"जागतिकीकरण आणि भाषा" : एक आकलन माझेही

*"जागतिकीकरण आणि भाषा" : एक आकलन माझेही*
---------------------------------------------- --------------------
@ॲड.लखनसिंह कटरे 
~~~~~~~~~~~~~~~~
     1993-1995 दरम्यान मी रामटेक (जि.नागपूर) येथे तालुका सहकार निबंधक असताना तेथील मराठीचे प्राध्यापक, सुप्रसिद्ध कवी, समीक्षक व विचारवंत श्री.कृष्णा चौधरी यांच्याशी मैत्री "जुळली." 

       मला सुद्धा मराठी साहित्यात, विशेषतः कविता क्षेत्रात थोडीशी रुची असल्याने आम्ही रामटेक येथे साहित्य विषयक कार्यक्रम घेत असायचो. अशाच एका कविसंमेलन प्रसंगी कृष्णा चौधरी यांनी डाॅ.श्रीपाद भालचंद्र जोशी यांना पाचारण केले होते. त्यावेळी जोशी यांनी सादर केलेली कविता मला जशीच्या तशी आठवत नसली तरी ती चिमणी हा पक्षी योजून तत्संबंधित केलेली/रचलेली एक अतिशय उच्च दर्जाची कविता होती. त्या दिवसापासून मी डाॅ.श्रीपाद जोशी यांच्या कवितेचा व लिखाणाचा फॅनच झालो. आपल्याला सुद्धा जोशी यांच्या कवितेसारखी कविता लिहिता यावी, असे वाटायचे. काही नकला सुद्धा मी केल्या असाव्यात. 

      त्यानंतर माझ्या voracious वाचन-प्रवासात असेही कळले/समजले की जोशी हे संवाद, संप्रेषण विषयक भाषा-शास्त्राचे सुद्धा सुप्रसिद्ध जाणकार/विचारवंत आहेत. मला सुद्धा या विषयाची आवड व अल्पशी समज असल्याने मी त्यांना प्रत्यक्ष न भेटताही त्यांच्या मार्गाचा सुद्धा सहप्रवाशी होऊ लागलो. 

     मी 1978-1984 दरम्यान देवरी येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असताना शाळेला भेट देऊन आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषद भंडारा चे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री.अनिलकुमार लखीना (IAS/रेकाॅर्ड किपींगच्या सुविहित संकल्पनेचे जनक) आले होते. आम्हा शिक्षकांच्या औपचारिक सभेत त्यांनी सर्वांचा परिचय जाणून घेतला. माझ्या हातात त्यावेळेस PHONETICS वरील एक इंग्रजी पुस्तक होते. ते पाहून त्यांनी मला त्या पुस्तकाबद्दल काही प्रश्न विचारले. मला त्यातील काही प्रश्नांची योग्य, समाधानकारक उत्तरे देता आली नव्हती. माझी थोडीशी त-त-फ-फच झाली होती. तरी त्यावर अजिबात नाराज *न* होता, त्यांनी मला त्याविषयावरील आणखी काही पुस्तकांची नावे सूचवून ती पुस्तके सुद्धा वाचायला सांगितले. अशाप्रकारे माझी या पुस्तकाच्या माध्यमातून भाषा, उच्चारशास्त्र, संवाद आणि संप्रेषण विषयक प्रारंभिक माहितीशी ओळख झाली होती. ती अल्पस्वल्प ओळख मला जोशी यांच्या लिखाणाचा फॅन व्हायला मददगारच ठरली. मला या विषयातले विशेष ज्ञान नसले तरी माझ्या H.D.C.M. आणि D.B.M. च्या अभ्यासात या विषयाच्या प्रारंभिक ओळखीची मला "शब्द" या गूढतम संकल्पनेच्या यथार्थ अर्थनिर्णयनासाठी मदतच झाली. 

      पुढे महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागात राजपत्रित अधिकारी म्हणून (1984 मध्ये) रूजू झाल्यावर सहकार क्षेत्र व या क्षेत्रातील संबंधितांचा मित्र, तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक ही विहित भूमिका पार पाडताना मला माझ्या या विषयाच्या अल्पस्वल्प ओळखीची मदतच झाली. या विषयावरील माझ्या अल्पस्वल्प ओळखीमुळे मला माझे न्यायिकवत (QUASI-JUDICIAL) निर्णय व आदेश मराठीत लिहिताना खूप खूप मदतही झाली. वस्तूतः भारतातील बहुतेक कायदेकानून इंग्रजीतच असल्याने व कायदापुस्तकातील इंग्रजी रचनाच अधिकृत व विधीमान्य मानण्याचे/धरण्याचे कायदेशीर बंधन असल्याने मराठी भाषेत न्यायिकवत (QUASI-JUDICIAL) निर्णय/आदेश लिहिणे सुस्पष्टेच्या दृष्टीने कठीणच ठरत असे. पण माझी ती भाषा, संवाद व संप्रेषण विषयक शब्द-शास्त्राची अल्पस्वल्प प्रारंभिक ओळख नेहमी माझ्या मदतीला धावून यायची. त्याचा सुपरिणाम असाही झाला की, माझे काही निर्णय/आदेश मा.उच्च न्यायालय व मा.सर्वोच्च न्यायालयात सुद्धा आव्हानित झाले असता ते सारे कायम राहिले/राहू शकले.

     माझ्या या विषयाच्या अल्पस्वल्प ओळखीची मदत मला माझ्या कविता लेखनातही झाली, हे मी नाकारू शकत नाही. माझे यदा-कदा अभ्यास विषय राहिलेले/असलेले तत्त्वज्ञान, राजनिती शास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, पूरातत्व, व्यवस्थापन व प्रशासन शास्त्र, सभाशास्त्र, विधीशास्त्र, सहकारी प्रबंधन, बँकिंग व अंकेक्षण, वाणिज्य, भौतिकशास्त्र, गणितशास्त्र, रसायनशास्त्र, अध्यात्म, दैवतशास्त्र, ज्योतिषशास्त्र, स्वभावशास्त्र, मंत्रशास्त्र, आयुर्वेद, योगशास्त्र, नॅचरोपॅथी, पुष्पौषधीशास्त्र, मानसशास्त्र,  .... सारखे विज्ञान-संमत/असंमत विविध विषय मला त्यांच्या त्यांच्या "व्यवहारा"ची भाषा, शब्द व शब्दार्थ सुद्धा शिकवून गेले.(मी एक मूर्ख : संदर्भ-दासबोध) 

     ...आणि त्यामुळेच मला भाषा, भाषेतील शब्द व त्यांचा उच्चार, शब्दांचा बदलता अर्थ, त्यानुसारची संवाद व संप्रेषण प्रक्रिया, अशा प्रक्रियेतील जागतिकीकरणाचे सकारात्मक/नकारात्मक प्रभाव, ...  सारख्या संकल्पना हळूहळू थोड्याबहुत प्रमाणात कळू लागल्या. (नीम हकीम खतरा-ए-जान 😃😇😀)

     आजच्या जागतिकीकरणाच्या माहोलात डाॅ.जोशी म्हणतात त्याप्रमाणे -- "... मोठ्या प्रमाणावर माहितीचा, संवादाचा, भाषेच्या वापराचा लोकव्यवहार वाढल्याने संवाद-यंत्रांची, डेटाची मागणी वाढली, डेटा विकण्याचाच मोठा उद्योग आकाराला आला. हा उद्योग जगातील विविध भाषांमधून भाषेच्या व त्याला पूरक बहुमाध्यमी चिन्हांच्या वापरामुळे वाढला. पर्यायाने भाषिक व्यवहार, भाषांचा वापर वाढला. अर्थात तो तसा वाढावा यासाठीच जागतिकीकरणातून बाजाराचे, नवनवे बाजार शोधणे जे चालवले त्याचीच ती परिणती होती. भाषा या देखील त्यामुळे विक्रय वस्तु झाल्या, लेखन रुपात आणि आता तर ध्वनिरुपातही भाषेच्या वापराचा हा बाजार विस्तारतो आहे." हा भाषेच्या वापराचा बाजार साहित्य क्षेत्रात सुद्धा फोफावत असून साहित्यिकांच्या पुढे त्यांच्या समयसापेक्ष अभिव्यक्तीसाठी भलेमोठे प्रश्नचिन्ह सुद्धा या भाषीय-व्यापाराने उभे केले आहे. या प्रश्नचिन्हाला यशस्वीपणे सामोरे जाऊन साहित्यिकाने स्वतःच बदलाचे माध्यम होण्याची तयारी ठेवावी लागेल. डाॅ.जोशी पुढे असेही म्हणतात की, "...या अगोदर माणसाचे भाषासंचित एवढ्या वेगाने कधीच बाधित झाले नव्हते. कोणत्याही बदलाचे माध्यम भाषा हेच असल्याने सर्वाधिक प्रभावित प्रथम होते ती भाषा, पर्यायाने संस्कृती. तसे झाले. ...." याद्वारे आजची भाषा-व्यवस्था डाॅ.जोशी अगदी योग्य प्रकारे व्याख्यायित करतात, असे मला वाटते. 

    अशा या जागतिकीकरणाच्या प्रभावाने प्रभावित होत असलेली/झालेली भाषा तिच्या शास्त्रोक्त उच्चारापासून ते अ-भ्रामक/मूलार्थ(?) शब्दार्थापर्यंत कशी टिकवून ठेवावी हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न ठरत असून या प्रश्नाचे सयुक्तिक उत्तर शोधण्याची जबाबदारी आपसुकच साहित्यिकांवर येते, असेही माझे अल्पबुद्धीचे आकलन आहे.

     डाॅ.जोशी यांच्या या संक्षिप्त पण गागर में सागर असलेल्या लेखाने माझ्या विचारांत जी चलबिचल/ढवळाढवळ निर्माण केली ती मला साह्यभूतच ठरणार आहे. त्यासाठी मी डाॅ.जोशी यांचा आभारी आहे व असेन. 

     एकंदरीत माझ्या अशा या आडमुठ्या प्रवासात श्री.अनिलकुमार लखीना व डाॅ.श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या, कळत नकळत  प्रेरणेचा, कळत नकळत प्रभाव(?), असला/नसला व मला ते मान्य असले/नसले तरी मी या दोघांचा शिष्य मात्र नाही/होऊ शकलो नाही/होऊ शकत नाही. मला गुरु-शिष्य ही संकल्पनाच मान्य(!) नसल्याने तसा प्रश्नच उद्भवत नाही. आणि कदाचित त्यामुळेच मी अनिलकुमार लखीना यांच्या जगप्रसिद्ध(!) रेकाॅर्ड किपींग संकल्पनेवर तथा श्रीपाद जोशी यांच्या काही विचारांवर माझे मतभेद व्यक्त करण्याचे धाडस करू शकलो. यापैकी अनिलकुमार लखीना यांच्याशी पुन्हा कधी, आजवर तरी संबंध आला नाही, संपर्क सुद्धा झाला नाही. त्यामुळे त्यांच्या माझ्यावरील राजी-नाराजीचा प्रश्नच उद्भवत नाही. परंतु श्रीपाद जोशी यांच्याशी अजूनही प्रत्यक्षाप्रत्यक्ष संपर्क व संबंध सुरू असून श्रीपाद जोशी मात्र माझ्यावर काहीसे नाराज असावेत असा माझा (अल्पमतीचा) कयास निराधार असल्याचे नुकतेच स्पष्ट झाले आहे. असो. 

     आमचे मित्र दिवंगत डाॅ.अनिल नितनवरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ डिजिटल अ/नियतकालिक तत्रैव - 2 अंकात प्रकाशित डाॅ.श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या "जागतिकीकरण आणि भाषा" या गागर में सागर स्वरूपाच्या महत्त्वपूर्ण लेखाच्या निमित्ताने मला अशाप्रकारे प्रकट होता आले, त्याबद्दल मी डाॅ.जोशी आणि तत्रैव च्या सर्व चमू-मंडळींचा आभारी आहे. खूप खूप धन्यवाद आणि पुनश्च आभार. (#1005)
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया 
(चलभाष : 7066968350)
(15.09.2020)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~




Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन