येथून पुढे जाताना.......!

*येथून पुढे जाताना........!*
~~~~~~~~~~~~~~
प्रिय रसिक वाचकहो, 
      साहित्यिक, प्रकाशक, संपादक आणि साहित्याचे रसिक वाचक यांच्या परस्पर संबंधाच्या संदर्भात माझे विचार असे आहेत की, कोणतेही साहित्यिक व/वा इतरही लिखाण, जे "गुरू-शिष्य संवादा"ला पूरक असते, ते "मित्र-मित्र संवादा"ला मात्र घातकच ठरते. 
        गुरू-शिष्य संवादाच्या लिखाणाचा मुख्य (कदाचित छुपा) उद्देश प्रामुख्याने असा असतो की, गुरुने ठाम(?) व अपरिवर्तनीय(?) मत मांडायचे आणि वाचकाने स्वतःचा कोणताही विचार न मांडता/करता तेच/गुरुचेच म्हणणे सत्य मानले पाहिजे, तसेच आचरण व अनुकरण केले पाहिजे. पर्यायस्वरूप ते लिखाण म्हणजे एकप्रकारे सहमतीच्या हुकूमशाहीला पूरक व कुलूपबंद वृत्तीचे द्योतकच असते, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कारण की, वाचकाने त्यावर असहमती, शंका वा जरासाही विरोध व्यक्त केला वा तत्संबंधित साधक-बाधक चर्चा उपस्थित केली तर त्या वाचकाला शिष्यत्वाच्या कट्ट्यातून उचलून शत्रूच्या पिंजऱ्यात ढकलण्यासारखेच असते. 
      याउलट मित्र-मित्र* संवादाचे लिखाण प्रामुख्याने वाचकाला त्यावर स्वतःचा स्वतंत्र विचार करायला/मांडायला प्रवृत्त करण्याच्या वृत्तीला पोषक असते, साहित्यिक-लोकशाहीवादी विचाराला ते पुरक असते. वाचकाने विचारप्रवृत्त होऊन स्वतःची भूमिका निश्चित करावी, असे ते सहिष्णू असते. असे लिखाण वाचकाची असहमती, शंका व विरोध पचवण्याची/स्वीकारण्याची विवेकी क्षमता बाळगून असते.  
       भगवद्गीतेच्या प्रारंभीच्या अध्यायांतून योगेश्वर श्रीकृष्ण हे अर्जुनच्या सर्व शंका, कुशंका, प्रश्न, विरह, ....., आदींचे यथाविहित निराकरण/निरसन/शमन करतात. अर्जूनही त्याचे समाधान झाल्याबद्दल माना डोलवू(!) लागतो व तशी स्वच्छ कबुलीही देतो. तरी अशाही अवस्थेत अठराव्या अध्यायाच्या त्रेसष्टाव्या श्लोकाच्या उत्तरार्धात शेवटी श्रीकृष्ण अर्जुनला म्हणतात, आता "||........यथेच्छसि तथा कुरु||" इथे श्रीकृष्ण हे अर्जुनचे "गुरू" नसतात तर "मित्र/सखा" असतात. कारण श्रीकृष्ण हे अर्जुनला लकीर का फकीर बनवत(!) नसून त्याला स्वतः विचार करायला सांगतात. आणि असा हा, त्या "सखा-मित्र संवादा"चा/भगवद्गीतेचा सुखद, सुंदर, टिकाऊ, सार्वकालिक, सार्वत्रिक, ... "परिणाम" इतिहास-वर्तमान-भविष्याला छेदूनही शाश्वत म्हणून नमूद आहेच! एवढेच नव्हे तर आजच्या या सत्त्योत्तर (POST TRUTH) आणि उजाखा (उदारीकरण, जागतिकीकरण, खाजगीकरण) च्या युगातही विचारवंतांना, कार्पोरेट विश्वातील व्यवस्थापनीय व्यवस्थेला, शांतिपूर्ण सहअस्तित्वभावाला; "तो संवाद" यथावश्यक खाद्य सतत पुरवत आला आहे.
      मी सुद्धा माझ्या प्रत्येक "लिखाणा"तून संबंधित वाचक, साहित्यिक, प्रकाशक, संपादकाला हेच सांगायचा/म्हणायचा प्रयत्न करतोय की, मला जे "कळले/आकळले"(?) ते मी याद्वारे सांगायचा प्रयत्न केलाय, हे वाचून आता तुम्ही मात्र "यथेच्छसि तथा कुरु."..... म्हणजे तुमच्या बौद्धिक, मानसिक, साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक, भौगोलिक वास्तव, ... वगैरेंच्या आधारे विवेकी विचाराने आपले यथायोग्य मार्गक्रमण करा व वाचनसमाधी ठरवा. (मी श्रीकृष्णाची बरोबरी करू शकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी येथे ते फक्त उदाहरण म्हणून उद्-घृत केले आहे.) 
       एकंदरीत मला जे म्हणावयाचे/सांगावयाचे आहे ते संक्षेपात असे की, साहित्यिक, प्रकाशक, संपादक यांनी व साक्षेपी वाचकांनी सुद्धा आपल्या लिखाणात, प्रकाशनात, संपादनात, वाचनात अवांछित (दुढ्ढाचार्य?) गुरुवर्याची मानभावी तथा आढ्यतासदृश्य भूमिका न घेता आपल्यातील (कदाचित दडून बसलेला) मित्रवर्य/मित्रश्रेष्ठ जागवावा आणि आपली साहित्यिकाची, प्रकाशकाची, संपादकाची, वाचकाची उत्कृष्टतम भूमिका पार पाडावी. जेणेकरून आजच्या या उजाखो**त्तर सत्योत्तरकालीन संगणकीय व कृत्रिम-बुद्धिमत्तामय युगातील वाचकाला त्यांच्या पुढ्यात येणाऱ्या साहित्यात, प्रकाशनात, संपादनात, लिखाणात आपली/स्वतःची प्राथमिक ओळख दृग्गोचर होऊ शकेल. आणि पर्यायाने साहित्य व्यवहारातील रसिक वाचकांच्या सहभागाबद्दलची सध्याची सार्वत्रिक ऋणात्मक ओरड(!) काही प्रमाणात तरी कमी होऊ लागेल व हळूहळू-सावकाश अशी नकारात्मक ओरड(?) शुन्यवत होऊन वाचक =><= साहित्यिक, प्रकाशक, संपादक ही जोडी आणखी मजबूत होऊ शकेल, असे माझे अल्पबुद्धि-आकलन आहे.
    मला वाटते, मला जे म्हणायचे/सांगायचे आहे/होते ते वाचकांपर्यंत यथावत पोचले असावे. कारण माझे हे लिखाण ज्यांना ज्यांना सामोरे जाईल, त्या सर्व वाचक, साहित्यिक, प्रकाशक, संपादक यांची योग्यता माझ्याहूनही प्रगल्भ आहे, याचा पडताळा मला कित्येकदा आलेला आहे.
       शेवटी पुनश्च, "...यथेच्छसि तथा कुरु"!! (#485)
(*मित्र = मित्रवर्य, मित्रश्रेष्ठ वगैरे तर-तम भाव अपेक्षित,
**उजाखा = उदारीकरण, जागतिकीकरण, खाजगीकरण)
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902, जि.गोंदिया.
//18.02.2019//
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


         


Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन