वीर सावरकर : एका भाषिक क्लृप्तीचे बळी

*वीर सावरकर : एका भाषिक क्लृप्तीचे बळी*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
        सावरकरांनी त्यांच्या जन्मठेपेच्या कैदेतून सुटका होण्यासाठी इंग्रजांना माफीपत्र पाठवले होते, ह्या तथाकथित व सध्याच्या संकल्पनेत सांगायचे तर सत्योत्तर स्वरूपाच्या टीकेचे विश्लेषण करावयाचे तर पॅलेस्टिनी कवी व लेखक मौरिद बार्गोटी यांच्या एका सुप्रसिद्ध कथन/विधानाचा अर्थ जाणून घ्यावा लागेल. मौरिद बार्गोटी लिहितो की, "सत्यस्थिती धूसर करणे हे केवळ एका साध्याशा भाषिक क्लृप्तीच्या आधारे शक्य असते. 'दुसरे म्हणजे' या शब्दांनी कहाणी सुरू केली की झालं." अगदी याच धर्तीवर सावरकरांच्या तथाकथित माफीपत्रावर 'भाषिक क्लृप्ती'चा जाणीवपूर्वक वापर करून वस्तुस्थितीला/सत्यस्थितीला धूसर करून या धूसर शब्दांकित, सत्योत्तर वस्तुस्थितीची/सत्यस्थितीची कहाणी गढण्यात येत असल्याचे दिसून येते. आणि अशा या आरोपित कहाणीद्वारे वीर सावरकरांची मृत्यूपश्चात बदनामी करण्याची मोहीमच उघडली जाते. 
       वस्तूतः वीर सावरकर हे महाभारतकालीन श्रीकृष्ण यांच्या कृष्णनीतीचा (तत्वहीन शत्रूच्या आक्रमकतेसमोर सद्गुणांची विकृती शांतता प्रस्थापित करण्यासाठी असफल ठरते, शांततेच्या निर्मितीसाठी सशक्त व तत्सम कुटील-वृत्तीने शत्रूचा मुकाबला करण्याच्या अशा परमावश्यक/अनिवार्य नीतीचाच अवलंब करावा लागतो.) या आधुनिक युगातही यथायोग्य व यथावश्यक वापर करणारे श्रीकृष्णाचे आधुनिक वारसदार ठरतात. कसे ते आता पाहू...

👇👇👇

*वीर सावरकर : कृष्णनीतीचा आधुनिक वारसदार*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
     वीर सावरकर! 
     वि.दा.सावरकर! 
     विनायक दामोदर सावरकर! 
     स्वातंत्र्यवीर सावरकर! 
या सर्व संज्ञा आणि संकल्पना खऱ्या अर्थाने जाणून व समजून घ्यायच्या असतील तर कोणत्याही सम्यक बुद्धीच्या अभ्यासकाला सावरकरांचे व्यामिश्रतम जीवन व जीवनचरित्र प्रथम अभ्यासावे लागेल, असे माझे नम्र-आकलन आहे. त्यासाठी सावरकरांनी त्यांच्या जीवनप्रवासात वेळोवेळी घेतलेल्या उचित/अनुचित वाटणाऱ्या/भासणाऱ्या निर्णयमालिकांचा सम्यक व सर्वसाक्षी/सर्वव्यापी दृष्टिकोनातून विचाराभ्यास करणे परमावश्यक (Mandatory) ठरते. 
     कोणताही अभ्यासक कोणताही अभिनिवेश न वापरता यावर/सावरकर-नीतीवर विचाराभ्यास करू इच्छित असल्यास त्याला सर्वप्रथम सनातन संस्कृतीतील दोन महान महाकाव्यांपैकी एक महाकाव्य असलेल्या महाभारतातील कौरव-पांडव युद्धाचा साधक-बाधक विचाराभ्यास करणे सुद्धा क्रमप्राप्त ठरते. कुरुक्षेत्रावर लढल्या गेलेल्या त्या युद्धात कृष्णाने वापरलेली कृष्णनीती काय/कशी होती, याचाही विचाराभ्यास करावा लागेल. असा विचाराभ्यास करण्यापूर्वी त्या अभ्यासकाला कौरव-पांडव युद्धात कोणाचा जय व्हावा व कोणाचा पाडाव व्हावा, या प्रश्नाचे समुचित/कालोचित उत्तर सर्वप्रथम शोधावे लागेल. आणि कोणताही विवेकनिष्ठ, धर्मनिष्ठ व निरपेक्ष/तटस्थ विचाराचा अभ्यासक कौरवांचा पाडाव व पांडवांचा जय व्हावा अशाच एकमेव उत्तरापाशी थांबेल याची मला खात्री आहे. 
      आता आणखी पुढचा प्रश्न उभा राहतो की, कौरवांचा पाडाव होऊन पांडवांचा विजय होण्यासाठी अनिवार्य व परमावश्यक अशा बाबी/घटना कोणत्या? तर या प्रश्नाचे सर्वसाधारण व सर्वमान्य उत्तर असे की, जोवर कौरवपक्षातील इच्छामरणाचा वरदान प्राप्त असलेले भीष्म, कौरव-पांडवांचे अजेय असे गुरु द्रोणाचार्य, अर्जुनालाही न पेलवणारा दुर्योधनचा परममित्र कर्ण, परमयोद्धा जयद्रथ आणि स्वयं दुर्योधन या पाच महावीरांचा मृत्यू/पाडाव झाल्याशिवाय पांडवांचा जय शक्यच नव्हते/नाही. आणि आमच्या प्रमेयाचे साध्य तर कौरवांचा पाडाव व पांडवांचा जय असा आहे. मग यावर उपाय काय? आणि त्यासाठी यशस्वीरीत्या राबवून जय प्राप्त करणे सुकर होईल अशी नीती कोणती? असे पुढचे प्रश्न उभे ठाकतात. यासंदर्भात आता वरील पाचही महावीरांबद्दल विचाराभ्यास केला तर खालीलप्रमाणे किमान पाच प्रश्न समोर उभे ठाकतात. ते असे ---- 

1)भीष्माला इच्छामरणाचा वरदान प्राप्त असल्याने त्यांचा मृत्यू त्यांच्या स्वतःच्या इच्छेशिवाय घडवून आणणे पांडवांना शक्यच नव्हते/नाही. अशावेळेस भीष्माला मारण्या(?)ची जी कृष्णनीती कृष्णाने अवलंबिली ती चुकीची, अनैतिक, विश्वासघातकी तथा तत्कालीन युद्धनीतीच्या विसंगत कृती समजावी काय? 
2)समोरासमोरच्या युद्धात गुरु द्रोणाचार्य यांना मात देणे, त्यांचा पराभव करणे, त्यांचा मृत्यू घडवून आणणे पांडवांना शक्यच नव्हते/नाही. अशावेळेस गुरु द्रोणाचार्यांना मारण्या(?)साठी जी कृष्णनीती कृष्णाने अवलंबिली ती चुकीची, अनैतिक, विश्वासघातकी तथा तत्कालीन युद्धनीतीच्या विसंगत कृती समजावी काय? 
3)त्याचप्रमाणे जन्मतःच कवच-कुंडले धारणकर्ता कर्णाचा सुद्धा मृत्यू घडवून आणणे पांडवांना शक्यच नव्हते/नाही. त्यासाठी इंद्राला त्याच्याकडे याचक म्हणून जाऊन त्याची कवच-कुंडले दानात मागून घेण्याची युक्ती सांगणारा, युद्धापूर्वी कर्णाला त्याच्या जन्माची खरी कथा सांगून कुंती-कर्ण भेट घडवून अर्जुनाशिवाय उर्वरित चारही पांडवांना कर्णाकडून अभयदान मिळवून देण्याची कृष्णनीती, अंती नि:शस्त्र कर्णाचा वध(?) करण्यासाठी अर्जुनाला प्रवृत्त करण्याची कृष्णनीती; या सर्व कृती चुकीच्या, अनैतिक, विश्वासघातकी तथा तत्कालीन युद्धनीतीच्या विसंगत कृती समजाव्यात काय? 
4)त्याचप्रमाणे कौरवसेनेतील रथी-महारथी असलेल्या महावीरांच्या संरक्षणात सुरक्षित असलेल्या जयद्रथाचा वध करण्यासाठीची कृष्णाची क्लृप्ती चुकीची, अनैतिक, विश्वासघातकी तथा तत्कालीन युद्धनीतीच्या विसंगत कृती समजावी काय? 
5)भीम-दुर्योधन यांच्या अंतिम गदायुद्धात दुर्योधनाचा वध करण्यासाठी त्याच्या कमरेखाली मांडीवर गदेचा वार करून त्याचा वध(?) करण्यासाठीची कृष्णनीती चुकीची, अनैतिक, विश्वासघातकी तथा तत्कालीन युद्धनीतीच्या विसंगत कृती समजावी काय?  
      वर नमूद पाचही प्रश्नांची सम्यक, समुचित/कालोचित व ऐतिहासिक दृष्ट्या परमावश्यक असणारी उत्तरे, सकारात्मक वृत्तीने, ज्याला देता येणे शक्य आहे/असेल त्याला वीर सावरकरांच्या जीवनप्रवासातील तथाकथित माफी, सुटका, पेन्शन, स्थानबद्धतेचा स्वीकार या बाबी/घटनांची सम्यक, समुचित/कालोचित व ऐतिहासिक दृष्ट्या परमावश्यक असलेली उत्तरे आपोआपच मिळतील/कळतील/उमजतील. आणि ज्यांना कृष्णाची, (ज्याची भगवद्गीता पौर्वात्य व पाश्चिमात्यच नव्हे तर संपूर्ण जगातील सर्वच विचारक्षेत्रातील तत्त्वज्ञ, विचारवंत, वैज्ञानिक, मानसतज्ज्ञ, वैद्यकशास्त्राचे तज्ज्ञ, व्यवस्थापनतज्ज्ञ वगैरे सर्वच भलावण करतात, सर आँखों पे धारण करतात त्याची), यशनीती/जयनीती समजलीच नाही, किंवा त्यांना ही यशनीती/जयनीती मुजोरीपूर्वक समजूनच घ्यायची नाही, अशांना कायम अज्ञानांधकाराच्या चिखलात पडून राहणेच आवडते, असेच म्हणावे लागेल, असे माझे सविनय प्रमेय आहे. 
      त्याचप्रमाणे (1)औरंगजेबाच्या कैदेतून सुटका करून घेण्यासाठी, (2)अफझलखानचा कोथळा काढून त्याचा अंत करण्यासाठी, (3)शाहिस्तेखानाची बोटे कापून त्याची मस्ती जिरवण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांनी अवलंबिलेली गनिमी कावाप्रणित युद्धनीती समजून/उमजून घेणाऱ्यालाही वीर सावरकरांच्या जीवनप्रवासातील साऱ्या अपप्रचारित घटनांची अनिवार्यता व सुयोग्यता/कालानुरूपता सहज समजू शकेल. 
       सुमारे तीन चतुर्थांश जगभर ज्या इंग्रजांचे साम्राज्य पसरले होते, त्यांच्या राज्यात कधीच सूर्य मावळत नव्हता अशी महती(?) असलेल्या इंग्रजांना पवित्र भारतभूतून हाकलून लावण्यासाठी वीर सावरकरांनी कालानुरूप सुयोग्य अशी गनिमी कावाप्रणित कृती केली असेल तर ती कोणत्याच प्रकारे अनुचित ठरविता येत नाही. तसेच अशी/अशा कृती ह्या वीर सावरकरांसाठी कदापि लज्जास्पद ठरत नसून उलट भूषणावहच ठरतात तथा त्यांच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्वातंत्र्यवीर या संज्ञेसाठी त्यांच्या सदरील कृती पूर्णतः पात्र ठरतात. आणि माझ्या या प्रमेयाला वर नमूद केल्यानुसार महाभारतातील कृष्णनीतीचा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी कावाप्रणित युद्धनीतीचाही भक्कम आधार असल्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अनावश्यकरीत्या व बेजबाबदारपणे उपमर्द करणारी कोणतीच व्यक्ती व/वा वल्गना सर्वथा महामूर्खपणाचीच वाहक/द्योतक ठरते, हे मी सविनय मांडू इच्छितो. 
(शब्दसंख्या : सुमारे 950)
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
(विदर्भ प्रांत अध्यक्ष, अखिल भारतीय साहित्य परिषद)
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया 
(11.06.2023)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


 




Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन