कवी, कविता आणि दुर्बोधता वगैरे : एक आकलन (परिवर्तनाचा वाटसरु, 01-15 सप्टेंबर 2022 च्या अंकात प्रकाशित)
*कवी, कविता आणि दुर्बोधता वगैरे : एक आकलन*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
भौतिकशास्त्रातील एक जुना नियम असे सांगतो की, प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असतेच असते; तथा या क्रिया आणि प्रतिक्रिया परस्परविरोधी परंतु समसमान शक्तीभारित असतात. भौतिकशास्त्रातील हा जुना नियम काव्यप्रांतात मला अपुरा व बावळट वाटतो. परंतु याच भौतिकशास्त्रातील क्वांटम मेकॅनिक्स/क्वांटम थेअरी(सायंस) संबंधातील नवीन नियम (जसे-- हायझेनबर्गचे अनिश्चिततेचे नियम, श्राडिंगरचे वेव्ह इक्वेशन्स, पाॅल डिरॅक चे अनिश्चित विश्व विषयक शोध, इ.) मात्र काव्यप्रांतात जवळजवळ तंतोतंत म्हणता येतील असे लागू होतात, असे सूक्ष्म अवलोकनाअंती दिसून येते.
कविता ही एक गूढ विचारप्रक्रिया (मनःप्रवास) सुद्धा आहे; हे मत विचारात घेता कविता ही वर नमूद केलेल्या भौतिकशास्त्राच्या संकल्पनेनुसार क्रिया आहे की प्रतिक्रिया, हा प्रश्न मला अतिशय महत्त्वाचा वाटतो. आणि या प्रश्नाचे माझे अल्पमतीचे उत्तर असे की, कविता ही क्रिया असते/असावी. आणि कोणतीही क्रिया ही नवनिर्मिती असते, ती पुनरावृत्ती नसते. पुनरावृत्ती असल्यास ती नक्कल असते, क्रिया नसते. याउलट प्रतिक्रिया ही अशा नवनिर्मितीवरील भाष्य/टीका/प्रवचन/विवेचन/समीक्षण असते.
पर्यायाने कविता ही जर क्रिया असेल तर ती नवनिर्मितीही असेल, ती भाष्य/टीका/प्रवचन/विवेचन/समीक्षण आदि नसेल हे ओघाने आलेच. शिवाय ती (कविता) जर भाष्य/टीका/प्रवचन/विवेचन/समीक्षण आदि असेल, तर पर्यायाने ती प्रतिक्रिया असल्याने नवनिर्मिती नसेल. म्हणजेच ती शुद्ध(?) कविता(?) नसेल/नसावी, असा एक तर्कशुद्ध निष्कर्ष निघतो. माझे हे उत्तर तर्काधिष्ठित गणितातल्या उत्तराप्रमाणे "एकमेव" तथा "परिपूर्ण" असणार नाही, याची मला नम्र जाणीव आहे. म्हणूनच माझ्या या उत्तरात "कसर" कोठे/काय/कशी आहे, तर्क आणि कविता यांतील अंतर्संबंध काय आहेत, हे समजून घेेणेे मला मनापासून आवडेल.
माझे वरील प्रतिपादन योग्य आणि पुरेसे मानल्यास क्रिया ही नवनिर्मिती असून कविता ही क्रिया व पर्यायाने नवनिर्मिती असल्याने ती (सापेक्षवादाचे तत्त्व लक्षात घेता) समजून घेण्यासाठी, अर्थांकित करण्यासाठी, अर्थनिर्णयनासाठी सदा/नेहमीच सोपी राहणे स्वाभाविक/नैसर्गिक असणार नाही, हे ओघाने आलेच. कारण त्यासाठी/तिच्या अर्थनिर्णयनासाठी कोणताही पूर्वाधार उपलब्ध नसतो. म्हणजेच कवितेचे दुर्बोध वा समजण्यास कठीण असणे हे कवितेचे अवगुण/दुर्गुण नसून तो कवितेचा स्वयंभू असा स्वाभाविक गुणधर्मच आहे, असे म्हणावे लागणे क्रमप्राप्त ठरते. पर्यायाने कविता "दुर्बोध" वा "समजण्यास कठीण" असणे ही बाब अतार्किक किंवा अनैसर्गिक वा अस्वाभाविक नाही, हे सुद्धा स्पष्ट होऊ लागते.
कविताविषयक माझी जाण/समज अद्यापही विकसनशीलच असून मी ह्या क्षेत्रातला एक अजाण विद्यार्थीच आहे याचीसुद्धा मला नम्र जाणीव आहे. ह्या संदर्भात सुप्रसिद्ध तथा साक्षेपी समीक्षक स्व.श्री.म.सु.पाटील यांचे विचार (कविता-रती : दिवाळी, 2001) मला येथे उद्घृत करावेसे वाटतात. प्रतिभाशाली पण दुर्लक्षित कवी शंकर रामाणी यांच्या कवितेच्या विश्लेषणात श्री.पाटील म्हणतात की, "(रामाणी यांच्या कवितेतील भाषा) ही विरोधाभासी भाषा आहे. याचे उघड कारण अशा अनुभवांना तर्कसंगती नसते; निश्चितता नसते; ते ज्ञान देत नसतात. म्हणूनच ते केवळ बुद्धीचा विषय होत नाहीत. त्यासाठी नेहमीची व्यावहारिक दृष्टी पुरी पडत नाही..... तो 'एक अबोध चैतन्याचा साक्षात्कार' असतो ..... नजरेचे हे वर्णन म्हणण्यापेक्षा दर्शन आहे. आणि ते विरोधाभासाच्या काव्यात्म भाषेत घडवलेले आहे. .... त्यांचे शब्द त्यांच्या काव्यप्रतिभेला जाणवणाऱ्या पण वर्णन करता येणार नाही अशा अनुभवांचे सूचक आहेत.... हा अर्थ म्हणजे संकल्पनात्मक ज्ञान नव्हे; ती प्रातिभ जाणीव आहे. तिला अजून शब्द सापडलेला नाही. ती 'अंधूक आकृती' आहे; म्हणून ती कळल्यासारखी वाटली तरी ती कळल्याची खात्री वाटत नाही ..... तो एका अंधारातून होणा-या उषःकालाचा, अंधार-उजेडाला, नेणीव-जाणिवेला जोडणारा, प्रस्तुत-अप्रस्तुत यांचा संयोग साधणारा, वरवर संबंध नसलेल्या गोष्टीत संबंध स्थापित करणारा आणि काव्यात्म अनुभवाचे प्रतिमात्मक शब्दरूप निर्माण करणारा कोवळा प्रकाश आहे...."
त्याचप्रमाणे याच संदर्भात मला डाॅ.विश्वास कानडे यांचे विचार सुद्धा विचारणीय वाटतात. डाॅ.कानडे त्यांच्या डब्ल्यू. एच.ऑडेन यांच्यावरील दीर्घ लेखात (कविता-रती : दिवाळी,2000) म्हणतात की, "ऑडेनच्या शैलीत .... विशेषतः त्याच्या सुरुवातीच्या काळातल्या कवितांमध्ये--- एक तुटकपणा आहे. जिथे ओघवत्या अर्थसुकर भाषेची सवय झालेली असते तिथे असा तुटकपणा खटकतो; पण त्याचा एक चांगला उपयोग असतो. अशा अडखळण्यामुळे वाचक त्या त्या ठिकाणी विचार करायला लागतो. बौद्धिक कवितेसाठी वाचकाने अशाप्रकारे विचार करणे आवश्यक असते. ऑडेनच्या या तुटक शैलीच्या मागे मुख्यत्वे त्याचा चिकित्सक अलिप्तपणा (Clinical Detachment) हे कारण आहे. वास्तवाचे 'वस्तुनिष्ठ' अभिव्यक्तीकरण करण्याची ईर्षाही त्याला बऱ्याच अंशी कारणीभूत आहे. याखेरीज रचनेचे वैचित्र्य, वैज्ञानिक व औद्योगिक विश्वातले तपशील, शब्दांशी खेळण्याची हौस, मानसशास्त्रीय संज्ञांच्या संदर्भात केलेला शब्दांचा वापर, खाजगी गोष्टींचा केलेला प्रतिकात्मक उपयोग इत्यादी गोष्टींमुळे ऑडेनच्या कवितेला एक तुटकपणा (Clipped Style) प्राप्त झालेला आहे. त्यामुळे लुई मॅकनीसने त्याच्या या शैलीला तारेची भाषा (Telegraphese) असे म्हटले आहे. ऑडेनसाठी निसर्ग आणि मानवी जीवनाची केवळ एक पार्श्वभूमी आहे. त्याच्या कवितेतला निसर्ग वर्डस्वर्थप्रणाणे भव्योदात्त नाही; की त्याला त्यात मानवी जीवनाचे प्रतिबिंब दिसत नाही. त्याने आपली भूमिका स्वतःच स्पष्ट केली आहे. तो म्हणतो, "To me art's subject is the human clay and landscape but the background to a torso." असे असले तरी ऑडेन बऱ्याच वेळा निसर्ग परिदृश्याचा उपयोग माणसाच्या किंवा समाजाच्या मानसिक व्यापाराची रुपकात्मक-प्रतिकात्मक अभिव्यक्ती करण्यासाठी अतिशय कौशल्याने करतो. ... ऑडेन तर असेही म्हणतो, "सुसंगत, लयबद्धता, प्रमाणबद्धता या गोष्टींमुळे कला कलावंताला आणि रसिकाला एक फसवे समाधान देत असते; कारण मुळात ती जीवनाच्या वास्तवाला मुरड घालत असते. या फसव्या समाधानामुळे जीवनाच्या खऱ्या आव्हानांकडे किंवा जटिल प्रश्नांकडे रसिकांचे लक्ष जात नाही. अशाप्रकारे कला नकळत पलायनवादी भूमिका अंगिकारत असते. ...." ऑडेनचे हे विचार मला आपलेच विचार वाटतात, कारण मला रसिक आणि वाचकांसाठी कवितेत मध्ये मध्ये "रिकाम्या जागा" सोडणे हे रसिक/वाचकाच्या सक्रीय सहभागासाठी व रसास्वादासाठी आवश्यक वाटते.
सुप्रसिद्ध कवी, विचारक व "कविता-रती" चे संस्थापक संपादक स्व.पुरुषोत्तम पाटील मला लिहिलेल्या त्यांच्या एका पत्रात कवितेबद्दल असे विधान करतात की, "...महत्त्वाची गोष्ट त्यातील (कवितेतील) व्यक्त झालेल्या अनुभवाची आणि अनुभवसंलग्न आर्ततेची आहे. व्याकरणाच्या दिशेने फार बोध घेण्याची आवश्यकता रसिकाला वाटू नये .... कवितेचा अर्थ जाणून घ्यायचा झाला तर खूप बारकाईने पदर उलगडून दाखवावे लागतील. .... अशा सूक्ष्म सूचित अर्थाचा शोध घेता येतो. ... आधुनिक समीक्षेची क्षितिजे फार विस्तारली आहेत. आपल्या मर्यादांमुळे पुष्कळ वेळेला कविता कळत नाही, म्हणून त्या कवितांना दोष देण्यात अर्थ नाही..... अलिकडची कविता फार पिळाची, तशीच नवनवीन प्रयोग करणारी झाली आहे. ती समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे."
वरील सर्व विवेचनाचा साकल्याने/एकत्रितपणे विचार करता, एकंदरीत मला असे वाटते की, कविता म्हणजे 'सोडवलेले गणित' नसून 'सोडवावयाचे गणित' आहे/असावे; ते सोडविता येते/सोडविता येणे शक्य आहे, हेच यावरून स्पष्ट होते. आणि "ते गणित" (ती कविता) सोडविता आल्यावर मिळणारी/लाभणारी प्रसन्नता, आनंदमयता, स्वस्थता जीवनाला 'आनंदाने' भरून टाकते; हा कित्येक विचारवंतांचा, रसिकांचा 'स्वानुभव' आहे. सुसंस्कृतता आणि सुसभ्यता या बाबींची मानवी जीवनातील परमावश्यकता पूर्ण करण्याचे/पूरविण्याचे पवित्र तथा महत्त्वाचे कार्य कविता करीत असते; कवितेने हे कार्य करायचे असते. हे कार्य पेलू शकेल ती कविता खऱ्या अर्थाने "कविता" या "क्रियात्मक" नामाभिधानाला/संज्ञेला पात्र ठरते; तीच कविता टिकाऊ असते. त्या कवितेला "अंत" माहितच नसतो. ब्रह्माण्डाच्या अनंतत्त्वाला पूरक अशी "ती" कविता मानवाला/वाचकाला/रसिकाला सुद्धा त्या अनंत ब्रह्माण्डाशी जीवाशिवाचे नाते जोडण्यासाठी साह्यभूत ठरते. कवितेने दिलेली ही आनंदानुभूती अनंत काळापर्यंत टिकाऊ अशी असते. म्हणूनच "मानवी संस्कृतीचा उदय/प्रारंभ कवितेनेच झाला", हा इतिहास एखाद्या पुराव्याअभावी अग्राह्य ठरविण्याची हिंमत कोणीच प्रज्ञावंत करू धजत नाही.
शब्दार्थ, तर्क, बुद्धी आणि व्याकरण यांच्या पलीकडे काहीच नसेल/नसावे काय? काही असल्यास 'ते' काय असावे? याचा विचारही करू नये काय? मला "सोडविलेले गणित" अभ्यासण्यात पुरुषार्थ(?) गवसत नसेल, मला "स्वतः गणित सोडविण्यात" आनंदानुभूती व आत्मिकसुखाची प्राप्ती होत असेल, तर मी काव्यप्रांतातील "खलनायक" ठरावा काय? गणित सोडविण्याची व गणित मांडण्याची सुद्धा माझी "रिती" अवघड व/वा अभिनव/नाविन्यपूर्ण दिसत/भासत/वाटत असेल तर त्या कारणासाठी माझी ती "रिती" सरसकट नाकारणे/फेटाळणे क्रमप्राप्त व सयुक्तिक ठरावी/ठरेल काय? नसल्यास ती "रिती" समजून घेण्याचे "श्रम" म्हणजे फालतू कटकट वा भ्रमिष्टाच्या बरळण्याकडे अनावश्यक लक्षवेध का समजण्यात यावे? असे काही ससंदर्भ तर काही संदर्भशून्य प्रश्न मला कवितालेखनाच्या पूर्वी, दरम्यान व नंतरही सतावत असतात. माझे हे प्रश्न मूर्खपणाचे, मानभावीपणाचे, मुजोरीचे आहेत/असावेत किंवा कसे; हे ठरविण्यापूर्वी माझ्या प्रश्नांवर "विचारविमर्श" मात्र अवश्य व्हावा, ही माझी स्वाभाविक इच्छा आहे. आणि माझी "ही" इच्छा काव्याभासाला मारक निश्चितच ठरणार नाही, असे माझे प्रांजळ व प्रामाणिक मत आहे.
माझ्या या प्रतिपादनानुसार कविता ही क्रिया असल्याने तिच्यावर प्रतिक्रिया व्यक्त होणे, हे ओघाने आलेच. प्रतिक्रिया ही भाष्य/टीका/प्रवचन/विवेचन/समीक्षणात्मक असते. कवितेने वाचकाच्या/रसिकाच्या पुढे 'ठेवलेले गणित' सोडविण्यास हे भाष्य/टीका/प्रवचन/विवेचन/समीक्षण साह्यभूत ठरते. परंतु या भाष्य/टीका/प्रवचन/विवेचन/समीक्षणाला कवितेसम "सम-समानता" देणे, ही बाब निर्मितीप्रक्रियेचा/चे अवमान व अवमुल्यन करणारी/रे ठरेल असे मला वाटते. याचा अर्थ त्या भाष्य/टीका/प्रवचन/विवेचन/समीक्षणाला दुय्यम समजण्याचेही कारण नाही, तसा माझा "अर्थ" कदापि नाही. तथापि काव्यप्रांतात क्रिया आणि प्रतिक्रिया या संज्ञा भौतिकशास्त्रातील जुन्या नियमांचे तंतोतंतरित्या अनुपालन करीत नाहीत; त्यात भौतिकशास्त्रातीलच नवीन नियमांप्रमाणे "काहीतरी" न्यूनाधिकता, अनिश्चितता, अनाकलनीयता, गूढता असते; एवढेच मला या निमित्ताने मांडायचे आहे. (यात प्रतिक्रियेलाच कविता समजण्याची भूल/चूक सुद्धा होते/केली जाते, हे सुद्धा अलाहिदा तपासणे आवश्यक राहील असेही मला वाटते.)
माझे ब्रीदवाक्य "DISSENT : THE VOICE OF PROGRESS" च्या अनुषंगाने यावर चर्चा घडावी अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो.
(शब्द संख्या सुमारे - 1200)
□
@लखनपाल सिंह (लखनसिंह) कटरे,
बोरकन्हार-441902, ता.आमगांव, जि.गोंदिया
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment