समाजपुरुष : एक संक्षिप्त आकलन

*समाजपुरुष : एक संक्षिप्त आकलन*
~~~~~~~~~~~~~~~~~~~    
>> सौम्य, समंजस, एकात्मभाव आणि सहकार्य प्रणित विचारांच्या प्रवाहात द्वेष, परात्मभाव, अलगाववाद, तीव्र जातीय तेढ आणि चुकीच्या माहितीचा ओघ कोणत्याही परिस्थितीत मिसळू 'न' देणे, हे आजचे अतिशय महत्त्वपूर्ण असे समाजकार्य होऊन बसले आहे. त्यादृष्टीने प्रत्येक समंजस, सुजाण व सजग समाजपुरुषाने डोळ्यात तेल घालून जागृत राहणे व त्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे, आजच्या उजाखा*प्रणित सत्योत्तरकालीन संगणकीय/समाजमाध्यमीय युगात परमावश्यकरित्या क्रमप्राप्त ठरत आहे. 

>> कोणताही समाज एकसंध राहूनच सद्यकालीन व्यामिश्रतम अशा परिस्थितीला सामोरे जाऊन टिकून राहू शकतो. त्यासाठी संकीर्ण जात, धर्म किंवा भावनिक मुद्द्यांचा विचार न करता समाजापुढील विविधांगी अशा आधुनिक आव्हानांचा विचार करूनच सामाजिक नेतृत्व निवडणे गरजेचे ठरत आहे. 

>> समाजपुरुषाचा संथ झालेला प्रवाह, आलेली तथाकथित शिथिलता, समाजविकासात पडलेला/पडत असलेला खंड, समाजातील तरुणांचे भविष्य या सर्व बाबींचा साधक-बाधक विचार करूनच आजच्या सुजाण, समंजस व सजग समाजपुरुषाला पुढील वाटचालीची दिशा निश्चित करणे परमावश्यक झालेले/ठरत आहे.  

>> आजकाल बौद्धिक प्रतिभेचीही उथळ उठाठेव वाढू लागली असून अशा उठवळांचा साधार प्रतिवाद करणे रोजच्यारोज आणखीन कठीण होत चालले आहे. अशा या कटू-वस्तुस्थितीच्या आवरणाला छेद देऊन यशस्वी होण्यासाठी आजच्या समाजपुरुषाला बहुआयामी व बहुविध प्रयत्नांची सतत पराकाष्ठा करीत राहणे क्रमप्राप्त ठरत आहे. महाभारत युद्धात अंतिम विजयाचे लक्ष्य निर्धारित करून कृष्णाने, इच्छामरणाच्या आवरणाने आच्छादित भीष्म, अजेय द्रोणाचार्य, सर्वशास्त्र-शस्त्रसंपन्न कर्ण यांचा वध करण्यासाठी योजिलेले उपाय(?) नैतिक-अनैतिक तथा योग्य-अयोग्यतेच्या लोलकातूनच पार पाडले, ही पौराणिक युक्ती आजच्या सुजाण, समंजस व सजग समाजपुरुषाने विसरून चालणार नाही. मनुष्य हा निसर्गतःच हिंसक प्राणी असून हिंसा ही मनुष्याची स्वाभाविक वृत्ती आहे. याउलट अहिंसा ही मनुष्याची स्वाभाविक वृत्ती नसून अहिंसक वृत्ती त्याला/मनुष्याला प्रयत्नपूर्वक अर्जित करावी लागते. सभ्यता, औचित्य, नैतिकता आदि अर्जित भाव मनुष्याला अहिंसक वृत्ती धारण करण्यास साह्यभूत ठरतात. या वैज्ञानिक, मनोवैज्ञानिक, भावनिक व नैसर्गिक वस्तुस्थितीच्या प्रकाशातच आजच्या समाजपुरुषाला आपले सामाजिक दायित्व आणि कर्तव्य पार पाडणे परमावश्यकरित्या क्रमप्राप्त ठरत आहे. हे कार्य अर्थातच महाकठीण ठरत आहे.

>> ... आणि म्हणूनच आजच्या या उजाखा*प्रणित सत्योत्तरकालीन संगणकीय/समाजमाध्यमीय युगातील समाजपुरुषाला अत्यंत काळजीपूर्वक आपले विहित कर्तव्य व दायित्व पार पाडणे कठीण ठरू लागले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. तथापि, असे असले तरी हे आव्हान स्वीकारून समाजपुरुषाने आपल्या समाजाच्या सम्यक, सर्वांगीण, सम्यक व सर्वसमावेशक उन्नती व प्रगतीसाठी कार्यान्वित होणे ही आजची परमावश्यक गरज झाली आहे. यातील समाधानाची बाब अशी की, आजचा समाजपुरुष त्यादृष्टीने कार्यान्वित व कार्यप्रवण होत असल्याचे वर्तमान परिदृश्य दिसू लागले आहे. जय हो!
¤
(*उजाखा = उदारीकरण, जागतिकीकरण व खाजगीकरण)
¤
@ॲड.लखनसिंह कटरे, 
बोरकन्हार, जि.गोंदिया.
(16.10.2022)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन