इतिहास संशोधन/लेखनातील काही चकवे

*इतिहास संशोधन/लेखनातील काही चकवे*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
>> असे म्हणतात की, इतिहास आणि विज्ञान या विषयांत अंतिम सत्य असे काहीच नसते, तर या विषयांद्वारे अंतिम सत्याच्या शोधाची प्रक्रिया सतत/कायमस्वरूपी सुरू असते. म्हणूनच इतिहास आणि विज्ञानाने संशोधित/प्रतिपादित केलेले तथ्य व कथ्य कालांतराने बदलत/सुधारित होत असते, ही आपली नित्याचीच अभ्यासप्रक्रिया आहे. अशा या वस्तुस्थितीच्या प्रकाशात इतिहास संशोधन/लेखनात उद्भवू शकणारे/उद्भवणारे काही चकवे जाणून घेणे महत्वपूर्ण ठरेल, असे मला वाटते. 

>> *थुसिडायडसचा सापळा (Thucydides Trap)* : ग्रीक इतिहासकार थुसिडायडस याच्या तद्विषयक विचारात या चकव्याची/सापळ्याची मांडणी आढळून येते. इतिहासाच्या संशोधन/लेखनात संबंधित संशोधक/इतिहासकार यांच्याकडून, कदाचित त्यांच्याही अजाणता, काही प्रमाद घडतात/घडू शकतात. आणि अशा प्रमादांच्या वशीभूत होऊन तशा संशोधक/इतिहासकारांकडून भ्रामक व/वा चुकीची मांडणी केली जाते. अशी मांडणी ही ज्या सापळ्यात सापडली/फसली असते त्या सापळ्यालाच थुसिडायडसचा सापळा (Thucydides Trap) अशी संज्ञा दिली जाते. कोणतीही घटना घडून गेल्यावर तिच्याविषयी तथ्यात्मक संशोधन करताना तत्कालीन परिस्थितीचे वास्तव, त्या परिस्थितीवर प्रभाव टाकणारे इतर तत्कालीन घटक, मानवी क्षमतेच्या आवाक्यातील तत्कालीन विचारप्रवाह/विचारप्रणाली, तत्कालीन सामाजिक व भौगोलिक वास्तव, अशा कितीतरी, सध्या कदाचित लुप्तप्राय झालेल्या, बाबींच्या प्रकाशात उपलब्ध साधनसामुग्री व डेटा (DATA) या सर्वांचा साकल्याने व समग्रतेने विचार व अभ्यास करावा लागतो. अशा या व्यामिश्रतम वस्तुस्थितीची वास्तववादी उपपत्ती शोधून त्याबरहुकूम आपले संशोधन/लेखन सादर करताना काही महत्त्वपूर्ण बाबींकडे, कदाचित अजाणता, दुर्लक्ष होण्याची शक्यता ही थुसिडायडस सापळ्याची परिणती असू शकते. म्हणूनच इतिहास संशोधन/लेखनात अशा थुसिडायडस सापळ्याला, कदाचित अजाणता, शरण गेलेल्या शरणार्थी इतिहासकार/संशोधकांच्या संशोधन/लेखनाचे परिवर्धन होणे हे ऐतिहासिक संशोधनातील तथ्यात्मक बाबी शोधण्यासाठी परमावश्यक ठरत असते. आणि अर्थातच ही कायमस्वरूपी प्रक्रिया असते/असावी लागते.

>> *ऐतिहासिक कोटी प्रमाद (Category Mistakes)* : इतिहास संशोधन/लेखनातच नव्हे तर इतरही विषयांच्या संशोधन/लेखनात बहुतेक वेळेस आढळून येणारे कोटी प्रमाद (Category Mistakes) इतिहासाच्या वास्तववादी उपपत्तीला मारक/घातक ठरत असतात. असे कोटी प्रमाद घडण्यामागील कारणांचा आवाका सीमित असला तरी अशा कोटी प्रमादांमुळे ऐतिहासिक तथ्याकलन व निष्कर्ष हे भ्रामक/चुकीचे ठरण्याची दाट शक्यता असते. दोन (किंवा अधिकही) घटना/तथ्य(डेटा) यांची तुलना करताना घेतलेला आधारच जर पूर्वग्रह-मुक्त नसेल, कालातीत व कालाधारित नसेल, तुल्य-विसंगत असेल तर ती तुलना व त्याद्वारे प्रतिपादित निष्कर्ष ही बाब कोटी प्रमाद या संकल्पनेची/संज्ञेची शरणार्थी झालेली असते. आणि अशा कोटी प्रमादाने प्रभावित झालेले इतिहास संशोधन/लेखन सुद्धा भ्रामक तथा सत्योत्तर स्वरूपाचे ठरण्याची दाट शक्यता असते. म्हणूनच इतिहास संशोधन/लेखनात इतिहासकार/संशोधकाने स्वतःला अशा कोटी प्रमादांचा शिकार/शरणार्थी होण्यापासून जाणीवपूर्वक जपले पाहिजे. कोटी प्रमाद ही संकल्पना/संज्ञा समजावून सांगत असताना पुष्कळदा एक उदाहरण दिले जाते. ते उदाहरण असे --- "टीमसह खेळल्या जाणाऱ्या कोणत्याही खेळामध्ये विजयाच्या दृष्टीने खेळाडूंमध्ये टीम स्पिरीट असणे आवश्यक असते. त्या दृष्टीने बघितले असता विजयी झालेल्या टीममधील एका खेळाडूने तशा टीम स्पिरीट चे उत्कृष्ट प्रदर्शन केले." या विधानांतील/कथनातील कोटी प्रमाद शोधता आला, तर कोटी प्रमाद ही संकल्पना/संज्ञा सहज समजू शकते. 

>> कला, साहित्य, इतिहास या व्यामिश्रतम संज्ञा/संकल्पनांत अभ्यासकांनी व्यक्त केलेले विविध विचारव्यूह समजून घेताना, त्या त्या विचारव्यूहांत दडलेल्या अर्थाच्या शोधात निघताना प्रत्येक कालखंडात बदलत गेलेल्या तद्विषयक चळवळी, रूढ झालेले नवीन प्रवाह, नवे संदर्भ, नवी कला/साहित्यिक/ऐतिहासिक मूल्ये, नव्या संकल्पना यामूळे त्या त्या कालखंडातल्या कला, साहित्य, इतिहासविषयक संज्ञा/संकल्पनांचे अर्थनिर्णयन आणि अर्थनिर्णयनाची पद्धतीही बदलत गेलेली दिसते किंवा अधिक बहुपेडी होत गेलेली दिसते, याचे जागृत भान असणे गरजेचे ठरते. म्हणजेच कोणत्याही एकाच विशिष्ट कसोटीवर ते तपासून पाहणे हे त्या संज्ञा/संकल्पनांच्या अर्थनिर्णयनाच्या विविध शक्यता नाकारणारे किंवा नष्ट करणारे किंवा त्यांचा चुकीचा अन्वयार्थ प्रक्षेपित करणारे असू शकते. असो.

 >> कोणत्याही संशोधन-प्रक्रियेत सर्जनशीलता व कल्पनाशक्ती यांचा तर्कशुद्ध विचारप्रणालीसह मेळ घालण्याचे महत्त्व वादातीत असले तरी अशा मेळ घालण्याच्या विशुद्ध प्रक्रियेला वरीलप्रमाणे चकव्यांची दृष्ट लागू नये, याची प्रत्येकच संशोधकाने जाणीवपूर्वक दक्षता घेणे आवश्यक असते. अशा या व्यामिश्रतम संशोधन प्रक्रियेच्या प्रकाशात, माझ्या अल्पबुद्धि-आकलनानुसार मी इतिहास संशोधन/लेखनातील काही चकव्यांचे वरीलप्रमाणे संक्षिप्त टिपण जाणकारांच्या विचारार्थ व तदनुषंगिक मार्गदर्शनार्थ सादर करीत आहे. (#550)
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया.
(08.05.2022)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन