बदल/परिवर्तन : एक कोलाज

*बदल/परिवर्तन : एक कोलाज*
~~~~~~~~~~~~~~~~
>> कोणत्याही परिवर्तन/बदलाबद्दल नकारात्मक बोलणारे बहुधा वास्तव नाकारून केवळ स्वतःची गृहीतके -- स्वतःचे पूर्वग्रह, दामटतात. अर्थात केव्हाही/कधीही, कोणालाही एखादा मोठा बदल/परिवर्तन घडवायचा/चे असेल तर त्याला 'आचरट स्थितीवादा'चा सामना करावाच लागतो. अशा तथाकथित 'वाद'ग्रस्ततेला सामोरे जाताना बदल/परिवर्तन-विरोधकांचे या वादातील तथाकथित मुद्दे हे स्थितीवादी, म्हणजे आहे ते तसेच ठेवण्याच्या बाजूने, तर असतातच, पण आपण कशाची भलावण करतो आहोत, का करतो आहोत, जो बदल आपण सपशेल नाकारतो आहोत त्याबद्दल काहीएक सखोल व तर्कशुद्ध विचार आपण केला आहे का, हे प्रश्नच त्यांना पडत नाहीत. आणि आपल्या त्याच त्या वरकरणी निरागस सुरात ते विचारत असतात की, 'आत्ताच्या 'व्यवस्थे'त वाईट काय आहे?' बदलाचा मुद्दाच कळला नाही, किंवा बदलाचा मुद्दा कळून घ्यायचाच नाही, तर मग असे प्रश्न येतातच. बदल/परिवर्तन समर्थकांच्या तथाकथित, भ्रामक व काल्पनिक अशा 'छुप्या हेतूं'बद्दल चर्वितचर्वण करून मुद्दा भरकटवण्यात असे बदल/परिवर्तनाचे द्वेषमूलक विरोधक पटाईत असतात.
>> या संपूर्ण विश्वातच काही कायम असेल तर ते एकमेव बदल/परिवर्तन हेच होय, अशा आशयाचे एक सर्वमान्य सिद्धांतन आहे. आणि कोणतेही सिद्धांतन हे मानवी विश्लेषक बुद्धीचा आविष्कार असून अशी विश्लेषक बुद्धी केवळ मानवाकडेच असते. सबब, एखाद्या मानवी कृतीचा वा सिद्धांतनाचा शक्य तितक्या वेगवेगळ्या दिशांनी आणि दृष्टिकोनांतून विचार करणे ही मानवी ज्ञानलालसा स्वाभाविकच म्हणावी लागेल. त्यामुळे बदल/परिवर्तनाचे समर्थक व विरोधक यांच्यातील 'वादविवाद' आणि त्यातून होणारा एकंदर तत्त्वबोध हाच ज्ञानाच्या जडणघडणीचा मार्ग ठरत असला तरी या तत्त्वबोधाद्वारे 'निखळ सत्य' अशी एकच एक बाजू गवसेल असे मात्र नसते. ही तर्कशुद्ध बाब सगळ्या उत्तर-आधुनिक चर्चाविश्वाचा मूलाधार/पाया असल्याने असे 'वादविवाद' हे त्यातून उभे राहणारे चर्चाविश्व समृद्ध करणारेच ठरत असतात/ठरावेत. परंतू 'आचरट स्थितीवादा'चे समर्थक व प्रवर्तक अशा 'वादविवादा'ला चर्चाविश्व समृद्ध करणारी 'घटना' न समजता द्वेष, आकस आणि क्षुद्र अहंकाराच्या आहारी जाऊन बदल/परिवर्तनाच्या निसर्गसंमत बाबीवरील साधक-बाधक वादविवाद/चर्चेला सपशेल नाकारून मूळ मुद्दा भरकटवण्यातच मश्गुल असतात. 
>> बदल/परिवर्तन ही संकल्पना/संज्ञा (प्रक्रिया) यथार्थ स्वरूपात समजून घेताना वैचारिकतेशी अत्यंत जवळचे नाते सांगणाऱ्या सांस्कृतिक बाबींचे साधक-बाधक अवगाहन सुद्धा अनिवार्य ठरत असते. सांस्कृतिक बाबी या मानवी जीवनाशी घनिष्ट प्रकारे संबंधित असल्याने या बाबतीतले मानवांचे विचार आणि अर्थनिर्णयन हे तत्संबंधित सामाजिक संबंधांना जन्म देत असतात व त्यातूनच सांस्कृतिक आचारनियम/आदर्श निर्माण होत असतात. यापुढील पायरी म्हणजे यातूनच अमुक एक गोष्ट/रीत/बाब ही 'नियमीकृत' किंवा 'आदर्शकारी' आणि उर्वरित सगळ्या 'वेगळ्या', असा विचार जन्माला येतो. मानवी उत्क्रांती तथा सभ्यतेची ही मूलभूत बैठक समजून न घेता जेव्हा बदल/परिवर्तन या क्रमप्राप्त अशा अपरिहार्य संकल्पने/संज्ञेबद्दल 'आचरट स्थितीवादा'चे समर्थक व प्रवर्तक आपले द्वेषमूलक स्वरूपाचे छद्मी व प्रच्छन्न ज्ञान(?) पाजळू लागतात तेव्हा बदल/परिवर्तनाच्या सम्यक समर्थकांनी विचलित न होता त्याचा वैज्ञानिक व वैधानिक दृष्टिकोनातून परामर्श घेणेच उचित ठरत असते/ठरेल. 
>> सांस्कृतिक, सामाजिक व ऐतिहासिक वास्तव घडवणारे घटक जसे काळाबरोबर बदलतात, तसेच ते स्थानानुसारही बदलतात. एका समाजशास्त्रज्ञांच्या मते यापुढे एका व्यक्तीला आयुष्यभरात किमान 5 ते 6 वेळा नोकरी बदलावी लागेल, म्हणजे चक्क कामाचे स्वरूपच बदलावे लागेल. स्पर्धेत टिकण्यासाठी 'जुनं विसरणं' आणि 'नवीन स्वीकारणं' या गोष्टी सातत्याने कराव्या लागणार आहेत. भविष्यात बदल स्वीकारणे हे केवळ व्यक्ती, उद्योग आणि काही समूह/समाज यांच्यापर्यंतच मर्यादित असणार नाही. म्हणजेच 'नियमीकृत' आणि 'आदर्शकारी' असे कालातीत वैयक्तिक, सांस्कृतिक, सामाजिक व ऐतिहासिक निकष कशाला म्हणावे यांचे संदर्भ सुद्धा स्थलकालसापेक्ष असतात, हेच अधोरेखित होते. पर्यायाने त्यांच्यातील स्वाभाविक असे क्रमप्राप्त/अपरिहार्य बदल/परिवर्तन हे निसर्गसंमतच ठरतात. तथापि अशा निसर्गसंमत व कालसुसंगत बदल/परिवर्तनाला विरोध दर्शविणारे 'आचरट स्थितीवादा'चे समर्थक व प्रवर्तक मात्र आपल्या तर्कदुष्ट अशा द्वेषमूलक मुद्दे/कारणे/बाबींच्या पोकळ ढालीमागे लपून जोरदार हल्ला करू लागतात. त्यांचा हा हल्ला बहुतेक वेळेस, अल्पकालिक का असेना, आपला जोर पसरवू लागतो व या जोराच्या आहारी जाण्याचे अल्पज्ञ जनांचे प्रमाणही वाढू लागते. अशावेळेस अशा या 'आचरट स्थितीवादा'च्या समर्थक व प्रवर्तकांच्या तर्कदुष्ट, पोकळ व बौद्धिक पक्षाघाताने ग्रस्त युक्तिवादांना यथाविहित व यथायोग्य अशा तर्कशुद्ध व विवेकपूर्ण युक्तिवादांनी खोडून काढणे क्रमप्राप्तरित्या परमावश्यक ठरत असते. 
>> बदल/परिवर्तनाची ही निसर्गकेंद्रित व निसर्गसंमत अशी क्रमप्राप्त व अपरिहार्य घटना/प्रक्रिया 'आचरट स्थितीवादा'च्या समर्थक व प्रवर्तकांच्या तर्कदुष्ट, द्वेषमूलक व निसर्ग-विरोधी वृत्तीच्या तावडीत न फसता तिचा पथ सुगम, निष्कंटक व सुफल करण्या/होण्यासाठी सम्यक, तर्कशुद्ध व विवेकपूर्ण अशा सामंजस्यभावाने संपृक्त लोकचळवळीचे अनन्यसाधारण महत्त्व म्हणूनच अधोरेखित होते. (#560)
¤
[आभार : (1) 'लोकसत्ता' (दैनिक/21.10.2022), व
(2) 'सजग' (त्रैमासिक/जुऑस 2022)]
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार, जि.गोंदिया.
(22.10.2022)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन