"व्यवस्थेत बदल नक्की होईल, आणि ते खालूनच शक्य आहे" : माझे एक अल्पबुद्धि-आकलन
*"व्यवस्थेत बदल नक्की होईल, आणि ते खालूनच शक्य आहे" : माझेही एक अल्पबुद्धि-आकलन*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
>> मी 'सर्वंकष'चा प्रथमांकापासूनचा वर्गणीदार-वाचक आहे. 'सर्वंकष'च्या ए-मे-जू 2022 च्या अंकातील आदरणीय डाॅ.माधव गाडगीळ यांच्या वरील शीर्षकाच्या मुलाखतीतून व्यक्त विचार हे मानवाच्या पृथ्वीवरील आनंदमय शाश्वत अस्तित्वासाठी पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन व संतुलन साधणे कसे अनिवार्य आहे, ह्या संदर्भातील त्यांच्या तद्विषयक सघन व प्रत्यक्ष स्वानुभवीय अभ्यासाचे द्योतकच आहेत. त्यांनी अगदी सुस्पष्टपणे व सडेतोडपणे आपले तद्विषयक अध्ययन व तद्जनित विचार व्यक्त करून संवेदनशील वाचकांना विचारप्रवृत्त होण्यास भागच पाडले आहे, असे मला वाटते. या सद्यकालीन-परमावश्यक ठरत असलेल्या एका ज्वलंत विषयाला त्यांनी सजग व सुजाण वाचकांसमोर ठेवून वाचकांना त्यादृष्टीने कार्यप्रवण व्हायला जणू मजबूरच केले आहे. हा विषय शासनकर्त्यांना/धोरणकर्त्यांना त्यांच्या अजेंडावर प्राथमिकतेने घेऊन त्यावर तातडीने सकारात्मक व सक्षम, सुफल उपाययोजना करण्या/राबविण्यासाठी लोकजागराचे/सक्रिय लोकसहभागाचे दबावतंत्र वापरण्याची अनिवार्यता सुद्धा त्यांनी स्पष्ट करून वाचकांना त्यासाठी जणू प्रवृत्तच केले आहे. अशा महत्त्वाच्या आणि आजच्या ज्वलंत विषयावर डाॅ.गाडगीळ यांच्यासारख्या त्या विषयातील तज्ज्ञांकडून परिणामकारक व सक्षम अशा उपाययोजने संदर्भातील त्यांचे विचार माझ्यासारख्या त्याविषयातील अल्पस्वल्प, सूक्ष्मशा अभ्यासकाला महत्त्वपूर्ण मार्गदर्शकच ठरले/ठरत आहेत. त्याबद्दल मी 'सर्वंकष'च्या संपूर्ण टीमचा आणि आदरणीय डाॅ.गाडगीळ यांचा आभारी आहे.
>> तथापि "व्यवस्थेत बदल ... खालूनच शक्य आहे" या विधानातील एका अल्पशा अपवादाबद्दल मला माझे अल्पबुद्धि-आकलन/प्रतिसाद खालीलप्रमाणे मांडावेसे/व्यक्त करावेसे वाटल्याने मी हे महाधाडस करू धजलो आहे. त्याबद्दल सर्वप्रथम क्षमस्व.
>> सन 2000-2001 च्या दरम्यान तत्कालीन सुप्रसिद्ध मासिक 'अंतर्नाद'चे संपादक मित्रश्रेष्ठ श्री भानू काळे यांच्या एका संपादकीयातून सुप्रसिद्ध पर्यावरणनिष्ठ व्यक्तिमत्त्व असलेल्या श्री दिलीप कुलकर्णी आणि सुश्री पौर्णिमा कुलकर्णी यांच्या कार्याची मला ओळख झाली. आणि मी दिलीप कुलकर्णी संपादित 'गतिमान संतुलन' या लघु (साप्ताहिक आकाराचे फक्त चार पृष्ठे असणाऱ्या) मासिकाचा वर्गणीदार-वाचक व अनुयायी(?) झालो, तो अंतिम अंकापर्यंत.
>> मी माझ्या वयाच्या 17व्या वर्षापर्यंत पूर्णरूपेन ग्रामवासी/खेडूतच होतो. धानशेतीचा, वनभ्रमणाचा, अल्पकालिक शेळ्या-मेंढ्या-गायी चारण्याचा जवळून व सहभागी अनुभव घेऊनही प्रत्येक वर्गात प्रथम येण्याचा क्रम राखून होतो. पण तोपर्यंत मी जवळच्या गोंदिया ह्या शहराचेही जवळून दर्शन घेतले नव्हते. त्यानंतर मात्र सुमारे 40 वर्षे मी शिक्षण व नोकरी निमित्ताने गोंदिया ते नागपूर, मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, ... आदि शहरांचा स्वानुभवीय रहिवासाचा अनुभव घेतला. व निवृत्तीनंतर गेली 10 वर्षे मी पुन्हा स्वगावी परतून ग्रामवासी/खेडूत म्हणूनच सपरिवार जीवन जगत आहे. वर नमूद दिलीप कुलकर्णी यांच्या विचारधारेची ओळख झाली नसती तर कदाचित मी शहरातून गावाकडे परतलोही नसतो, अशीच माझी तत्कालीन विचारपद्धती होती.
>> आदरणीय डाॅ.माधव गाडगीळ यांच्या वर नमूद मुलाखतीत प्रकट विचारधारेचा अर्थातच मी एक अल्पतम(?) असा एकलव्यानुयायी असलो तरी जागतिक एन्व्हायरमेंटल परफाॅर्मन्स इंडेक्सच्या रिपोर्टनुसार आपल्या भारताचे स्थान 180 देशांच्या यादीमध्ये इकोसिस्टीम व्हारटॅलिटी मध्ये 178, बायोडायव्हरसिटी हॅबिटॅट मध्ये 170, स्पेस प्रोटेक्शन मध्ये 175 व ट्री कव्हर लाॅस मध्ये तथाकथित 75 वर असल्याने या समस्येतून यशस्वीरित्या पार पडण्याच्या दृष्टीने डाॅ.गाडगीळ यांच्या विचारातील तथाकथित तळागाळातील लोकांच्या सहभाग, शहाणपणा व विवेक विषयक विश्वासाच्या आशावादाला मात्र माझा गेल्या 10 वर्षांतला स्वानुभव सहमत होण्यास असमर्थ ठरत आहे. माझा सुमारे 40 वर्षांचा शहरवासाचा स्वानुभव पर्यावरण-विनाशाच्या दृष्टिकोनातून जितका शोचनीय आहे, तितकाच शोचनीय स्वानुभव माझा ग्रामवासी/खेडूत झाल्यानंतरच्या त्या तथाकथित तळागाळातील लोकांच्या संदर्भातही आहे. माझ्या ह्या 10 वर्षाच्या स्वानुभवाने माझ्यातील आजवर अदम्य ठरलेल्या आशावादालाच पोखरायला प्रारंभ केला आहे. आता पुन्हा गाव सोडून शहरातच वास्तव्याला जावे काय, या दृष्टीने माझे विचारचक्र डोलायमान होऊ लागले आहे. या संदर्भात रामदास स्वामींनी "दासबोध"मध्ये वर्णिलेल्या मुर्खांच्या लक्षणांपैकी एका लक्षणाचे अनुसरण करून सविनय सांगू इच्छितो की, माझे लागोपाठ दोन जीवघेणे अपघात होऊन माझा डावा पाय अंशतः दिव्यांग झाला असून डावाच हात उखडून जाऊन डाॅ.अनिल भाटिया व डाॅ.आशिष बाभुळकर,संचेती हाॅस्पिटल पुणे यांच्या महत्प्रयासाने कसातरी जोडला जाऊनही पूर्णतः दिव्यांगच झाला आहे. याच दरम्यान मला किडनी कँसर होऊन माझी उजवी किडनी काढून टाकावी लागली आहे. या कँसरच्या उपचारादरम्यान रूबी हाॅल क्लिनिक, पुणे येथे बायोप्सीसाठी सॅम्पल घेताना माझ्या छोट्या आतडीला एक छिद्र पडले (अशी अपघाती घटना लाखात एखादीच घडते, असे डाॅक्टर म्हणाले) व त्यावरील अतिशय कठीण व गंभीर शस्त्रक्रियेदरम्यान मला 15 दिवस अन्न आणि पाण्याच्या थेंबाशिवायही काढावे लागले आहे. या सर्व घटनाक्रमात मला 10 विविध/मोठ्या/गंभीर शस्त्रक्रियांचा अनुभव घेता आला. तरी माझा आशावाद थोडासाही डगमगला नाही/नव्हता, डोलायमान झाला नाही. परंतु एकूणच/सर्वांगीण पर्यावरणनिष्ठता आणि गावातील तथाकथित तळागाळातील बहुतांश लोक यांची तद्विषयक एकूणच पूर्णतः विपरीत, विक्षिप्त व आत्मघाती "वागणूक" लक्षात घेता मला आता 'गावापेक्षा शहर परवडले' असे साधार वाटू लागले आहे. माझा हा स्वानुभव जवळपास प्रत्येकच पर्यावरणनिष्ठ ग्रामवासी/खेडूतांचा सार्वत्रिक अनुभव झाला असून या विषयातील कोणाही विचारशील व पूर्वग्रहमुक्त संशोधकाने आपली ओळख लपवून सहा महिने कोणत्याही गावात सलग वास्तव्य केल्यास ह्यातील सत्य वस्तुस्थिती त्याला अवश्य आढळून येऊ शकेल. असो.
>> त्यामुळेच विशेषतः ग्रामीण/खेडेगावातील तथाकथित तळागाळातील लोकांद्वारेच "व्यवस्थेत बदल" घडविला जाण्याचा आदरणीय डाॅ.गाडगीळ यांचा आशावाद मला माझ्या स्वानुभवाला अनुकूल वाटत नाही. माझ्या नोकरीपेशातील प्रारंभीची सहा वर्षे मी पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा मराठी, हिंदी व इंग्रजी माध्यमाचा शिक्षक होतो. त्या अल्पकालिक पण अनाकलनीय रित्या नकारात्मक ठरलेल्या अनुभवाच्या आधारे(?) मी सांगू इच्छितो की, आमच्या तत्कालीन व सद्यकालीनही शिक्षण-व्यवस्थेने घडविलेला ग्रामीण/खेडेगावातील विद्यार्थी हा पढतमूर्ख असाच घडविण्यात मुख्यतः हातभार लावला आहे. त्यामुळे अशा शिक्षण-व्यवस्थेतून/व्यवस्थेद्वारे बाहेर पडलेला/घडविलेला विद्यार्थी आपल्या युवावस्थेत व पुढील प्रौढावस्थेतही कोणत्याच प्रबोधनासाठी दुष्कर घटक ठरत आहे. त्याला पर्यावरणनिष्ठतेच्या दृष्टीनेच नव्हे तर इतरही प्रबोधनात्मक उपचार अनावश्यकच नव्हे तर अपमानास्पद(?) वाटतात. आणि ग्रामीण/खेडेगावातील तळागाळात याच घटकाचे बाहुल्य व प्राबल्य असल्याने अशा घटकाद्वारे पर्यावरणदुष्ट व्यवस्थेत पर्यावरणनिष्ठ असा बदल होऊ शकेल हा आशावाद माझ्या 10 वर्षाच्या सध्याच्या स्वानुभवाला दुर्दैवाने अनुकूल दिसून येत नाही. याउलट विविध सामाजिक, सांस्कृतिक संस्थांच्या शहरी भागातील संस्थात्मक कार्य आणि विचार-प्रबोधनाचा प्रभाव होऊन, अल्प प्रमाणात का असेना, शहरी भागातील तळागाळातील घटकासह इतरही सर्वच घटक पर्यावरणनिष्ठ होण्याच्या व्यवस्थेत सहभाग नोंदवतात, हा सुद्धा माझा सध्याचा अल्पस्वल्प स्वानुभव आहे. *(यातील मूलभूत अपवाद म्हणजे डाॅ.गाडगीळ यांनी नमूद केलेले विचारशून्य व विचारनग्न असे परजीवी, आकाशमहली व भारतीय परंपरेत मूळविहीन तथाकथित शहरी पर्यावरणवादी हे आहेतच.)* माझा हा स्वानुभव आमच्या झाडीपट्टीपुरताच मर्यादित नसून महाराष्ट्रातीलच नव्हे तर मध्यप्रदेश व छत्तीसगढ या आमच्या शेजारील राज्यातील माझ्या परिचयातील काही पर्यावरणवाद्यांना सुद्धा येत असल्याचे आढळून येत आहे. आज कदाचित हे प्रमाण अल्प असेलही पण मूळ आदिम मानवी प्रवृत्ती लक्षात घेता अशी विकारात्मक मनोवृत्ती शीघ्र गतीने विकसित(?) होते, ही #कटू-वस्तुस्थिती (#BitterReality) नाकारून चालणार नाही. पर्यायाने त्यावरील सक्षम व सुफल ठरू शकणारी उपाययोजना आखणे अनिवार्यच ठरेल/ठरते असे माझे अल्पबुद्धि-आकलन आहे.
>> डाॅ.गाडगीळ यांच्या तुलनेत मी एक यःकश्चित व क्षुल्लक असा अल्पानुभवी व्यक्ती असल्याने मी त्यांच्या मताशी/विचाराशी असहमती व्यक्त करावी अशी माझी हिंमत व दानत नाही. त्यामुळे माझ्या या अल्पबुद्धि-आकलनाला अन्यथा न घेता एक अल्पांश अपवाद म्हणूनच घ्यावे ही सविनय विनंती आहे. आणि म्हणूनच असे असले तरी आदरणीय डाॅ.गाडगीळांचा आशावाद जिंदाबाद असेच मी म्हणेन व वरील शीर्षकातील *'व्यवस्थेत बदल...खालूनच शक्य आहे', हा वाक्यांश 'व्यवस्थेत बदल...खालूनही शक्य आहे'* असा स्वतःसाठी बदलून त्यावर विश्वास आणि आशावाद कायम ठेवून मी कुठेही वास्तव्याला असलो तरी माझ्यातील पर्यावरणनिष्ठ विचारधारा व तद्विषयक माझा अल्पस्वल्प सहभाग मी सुकू/आटू/भंगू देणार नाही, हे मात्र नक्की! (#990)
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया.
(29.08.2022)//
('सर्वंकष' चा प्रथमांकापासूनचा वर्गणीदार-वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment