होता होता पहाट (एक अपूर्ण दीर्घ कविता)
◇होता होता पहाट◇
---------------------------------
होता होता पहाट झाली अखेर
आणि मावळला सूर्य अचानक
ऐशीतैशी झाली निसर्ग-नियमांची
तर्काला भोवली विसंगती भयानक ||१||
लागला पाठीमागे भयानकाच्या
अरण्यातील तो सर्वभक्षी वणवा
शुष्क पापणीला फुटले पाझर
आणि धरेवर तो सूर्य ओणवा ||२||
ओल, आटलेला हृदयाच्या कप्प्यातील
संध्यासमयी मग पाझरू लागला
"जल बिन जैसी तड़पे मछली"
कोरड्यातून तसा कोंभ उगवला ||३||
Dissent : the voice of progress
ज्योतिषी कुडमुड्या सांगून गेला
पायव्यात गाडलेल्या काळ्या गोट्यांना
शिखराचे मोल "समजावता" झाला ||४||
होता होता अखेर पहाट झाली
आणि मर्त्य-मानव अमर झाला
नचिकेताच्या अनंत प्रश्नांनी तेव्हा
यम सुद्धा जरासा भांबावून गेला ||५||
शून्यातील ते अनादि-अनंत शून्य
ऋण बाजूलाही धनावून गेले
नव्हते अमृत जेव्हा मृतांसाठी
तेव्हा प्रकाशालाही अंधारून आले ||६||
कोण तो जाणतो, न-जाणतो सत्य
जणू बीजात दडलेला महावृक्ष
पारंब्या अनाहूत पसरत जाताना
लोपतो का तो मूळ जाणता वृक्ष? ||७||
होता होता होते मग पहाट
आणि सूर्य भ्रमतो दिशाभ्रमात
पश्चिमेला होते आगमन सूर्याचे
द्वेष, ईर्ष्या साचे पूर्वेच्या मनात ||८||
फतकल नियतीची अनाकलनीय
शरणागत असते प्रयत्नांच्या पुढे
श्रद्धेचे झाकण झाकते अंधश्रद्धेला
आणि रस्त्या-रस्त्यावर गर्दी वाढे ||९||
नर-नारी, नारायण-नारायणी
पालवीच्या रंगासाठी झगडती
जठरतेचे रंग पालवीचे वेग-वेगळे
क्रमाला डावलून उफाळून येती ||१०||
अनंताच्या अंतसमयीचा अश्रूंचा पूर
वाहवून टाकतो राजमहालांना सुद्धा
शिखरावर आसनस्थ असलेले पक्षी
शोधिती आधार पायव्याचा साधा ||११||
चकव्याच्या हाती नसते कधी काठी
हाकलतो तरी तो चकणा-यालाही
सापाने टाकलेली कात झुरमुरी
हळूच फसवते मग चकव्यालाही ||१२||
ठेच लागली नि झालो मी परका
जन्मदाता कृपण एकांगी झाला
गाडलेल्या धनाच्या पारंब्या लोंबता
वृक्षांनाही मोठा अचंबाच झाला ||१३||
उत्तरांच्या घेरावात फसलेले साधे प्रश्न
तरसले जेव्हा तहान शमविण्यासाठी
तेव्हा अकस्मात चकाकली वीज आणि
लपला पाऊस मग तृष्णेच्याच पाठी ||१४||
पाडसाला पाजताना पान्हा आवरला
मायच्या नयनी मग तरारले पाणी
आसमंत कोरडे-कोरडे वाळवंटाचे
आमिष तेथे झाकलेले पाहिले कोणी? ||१५||
दगडात लपलेले शिल्प उकरताना
शिल्पकार आतून हादरून गेला
कवीची कविता झाली मुकी आणि
अवकाळी पावसाला जोम आला ||१६||
"येथे समस्त बहिरे बसतात लोक"
आणि कवी वाचतो कविता तेथे
"काट्याच्या अणीवर वसले तीन गाव"
वस्तीला आले तेथे जत्थेच्या जत्थे ||१७||
"हम होंगे कामयाब, एक दिन"
After-image will be proven
दिग्दर्शकाच्या टोपीत दडले काय?
पहावे नकली डोळे जरा विस्फारून ||१८||
संभोगतानाच्या आसनांची व्यथा
व्हायरल झाल्याचे जेव्हा कळले
पारितोषिकांची माळ पसरली जरा
आणि बोलके संवादही फळले ||१९||
होता होता पहाट झाली पुन्हा
लालिमा उषेची मग आरवली
कोंबडा मात्र झोपला उशीरापर्यंत
त्याची पालखी सजवून झाली ||२०||
शिल्पात कोरले प्रवाह कोरडे
डोंगर पोखरून काढला उंदिर
होता होता झाली शांतल पहाट
अजून एकांगी ते दूरस्थ मंदिर ||२१||
□
(...अपूर्ण)
□
@ॲड.लखनसिंह कमलाबाई कटरे,
बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902,
(जि.गोंदिया/विदर्भ-महाराष्ट्र)
(रचना काल : 23 ते 27 जानेवारी 2019/बोरकन्हार)
¤¤¤¤¤¤¤¤¤¤||●||●||●||¤¤¤¤¤¤¤¤¤¤
Comments
Post a Comment