचा होता/आहे, त्याला व त्याच्या आईला म्हणजेच माझ्या चौथ्या आत्याला  माझ्या या वाचनभक्तीला काही पूरक हातभार लावावा असे वाटले असावे. व त्यांनी मला त्यांच्याकडे असलेल्या चारही वेदखंडांची करूण कहानी सांगून मला वाचनासाठी ते खंड देण्याची तयारी दर्शविली. अखेर त्यांच्या कुटुंबाकडूनही हिरवा सिग्नल मिळून चारही वेदांचे खंड 1965 मध्ये माझ्या ताब्यात देण्यात आले. त्याच उन्हाळ्याच्या सुट्टीत व नंतर पाचव्या वर्गात गेल्यावरही दिवाळीची सुट्टी संपेपर्यंत मी चारही वेदांचे हिंदीतील ते सर्व खंड वाचून काढले. अर्थातच मला त्या वयात त्यातील लिखाणाचा किती अर्थबोध झाला असावा हा मोठाच प्रश्न असला तरी माझ्या अबोध मनात कुठेतरी त्यातील  काहीतरी अल्पांश माझ्याही नकळत साचून राहिला असावा, असे आज वाटते. 
       याच वेदांच्या अबोध बोधापायी कदाचित मी तत्कालीन हायर मॅट्रीक ला असताना माझ्या नवव्या, दहाव्या व अकराव्या वर्गात संस्कृत शिकण्याला महत्तम प्राधान्य दिले असावे. त्यावेळेस संस्कृत शिकवायला योग्य व सक्षम शिक्षक मिळणे दुरापास्त होते. त्यामुळे आमचे मुख्याध्यापक श्री.ह.रा.चौथकंठीवर सरांनी गोंदिया येथील एक 82 वर्षे वयाच्या सेवानिवृत्त संस्कृत शिक्षकाकडे आम्हाला संस्कृत शिकवण्याची जबाबदारी सोपवली होती. त्या संस्कृत शिक्षकांचे नाव विश्वनाथ पंडित असे होते व त्या वयातही ते गोंदिया ते आमगांव ट्रेनने व आमगांव रेल्वेस्थानक ते आमची शाळा हे सुमारे दोन किलोमीटरचे अंतर पायी येऊन जाऊन दररोज जाणेयेणे करायचे. त्या वयातही त्यांची प्रकृती ठणठणीत असली तरी त्यांच्या तोंडात दातच नसल्याने ते शिकवताना जेव्हा हसत असत तेव्हा आमची करमणूक होऊन आमचीच हसता हसता पुरेवाट व्हायची. तरी ते कधी रागावत नसत. त्यांचे संस्कृत शिकवणे म्हणजे एक संगीतमय व लयबद्ध असा संस्मरणीय वर्ग असे. आणि कदाचित म्हणूनच मला तत्कालीन अकरावी हायर मॅट्रीकच्या बोर्डाच्या परीक्षेत संस्कृतात 100% गुणांसह उच्च प्रथम श्रेणीत व वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होता आले होते. या फक्त तीन वर्षात मी संस्कृतचा जाणकार झालो असे मला कदापि म्हणता येणार नाही आणि वस्तूतः जीवनभर संस्कृत शिकूनही कोणी संस्कृतचा 100% परिपूर्ण जाणकार होऊ शकेल असेही मला वाटत नाही. तथापि कामचलाऊ संस्कृतची जाण व संस्कृतचे वाचन-उच्चारण यात मात्र मला खूप खूप मदत आजही होत आहे. 
        अशी ही संस्कृत आत्मसात करण्याची व मूळ संस्कृतातूनच चारही वेद वाचून समजून-उमजून घेण्याची माझी अबोध मनातील इच्छा अधूनमधून डोके वर काढायची. पण अखेर आजवर तरी ते शक्य झालेले नाही. अशातच मला चारही वेदांचा मूळ संस्कृतसह आधुनिक मराठीत अनुवाद प्रकाशित झाल्याचे व ते खंड उपलब्ध असल्याचे कळले व मी ते सर्व खंड नुकतेच गेल्यावर्षी मागवले आहेत. आता प्रसंगानुरूप तथा कधीकधी संदर्भशोधनाच्या दृष्टिकोनातून मी या वेद-खंडांचे अधूनमधून फक्त तुटकतुटकच वाचन/अवलोकन करतो. काही का असेना माझी चारही वेद पुन्हा वाचण्याची माझ्या अबोध मनातील *त्रिमीत* इच्छा अशाप्रकारे माझ्या तावडीत सापडली, हे ही नसे थोडके. आता हे वेद-खंड या जीवनात पूर्णतः वाचून समजून-उमजून घेणे शक्य झाले नाही तर पुनर्जीवनातील *चौमीतीत* तरी हे शक्य व्हावे ही माझी अंतिम इच्छा राहीलच. (#810)
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902, ता.आमगांव,
जि.गोंदिया (विदर्भ-महाराष्ट्र)
(29.07.2023)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन