होती एक पुष्पा (लघुकथा)
*होती एक पुष्पा* (एक लघुकथा)
~~~~~~~~~~~~~~~~~~
>> आम्ही भंडारा जिल्ह्यातील वाकोडी नामक गावातील एका नावाजलेल्या खाजगी सोसायटीच्या शाळेत तत्कालीन हायर मॅट्रीक पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. आमच्या त्यावेळेस नवव्या वर्गापासूनच आपापला विषय-संच/अभ्यासक्रम निवडावा लागे. आमच्या त्या शाळेत गणित-विज्ञान, बाॅयोलाॅजी, कृषी, काॅमर्स व आर्ट असे पाच विषय-संच/अभ्यासक्रम होते. बाॅयोलाॅजी हा विषय-संच/अभ्यासक्रम लोअर मॅट्रीक (वर्ग 9 व 10 पुरता) म्हणून ओळखला जात होता व दहाव्या वर्गाची परीक्षा तत्कालीन बोर्डाद्वारे घेतली जात होती. लोअर मॅट्रीक उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यापीठाच्या त्रिवर्षीय स्नातकाच्या प्रथम वर्षात प्रवेश मिळविण्यासाठी प्रि-युनि. नामक एक वर्ष काॅलेज मध्ये घालवून विद्यापीठाची ती परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागायची, त्यानंतरच स्नातकच्या प्रथम वर्षाला प्रवेश मिळायचा. उलट गणित-विज्ञान, कृषी, काॅमर्स, आर्ट चे विषय-संच/अभ्यासक्रम हायर मॅट्रीक म्हणून ओळखले जायचे आणि बोर्डाची हायर मॅट्रीक परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्याला त्रिवर्षीय स्नातकाच्या प्रथम वर्षात डायरेक्ट प्रवेश मिळायचा. मी गणित-विज्ञान या विषय-संचाचा/अभ्यासक्रमाचा हायर मॅट्रीकचा विद्यार्थी होतो.
>> आमच्या तत्कालीन गणित-विज्ञान या विषय-संच/अभ्यासक्रमात मुली अजिबात नसायच्या, त्यामुळे आम्हाला इतर अभ्यासक्रमातील मुलांचा हेवा वाटायचा. अशाच आमच्या समकालीन एका आर्ट अभ्यासक्रमातील पुष्पा खांडेकर नावाच्या एका विद्यार्थिनीची ही अल्पांश कथा-कहानी आहे. पुष्पाचे वडील टेलर होते आणि माझे कपडे त्याच टेलरकडे शिवले जायचे. मी माप द्यायला व शिवलेले कपडे आणायला टेलरकडे जायचो तेव्हा कधीमधी पुष्पाची व माझी नजरभेट अवश्य व्हायची, पण त्याकाळच्या पद्धती(?)नुसार मी तिच्यासोबत बोलायची कधी हिंमत केली नाही. शिवाय ती मला कधी आवडल्याचेही मला आठवत नाही. पुष्पा दिसायला तशी सुरेखच होती आणि तिच्या वयापेक्षा जरा मोठीच वाटायची. आम्ही दहावीत असताना ती इतर विद्यार्थिनींसोबत आमच्याच वर्गात पण आर्टच्या अभ्यासक्रमात होती. आणि मराठी, हिंदी, इंग्रजी या विषयांचे तास एकत्रच होत असल्याने हे तास आम्हा गणित-विज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठी हिरवळीचेच असत.
>> एके दिवशी आमच्या वर्गात विद्यार्थ्यांत एक अनाकलनीय कुजबुज सुरू असल्याचे माझ्या लक्षात आल्याने मी खोदून खोदून विचारल्यावर पुष्पाच्या मोहल्ल्यातच राहणाऱ्या एक मित्राने अजीबच स्टोरी सांगितली. त्या स्टोरीनुसार पुष्पा आमच्या गणिताच्या गुरुजींच्या व गुरुजी पुष्पाच्या प्रेमा(?)त पडल्याची कुजबुज सुरू होती. आमचे गणिताचे गुरुजी नाटकवेडे होते. शाळेच्या विविध उपक्रमात ते प्रसंगानुरूप गीत सुद्धा रचून द्यायचे व गायचे सुद्धा. स्नेहसंमेलनानिमित्त होणाऱ्या विद्यार्थ्यांद्वारे अभिनित नाटक-लेखन-दिग्दर्शनात त्या गुरुजींचाच पुढाकार असायचा. अशाच त्या गुरुजींद्वारा स्वरचित(?) एका नाटकाच्या तालीमेदरम्यान गुरुजी घसरले आणि त्या घसरणीत पुष्पा अलगद सापडली, अशी ती कुजबुज स्टोरी विद्यार्थ्यांच्या मनोमनी खेळत होती.
>> त्याच नाटक-मंचनाच्या स्नेहसंमेलनप्रसंगी उद्घाटनासाठी नागपूर येथील एका सुप्रसिद्ध वर्तमानपत्राचे बहुश्रुत संपादक आपल्या एका सहकाऱ्यासह आले होते. उद्घाटनानंतर संपादक महोदयांनी गुरुजींच्या आग्रहाखातर त्या नाटकाचे पहिले दोन अंक पाहिले सुद्धा. त्या संपादकांसोबत आलेल्या त्यांच्या सहकाऱ्याने सुद्धा ते नाटक पाहिले. त्या नाटकाचे लेखन त्या गुरुजींनीच केले असल्याचे सांगण्यात आले होते व नाटकाचे नाव होते, "तुझ्या अंगणातील तुळस". संपादकांसोबत आलेले त्यांचे सहकारी सुद्धा नाटकवेडे होते व ते मराठीचे प्राध्यापक असल्याने त्यांनी विविध नाटके अभ्यासून विद्यार्थ्यांना शिकवलीही होती. गुरुजी-लिखित नाटक पाहताना त्या सहकाऱ्यांना हे नाटक कुठेतरी वाचल्याची शंका आली पण प्रोटोकॉल/शिष्टाचाराच्या दृष्टिकोनातून ते मौनच राहिले. अखेर नागपूरला परत गेल्यावर त्या सहकाऱ्यांनी आपले ग्रंथालय तपासले(!) असता गुरुजी-लिखित(?) ते नाटक मधुकर कानेटकर या नाटककाराच्या "रात्रभर दिवा जळतच होता" या नाटकाची भ्रष्ट नक्कल असल्याचे स्पष्ट झाले. त्यावर त्या सहकाऱ्यांनी नागपूर येथील एका वर्तमानपत्राच्या वाचकांच्या मनोगतीय पत्रव्यवहारात टोपण नावाने ही चोरी उघडही केली. पण त्या गुरुजींवर त्याचा काहीच परिणाम जाणवला नाही. त्यांचे ते नाट्य-चौर्य-कर्म सुरूच राहिले.
>> त्या नाटकातील नायिकेच्या भूमिकेचे जीव तोडून अनुसरण केल्याने पुष्पा आता त्या गुरुजींच्या जाळ्यात अलगद फसली व विद्यार्थ्यांतील कुजबुज स्टोरीला पाय फुटून ती स्टोरी प्रथम आमच्या शाळेत व हळूहळू गावभर पसरली. मुख्याध्यापकांनी त्या गुरुजींना झापले व "ही स्टोरी" न थांबवल्यास नोकरीतून काढून टाकण्याची धमकीच दिली. गावातील लोकही गुरुजींच्या स्टोरीमुळे भयंकर चिडूनच होते. पण टेलरने मात्र सोपी उपाययोजना योजून पुष्पाचे लग्नच उरकून टाकले.
>> पुष्पाच्या लग्नानंतरही ही स्टोरी संपली नाही, पण पुढची स्टोरी सांगणे मात्र सभ्यतेच्या लक्षणात व शिष्टाचाराच्या संकेतात मोडत नसल्याने मला ही स्टोरी इथेच थांबवणे भाग पडत आहे. (#630)
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया.
(21.05.2022)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment