एक स्मरणरंजन असेही...!
*एक स्मरणरंजन असेही...!*
~~~~~~~~~~~~~~~~
>> ब्रिटिश आमदानीत इ.स.1930 साली डेप्युटी डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चर, छत्तीसगढ रिजन या वरीष्ठतम पदावरून निवृत्त होऊन स्वातंत्र्योत्तर काळात इ.स.1960 साली निसर्गशरण झालेले व रायबहादूर पदवीने सन्मानित करण्यात आलेले टुंडीलाल पोवार (तुरकर) हे माझे आजेसासरे.
>> त्यांच्या दोन पुत्रांपैकी वडील पुत्राने नागपूर येथील तत्कालीन हिस्लाॅप काॅलेज येथे गणित व विज्ञानाचे पदवी-शिक्षण अर्धवट सोडून, वडीलांच्या इच्छेनुसार, वडीलांनी कमावलेली शेती करण्या/सांभाळण्यास सुरुवात केली. पायलट म्हणून प्रशिक्षणाची चालून आलेली संधी सोडून मध्यप्रदेशातील एका आडवळणावरील छोट्याशा खेडेगावात शेती करण्या/सांभाळून एक मोठी (सुमारे 20 एकरात) आमराई उभारण्यात यशस्वी ठरले.
>> कनिष्ठ पुत्राने वकीलीची परीक्षा उत्तीर्ण करून वकीली-कम-शेतीऔजार (ट्रॅक्टरादि) व्यवसायात आपला जम बसवत मध्यप्रदेशातीलच बालाघाट या जिल्हास्थळाला आपला स्थायी निवास बनवला. जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे अध्यक्षपदही भूषविले. परंतु एका अपघाती श्वानदंशाने त्यांचा जीवनप्रवासच बदलून टाकला व त्यांना एकप्रकारे स्थानबद्ध स्वरूपाचा शहरी वानप्रस्थाश्रमच अवलंबावा लागला.
>> अशा या परिवारातील वडील पुत्राची, सातपैकी मधली, एक कन्या 1982 मध्ये माझी अर्धांगिनी होऊन माझ्या तोवरच्या सन्यस्त जीवनाचा आधार झाली. मध्यप्रदेशातील हा परिवार पूर्णतः हिंदी भाषिक. माझे गाव महाराष्ट्रातील असले तरी विदर्भाच्या अगदी पूर्वटोकावर असून मध्यप्रदेश-सीमेला कवटाळून असल्याने माझा परिवार मात्र पोवारी-कम-झाडीबोली-कम-मराठी-कम-हिंदी भाषिक. असे असले तरी मी माझ्या सहाव्या वर्गापासूनच पुणे आणि वर्धा येथील हिंदी भाषा विषयक विविध परीक्षा उत्तीर्ण करून हिंदी भाषा व साहित्याचा, अल्प का असेना, अभ्यासक राहिल्याने माझे शुद्ध व साहित्यिक हिंदीतील पत्रलेखन माझ्या सासुरवाडीत खूप वाखाणले जायचे.
>> आज आता माझे आजेसासरे, आजेसासू (110 वर्ष जगून), सासरे, सासूबाई, काकेसासरे हे सर्व निसर्गशरण झालेले असले तरी त्यांच्या जीवनप्रवासातील स्वानुभव ऐकून, वाचून, पाहून मी आजही प्रभावित होत असतो. जय हो!
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया.
(01.08.2022)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment