विचारपद्धती व तिचे प्रकार : एक संक्षिप्त आकलन

*विचारपद्धती व तिचे प्रकार : एक संक्षिप्त आकलन*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
       वाद (इझम) व/वा विचारसरणी या विचारपद्धतीच्या विविध विधा/तऱ्हा आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. या विचार करण्याच्या विचारपद्धतींचे मी तीन मुख्य प्रकार मानतो. ते तीन प्रकार म्हणजे -- 
(1)विचारवाद (इझम), 
(2)विचारसरणी आणि 
(3)विचारधारा.  
      (1) *विचारवाद* :- यापैकी विचारवाद(इझम) हा कोणत्यातरी विचारकाच्या विचारांचा संग्रह व/वा संगम असतो. यात मुख्य प्रवर्तकाचे विचारच प्रामुख्याने आचरले व अभ्यासले(?) जातात. मुख्य प्रवर्तकाने मांडलेल्या विचारांचा प्रतिवाद करण्याची प्रथा या प्रकारात कटाक्षाने टाळली जाते. मुख्य प्रवर्तकाने त्याच्या जीवनकालात/जीवनप्रवासात मांडलेले विचार हेच अंतिम विचार असा एक समज/कल/आग्रह असणे, हे या प्रकाराचे एक वैशिष्ट्यच म्हणता येईल. परंतू निसर्गचक्र हे सतत प्रवाही व बदलानुकूल असल्याने कोणताच कालसापेक्ष विचार/विचारवाद/विचारपद्धती शाश्वत/कायम/सार्वकालिक असूच शकत नाही. त्यामुळेच अर्थातच अशा विचारवाद/विचारपद्धतीचे कालसुसंगत असणे क्षरित होऊन या प्रकाराचे कूपमंडूकत्व उदयास येऊ लागते. असे असले व या विचारपद्धतीचे पाईक नसलेल्या विचारकांना यातील व्ययर्थ समजत/कळत असले तरी या प्रकारच्या अनुयायींना मात्र याचा बोध होणे दुरापास्त होऊन बसते. आणि अर्थातच मग या प्रकाराचे समर्थक/अनुयायी आणि वेगळा विचार मांडणारे विरोधक/अ-समर्थक यांच्यातील सारे नैसर्गिक मतभेद हे मानवनिर्मित मनभेदात तबदील होऊन सार्वजनिक विवेकाची ऐशीतैशी होऊ लागते. थोडक्यात असे म्हणता येईल की, अशा विचारवादाचे (इझमचे) शव/भूत अधूनमधून उसळून इतर विचारकांनाही त्याची भूतबाधा(?) होऊ लागते.
       (2) *विचारसरणी*:- विचारवाद (इझम) ही विचारपद्धती कोणातरी विचारक प्रवर्तकाने प्रवर्तित केलेली असल्याने अशा विचारपद्धतीद्वारे तिच्या एकूणच प्रतिपादनात कोणताही बदल सहजगत्या स्वीकृत केला जात नाही, उलट अशा कोणत्याही बदलाला तीव्र विरोध केला जातो, हे आपण वर पाहिले. परंतू *विचारसरणी* या दुसऱ्या प्रकारात मात्र विचारपद्धतीच्या मूळ प्रतिपादनात काही कालसुसंगत/कालसापेक्ष बदल स्वीकृत केले गेले तरी मूळ तोंडवळा मात्र अबाधित राहील याचीही दक्षता घेतली जाते. या प्रकारच्या विचारपद्धतीवर झालेले/होत असलेले आक्षेप अंशतः समावेशित करून उर्वरित आक्षेपांना तूर्त सौम्य विरोध दर्शवून ते आक्षेप फेटाळून लावण्याचे तार्किक उपाय योजिले जातात. थोडक्यात विचारपद्धतीच्या या प्रकारात पूर्ण ताठरता नसते तर सौम्य लवचिकतेचा अवलंब केला जातो. अर्थातच कालांतराने विचारपद्धतीच्या या प्रकारात कालसुसंगत/कालसापेक्ष बदल सौम्य गतीने का होईना, होऊ लागतात. तरी मूलभूत बिंदूंवर भर देण्याचे कार्य सुद्धा अन्य अनुयायी/समर्थक सातत्याने करीत असतात. एकंदरीत या प्रकारातील विचार करण्याची क्षमता गोठलेली मात्र नसते, बदल स्वीकृत करण्याची प्रक्रिया अतिशय संथगतीने प्रवाहित असते. 
        (3) *विचारधारा*:- महात्मा गांधी यांचे समर्थक असो वा विरोधक सर्व आतून जाणून असतात की, महात्मा गांधी म्हणजे एक चालताबोलता चमत्कार होते व आहेत. जागतिक पातळीवरील सर्वच बाबतीतील/क्षेत्रातील श्रेष्ठतम विचारक/विचारवंत गांधीविचार-प्रणित विचारपद्धतीला डावलण्याची हिंमत करीत नाहीत/करू धजत नाहीत हे जागतिक सत्य सर्वश्रुत आहे. अशा या गांधींचे एक महत्त्वपूर्ण कथन/विधान असे की, गांधींच्या कालच्या आणि आजच्या विचारात बदल/विसंगती आढळून येत असेल तर ती एक नैसर्गिक प्रक्रियाच असून आजचा विचारच अधिकृत मानला जावा. विचार करण्याच्या अशा/या विचारपद्धतीला मी *विचारधारा* असे म्हणतो व याला मी विचारपद्धतीचा तिसरा मुख्य प्रकार मानतो. विचारपद्धतीच्या या प्रकारात कोणत्याही इझमला स्थानच नसते. कोणत्याही नदीच्या प्रवाहात दोनदा दाखल होता येत नाही, कारण आपण पहिल्यांदा प्रवेश केलेला नदीप्रवाह पुढे प्रवाहित होऊन त्याचजागी पुढचा नदीप्रवाह आलेला असतो, असे एक विधान केले जाते. असाच जो विचारप्रवाह सतत प्रवाहित असतो, सतत नवनवोन्मेषशाली असतो तो विचारप्रवाह म्हणजेच विचारपद्धतीचा *विचारधारा* हा प्रकार होय, असे मी मानतो. विचारपद्धतीच्या या प्रकारात सतत कालसुसंगत/कालसापेक्ष असे बदल/परिवर्तन घडत असून ही विचारपद्धती कधीच कालबाह्य व/वा कालविसंगत होत नसते. या प्रकारात वैचारिक मतभेदांची सार्वजनिक विवेकसंमत अशी साधक-बाधक चर्चा होत असते. या प्रकारत आज्ञाधारकपणाला महत्त्व नसून प्रश्न विचारण्याला महत्त्व असते. आपल्या मताला आव्हान देणाऱ्या लोकांचा दुस्वास न करता वेगळे मत समजावून घेऊन ते तशाच शांतपणे खोडून काढणे किंवा शांतपणे माघार घेणे अशा तर्कसुसंगत पद्धतीचा अवलंब हे या प्रकाराचे एक वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. थोडक्यात सार्वजनिक विवेक जोपासणे आणि शांतिपूर्ण व सामंजस्यभावदृढ सहअस्तित्व जपण्याची संस्कृती आचरणे, म्हणजेच *विचारधारा* हा विचारपद्धतीचा तिसरा प्रकार होय, असे मला नम्रतापूर्वक मांडावेसे वाटते. 
         मुळात कोणताही विचार स्थिर(?) नसतोच, तो सतत प्रवाही असतो. इतर विचारांचे प्रभाव, त्यांचे विविधांगी अर्थ, विविध संकल्पना यांचा बहुविध प्रवाह काळाच्या ओघात कोणत्याही विचारकाच्या विचारांत वाहात असतो. भोवतालच्या वातावरणातून, प्रवासांतून, अन्यभाषिक मित्रमैत्रिणींकडून, व्यावसायिक कारणांतून नवनवे विचार मूळ विचारात मिसळत जाण्याची प्रक्रिया सतत जागृत असते. अशी सरमिसळ योग्य की अयोग्य याचा पडताळा लावताना/करताना सार्वजनिक विवेक आणि नैतिकतेचे अधिष्ठान परमावश्यकरीत्या अनिवार्य असते आणि हीच बाब *विचारधारा* या विचारपद्धतीचे श्रेष्ठत्व, सार्वकालिकत्व, शाश्वतत्व आणि महत्त्व स्पष्ट करते. याच संदर्भात हे सुद्धा नमूद करणे आवश्यक ठरते की, कोणत्याही विचारपद्धतीचे संवादी आणि प्रवाही असणे तथा अर्थवाही असूनही गहनगम्य नसणे सुद्धा मानवीय संवेदनेच्या दृष्टिकोनातूनही यथायोग्य ठरते. अशाप्रकारे सतत संवादसंपृक्त व प्रवाहशील असलेल्या *विचारधारा* या विचारपद्धतीचे कालातीत असे एकमेवाद्वितीय महत्त्व अधोरेखित होते, असे माझे नम्र आकलन आहे. 
       अशाप्रकारे विचार करण्याच्या पद्धतींचे तीन मुख्य प्रकार असून पुष्कळदा हे तिन्ही प्रकार एकाच व्यक्तीच्या विचार-आचरणात आलटून-पालटून दिसून येतात. आणि त्यामुळे त्या व्यक्तीची नेमकी विचारपद्धती कोणती याची शहानिशा करणे कठीण होऊन बसते. अशी व्यक्ती बहुतेक वेळेस पाखंडी सुद्धा असू शकते. म्हणूनच नेमक्या वैचारिक विचारपद्धतींच्या अनुयायी/समर्थकांची पारख करताना त्यांच्या त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतींचे बारीक निरीक्षण क्रमप्राप्त ठरत असते.
       सज्जन तथा सुविचार-समृद्ध व्यक्तींच्या विचार करण्याच्या पद्धतींमधले इतर मुद्द्यांसह सर्वच मुद्दे नैतिकता, कायदे, योग्य-अयोग्य यांची पारख/सार्वजनिक विवेक अशा गोष्टींशी संबंधित असतात. ज्ञानी आणि सुविचार-समृद्ध व्यक्तींना योग्य-अयोग्य यांची पारख करण्याची व नैतिकतेच्या बाबतीत बोलायचं तर मानवी दोष, पक्षपाती वृत्ती, वर्णद्वेष, एककल्ली कट्टरपणा, द्वेषपूर्ण आवेश सारख्या अवगुणांपासून सदैव फटकून राहण्याची वृत्ती दिसून येते. अशा सुक्ष्म ते सुक्ष्मतम निरीक्षणाद्वारे समोरील व्यक्ती विचार करण्याच्या उपरोल्लेखित तीन प्रकारांपैकी नेमका कोणत्या प्रकारातील विचारपद्धतीचा अनुयायी/समर्थक आहे व आपले विचार व्यक्त करताना प्रामुख्याने कोणत्या विचारपद्धतीचा अवलंब करते, हे थोड्याशा प्रयत्नानंतर सहज ओळखता येऊ शकते. 
       माझ्या नम्र आकलनानुसार या तीन प्रकारांपैकी तिसरी *विचारधारा* ही विचारपद्धती वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही यथायोग्य ठरते. आणि मानवा-मानवातील शांतिपूर्ण सामंजस्यभाव तथा सहअस्तित्वभाव टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा विचारपद्धतीच्या पहिल्या दोन प्रकारांपेक्षा *विचारधारा* हा तिसरा प्रकारच नैसर्गिकरीत्याही अनुकूल ठरतो, अशी माझे नम्र आकलन आहे.
(#875)
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया.
(24/02/2023)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन