हिंसा आणि अहिंसा : एक चक्रव्यूह (प्रकाशित)

*हिंसा आणि अहिंसा : एक चक्रव्यूह* 
(संपृक्त लिखाण, दिवाळी विशेषांक 2022 मधून प्रकाशित)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(@ॲड.लखनसिंह कटरे)
----------------------------------------------
>> हिंसा म्हणजे काय? हा साधासोपा वाटणारा प्रश्न प्रत्यक्षात मात्र तसा साधासोपा/सरळसोट नसून हिंसा ही व्यामिश्रतम अशी संकल्पना/संज्ञा असून तिला व्याख्यायित करणे मला अतिशय कठीण वाटते. शारीरिक व दृश्यमान हिंसा ही कदाचित सहजतेने व्याख्यायित करता येईलही, पण हिंसेचे अन्य विविधांगी, अदृश्य व गहन प्रकार व्याख्यायित करण्याच्या प्रयत्नात मात्र ते 'दशांगुळे उरण्याची'च परिणती अधिक असण्याची शक्यता असेल. म्हणूनच मी माझ्या अल्पबुद्धि-आकलनानुसार हिंसा ही संकल्पना/संज्ञा म्हणजे एक चक्रव्यूहच म्हणतो/समजतो. 

>> अशा या चक्रव्यूहात्मक हिंसा नामक संकल्पना/संज्ञेला व्याख्यायित करण्याच्या असफल ठरू पाहणाऱ्या प्रयत्नांचा मागोवा घेताना कठोपनिषदाच्या इंग्रजी भाष्यात मिरज चे श्री.दिलीप वासुदेव आपटे यांनी व्यक्त केलेले व्याख्याविषयक विचार मी येथे उद्घृत करू इच्छितो. श्री.आपटे लिहितात, "That which is indefinable is also unknowable to the mind because knowledge given to the mind and the intellect is always in terms of definition. The definition need not necessarily be verbal or linguistic. There is a psychological definition of an object inwardly conducted when we begin to cognise it. A definition is an activity of the mind by which it apprehends the location of an object in a particular manner, and so indefinable things are also unknowable things. Inasmuch as reality is not spatial or temporal, and is not causally connected, it is not definable by logical characters, and therefore not capable of being known by the mind; not also capable of being judged by the intellectual categories." म्हणूनच हिंसा ही व्यामिश्रतम संकल्पना/संज्ञा व्याख्यायित करण्याच्या भानगडी(?)त न पडता, अमूर्त स्वरूपातच तिचा यथार्थ(?) समजून घेण्याचा प्रयत्न करणे, इतकेच आपल्या हाती उरते, असे मला वाटते.

>> शारीरिक हिंसेव्यतिरिक्त असलेले हिंसेचे सारे प्रकार यादीबद्ध सुद्धा करता येणार नाहीत, काही ना काही प्रकार त्यातून सुटतीलच, असा माझा कयास आहे. मानसिक, बौद्धिक, वैचारिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, ऐतिहासिक, भौगोलिक, पारिवारिक/कौटुंबिक, वैयक्तिक, वैधानिक, पारंपरिक, ..... असे हिंसेचे कितीतरी विविधांगी, अदृश्य व गहनतम प्रकार आजच्या या उजाखा* व सत्त्योत्तर** युगात पदोपदी, डिजीटल-डिजीटली, जागोजागी सतत प्रत्ययास येत असतात. अशा, हिंसा या व्यामिश्रतम संकल्पना/संज्ञेबद्दल 'हिंसा म्हणजे काय?' या प्रश्नाच्या एकरेखीय उत्तरातून एखाद्याच्या, हिंसेबद्दल जाणून घेण्याच्या जिज्ञासेचे, सर्वंकष समाधान करता येईल, असे मलातरी अजिबात वाटत नाही. अर्थातच हिंसा या व्यामिश्रतम संकल्पना/संज्ञेचा चक्रव्यूह भेदणे किती कठीणतम बाब आहे, हे स्पष्ट होते. असे असले तरी 'हिंसा म्हणजे काय?' या प्रश्नाची शोधप्रक्रिया मात्र थांबवता येत नाही/येणार नाही. कारण मानवजातीच्या उज्ज्वल व आदर्श भविष्याच्या दृष्टिकोनातून ही शोधप्रक्रिया कधीच न थांबवता सतत त्या चक्रव्यूहाचे भेदन करण्यासाठी प्रयत्नरत असणे स्वाभाविकच परमावश्यक ठरते. 

>> मानवजात ही एक "प्राणिजात" या नात्याने निसर्गाचा एक अविभाज्य घटक म्हणून स्वभावतःच हिंसक प्रवृत्तीची असावी काय?, हा प्रश्न अजूनही पूर्णांशाने अनुत्तरीतच असल्याचे आढळून येते. हिंसेची ही प्रवृत्ती मानवजातीचा अविभाज्य स्वभावविशेषच असावी काय, निसर्गात जीवसृष्टीचा उद्भव/उगम होतानाच्या प्रक्रियेतच 'जीवो जीवस्य जीवनम्' या क्रूरतम वाटणाऱ्या निसर्गनियमानुसार ही हिंसक प्रवृत्ती मानवात घुसली(?) असावी काय? असे काही मौलिक व पायाभूत प्रश्न उपस्थित होतात. असे जर असेल तर मानवजातीच्या उत्क्रांत अवस्थेत ही जन्मदत्त व जन्मजात हिंसेची प्रवृत्ती शमवून तिला अहिंसक होण्याकडे प्रवृत्त करण्याचे महावीर, बुद्ध, गांधी,... आदिंचे प्रयत्न सुद्धा अभ्यासनीय ठरावेत/ठरतील/ठरतात, असेही माझे अल्पबुद्धि-आकलन आहे. अर्थात 'बळी तो कान पिळी' किंवा 'जिसकी लाठी उसकी भैंस' ही मानवजातीची मूळची(?) हिंसक प्रवृत्ती सहभागी बलशक्तीकडे व शांतिपूर्ण सहअस्तित्वभावाकडे कशी वळली/वळवली गेली असेल याचाही अभ्यास त्यादृष्टीने होणे क्रमप्राप्त ठरते/ठरावे. आणि असे असले तरी आजच्या या सभ्यतेचा उत्कर्ष मानल्या जात असलेल्या युगात रशियाला युक्रेनचा हिंसक पद्धतीने नायनाट करण्याची प्रवृत्ती कशी योग्य वाटू शकली असेल/वाटत असेल, या प्रश्नाचे चक्रव्यूह भेदणे सुद्धा अभ्यासकांसाठी एक मोठे आव्हानच ठरत आहे. 

>> हिंसा आणि अहिंसा यांच्यातील चिरंतन द्वंद्वयुद्धाचा इतिहास हाच मानवी सभ्यतेचाही इतिहास आहे, असे आढळून येते. पाश्चात्य-विचार-प्रणित डार्विनचा उत्क्रांतीवाद असो किंवा भारतीय संस्कृतीतील (कथित) वराह, कच्छप, मत्स्यादि अवतारप्रणित मानवाचा विकासवाद असो, या दोन्ही विचारप्रणाली हिंसेच्या इतिहासाने संपृक्त असल्याचेच दिसून येते. रामायणमधील हिंसेचा आरंभ विश्वामित्राच्या आगमनानंतरच दिसून येतो आणि शेवटी मेघनाद, रावणादिंच्या मृत्युनंतरच हिंसेची ही प्रक्रिया मंदावल्याचे आपण पाहतो/वाचतो. रामवनवासाच्या कालावधीत दंडकारण्यात सारे ऋषि-मुनि रामाला विनवणी करतात की, रामाने त्यांची राक्षसांच्या अत्याचारांपासून रक्षण करावे. आणि याप्रसंगी रामसुद्धा ऋषि-मुनींना आश्वस्त करतात की, ते ऋषि-मुनींवर अत्याचार करणाऱ्या राक्षसांचा वध करतील. यावर हिंसा-अहिंसा या विषयावर राम आणि सीता यांच्यात जो विचार-विमर्श होतो, त्यात सीता एक बुद्धिमान व विवेकसंपन्न स्त्रीच्या रूपात आपले विचार व्यक्त करताना वाल्मिकी रामायणात दिसून येते. त्यात ती 'काम' या एका षड्रिपूतून व्युत्पन्न तीन व्यसनांची चर्चा करून सांगते की, मिथ्याभाषण, परस्त्रीगमन आणि कोणत्याही वैराशिवाय दुसऱ्यांप्रति क्रूरता हे तीन व्यसन मानवाला अकारण हिंसेकडे प्रवृत्त करतात. या तीन व्यसनांपैकी पहिल्या दोन व्यसनांपासून राम सर्वथा मुक्त असला तरी ऋषि-मुनींच्या आग्रहास्तव तो तिसऱ्या व्यसनाच्या/दोषाच्या कृत्याला बळी पडून हिंसाचार करू शकतो. त्यामुळे सीता रामाला 'कहाँ शस्त्र और कहाँ वनवास' या बेमेल व्यवहारापासून अर्थात हिंसेपासून प्रवृत्त करू पाहते. पण राम काही सीतेचा परामर्श मानत नाही आणि पुढची कथा आपण जाणतोच. परंतू हीच सीता जेव्हा रावणाच्या कैदेत असते आणि सीतेला शोधत हनुमान लंकेत पोचून सीतेला भेटतात तेव्हा मात्र सीता रामाबद्दल विचारपूस करताना आपल्या स्वस्थित विवेकबुद्धीचा पुन्हा वेगळाच स्वरूप दाखवते. सीता हनुमानाला सांगते/विचारते की, रामाने एका साधारण अपराधासाठी इंद्रपूत्र जयंतला शिक्षा करण्यासाठी ब्रह्मास्त्र उचलला होता, आणि आतातर ज्या रावणाने मला, रामाच्या प्राणप्रियेला, अपहरण करून आणले आहे, अशा परिस्थितीत राम रावणाला कसे क्षमा करू शकतील. राम तर रावणाचा वध करून मला घेऊन जातील/मला पुन्हा 'नाथवती' करतील. अर्थात याप्रसंगी आता सीता अहिंसेचा नव्हे तर हिंसेचा पुरस्कार करते. यावरून सुद्धा हिंसा-अहिंसा या संकल्पना/संज्ञा व्याख्यायित करायला किती कठीणतम आहेत, हेच स्पष्ट होते. रामायणमधील हिंसा योग्य की अयोग्य, कालसुसंगत की कालविसंगत, सुसंस्कृत की रानटी अशा कोणत्याच वाद-विवादाच्या चक्रव्यूहात न फसताही हिंसा या व्यामिश्रतम संकल्पना/संज्ञेच्या प्रकाशात तटस्थपणे तपासली असता ती मानवजातीचे पृथ्वीवरील एकूणच प्राणिजातचे अविभाज्य घटकत्वच सिद्ध करू लागते, हा माझा अल्पबुद्धि-आकलनाचा स्वानुभव आहे. रामायणमधील हिंसेचे समर्थक वा विरोधक कोणीही असो, प्रत्येकाकडे एकतरी ठोस व भक्कम वाटणारी तर्कशुद्ध कारणमीमांसा असतेच असते. याचे कारणही हिंसा व अहिंसा या संकल्पनेबद्दलचे/संज्ञेबद्दलचे मानवी-संज्ञान चक्रव्यूहासम व्यामिश्रतम असणे हेच असल्याचे माझे अल्पबुद्धि-आकलन आहे. 

>> त्याचप्रमाणे दुसऱ्या महाकाव्यातील, म्हणजेच महाभारतातील कृष्णाचे तत्त्वज्ञान आणि त्याने आचरलेल्या कार्यपद्धतीचे अवगाहन केले असता सुद्धा अभ्यासकांना हिंसा आणि अहिंसा या दोन्ही संकल्पना/संज्ञांची चक्रव्यूहासम व्यामिश्रतम वास्तवताच निदर्शनास येते/यावी. कृष्णचरित्रातील कंस, जरासंध, शिशुपाल, कालयवन आदि प्रसंगही तटस्थ व संशोधक वृत्तीच्या अभ्यासकांना अशाच हिंसा-अहिंसेच्या द्वंद्वात फसवू पाहतात, हे आजकालच्या डिजिटल माध्यमातून प्रकट होणारे विविध मत/लिखाण पाहता/वाचता अनुभवयास येते. युद्धातील अविभाज्य व अपरिहार्य हिंसा टाळून अहिंसक मार्गाने, कौरव-पांडवातील 'विवाद' समन्वय व सामंजस्याने सोडविण्याचा संदेश घेऊन कृष्ण कौरव दरबारी गेला असता कृष्णाला बंदी बनवून त्याचा खात्मा करण्याचा दुर्योधनाचा, असफल का असेना, प्रयत्न अखेर अहिंसक वृत्तीवर हिंसक वृत्तीला बलवत्तर ठरवून जातो. आणि शेवटी महाभारत युद्धात लाखो "मानवां"चे रक्त प्राशनाचे हिंसेचे लक्ष्य(?) अखेर पूर्ण होते. अशी ही हिंसा मानवजातीच्या इतिहासात सततच चक्रव्यूहासम व्यामिश्रतम असण्याची आपली वस्तुस्थितीच वारंवार स्पष्ट करत असते, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

>> हिंसा आणि अहिंसेचे हे अनादि-अनंत द्वंद्व, पाश्चात्य व पौर्वात्य विचारप्रणाली किंवा इतिहास असा कोणताही भेदाभेद/भेदभाव करत नाही, हे सुद्धा अभ्यासनीय ठरावे. येशूची अहिंसा सुद्धा यादृष्टीने तपासली(?) असता असेच दिसून येते की, येशूच्या अहिंसेची अखेर मात्र येशूच्या क्रूसीफिकेशन द्वारे क्रूरतम हिंसेतच प्रवर्तित होते. पैगंबरांनाही हिंसेच्या शैतानाने बख्सले नाहीच. त्यांनाही अहिंसेच्या प्रस्थापनेसाठी हिंसेचा अवलंब करावाच लागला. अशी ही हिंसा-अहिंसेची अनादि-अनंत असलेली अनाकलनीय द्वंद्व-प्रक्रिया अनवरत व चिरायू असल्याचेच निष्पन्न होत असते. एवढेच नव्हे तर आधुनिक युगातील अविश्वसनीय भासणारा अद्वितीय असा अहिंसेचा एकनिष्ठ पुजारी गांधी सुद्धा अखेर हिंसेचाच बळी ठरला. आणि या गांधीविचार-प्रणित अहिंसेचे दुर्दैव असे की गांधीहत्येनंतरही त्या हिंसेने आपले विध्वंसक रूप आवरले नाहीच. गांधीविचाराची हत्या करण्याचे हिंसक (वैचारिक हिंसा) कृत्य स्वातंत्र्योत्तर सत्तारूढांनी सातत्याने राबवल्याने आजचे भयानक व विकृतसम असे वैचारिक, सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिकादि वास्तव (परिणाम/effect) भारतीयांसमोर उभे ठाकल्याचे आकलन विविध विचारवादांतून आता मांडण्यात येत आहे. 

>> वरीलप्रमाणे विचारप्रक्रिया पुढे नेताना असा एक मुख्य प्रश्न उपस्थित होतो की, मानवी-संज्ञानात हिंसेचा उदय कसा होत असावा? या प्रश्नाच्या उत्तरासाठी भगवद्गीतेच्या प्रकाशात आपल्याला काही उत्तर गवसते काय, हे सुद्धा तपासले पाहिजे असे माझे अल्पबुद्धि-आकलन असल्याने मी जेव्हा भगवद्गीतेकडे पाहू लागतो तेव्हा माझ्या अल्पमतीला असे आढळून येते की, गीतेतील 2:41 व्या श्लोकाच्या प्रकाशात महाभारतातील बुद्धी आणि मन यासंदर्भातील विवेचन यासाठी उपयोगी ठरू शकेल. त्यासाठी महाभारतातील खालील श्लोकार्धात नमूद विवेचन महत्वपूर्ण ठरावे. 
तो श्लोकार्ध असा --- 
*व्यवसायत्मिका बुद्धिः मनो व्याकरणात्मकम् ||* 
याचा भावार्थ असा की, "बुद्धि (इंद्रिय) हें व्यवसाय करणारे म्हणजे सारासार विचार करून निश्चय करणारें; आणि मन (धाकटे) हे व्याकरण म्हणजे विस्तार अगर पुढील व्यवस्था करणारे प्रवर्तक इंद्रिय आहे, अर्थात बुद्धी व्यवसायत्मिक आणि मन व्याकरणात्मक आहे." याचाच पुढील विचारविस्तार पाहिला/अभ्यासला असता असे दिसून येते की, बुद्धीचा अर्थ सारासार विवेक करून निश्चय करणारे एक मानवी इंद्रिय (ज्ञानेंद्रिय) असाच आहे. बुद्धी ही केवळ धारदार तलवार आहे. जे काही तिच्यापुढे येईल किंवा कोणी आणील ते तोडणे/विश्लेषित/विमर्शित करणे एवढेच तिचे काम आहे; तिला दुसरा कोणताही गुण अगर धर्म नाही. संकल्प, वासना, इच्छा, स्मृति, धृति, श्रद्धा, उत्साह, कारुण्य, कळकळ, प्रेम, दया, कृतज्ञता, काम, लज्जा, आनंद, भीती, राग, द्वेष, लोभ, मद, मत्सर, क्रोध इत्यादि सर्व मनाचेच गुण अगर धर्म असून मनोवृत्ती जशा जागृत होतील त्याप्रमाणे कोणतेही कर्म करण्याकडे मानवाची प्रवृत्ती होत असते. उदाहरणार्थ, मनुष्य/मानव कितीही बुद्धिमान असला आणि त्याला गरिबीमुळे लोकांचे हाल कसे होतात याचे जरी पूर्ण ज्ञान असले तरी त्याच्यात कारुण्यवृत्ती जागृत नसेल तर गरिबांना मदत करण्याची इच्छा त्याला कधीच होणार नाही; अगर युद्ध करण्याची इच्छा असूनही धैर्य, साहस नसेल तर तो लढणार नाही. ज्या गोष्टी आपण/मानव करू इच्छितो त्यांचा परिणाम काय होईल एवढेच बुद्धी सांगत असते. पण वर नमूद केल्याप्रमाणे इच्छा किंवा धैर्य वगैरे गुण बुद्धीचे धर्म नसल्यामुळे बुद्धी स्वतः होऊन म्हणजे मनाचे मदतीखेरीज केव्हाही इंद्रियांना प्रेरणा करू/देऊ शकत नाही. उलटपक्षी क्रोधादिकांच्या झपाट्यात मन स्वतः होऊन जरी इंद्रियांना प्रेरणा करू/देऊ शकले, तरी बुद्धीच्या सारासार विचारांवाचून नुसत्या मनोवृत्तीच्या प्रेरणेने घडलेले कर्म नैतिकदृष्ट्या शुद्ध आणि योग्य असेलच असा नेम नसतो. म्हणूनच मनुष्याचे/मानवाचे हातून कोणतेही शुद्ध कर्म घडण्याचे प्रसंगी बुद्धी शुद्ध म्हणजे बऱ्यावाईटाचा बिनचूक निर्णय करणारी, मन हे बुद्धीच्या तंत्राने वागणारे आणि इंद्रिये मनाच्या ताब्यात असणारी याप्रमाणे त्यांची जोड असावी लागते. बाळ गंगाधर टिळक यांच्या गीतारहस्यात नमूद व दिलीप वासुदेव आपटे यांच्या लेखणीतून प्रसृत वरील गीता-विचारांच्या प्रकाशात आपण म्हणू शकतो की, हिंसेचा उदय हा मानवाच्या आदिम मनाचा एक आविष्कार असून त्यावर संस्कारित/विकसित/प्रबोधित मानवी बुद्धीचा अंकुश असल्याशिवाय हिंसेला आवर घालणारी अहिंसा प्रभावी ठरू शकत/शकणार नाही. 

>> वरील विवेचनाच्या प्रकाशात मानवी-बुद्धीचे, हिंसादमन व अहिंसावृद्धी या दोन्हीतील महत्वाचे कर्म, धर्म व गुण स्पष्ट होतात. परंतु ही बुद्धीच जर भ्रष्ट झाली असेल/होत असेल तर मात्र हिंसेला पर्याय(?)च उरणार नाही, हे कटूतम वास्तव आजही जगापुढे उभे ठाकत आहे/ठाकले आहे. त्यादृष्टीने मानवी बुद्धीचे प्रबोधनात्मक/सुसंस्कारात्मक पुनरुत्थान अभियान जगभर राबवणे परमावश्यकरित्या क्रमप्राप्त ठरत आहे, असे माझे अल्पबुद्धि-आकलन मी जाणकारांपुढे साधक-बाधक विचारार्थ मांडून, "DISSENT : THE VOICE OF PROGRESS" या संविधानसंमत तथा निसर्गसंमत तत्त्वानुसार माझे हे अल्पमती निरीक्षण सादर करीत आहे. (शब्दसंख्या सुमारे #1490)
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया.
(18/19/20.05. व 01.06.2022)
---------------------------------------------------------------
*उजाखा = उदारीकरण, जागतिकीकरण व खाजगीकरण 
**सत्योत्तर = POST-TRUTH = PERJURY (सत्यात असत्याची बेमालूम भेसळ करून सांगितले जाणारे भासमान सत्य) 
@आभार : 
(1) श्री.दिलीप वासुदेव आपटे, संपादक, धर्मयज्ञ (मासिक) : मे-2022.
(2) प्रेमचन्द साहित्य संस्थान, गोरखपूर (उ.प्र.) द्वारा प्रकाशित हिंदी त्रैमासिक, साखी-35, ऑक्टोबर 2021 मध्ये प्रकाशित भारती गोरे यांचा 'सीता की खोज - अवधेश प्रधान' या ग्रंथावरील समीक्षात्मक लेख.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन