माझी कविता : एक अप्रासंगिक टिपणी

*माझी कविता : एक अप्रासंगिक टिपणी*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
>> तसे पाहिले असता माझ्या आईच्या प्रेरणेने माझ्या वयाच्या नवव्या-दहाव्या वर्षापासूनच मी सटरफटर कविता/कथा करू/लिहू लागलो होतो. माझ्या या वृत्तीला 1969-70 पासून अजून काही धुमारे फुटू लागून मी आणखी काही सटरफटर कविता/कथा (हिंदी आणि मराठीत) करू लागलो होतो. माझ्या वर्ग दहा (1970-71) च्या शिक्षिका सौ.मंदाकिनी प्रभाकरराव सगदेव यांनी मला खऱ्या अर्थाने काव्यलेखनाला प्रवृत्त व दिक्षित करताना काव्यालंकार, वृत्त-छंदादि काव्य-व्याकरणाचे सफल व यशस्वी धडे दिले. मी आपल्या अल्पमतीप्रमाणे यथाशक्य तसा या काव्य-व्याकरणाला शरण जाऊन माझी सटरफटर कविता लिहित असे.

>> परंतु मी बी.एससी.(पीसीएम) च्या अभ्यासक्रमात आधुनिक भौतिकशास्त्राचा अभ्यास करू लागलो तेव्हा प्रा.आगलावे सरांच्या प्रभावी व सुहृद्, सुस्पष्ट शिकवण्यामुळे खूप प्रभावित होऊन भौतिकशास्त्रावरील विविध पुस्तके वाचू/अभ्यासू लागलो. बी.एससी. च्या अंतिम वर्षात आइनस्टाइन यांचा सापेक्षवादाचा सिद्धांत, वर्नर हायसेनबर्ग यांचा अनिश्चततेचा सिद्धांत आणि रिचर्ड फाइनमन यांची वेगवेगळे विश्वेतिहास असण्याची कल्पना या त्रयींचा माझ्या चिंतनावर अतिशय प्रभाव पडून मी माझ्या नियमबद्ध काव्य-व्याकरणाच्या UNLEARN ची आत्म-प्रक्रिया सुरू केली. मी भौतिकशास्त्राचा विद्यार्थी-अल्पाभ्यासक(?) असल्याने ध्वनीशास्त्राचा अवलंब असलेली लय ही संकल्पना मात्र मी विसरू शकलो नाही. पण माझ्या या UNLEARN वृत्तीपायी हळूहळू माझ्या कवितेतून (हिंदी व मराठी) काव्यालंकार व वृत्तादि बाबी "अव्यक्त" होऊ लागल्या. 

>> याच सुमारास किंवा याच्या थोडासा मागे पुढे ग्रेस, मर्ढेकर, खानोलकर चिं.त्र्यं. यांच्या कवितांनी मला घेरल्यामुळे माझ्या कवितेत वर नमूद तीन भौतिकी-शास्त्रज्ञांसोबत या तीन मराठी कवींचा सुद्धा प्रभाव अनायासेच जाणवू लागला. त्यामुळे मी हे तीन कवी माझ्या वाचनातून बाजूला काढून ठेवले. आणि आपली कविता (हिंदी व मराठी) आपल्याच मस्तीत लिहू लागलो. 

>> मी भौतिकशास्त्राचा भोक्ता असल्याने, जरी माझ्या बी.एससी. च्या अंतिम वर्षाच्या भौतिकशास्त्राच्या एका लालची प्राध्यापकामुळे मला एम.एससी. (भौतिकशास्त्र) मध्ये प्रवेश न मिळाल्याने माझी शास्त्रज्ञ होण्याची इच्छा डावलून मला एलएल.बी. साठी प्रवेश घ्यावा लागला असला तरी, मी भौतिकशास्त्रातील अद्यावत संशोधन व माहिती वाचत/अभ्यासत असतो. याच प्रवासात मला स्टीफन हाॅकिंग या विश्वरचनाशास्त्रज्ञाने घेरले. आणि हा माझ्या मानसपटलावर स्वार असलेल्या पूर्वीच्या तीन शास्त्रज्ञांसोबत जाऊन बसला. त्यामुळे माझ्या कवितेत (हिंदी व मराठी) या चार शास्त्रज्ञांनी आपले ठाण मांडल्याची मांडलिक वस्तुस्थिती मी अजूनही भोगतोच आहे. त्यातल्या त्यात एक बरे की मी अजूनही "लय" या संकल्पनेचा मात्र शरणार्थी आहेच. 

>> माझी उपरोक्त बडबड वाचून एखाद्या रसिकाला प्रश्न पडला की कविता या अगदी वेगळ्या(!)च विषयात भौतिकशास्त्र व शास्त्रज्ञ यांच्या लुडबुडीची गरज अनावश्यक असूनही ही अव्यापारेषु व्यापारासारखी द्राविडी प्राणायामाची कसरत(?) कशाला ? तर मग मी ठीक अर्ध्यारात्री सूर्य शोधण्याचा प्रयत्न अवश्य करेन. 
¤
@ॲड.लखनसिंह कटरे 
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया 
(21 ऑगस्ट 2020)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन