वाचता वाचता : इब्ने शफी की जासूसी दुनिया

*वाचता वाचता...*😁😁😁
-----------------------------------------------
👇
*इब्ने शफी की जासूसी दुनिया*
~~~~~~~~~~~~~~~~~~~
>> मी जर विसरत नसेन तर माझ्या तत्कालीन हायर मॅट्रीक (अकरावी मॅट्रीक) व महाविद्यालयीन जीवनात म्हणजे 1970 ते 1980 या कालावधीत हिंदी भाषेत जासूसी कथा/कादंबऱ्यांचे एक पाक्षिक किंवा मासिक प्रकाशित व्हायचे. त्याचे नाव होते 'जासूसी दुनिया' आणि लेखक होते इब्ने शफी. त्या अंकातून दर पंधरवड्यात/महिन्यात नवनवीन(!) जासूसी कथा/कादंबरी प्रकाशित केल्या जायच्या. मी सुमारे पन्नासेक तरी अशा जासूसी कथा/कादंबऱ्या वाचल्या असाव्यात.

>> शिवाय विविध पाॅकेट बुक्स अंतर्गत गुलशन नंदा, रामानंद सागर, राजवंश, रानू, गुरुदत्त, शिवानी, ... आदिंच्या हिंदी कादंबऱ्या/उपन्यास सुद्धा दर महिन्या-दोन महिन्यात प्रकाशित व्हायच्या. अशा सुमारे पाचेकशे हिंदी कादंबऱ्या/उपन्यास मी वाचल्या असाव्यात. त्यामुळे माझे हिंदी भाषेवर चांगलेच प्रभुत्व(?) झाले होते. मिडलस्कूल मध्ये वर्धा आणि पुणे येथील राष्ट्रभाषा प्रचार समिती आणि महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा यांच्या परिचय, प्रबोध, प्रवीण, वगैरे परीक्षा उत्तीर्ण झाल्याने माझा हिंदी साहित्याशी प्राथमिक/प्रारंभिक परिचय सुद्धा होऊ शकला होता. 

>> याच दरम्यान हिंदी प्रचारक समिती, वाराणशी यांच्या हिंदी बुक क्लब चा अखेरपर्यंत (सुमारे 2012 पर्यंत?) सदस्य असल्याने त्यांनी या बुक क्लब अंतर्गत प्रकाशित केलेली सर्व पुस्तके (सुमारे सात-आठशे) मी मागवून वाचली आहेत. यातच मला मनू शर्मा यांच्या कर्ण की आत्मकथा, द्रौपदी की आत्मकथा, द्रोण की आत्मकथा, कृष्ण की आत्मकथा, वगैरेंसोबतच 'शिवानी की आत्मकथा' ही शिवाजी महाराजांच्या जीवनावरील कादंबरी सुद्धा वाचता आली. या बुक क्लब द्वारा प्रकाशित विविध विषयांवरील पुस्तके (पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, काल्पनिक, सांस्कृतिक विषयांवरील ग्रंथ-वजा-पुस्तके) वाचण्याचे सौभाग्य मला प्राप्त झाले होते/आहे. 

>> याच दरम्यान दिल्ली स्थित विश्वनाथ द्वारा संपादित/प्रकाशित 'सरिता' आणि 'मुक्ता' हे दोन हिंदी पाक्षिक सुद्धा नियमित वाचता आले आणि त्यातून 'हिंदू धर्म के पथभ्रष्टक तुलसीदास' सारखे विवादास्पद ग्रंथ व तद्विषयक विविध विवादास्पद लेख सुद्धा वाचता आले. त्यामुळे माझ्यातील कूपमंडूक वाचकदृष्टी विशाल/तटस्थ/विकसित होत गेली, असे मला वाटते. 

>> याच दरम्यान, धर्मवीर भारती यांचे 'धर्मयुग', कमलेश्वर यांचे 'सारिका', ज्ञानरंजन यांचे 'पहल', टाईम्स ऑफ इंडिया चे 'दिनमान', आनंद/अमृत बझार पत्रिकेचे 'रविवार', डाॅ.दयानंद वर्मा यांचे 'प्रकाशित मन', नेमीचंद जैन यांचे 'तीर्थंकर', आचार्य तुलसी यांचे 'युवा दृष्टी', विवेकानंद आश्रम, रायपूर यांचे 'विवेक ज्योति', आचार्य रजनीश यांचे जबलपूरहून प्रकाशित होणारे एक साप्ताहिक, 'कादंबिनी', 'राष्ट्रधर्म', 'नवनीत', 'यंत्र, मंत्र, तंत्र विज्ञान', 'निरोगधाम', 'आरोग्य', 'अखण्ड ज्योति', 'कल्याण', 'इंडिया टुडे' ... इत्यादि ...  अशी विविध हिंदी नियतकालिके स्टॉलवरून खरेदी करून किंवा सदस्यता ग्रहण करून वाचता आली व त्यापैकी काहींमध्ये सटरफटर(!) हिंदी लेखन सुद्धा करता आले. 

>> असा माझा हिंदीचा प्रवास 1980-1982 पासून हळूहळू मंदावत गेला व 1999 पासून जवळजवळ थांबलाच, त्याबद्दल आज पश्चात्ताप होत असला तरी 'अब पछताए क्या होत, जब चिड़िया चुग गई खेत', असा एकूण प्रकार आहे. (जसे आठवले तसे.)/(आता पुन्हा, संथगतीने का होईना, हा प्रवास सुरू केलाय!)
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार, जि.गोंदिया.
(11/02/2022)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन