काही महत्त्वाचे वेचे... (1), (2)

*काही महत्त्वाचे वेचे...* (1), (2)
~~~~~~~~~~~~~~~~~
(1)
>> कला म्हणजे मानवी संवेदनेचे विविध अंगाने/प्रकाराने प्रकटीकरण असल्याने कलेत केवळ उदात्त, सुंदर, सकारात्मक/सुखद, मनोहरी, सुबोध/सुकर, ... तेवढेच असेल/असावे हे स्वतंत्र बुद्धीमत्तेला मान्य होईलच असे म्हणता येणार/येत नाही. पर्यायाने कलेत काही नकारार्थी, त्रासदायक, बोचणारे, भयानक, रौद्र, दुःखद, दुर्बोध/अमूर्त, ... वगैरे तथाकथित काळेबेरेही असणारच हा स्वतंत्र बुद्धीने विचार करणाऱ्यांचा दृष्टिकोण म्हणूनच अभ्यासकांचा अभ्यासविषय असतो/ठरतो. पूर्वपरंपरा आणि पूर्वसंस्कार हे सगळे बाजूला सारून, स्वतंत्र/निरपेक्ष/पूर्वग्रह-मुक्त बुद्धीने कला आणि तद्विषयक तत्त्वज्ञानाची चिकित्सा करणे, ही परिघाबाहेर विचार करू शकणाऱ्या तत्त्वज्ञ आणि तज्ज्ञांची खरी ओळख असते. आजच्या भाषेत सांगायचे तर ही 'ओळख' म्हणजे अशा तत्त्वज्ञ आणि तज्ज्ञांची जणू 'यूएसपी'च असते. 
-----------------------------------------------------
(2)
>> व्यक्तिवादी उपयुक्ततावादी आणि प्रच्छन्न बुद्धिवादाला बेगडी व भ्रामक अस्मितेच्या आवारात जबरीने कोंडून ठेवणारे तथाकथित परंपरावादी व छद्म इतिहासकार एकूणच समाजातील एकरुपतेचे/समरुपतेचे छुपे दुष्मन असतात. अशा छद्मावच्छादित व्यक्तींना वेळीच ओळखून त्यांची छुपी अलगाववादी वृत्ती उघड करून तिचा भांडाफोड करणे अगत्याचे ठरते. त्या दृष्टीने विचारप्रवृत्त होऊन त्या कंटकाधीन मार्गावरील काटे दूर करण्याची क्षमता धारण करणारे सच्चे विचारवंत अस्तित्वात असतातच/आहेत. गरज आहे ती अशा सच्च्या विचारवंतांना ओळखून त्यांच्या पाठीशी समाजाने भक्कमपणे उभे राहण्याची. एकूणच मानवजातीच्या उज्ज्वलतम भविष्यासाठी सुद्धा हे परमावश्यक ठरते. कारण मानवाचे सामाजिक व्यवहार हे काही इतर व्यवहारांपासून अलग, स्वतंत्र व स्वायत्त जग नसते. म्हणूनच मानवाचे सामाजिक व्यवहार समजून घ्यायचे असल्यास मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, पुरातत्वीय इतिहास, अनुवंशशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र सारख्या ज्ञानशाखांचाही अभ्यास करावा लागतो. परंतू प्रच्छन्न विशेषीकरणवाल्या (Specialization) तथाकथित/छद्मी तज्ज्ञांना हे नको असते. एकांगी व सहअस्तित्वभाव नाकारणाऱ्या सामाजिक व्यवहारवाद्यांना त्यांच्या अशा या मुजोरीसदृश्य प्रतिपादनातील धोका समजूच शकत नाही, कारण ते त्यांच्या अहंगंडाच्या भोवऱ्यात पक्के फसलेले असतात. म्हणूनच सुजाण व सजग समाजपुरुषांनी सतत/कायम जागृत राहून अशा धोक्यांना पुरून उरायचे असते. उज्ज्वलतम समाजसातत्यासाठी ही बाब सदैवच परमावश्यक अशी बाब ठरत आली आहे.
-------------------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन