एक खंत अशीही...
*एक खंत अशीही ...*
~~~~~~~~~~~
माझा जन्म झाडीपट्टीतील एका लहानशा गावात (बोरकन्हार: लोकसंख्या 2338) झाला. माझे आठवीपर्यंतचे शिक्षण सुद्धा या ग्रामीण भागातच झाले. तत्कालीन अकरावी (हायर मॅट्रीक) सुद्धा आमगांव या निम-ग्रामीण गावातूनच उत्तीर्ण झालो. पुढचे शिक्षण सुद्धा गोंदिया या निम-शहरी गावातच झाले. पहिली शिक्षकाची नोकरी सुद्धा तत्कालीन आदिवासी बहुल अशा देवरी येथेच "गेली." माझे सुमारे 90% विद्यार्थी आदिवासी समाजातीलच होते, ज्यांनी ट्रेन स्वप्नातही बघितली नव्हती. देवरी तालुक्यातील व गडचिरोली जिल्ह्यातील चिचगड, ककोडी, बेतकाटी, कोरची, कोटगुल, कुरखेडा, ..... सारख्या त्याकाळी अगदी रिमोट क्षेत्रातील रहिवासी असलेली ती मुले देवरी सारख्या गावालाही बुजडायची!
माझा हा जन्म-परिसर एकेकाळी गोंडवनाचा/दंडकारण्याचाच भाग राहिला असून बहुतेक काळ या भागावर गोंड राजांचेच अधिपत्य राहिले आहे. नंतरच्या कुणबी, पोवार यांच्या जमीनदारीखालील प्रशासना(?)त सुद्धा गोंडी-संस्कृतीचा प्रभाव कायमच होता/आहे. आजही गोंडी संस्कृतीचा प्रभाव येथील जनजीवनावर आढळून येतो. अशा या झाडीपट्टीचा अगदी काश्मीरच शोभेल अशा निसर्ग-रम्य भागात माझ्या जीवनाची प्रारंभीची 28 वर्षे गेली आहेत. त्यामुळे माझ्यावर या परिसराचा (सामाजिक, भौगोलिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, साहित्यिक(भवभूती) यांचा) आत्यंतिक प्रभाव असणे स्वाभाविकच म्हणता येईल/यावा(?).
नंतर मी महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागात राजपत्रित अधिकारी म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे निवड झाल्यानुसार रुजू झाल्यावर मी सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, अहमदनगर, पुणे, मुंबई, मराठवाडा, विदर्भ अशा भागात शहरवासी(?) म्हणूनच राहिलो/रहावे लागले. कोंकण आणि खान्देश वगळता जवळपास उर्वरित महाराष्ट्रातील ग्रामजीवनाचा "अनुभव" मला माझ्या नोकरीनिमित्त ग्रामीण भागात दौरा करताना घेता आला. पण मला माझ्या झाडीपट्टीचा विसर मात्र पडू शकला नाही. अशातच पर्यावरण-स्नेही जीवन प्रत्यक्षात जगणारे दिलीप कुलकर्णी व सौ.पौर्णिमा कुलकर्णी यांच्या "गतिमान संतुलन" च्या संपर्कात आल्यावर माझी माझ्या गावाकडची ओढ आणखी वाढली आणि निवृत्तीनंतर मी माझ्या या छोट्याशा गावातच स्थायी झालो.
माझ्या अशा ग्रामीण पृष्ठभूमीमुळे (कदाचित) मला अन्य शहरी लेखकांचे साहित्य परके वाटत असे/वाटते. मात्र आनंद यादवांच्या "गोतावळा"ने मला पहिल्यांदा माझा स्वानुभव समृद्ध करून(!) दिला आणि मी "तशा अनुभव कथनाचे" लिखाण आवडीने वाचू/अभ्यासू लागलो. ग्रामीण जनजीवनाचे अनुभव अतिशय व्यामिश्र आणि नाविन्यपूर्ण असतात. येथील "अनुभव" पूर्वग्रहावर किंवा परंपरेवरच अवलंबून वा आधारित नसतात. नित्यनूतनता व गैरपारंपरिकता हा साहित्यिक गूणविशेष माझ्या या झाडीपट्टीच्या भागात, महाकवी व नाटककार भवभूतीच्या काळापासून, आजतागायत कायम आहे.
अशातच ग्रामीण भागातून गेलेल्या साहित्यिकांच्या लिखाणातील जीवंतपणा मला त्यांच्या शहरवासी होण्यानंतरच्या लिखाणातून निसटत असल्याचे जाणवू लागले. हळूहळू माझा भ्रमनिरास होत गेला. आनंद यादव शहरवासी झाले, आणि त्यांच्या लिखाणातील ग्रामीण-जीवंतपणा काहीसा हरवत असल्याचे मला जाणवू(?) लागले. (अर्थात हे माझे वैयक्तिक निरीक्षण आहे, व ते व्यक्त करण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मला आहे, असे गृहीत धरूनच हे विधान करतोय, हे कृपया लक्षात घ्यावे.) हळूहळू माझ्या राक्षसी-वाचन-भूकेला शांत करण्यासाठी मी "अथांग-वाचक" होऊ लागलो. तसतसे माझ्या निरीक्षणात भर पडू लागली की, आनंद यादव या माझ्या अत्यंत आवडत्या लेखकापासून सुरू झालेली "ग्रामीण-जीवंतपणा-alienation" ची संक्रामक-स्वरूप प्रक्रिया थांबायला तयारच नाही.
अशातही समाधानाची बाब म्हणजे इंद्रजीत भालेराव, ना.धों.महानोर, वसंत आबाजी डहाके, महेश एलकुंचवार, रंगनाथ पठारे, संतोष पद्माकर, ऐश्वर्य पाटेकर, नवनाथ पाटील, ... यांच्यासारखे बोटावर मोजता येणारे काही अपवाद या संक्रामकतेपासून मुक्त आहेत. परंतु हे काही सन्माननीय अपवाद वगळता ही संक्रामकता अजूनही अव्याहत संक्रमित होत असल्याचेच पाहून एक साक्षेपी(!) वाचक म्हणून मला ही बाब खूप खूप वैषम्यजनक वाटते. आणि खंतही वाटते. नुकतेच शहरवासी झालेल्या व आताआतापर्यंत ग्रामीण-जीवंतपणा जपलेल्या काही साहित्यिकांचे शैली, पूर्वपिठीका, कोणातरी प्रस्थापित/शहरी साहित्यिकांचे शिष्यत्व यासंबंधीच्या पूर्वग्रहांचे व त्यांचे स्वतःतील न्यूनगंडाबद्दलचे, माझे अनुभव लक्षात घेता मला खंत व्यक्त करण्याशिवाय "आणखी काही" करता येत नाही, याचीही खंत वाटते.
अशातच मूळ शहरी असलेल्या संजय भास्कर जोशी, किरण येले, प्रणव सखदेव, ... यांच्यासारख्यांचे साहित्यिक-जीवंतपणा जपणारे गैरपारंपरिक लिखाण मात्र मराठी साहित्याच्या उज्ज्वल भविष्याला अधोरेखित करीत असल्याचे वाचून/पाहून समाधान ही होते. त्यांना माझा सलाम.
जय महाराष्ट्र! जय विदर्भ!
(वि.सु. :-उदाहरणादाखल घेतलेल्या साहित्यिक-नावांची यादी अपूर्ण असल्याची मला नम्र जाणीव आहे!)
¤
@बी.के.एम.लखनसिंहलु.
(26.10.2018/2019)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment