मित्रवर्य देवराव जीभकाटे, मी आणि माझा कँसर
*मित्रवर्य देवराव जीभकाटे, मी आणि माझा कँसर*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
>> मी, यवतमाळ येथे दि.15 मे 2006 ते 01जून 2008, त्यानंतर गडचिरोली येथे दि.02 जून 2008 ते 24 जून 2010 आणि तदनंतर पुन्हा दि.25 जून 2010 ते 28 फेब्रुवारी 2013 पर्यंत यवतमाळ येथेच महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचा जिल्हाप्रमुख म्हणून डीडीआर या पदावर कार्यरत होतो. 28 फेब्रुवारी 2013 ला मी यवतमाळ येथूनच निवृत्त झालो व माझे जन्मगाव असलेल्या बोरकन्हार (ता.आमगांव, जि.गोंदिया, झाडीपट्टी) येथे पुनर्स्थायी झालो. म्हणजेच मी एकंदरीत सुमारे पाच वर्षे (दोन कार्यकाल) यवतमाळ येथील सपरिवार रहिवासी होतो.
>> माझ्या या यवतमाळ येथील दोन्ही कार्यकाळाची तुलना करता माझ्या एकूणच व्यक्तिमत्त्वात व प्रकृतीस्वास्थ्यात जमीन-आसमानाचा फरक पडलेला(?) होता, हे मला दोन्ही कालावधीत जाणणाऱ्या/पाहणाऱ्यांच्या नजरेतून सुटणे शक्यच नव्हते. याचे कारण म्हणजे मी गडचिरोली येथे बदलून गेल्यावर 26 सप्टेंबर 2008 ला माझा एक अपघात होऊन त्यात माझा डावा गुडघा तुटल्याने मला चालताना काठीचा आधार घ्यावा लागत असे. लगेचच 18 जानेवारी 2009 ला गडचिरोली येथेच माझा दुसरा मोठा/जीवघेणा अपघात होऊन माझा डावा हात उखडून पूर्णतः निकामी झाला. त्यासाठी पुणे येथील सुप्रसिद्ध संचेती हाॅस्पिटल येथील सुमारे सहा महिने उपचार घ्यावा लागला आणि डावा हात पट्ट्याद्वारे गळ्यात अडकवूनच ठेवावा लागे. (ही अवस्था पुढे डिसेंबर 2013 पर्यंत कायम ठेवावी लागली.)
>> दरम्यान 25 जून 2010 ला यवतमाळात पुन्हा बदलून आलो तेव्हा आता मी पूर्वीचा जसाचा तसा लखनसिंह कटरे न राहता डावा हात गळ्यात लटकवलेला व उजव्या हातात काठी अशी माझी हसतमुख(!) अवस्था होती. यानंतर लगेचच 26 ते 30 जुलै 2010 दरम्यान माझ्या किडनी कँसरच्या मैत्रीचे निदान झाले व 12 ते 22 ऑगस्ट 2010 दरम्यान नागपूर येथे मला माझी ती कँसरग्रस्त उजवी किडनी शस्त्रक्रिया करून काढावी लागली. या सर्व प्रक्रियेदरम्यान माझ्या दर्शनी व्यक्तिमत्त्वात व शारीरिक हालचालीत स्वाभाविक फरक पडला असला तरी माझा पूर्वीचा स्वभाव, हसतमुखपणा, निडरता, सहजता, जीवंतता सारख्या बाबींवर कोणताही विपरीत परिणाम मी जाणवू दिला नाही व पूर्वीसारखाच ''हर फिक्र को धुएँ में उड़ाता चला" या वृत्तीनेच जीवन जगत होतो. याला यवतमाळातील माझे सारे मित्रगण, अधिकारी/कर्मचारीगण, संस्थाचालक व त्यांचे कर्मचारीगण, आदि सर्व साक्षी आहेत.
>> उजवी किडनी कँसर-मित्राला देऊन टाकली असली तरी कँसरने मैत्री जपूनच ठेवल्याने त्यावरील पुढील रेडिएशन वगैरे व अन्य उपचार पुणे येथील रूबी हाॅल क्लिनिक यांच्या देखरेखीखाली सुरूच होते. दरम्यान चिखलदरा या थंड हवेसाठी सुप्रसिद्ध असलेल्या शहरातील एका जडीबुटी तज्ज्ञाबद्दल कळले की ते कँसर वर सुद्धा सफल उपचार करतात. मी त्यांच्याकडून सुद्धा उपचार सुरू केला. आणि अखेर जानेवारी-2013 ला खात्रीपूर्वक निदान झाले की कँसर ने आता माझ्याशी मैत्री तोडली. रूबी हाॅल क्लिनिक चे माझे संबंधित डाॅक्टरसुद्धा त्या चिखलदरा-वैद्याच्या कुशलतेने प्रभावित झाल्याचे स्पष्ट झाले.
>> याच दरम्यानच्या काळात "लाखात एक घडणाऱ्या वैद्यकीय गफलती" मुळे कँसरच्या उपचारादरम्यान माझ्या लहान आतडीला एक छिद्र पडले. मी खाल्लेल्या अन्नाची पेस्ट इंजेक्शनसाठी तेथे पडलेल्या छिद्रातून माझ्या कमरेच्या उजव्या बाजूने बाहेर पडू लागली. सततच्या गहन निदानप्रक्रियेनंतर कारण कळले व त्यासाठी एक गंभीरतम शस्त्रक्रिया करून माझ्या लहान आतडीला पडलेले ते छिद्र बुजवण्यात यवतमाळचे डाॅ.अमोल देशपांडे सफल झाले. या शस्त्रक्रियेदरम्यान पंधरा दिवस मला अन्न आणि पाण्याच्या थेंबाशिवायही काढावे लागले. (देव असल्यास त्याला माझी प्रार्थना राहील की, बाबारे पाण्याशिवाय राहावे लागण्याची अशी शिक्षा कोणालाही देवू नकोस.)
>> वर नमूद सर्व "स्मरण-चिन्हे" सावरून व सांभाळून मी सध्या वयाच्या सदुसष्ट वर्षानंतरही कार्यरत व ''हर फिक्र को धुएँ में उड़ाता चला'' याच माझ्या ओरिजिनल वृत्तीने न थांबता वाटचाल करीत आहे. आज दि.19 मे 2022 ला यवतमाळच्या एक मित्राचा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, यवतमाळचे निवृत्त जनरल मॅनेजर श्री.देवराव जीभकाटे यांचा, नेहमीप्रमाणेच फोन आला व त्यांनी सध्या गाजत असलेल्या "मा.श्री.शरद पवार यांच्या कँसरविजया"शी माझ्या या कँसरविजयाची तुलना करून मला माझ्या inbuilt स्वभावविशेषाचे स्मरण करून दिले.
>> धन्यवाद मित्रवर्य देवराव विठ्ठलराव जीभकाटे!
>> जय हो !!!
🙏🙏🙏
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार, जि.गोंदिया.
(19.05.2022)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment