मी : पहिली ते आठवी : संक्षिप्त गोषवारा
*मी : पहिली ते आठवी : संक्षिप्त गोषवारा*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
>> माझे वर्ग 1 ते 4 दरम्यानचे शिक्षण प्राथमिक शाळा बोरकन्हार या आमच्या गावातील शाळेतच झाले. त्याकाळी
केजी वगैरेंचे खूळ आमच्या गावापर्यंत पोचले नसले तरी पहिली-पूर्व एक अनौपचारिक वर्ग असायचा. त्याला तुकडी असे म्हणायचे व वय 5 ते 6 वर्षे मधील मुलांना त्या वर्गात बाराखडी, अंकलेखन आदि शिकवले जाई. मी तुकडीत असताना आमच्या गावचेच नंदलाल शुक्ला हे मुख्याध्यापक असल्याचे पुसट आठवते. त्याचवर्षी ते निवृत्त झाले, असेही आठवते.
>> जून 1961 मध्ये मला पहिल्या वर्गात अधिकृत प्रवेश मिळाला. तेव्हा त्या शाळेतील गुरुजी म्हणजे, पटले गुरुजी, हरिणखेडे गुरुजी, रामेश्वर मंगरुजी हुकरे गुरुजी आणि माझे वर्ग 1 ते वर्ग 3 चे माझे आवडते वर्गशिक्षक सीताराम भुराजी चुटे गुरुजी. (हे एका डोळ्याने अंध होते.) माझ्या मराठी लेखन/हस्ताक्षर, वाचन व गणित या विषयांचा पाया मजबूत करण्यात या गुरुजींचा सिंहाचा वाटा आहे. या विषयातील माझी पहिली गुरु माझी आई स्व.सौ.कमलाबाई कटरे ही असली तरी माझी या विषयांतील रुची वृद्धिंगत करण्यात चुटे गुरुजींची भूमिका सुद्धा महत्त्वाचीच होती/आहे. पुढच्या म्हणजे चौथ्या वर्गाचे आमचे शिक्षक सोना बुगाजी बहेकार हे मुख्याध्यापक सुद्धा होते. ते अतिशय सालस व प्रेमळ वृत्तीचे सहृदय व्यक्ती असले तरी त्यांना शिकवण्याचे अंगच नव्हते किंवा त्यांना शिकवण्याची आवडच नव्हती असेही म्हणता येईल. त्यांना सतत बिड्या ओढण्याची सवय होती. चुटे गुरुजींना आमची व विशेषतः माझी अशी अभ्यासातील परवड पाहवत नसल्याने ते वेळात वेळ काढून आमच्या वर्गाचा अधूनमधून अभ्यास घेत असत. त्यावेळेस चौथ्या वर्गाची वार्षिक परीक्षा ही जिल्हा परिषद स्तरावरील एका सामाईक परीक्षा बोर्डाद्वारे घेतली जायची. त्यासाठी आम्हाला तीन किलोमीटर अंतरावरील अंजोरा येथे जावे लागले होते. माझी राहण्या-थांबण्याची व्यवस्था श्रावण चांगोजी ब्राह्मणकर गुरुजी या माझ्या गावनात्यानुसारच्या जिजाजी असलेल्या व आमच्या गावातील शाळेतच शिक्षक असलेल्या शिक्षकांच्या घरी करण्यात आली होती. तेथे माझी अगदी राजेशाही व्यवस्था करण्यात ब्राह्मणकर गुरुजींची पत्नी, माझी गावताई, हिने स्वयंस्फूर्त पुढाकार घेतला होता. आज वरीलपैकी कोणीही हयात नसले तरी त्यांची स्मृती माझ्या मानसपटलावर अंकित आहे. विशेषतः चुटे गुरुजींची स्मृती तर माझ्या मानसपटलावरच नव्हे तर अंतःकरणातही अमीट छाप सोडून आहे.
>> चौथीनंतरचे साडेपाचवी(?)पर्यंतचे माझे शिक्षण सुद्धा आमच्या गावातील शाळेतच झाले. तेव्हाचे माझे गुरुजी म्हणजे भैय्यालाल महादेव कटरे गुरुजी व श्रावण चांगोजी ब्राह्मणकर गुरुजी. पाचव्या वर्गात प्रथमच आम्हाला इंग्रजी भाषेची, एबीसीडीची ओळख झाली. भैय्यालाल महादेव कटरे गुरुजी हे माझे महाल्पे भाऊच असून त्यांनीच आम्हाला इंग्रजीची अतिशय सुंदर अशी ओळख करून दिली आणि रोमन लिपी व देवनागरी लिपी यातील संबंधाचा पाया मजबूत करून दिला. आजही मला त्याचा फायदाच होतो.
>> परंतु दिवाळीनंतर आमच्या गावातील सहाव्या वर्गाची मान्यता अर्ध्यातच रद्द झाल्याने दिवाळीनंतर आम्हाला जवळच्याच तीन किलोमीटर अंतरावरील अंजोरा येथील माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले. या शाळेतील उरकुडे गुरुजी, बाजपेयी गुरुजी, सैनी गुरुजी, म.गो.ब्राह्मणकर गुरुजी आणि रघुनाथ मनाजी दोनोडे गुरुजी तथा मुख्याध्यापक गोमा दाजिबाजी फुंडे गुरुजी यांच्या संपर्कात व देखरेखीत मी आठवी पर्यंतचे शिक्षण अंजोरा येथील शाळेतच पूर्ण केले.
>> अंजोरा येथील शाळेत असताना उरकुडे गुरुजी आणि बाजपेयी गुरुजी यांच्या पाठपुराव्याने मी महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे व महाराष्ट्र राष्ट्रभाषा परिषद, वर्धा द्वारे आयोजित विविध हिंदी भाषेच्या परीक्षा उत्तीर्ण होऊन हिंदी साहित्य व भाषेचा अल्पस्वल्प अभ्यास करू शकलो, ज्याची मला नंतरच्या जीवनात खूप मदत झाली. या कालावधीतील सातवीचे वर्गशिक्षक र.म.दोनोडे गुरुजी यांची आजही भेट होत असते. त्यांच्या शिकवण्याचा माझ्यावर पडलेला प्रभाव मला माझ्या शिक्षकी कालावधीतील खूपच उपयोगी ठरला होता. मुख्याध्यापक गो.दा.फुंडे गुरुजी आणि श्रा.चां.ब्राह्मणकर गुरुजी यांनी माझा आवडता गणित विषय आणखीच मजबूत करून दिला. उरकुडे गुरुजींनी मराठी आणि बाजपेयी गुरुजींनी अनुक्रमे माझ्या मराठी आणि हिंदी भाषेला योग्य वळण लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अशा शैक्षणिक वातावरणात, 1968-69 या शैक्षणिक वर्षात मी वर्गात पहिला येऊन आठवी उत्तीर्ण झालो.
>> अंजोरा येथे फक्त आठवी पर्यंतच शिक्षणाची सोय असल्याने नववी साठी आमगांव या माझ्या गावापासून सहा किलोमीटर अंतरावरील निमशहरी गावातील आदर्श विद्यालय येथे मी प्रवेश घेतला. पहिली ते आठवी पर्यंतच्या शिक्षकांना गुरुजी म्हणून संबोधण्याची आमची सवय आदर्श विद्यालयातील शिक्षकांना सर म्हणताना सुटता सुटत नव्हती. त्यामुळे आमची टर सुद्धा उडवली जायची. शिवाय माझा पहिल्या काही दिवसांचा पेहराव (हातभर रूंद बाॅटमचा पायजमा व गुडघ्यापर्यंत लांबीचा शर्ट) सुद्धा माझी टर उडविण्यास साह्यभूतच ठरायचा. अखेर तिमाही परिक्षेत वर्गात 'पहिला नंबर' पटकावल्यावरच माझी खोड काढण्याला आळा बसला व माझे अस्तित्व मान्य होऊ लागले.
>> असा हा माझा पहिली ते आठवी पर्यंतच्या शैक्षणिक प्रवासाचा संक्षिप्त गोषवारा.
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया.
(07.08.2022/मैत्री दिन)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment