अमर, अकबर, ॲन्थोनी आणि आम्ही तिघे...
*अमर, अकबर, ॲन्थोनी आणि आम्ही तिघे...*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मी 1977 मध्ये बी.एससी.(पीसीएम) उत्तीर्ण होऊन एलएल.बी. ला प्रवेश घेतला. त्यावेळेस बहुतेक हायस्कूलमध्ये गणित शिक्षकांची भयंकर(?) टंचाई(?) होती. म्हणून माझ्याकडे काही खाजगी शाळेचे संस्थाचालक व त्यांचे मुख्याध्यापक वारंवार येऊन मला गणित शिक्षकाची ऑफर द्यायचे. पण मी "नोकरी करणार नाही" असा, नंतर तकलादू ठरलेला, प्रण केल्याने मी त्यावर्षी काही त्यांना बधलो नाही. (आजच्या घडीला हे दिवास्वप्न वाटेल, पण ही त्यावेळची वस्तुस्थितीच होती.)
परंतू ग्रॅज्युएट होऊनही वडिलांनाच पैसे मागावे लागतात, हे कुठेतरी खटकल्याने मी जिल्हा परिषद भंडारा अंतर्गतच्या शहीद जान्या तिम्या ज्युनियर कॉलेज, गोरेगांव येथे तत्कालीन 3-बी-1 अंतर्गत जीवशास्त्राचे शिक्षक असलेल्या सी.आय.पटले या माझ्या मित्राच्या व तेथील मुख्याध्यापक श्री.जी.डी.ठाकूर यांच्या आग्रहाखातर जिल्हा परिषद कडे शिक्षक पदासाठी अर्ज केला. जिल्हा परिषद भंडाराचे तत्कालीन मुख्य कार्यपालन अधिकारी/सीईओ श्री.अनिलकुमार लखीना यांनी माझी मुलाखत घेतली व मला गोरेगांव येथेच 3-बी-1 अंतर्गत गणित शिक्षक म्हणून नियुक्ती दिली. त्यावेळेस मी एलएल.बी. द्वितीय वर्षाचा विद्यार्थी असल्याने मी गोंदिया येथेच राहून गोंदिया-गोरेगांव-गोंदिया असा एस.टी. ने दररोज जाणे-येणे करायचो.
माझा पूर्वोल्लेखित मित्र सी.आय.पटले हा सुद्धा एलएल.बी. फायनल इयर चा विद्यार्थी होता व गोंदिया येथेच माझ्याच बाजूला रहायचा. तो आणि मी असे आम्ही दोघेही गोंदिया-गोरेगांव-गोंदिया असे एस.टी. ने रोजच जाणे-येणे करायचो. याच कालावधीत माझा गोंदिया येथीलच एक जुना मित्र पी.व्ही.डोंगरे हा सुद्धा त्याच शाळेत जीवशास्त्राचा 3-बी-1 अंतर्गत शिक्षक म्हणून कार्यरत होता. तो सुद्धा गोंदिया येथेच राहत असून तोही आमच्यासोबतच गोंदियावरून जाणे-येणे करायचा. अशी आमची तिघांची जोडी जमली होती.
आमच्या या जोडीत मी 5 फूट 11इंच, पटले हा 5 फूट 8/9 इंच तर डोंगरे हा सुमारे साडेपाच फूट उंचीचे असल्याने व त्यावेळेस सुप्रसिद्ध असलेल्या अमर-अकबर-ॲन्थोनी या सिनेमाच्या प्रभावाने शाळेतील विद्यार्थ्यांनी व काही शिक्षकांनीही आमच्या त्रयीला अमर-अकबर-ॲन्थोनी असे नाव दिले होते. त्यातील पटले हा अमर, डोंगरे हा अकबर व मी ॲन्थोनी अशी ती आमची तत्कालीन "नाम-ठेवणी" होती.
शाळा सुटल्यावर रोजच संध्याकाळी आम्ही तिघेही सोबतच एस.टी.ने शाळेतून परत येत असू. परत येताना बस गोंदियात प्रवेश करतेवेळी आय.टी.आय. जवळील भागातील उष्मा धान मिल्सचा अगदी कुजका (एचटूएस सारखा) वास बसभर पसरायचा व सर्व प्रवासी नाक झाकायचे. उष्मा मिल्सच्या जवळपासच्या भागातच डोंगरेचे घर होते. एके दिवशी त्या जागेवर बस पोचताच वास सुटला व मी डोंगरेला हसत हसत म्हणालो, 'तू रोज येथेच हागायला येतोस का? किती वास सुटला तुझ्या हागल्याचा!' आणि माझ्या या उत्स्फूर्त टिप्पणीवर बसमधील सारे प्रवासी पोटभर हसले. अशी आमची सहयात्रा मार्च-1978 मध्ये संपुष्टात आली, कारण आमची नेमणूक ही 3-बी-1 अंतर्गतची तात्पुरत्या स्वरूपाची असल्याने आम्हाला तिघांनाही नोकरीतून पुढील शैक्षणिक सत्रापर्यंत दोन-तीन महिन्यांकरिता "खाली" करण्यात आले होते.
यापुढील योगायोगाची दुःखद कथा अशी की, आजच्या घडीला अमर-अकबर-ॲन्थोनी या चित्रपटातील अमर=विनोद खन्ना आणि अकबर=ऋषी कपूर हे दोघेही निसर्गशरण झाले आहेत तर ॲन्थोनी=अमिताभ बच्चन अजूनही कार्यरत आहे. आणि योगायोग असा की, आमच्या त्रयीतीलही अमर=सी.आय.पटले व अकबर=पी.व्ही.डोंगरे हे दोघेही मागेच निसर्गशरण झालेत. मी तथाकथित ॲन्थोनी मात्र अजूनतरी कार्यरत आहे. माझे ते दोन्ही मित्र मला नेहमीच आठवतात व कधीकधी त्यांचे स्मरण मला विचलितही करून जाते.
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया.
(19/04/2023)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment