वाघ नदीच्या डोहाजवळील ते उंबराचे झाड (असला औदुंबर) : प्रकाशित

*वाघ नदीच्या डोहाजवळील ते उंबरा*चे झाड*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
('असला औदुंबर' या शीर्षकाने "वाघूर : दिवाळी विशेषांक 2022 मधून प्रकाशित)
     @ॲड.लखनसिंह कटरे.
---------------------------------------------------
>> महाराष्ट्राच्या अगदी पूर्वटोकावरील विविध वृक्षराजींच्या समृद्धीने नटलेल्या झाडीपट्टीतील गोंदिया जिल्हा आणि लागूनच असलेल्या मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्हा, या दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचीच नव्हे तर येथील एकूणच जनसमूहाची जीवनदायिनी नदी म्हणून, अनादि काळापासून आपले अमूल्य योगदान सतत देणारी, नदी म्हणजे आमची वाघ नदी. या वाघ नदीचा उगम गोंदिया जिल्ह्यातील वन्यबहुल व नक्षलप्रभावित अशा देवरी तालुक्यातील चिचगड भागातील वांढरा (डोंगरगाव) येथील टेकड्यांतून होतो. ही नदी आपल्या उगमस्थानातून पुढे जात शिरपूर, कालीसराड व पुजारीटोला अशा तीन विशाल शासननिर्मित जलाशयांद्वारे "बांधसंपन्न" होऊन मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील रजेगाव या महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवरील गावाजवळ कोरनी घाट येथे वैनगंगा नदीत जाऊन आपले अस्तित्व तेथेच रिचवून टाकते. 

>> माझे गाव म्हणजे बोरकन्हार, ता.आमगांव, जि.गोंदिया. माझ्या या गावाजवळून सुमारे दीडेक किमी अंतरावरून, माझ्या शेताला रेटूनच ही वाघ नदी वाहत आहे. या नदीच्या काठावरच आमच्या शेतीचा एक अडीच एकराचा पडिक तुकडा(?) आहे. तेथे कोणतेही पीक घेण्यात येत नाही. त्या पडिक शेतीत आंब्याची, बेलाची, आंजण(अर्जुन)ची, किन्हीची, पळसाची झाडे आणि झिलमिलीच्या झुडपांसह बांबू-कटंगाच्या रांजी सुद्धा अस्ताव्यस्त वाढून त्या पडीक शेतीच्या सीमेचे अनाहूत राखण(!) करीत असत. कितीही पूर आला तरी आमच्या या उंचवट्यावरील शेतीत पुराचे पाणी शिरत नसल्यानेच कदाचित तेथील झाडांवर विविध प्रजातीच्या पक्ष्यांनी आपापले घरटे बांधून आपला रहिवास निवडला असायचा. त्याचबरोबर झुडूपात व रांजीत नागराजासह इतर सरपटणाऱ्या जीवांनीही आपले बस्तान मांडलेले असायचे. जणू आमच्या त्या पडिक शेतीत एक कायमस्वरूपी वृक्ष-पक्षीसंमेलनच भरलेले असायचे. ते पडिक शेत व ती जागा म्हणजे विविध वृक्षराजींच्या ओळखीची ती माझी जणू प्राथमिक शाळाच म्हणावी लागेल. तेथूनच मला विविध वृक्षराजींच्या व पक्ष्यांच्या विविध प्रकारांची/प्रजातींची माहिती होऊ शकली. आता हा जणू विस्मृतीत गेलेला (भूलाबिसरा) इतिहासच झालेला आहे.

>> या नदीच्या काठावरील माझ्या त्या पडिक शेतातच एका कृत्रिम उंचवट्यावर दरवर्षी मारबत-विसर्जनाचा सोहळा सुद्धा आमच्या बालपणी आयोजित केला जात असे. अगदी त्याचवेळी आमच्या गावातील काशीराम मेंढेने वाघ नदीच्या पुरात उडी मारली असे. पोहण्यात तरबेज असलेला काशीराम नदीचा सुमारे 300-400 फुटावरील दुसरा किनारा गाठून पोहत पोहतच, नदीतील डोहाच्या काठावरील उंबराच्या झाडाला वळसा घालून इकडे परतला असे. लगेच मारबत-विसर्जनानंतर आमच्या त्या पडिक शेतजमिनीत एका आंब्याच्या झाडाखाली, तात्पुरत्या छोट्याशा पटांगणावर कुस्तीचा फड जमत असे. आमच्या गावच्या नंगारसीच्या वीररसयुक्त ढोलवादनात कुस्त्या लढल्या जात. त्यानंतर सायंकाळी पुन्हा आमच्या गावातील खरासलीवर मोहांच्या झाडांच्या साक्षीने आयोजित दुसऱ्या कुस्तीफडात कुस्त्या खेळल्या जात. यावेळेस मारबत टेकरावरील विजयी कुस्तीगीरच भाग घेत असत. विजयी कुस्तीगीराला गावातर्फे पुरस्कृत केले जात असे. आता ही प्रथा नामशेष झाली असली तरी त्याविषयीच्या दंतकथा आमच्या गावात अजूनही चर्चिल्या जातात.

>> गावाजवळून नदी वाहत असल्याने गावातील गायकी-भसकी आपापल्या गायी-म्हशींना पाणी पाजण्यास हमखास नदीवर घेऊन जात असत. आमच्याकडील गडी सुद्धा बैलजोड्या धुवायला मधून मधून नदीवर जात असत. माझ्या वडीलांना घोडे आणि घोडागाडीचा खूपच शौक होता. माझ्या वडीलांना सायकल, फटफटी वगैरे येत नसल्याने ते बाहेर, नातेवाईकांकडे, इतरत्र जाण्यासाठी नेहमी घोडागाडीचाच वापर करीत असत. माझे वडील घोडागाडीचे सारथ्य स्वतः करीत व आमचा घोडकी/घोळकी घोडागाडीवर मागे बसून पोंगा वाजवत असे. आमच्याकडे त्यावेळेस तीन घोडे हमखास असायचे, दोन घोडागाडीला जुंपण्यासाठी आणि तिसरा झुलत असल्याने शुभ मानला जात असून फक्त घरी राहण्यासाठी. या घोड्यांची संपूर्ण देखभाल करण्याची जबाबदारी घोडकी/घोळकीचीच असल्याने कधीकधी आमचा तो घोळकी घोड्यांना धुण्यासाठी नदीवर घेऊन जात असे. त्यावेळेच्या त्या घोळकीचे नाव होते लोंढू उर्फ रूपचंद मेंढे. एके दिवशी मी त्याच्या सोबत घोडे धुण्यासाठी वाघ नदीवर गेलो. ते मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील दिवस असावेत. वाघ नदीचे पात्र कोरडेसे असले तरी डोहाजवळ भरपूर पाणी होते. तेथेच घोडे धुताधुता लोंढूने मला पोहायला शिकवण्यासाठी खोल पाण्यात अक्षरशः लोटून दिले. माझ्या नाकातोंडात पाणी जाऊ लागले, मी घाबरून बुडू लागलो. अखेर लोंढूने मला ओढून बाहेर काढले. हा सगळा एपिसोड डोहाच्या काठावरील तो उंबर* अगदी तटस्थ राहून देखत होता, असा मला झालेला भास आजही अगदी ताजा वाटतो. 

>> अशा या उंबरा*च्या झाडाचे एक गूढतम स्थानच माझ्या जीवनात स्थायिक झाले असावे असे वाटते. आमच्या बालपणी म्हणजे सुमारे 1960-70 च्या दशकात (व त्यानंतरही) उत्तरप्रदेशातील काही पंडे लोक आमच्या झाडीपट्टीत येऊन येथे आपला शिष्य परिवार वाढवत असत. अशाच एका पंडा परिवाराचे शिष्यत्व माझ्या वडिलांनी स्वीकारले होते. असे शिष्यत्व स्वीकारल्याशिवाय, म्हणजे साध्या बोलचालीच्या भाषेत 'कान फुकल्याशिवाय' राहिल्यास ती व्यक्ती मृत्युनंतर नरकात जाते अशी त्यावेळेस लोकप्रिय आख्यायिकाच होती. त्या आख्यायिकेनुसार मला सुद्धा अशा पंडे महोदयाचे शिष्यत्व स्वीकारणे म्हणजेच त्यांच्याकडून 'कान फुकवणे' अनिवार्य ठरविण्यात आले होते. अशा 'कान फुकणे'च्या प्रक्रियेत ते पंडे महोदय शिष्याच्या कानात सम्भवतः (मला निश्चित आठवत नाही) गायत्री मंत्राचा उच्चार करायचे. अशा कर्मकांडात्मक प्रक्रियेनंतर शिष्याला/चेल्याला दोन 'वस्तू' जीवनभरासाठी त्यागाव्या लागत. पण मी त्यावेळेस लहान/अजाण असल्याने माझ्या वतीने माझ्या आजीने दोन 'वस्तू' माझ्यासाठी जीवनभर वर्ज्य ठरविल्यात व त्याला त्या पंड्यांनी स्वीकृती दिली. त्या दोन 'वस्तू' म्हणजे उंबराचे फळ आणि रामफळ. हे दोन फळ मला जन्मभर वर्ज्य ठरविण्यात आले. अशाप्रकारे उंबराचा माझ्या जीवनात नकारात्मक प्रवेश झाला. मला मात्र याबाबत माझ्या वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत कल्पना नव्हती. तरी उंबराचे व रामफळाचे झाडच मला तोवर पाहताच न आल्याने त्यांची फळे खाण्या/त्यागण्याचा प्रसंगच उद्भवला नव्हता. 

>> माझ्या बाराव्या वर्षी आमच्या गावच्या शाळेतील सहाव्या वर्गाची मान्यता ऐन दिवाळीतच काढण्यात आल्याने माझे नाव जवळच्याच, तीन किलोमीटर अंतरावरील अंजोरा येथील शाळेत टाकण्यात आले. तेथे मी आणि माझे काही मित्र दररोज पायीच ये-जा करीत असू. शाळेत जाता-येता कुठे उंबराचे व/वा रामफळाचे झाड लागल्यास/भेटल्यास मी त्यांची फळे अनवधानाने खाऊ नये म्हणून माझ्या आजीने व आईने मला सक्त ताकीद दिली की, 'कान फुकते'वेळी मला उंबराचे फळ व रामफळ जीवनभरासाठी वर्ज्य ठरविण्यात आल्याने मी या दोन्ही झाडांजवळ किंवा या झाडांच्या आसपास सुद्धा जाऊ नये. नाहीतर गुरुचा अपमान होऊन मला नरकात जावे लागेल. अर्थातच त्यावेळेच्या माझ्या विचार-परीघानुसार मी ही ताकीद कवटाळून होतो. 

>> परंतू मी सातवीत असताना एके दिवशी मित्रांसोबत शाळेतून परत येताना मुख्य रस्त्याने न येता शेतातून परतत असताना एका पांधीच्या बाजूला फळांनी लदबदलेले उंबराचे झाड दिसले. मला त्या झाडाची ओळख नसल्याने मी मित्रांना विचारल्यावर मला ते उंबराचे झाड असल्याचे कळले. मला ते झाड व त्याचे फळ वर्ज्य असल्याचे आठवताच प्रथम तर माझ्या अंगावर काटाच उभा राहिला. माझे सवंगडी मात्र ते उंबराचे फळ आस्वादू लागले. हळूहळू माझी भीड चेपली व मी झाडाजवळ गेलो. उंबराचे फळ व त्यातील किडीसदृश्य अंतरंग पाहून मला किळसच आली. मी त्या फळाला हात सुद्धा लावला नाही. पण आजीची व आईची ताकीद आठवून मी घाबरलो व झाडापासून दूर झालो. घरी पोचल्यावर आईला ही हकिकत सांगितली. आईने व आजीने काहीबाही उतारा केला व मला यापुढे अशा बाबींपासून दूर राहण्याची पुनश्च सक्त ताकीद दिली. तेव्हापासून माझ्या अंतर्मनात उंबराच्या झाडाबद्दल एक गूढतम आकर्षण-वजा-कुतुहल कायमचे स्थानबद्ध झाले. वाघ नदीच्या डोहात पोहणे शिकवण्याच्या जबरदस्तीच्या प्रयत्नात मी बुडू लागताना म्हणूनच मला त्या डोहाच्या काठावरील उंबराच्या झाडाची तटस्थ उपस्थिती संभ्रमित करून गेली असावी. 

>> याच दरम्यानची आणखी एक आठवण आजही माझ्या अंगावर काटे उभे करते. माझे वडील पोलीस पाटील असल्याने गावातील सगळ्या भानगडी त्यांच्यापुढे येतच असत. असाच एक अतिशय घृणास्पद व भयंकर प्रसंग असा की, आमच्या गावातील एका विधवेने "पोट आणले"** होते. पण नऊ महिन्यानंतरच्या एके दिवशी ती "मोकळी" झाल्याचे पण मूल लापता असल्याची बाब शेजाऱ्यांच्या नजरेस आली. पर्यायाने पोलीस पाटील या नात्याने ती बाब माझ्या वडीलांसमोर आली. त्या विधवेला बोलावून धाकधपडशा दाखवून विचारणा केली असता अखेर तिने घडलेली हकिकत सांगितली. त्यानुसार ती प्रसूत होताच तिच्या त्या प्रियकराने त्या नवजात बालिकेचा गळा दाबून तिला मारून टाकले व एका सरण्यात*** गाडून टाकले. अखेर ही बाब पोलिसांकडे गेली, पोलीस आले व ते प्रेत उकरण्यात आले. आम्ही त्यावेळेस आमच्या अंजोरा येथील शाळेतून परतत असताना रस्त्यातच तो सरणा पडत असल्याने कुतुहलवश आम्ही ते प्रेत उकरणे पाहिले. सरण्यात ज्या ठिकाणी ते प्रेत पुरले होते तेथे सरण्याच्या काठावरच एक उंबराचे झाड फळांनी डवरलेले होते. त्यामुळे ते उकरलेले प्रेत व ते उंबराचे झाड यांचे एक गूढतम व भयकारी काॅम्बिनेशन माझ्या डोक्यात रुतून बसले. असा हा उंबर मला वेळोवेळी भेटताना त्याच्या संदर्भातील गूढ मात्र वाढवतच गेला. (ह्या घटनेचा न्यायिक इतिहास आजही गोंदिया येथील न्यायालयात उपलब्ध असावा.) 

>> माझ्या अंतर्मनात ठाण मांडून असलेल्या या उंबराच्या संदर्भात आणखी एक आठवण नमूद करणे आवश्यक राहील. विदर्भ साहित्य संघाचे मुखपत्र असलेल्या 'युगवाणी' या नियतकालिकाचा मी ऑक्टोबर-नोव्हेंबर 1973 च्या दिवाळी अंकापासून वर्गणीदार-वाचक झालो होतो. त्यावेळेस युगवाणीचे संपादक होते ग्रेस. त्या माझ्या वर्गणी कालावधीतील पहिल्याच विशेषांकात प्रभाकर पाध्ये यांचा बालकवींच्या 'औदुंबर' या आठ ओळींच्या कवितेवरील सात पृष्ठांचा अप्रतिम भाष्य-लेख प्रकाशित झाला होता. प्रभाकर पाध्ये त्यावेळेस लिहित असलेल्या सौंदर्यशास्त्रावरील पुस्तकातील एक भाग असलेल्या या भाष्य-लेखाने माझ्या अंतर्मनात दडून बसलेल्या उंबर = औदुंबर विषयक गुढतेला पुन्हा पुनर्जागृतच केले. बालकवींची ही कविता, प्रभाकर पाध्ये यांच्या अप्रतिम भाष्यासह, जणू माझ्या उंबर विषयक अल्पबुद्धि-आकलनाला समृद्ध करण्यासाठीच माझ्यासमक्ष युगवाणीतून पुन्हा प्रकट झाली असावी असे मला वाटून जाते. ती कविता मी येथे उद्घृत करतोय. 

ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन 
निळासावळा झरा वाहतो बेटाबेटातुन.
चार घरांचे गांव चिमुकलें पैल टेकडीकडे 
शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढे.
पायवाट पांढरी तयांतुनि अडवीतिडवी पडे ;
हिरव्या कुरणांमधुन चालली काळ्या डोहाकडे.
झांकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर ;
पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर. 

     या कवितेतील डोह आणि औदुंबरासह सारेच 'वर्णन' आमच्या वाघ नदीतील डोह व त्याच्या काठावरील उंबराचे झाड याच्याशी मिळतेजुळतेच असल्यानेही मला या कवितेने व त्यावरील प्रभाकर पाध्ये यांच्या भाष्याने मला झपाटावे(?) यात आश्चर्य नसावे. 

>> या उंबराने मला अजून एका दुसऱ्याच कारणानेही झपाटले आहे. ते म्हणजे तथाकथित उंबराचे फूल व त्याचे अलभ्य दर्शन. आमच्या गावातील एक सभ्य व मानवाईक गुराखी, ज्याने आपले संपुर्ण आयुष्यच गायी चारण्यात खर्ची घातले अशा वयोवृद्ध देवाजी राऊत सोबत माझी आजही या विषयावर चर्चा होत असते. त्यालाही माझ्यासारखीच, अजून उंबराचे ते अलभ्य फुल पाहण्याची अतृप्त इच्छा आहे. वनस्पतीशास्त्रज्ञ उंबराच्या अशा कोणत्याच फुलाबद्दल नकारात्मक असे वैज्ञानिक सत्य सांगत असलेत तरी या अलभ्य उंबराच्या फुलाचे गूढतम रहस्य माझ्या अल्पस्वल्प अशा प्रातिभ अंतर्मनात दडूनच आहे, आणि अजून ते निराश झालेले नाही.

>> अशी ही माझी आणि उंबराच्या झाडाची विचित्र भासणारी आकर्षण-वजा-कुतुहल संपन्न गूढ(?)कथा आहे. 
(शब्दसंख्या सुमारे 1350)  
(*उंबर = औदुंबर, 
**पोट आणणे = जारकर्मातून गर्भवती होणे, 
***सरणा = नाल्याचे (पावसाळी) लघुत्तम रूप)
¤
(उंबराला फूल ही दुर्मीळ म्हणण्यापेक्षा अनैसर्गिकच असल्याचे मानले जाते. कारण उंबराच्या फळामध्येच फुलाचे स्त्री केशर असते. कीटकाच्या माध्यमातून या वृक्षबीजाचे फलित होते. मात्र समाजमनात उंबराचे फूल दिसणे हे भाग्याचे मानले जाते.)
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902, ता.आमगांव, 
जि.गोंदिया. (विदर्भ-महाराष्ट्र)
(03/04.07/01.09.2022)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन