समाजविकासक चळवळी/मोहीमा : एक टिपण
*समाजविकासक चळवळी/मोहीमा : एक टिपण*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
>> समाजातील वाईट चालीरीती, कुप्रथा, अपसमज, गैरसमज, ऐतिहासिक गफलती, ... आदि समाजाच्या सम्यक व शाश्वत विकासात अडसर ठरणाऱ्या बाबींच्या सक्षम, सुफल व शाश्वत निराकरणासाठी झटपट होणारी क्रांति कधीच उपयोगी ठरत नसते, ही ऐतिहासिक तथ्याची वस्तुस्थिती आहे. क्रांतिकारक ठरणारी चळवळ/मोहीम ही स्वभावतःच फक्त मूठभर लोकांचीच चळवळ/मोहीम ठरत असल्याने ती जनतेची/समाजाची जाहीर चळवळ/मोहीम होऊ शकत नाही. वस्तूतः आणि मानवी प्रवृत्तीच्या निसर्गसंमत अंगाच्या दृष्टीने विचार करता अशी जाहीर चळवळ/मोहीम ही नेहमी शांततावादाच्या, सहअस्तित्वभावाच्या, सामंजस्यभावाच्या घोषणा करतच वाढत असते/वाढू शकते.
>> समाजाला जागृत करणे, संघटित करणे, समाजात बलिदानाची व तद्विषयक कर्तव्याची प्रेरणा जागृत करणे, कालसुसंगत चर्चाविश्व उभारणे, ... सारख्या सम्यक व शाश्वत समाजविकासक बाबींचे पुरेसे महत्त्व न जाणताच केलेल्या अविचारी आणि आततायी चळवळी/मोहिमा निसर्गतःच अल्पजीवी व पर्यायाने अपयशीच ठरतात. एवढेच नव्हे तर अशा अविचारी आणि आततायी चळवळी/मोहिमा समाजविघातक ठरून त्याद्वारे समाजाच्या होणाऱ्या नुकसान व तद्जन्य पतनातून समाजाला पुनरुज्जीवित व पुनर्स्थापित करणे सुद्धा एक कठीणतम कार्य/कर्म होऊन बसते. पर्यायाने सम्यक व शाश्वत समाजविकासक संघटना निर्माण करणे व अशी संघटना निसर्गसंमत तथा कालसुसंगत पद्धतीने सतत कार्यान्वित ठेवणे ही अतिशय जिकीरीची व संयमाची प्रक्रिया ठरते. कदाचित म्हणूनच 'हे येरागबाळ्याचे काम नोहे' असे म्हटले जात असावे. यासाठी कुतर्काधारित अविचारी तर्कशास्त्र नव्हे तर व्यवहारवादी सुतर्कशास्त्राचे अवलंबन अनिवार्य ठरत असते. अशा शांतिप्रिय संघटनेची सवय लागली की शांततामय चळवळीची/मोहीमेचीही सवय लागणे क्रमप्राप्तच ठरते. आणि अशाप्रकारे हक्कासह कर्तव्याचीही जाणीवजागृती होऊन समाजपुरुष हळूहळू सम्यक व शाश्वत अशा निसर्गसंमत व कालसुसंगत विकासाच्या विचारधारेत स्वयंप्रज्ञेने पोहू लागतो. या दृष्टिकोनातून महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचे तद्विषयक विचार व आचार समग्रतेने आचरित करणे खऱ्या व कालसुसंगत समाज-विकासासाठी परमावश्यक ठरते.
>> समाजविकासक चळवळी/मोहीमा आखताना आणि आचरताना कालात्मा या ऐतिहासिक संकल्पनेचा सम्यक विचार सुद्धा महत्त्वाचाच नव्हे तर अनिवार्य सुद्धा ठरतो. एखादा विशिष्ट विचार विशिष्ट काळात इतका प्रबल आणि प्रभावी ठरतो की तेव्हाचे लोक त्याच विचाराच्या आधारे व अनुषंगाने विचार करू लागतात. तो तेव्हाचा मुख्य विचारप्रवाह ठरतो. त्याला टाळून वा त्याचा प्रतिवाद करून पुढे जायचे साहस सहसा कोणी करीत नाही. अशा या संकल्पनेचा इतिहासाचार्य वि.का.राजवाडे हे कालात्मा ही संज्ञा देतात. या कालात्म्याच्या विरोधात जाऊन वेगळा, पर्यायी कालात्मा प्रस्थापित करायचा प्रयत्न करणारी व्यक्ती त्याच तोलामोलाची असणे अपरिहार्य/अनिवार्य असते. परंतू सहसा असे घडताना दिसत नाही. क्वचित काही अद्वितीय ज्ञानसमृद्ध असलेल्या अपवादात्मक व्यक्ती इतिहासाचा हा कालात्मा बदलण्याच्या प्रयत्नात यशस्वी होतातही, पण अशी भूषणावह व सकारात्मक उदाहरणे अगदी विरळाच. त्यामुळेच समाजविकासक कार्यात इतिहासवाद (Historicism) ही संकल्पनाच बाद ठरवावी लागते. कारण इतिहासवाद ही संकल्पना भविष्यात काय घडेल याचे अनुमानवजा भाकीत करीत असते. तथापि 'असे' भाकीत करता येणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून शक्यच नसल्याने ही संकल्पना वैज्ञानिक स्पिरीटच्या विरुध्द मानली जाते. वैज्ञानिक स्पिरीट/सिद्धांतची व्याख्या करताना कार्ल पाॅपर/Karl Poper* हा सुप्रसिद्ध विचारवंत म्हणतो की, 'ज्याच्या मांडणीतच तो केव्हा आणि कसा असत्य म्हणून नाकारला जाईल याचे सूचन असते त्याला वैज्ञानिक सिद्धांत म्हणता येईल.' या सर्व विज्ञानाधारित तत्त्वज्ञानाधिष्ठित बाबींच्या प्रकाशात समाजशास्त्राचे सामाजिक स्थितिकी (Socisl Ststics) आणि सामाजिक गतिकी (Social Dynamics) असे शाखाभेद केले गेले आहेत. ऑगस्ट कोन्त/Auguste Comte** या फ्रेंच पाॅझिटिव्हिस्ट विचारवंताने फिजिक्सच्या तत्संबंधित माॅडेलवर समाजशास्त्राची वरीलप्रमाणे रचना करायचा प्रयत्न केला आहे. अद्ययावत फिजिक्सच्या (क्वांटम मेकॅनिक्स, पुंज यामिकी वगैरे) माॅडेल नुसार पदार्थाच्या सूक्ष्मातिसूक्ष्म कण/पार्टिकल यांची स्थिती आणि गती ह्या दोन्ही अवस्था एकत्रितपणे/निश्चितपणे सांगताच येत नसून एकतर यांचे स्थान निश्चितपणे सांगता येईल किंवा गती. हेच अनिश्चिततेचे पदार्थविज्ञान/फिजिक्स असून हेच तत्त्व समाजशास्त्राची रचना करताना विचारात घेण्याची अद्ययावत प्रक्रिया तत्संबंधित विचारवंत आचरित आहेत. याला पुढच्या काळात सामाजिक पदार्थविज्ञान म्हणून अभ्यासले जाण्याची व त्यानुसार संशोधन मांडले जाण्याची शक्यता सुद्धा इतिहासाचा कालात्मा या संकल्पनेच्या प्रकाशात विचाराधीन ठेवूनच सध्याच्या समाजविकासक चळवळी/मोहीमा राबविणे व आचरणे क्रमप्राप्त ठरत आहे.
>> तथापि अविचारी, तर्कदुष्ट व अहंगंडाने संपृक्त बौद्धिकता आणि तद्जनित प्रतिभा जर निसर्गद्रोही व कालविसंगत (कालात्माविसंगत) पद्धतीने समाजविकासक कार्यात अतिरेकी लुडबुड करू लागली तर त्याचे दूरगामी दुष्परिणाम समाजाला भोगावे लागणे क्रमप्राप्तच ठरते. म्हणूनच अशा विकृत व कुत्सित प्रवृत्तींच्या तथाकथित क्रांतिकारक(?) चळवळी/मोहिमांना समाजात थारा मिळणार नाही, यासाठी सुजाण, सजग, समाजशील व खऱ्याखुऱ्या समाज-संघटक शक्तींना सतत डोळ्यात तेल घालून जागता पहारा ठेवणे भाग असते. आणि सम्यक व शाश्वत समाजविकासक कार्याच्या उत्क्रांतीशास्त्राधारित व कालात्मासुसंगत अशा निसर्गसंमत प्रक्रियेला व या प्रक्रियेत सक्रिय असलेल्या समाज-संघटकांना बळ देणे प्रत्येकच समाजघटकाचे प्राथमिक स्वरूपाचे नैतिक व नैष्ठिक कर्तव्यच ठरते. (#685)
¤
(*कार्ल पाॅपर- ऑस्ट्रियन-ब्रिटिश तत्त्वज्ञ, Critical Rationalism चा प्रणेता)
(**ऑगस्ट कोन्त- फ्रेंच तत्त्वज्ञ, Positivism चा प्रणेता)
(या टिपणात डाॅ.सदानंद मोरे यांचे 'साप्ताहिक सकाळ' : 17.09.2022च्या अंकात प्रकाशित लेख 'कार्ल पाॅपरचे क्वांटम समाजविज्ञान ?' मध्ये प्रकट/नमूद विचारांची मदत(आधार) घेतली आहे.)
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया.
(11.09.2022)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment