पढतमूर्ख (Idiot Servants) : एक पॅरेडाइम (Paradigm)
*पढतमूर्ख (Idiot Servants) : एक पॅरेडाइम (Paradigm)*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
>> समाजविकास व समाजविकासक यांच्यातील अन्योन्य आंतर्संबंध वेगळ्याने व्याख्यायित करण्याची आवश्यकता नसली तरी सद्यकालीन तथाकथित, स्वयंभू व स्वयंघोषित समाजविकासकांची बजबजपुरी विचारात घेता या विषयावर विवेकाधारित साधक-बाधक चर्चा व या विषयाचे सम्यक अवगाहन होणे आज परमावश्यक होऊन बसले आहे. त्यादृष्टीने विचार करू जाता सध्याच्या/स्वातंत्र्योत्तरकालीन आभासी व परावलंबित्वाधारित एकांगी, परजीवी व सम्भवतः विकृत शिक्षण प्रणालीतून तयार झालेल्या तथाकथित मान्यवर व मातब्बर समाजविषयक तज्ज्ञांचे पढतमूर्ख आचरण, व्यवहार व लिखाण तपासून त्यांचा यथोचित समाचार घेणे क्रमप्राप्त ठरते/ठरेल, असे माझे अल्पबुद्धि-आकलन आहे.
>> त्यादृष्टीने विवेकाधारित सहअस्तित्वभावप्रणित विचारांच्या प्रकाशात पाहिले असता सध्याच्या द्वेषभाव व परमत-असहिष्णुतेच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या जागतिक माहोलात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, औद्योगिक, आर्थिक... आदि सर्वच क्षेत्र-विषयांत पढतमूर्खांचे वाढते प्रस्थ दिसून येते. आणि ही बाब विवेकस्नेही विचारवंतांच्या गंभीर चिंता व चिंतनाचा विषय झाल्याचेही निदर्शनास येते. त्यासाठी तद्विषयक प्राथमिक व प्रारंभिक अशा मूलभूत बाबींवर सर्वत्र सकारात्मक काम होण्याची गरज स्वयंस्पष्ट होते. ह्या मूलभूत बाबींत सम्यक व सर्वसमावेशक असा शाश्वत समाजविकास ही बाब अतिशय महत्त्वाची असल्याचे व तीवर तातडीने यथोचित असे निसर्गसंमत उपचार होणे परमावश्यक असल्याचे माझे प्रथमदर्शनी मत माझ्या पुढ्यात उभे ठाकते. आणि या बाबीच्या सम्यक उपचारास्तव मला काही निदान सुचतात. त्या निदानांपैकी काही विचार मी विवेकस्नेही विचारवंतांच्या साधक-बाधक विचारार्थ सादर करीत आहे.
>> समग्र अशा व्यापक व व्यामिश्रतम समाजचित्राचे सम्यक दर्शन व आकलन होण्यासाठी तत्संबंधित मान्यवर व मातब्बर तज्ज्ञ असण्यासोबतच विवेकाधारित प्रांजळ प्रामाणिकपणा सुद्धा परमावश्यक असतो. अशा आकलनात काही खोट असल्यास किंवा दृष्टिकोन मर्यादित असल्यास किंवा तद्विषयक वैचारिक बैठकच कच्ची असल्यास मग आत्मपरीक्षणाची सुतराम शक्यता नसते. पर्यायाने 'चुकलं खरं' ह्या शाश्वत समाजविकासकाच्या मंत्राचा विसर पडतो. व त्यामुळेच 'कशामुळे चुकलं' हा पुढचा प्रश्न व अर्थातच त्यावरील सम्यक व समर्पक उत्तर सुद्धा अशा तथाकथित तज्ज्ञांच्या विचारकक्षेतून निसटून जातो.
>> यासंदर्भातील आणखी एक मुख्य मुद्दा असा की समकालीन समाजशास्त्रीय विचारांच्या मुख्य प्रवाहातील पढतमूर्ख समाजशास्त्रज्ञांच्या शिक्षण व संस्कृतीचा संकल्पनात्मक प्रभाव त्यांच्यावर पडून हा प्रभाव म्हणजेच एक पॅरेडाइम (महाप्रमाणक) असण्याची त्यांची (कु)जाण विकसित होऊ लागते. त्यामुळे असे तथाकथित मान्यवर व मातब्बर तज्ज्ञ आपल्याच आवर्तात फसून कालबाह्य प्रवृत्तींच्या आहारी जाऊन निसर्गसंमत व कालसुसंगत बदलालाही स्वीकृत करण्यात हतबल ठरू लागतात. आपल्या काही संकल्पना गैरलागू आहेत, हे बदलत्या समाजसत्याचे स्वरूप समजून घेण्याची क्षमता गमावून ते अशा आभासी पॅरेडाइमच्या (महाप्रमाणकाच्या) आहारी जातात. आणि त्यांचे हे पॅरेडाइमच आभासी असल्याने त्यांना त्यांच्या प्रश्नांची सम्यक व समर्पक उत्तरे सापडणे शक्यच नसते. अर्थातच 'चुकलं खरं' ह्या शाश्वत संकल्पनेचा त्यांना स्पर्शही होऊ शकत नाही व पर्यायाने 'कशामुळे चुकलं' ही सम्यक व समर्पक उत्तरे शोधण्याची बुद्धी व भावनागम्य प्रक्रिया सुद्धा त्यांच्या आवाक्यातील राहत/उरत नाही.
>> अशा तथाकथित मान्यवर व मातब्बर तज्ज्ञांसाठी पढतमूर्ख (Idiot Servants) अशी एक अर्थपूर्ण संज्ञा संस्थात्मक अर्थशास्त्र (Institutional Economics) या अर्थशास्त्रविषयक मुख्य प्रवाहांबाहेरील एका वैचारिक संप्रदायाचे प्रवक्ते मानले जाणारे जेफ्री एम. हाॅगसन (Geoffrey M Hodgson) यांनी वापरली आहे. तीच संज्ञा अशा तथाकथित समाजशास्त्रज्ञांविषयी सुद्धा वापरून व अशा तथाकथित मान्यवर व मातब्बर तज्ज्ञांना हेरून त्यांच्या समाजदुष्ट व समाजविघातक विचार तथा कार्यापासून स्वतः व समाजालाही वाचवणे/बचावणे ही आज काळाची परमावश्यक गरज होऊन बसली आहे. (#465)(आधारित)
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार, जि.गोंदिया.
(17 नोव्हेंबर 2022)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment