विचारप्रणाली (--वाद, --सरणी आणि --धारा) : एक संक्षिप्त आकलन
*विचारप्रणाली (--वाद, --सरणी आणि --धारा) : एक संक्षिप्त आकलन*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
>> कोणत्याही परिस्थितीचे/वस्तुस्थितीचे प्रांजळपणे केलेले संतुलित व सम्यक मूल्यमापन तथा विश्लेषण हे कोणत्याही एकाच विशिष्ट विचारवाद वा विचारसरणीने प्रभावित झालेले नसते/नसावे. तसे असल्यास/झाल्यास त्याचा मथितार्थ हा आईसबर्गच्या/हिमनगाच्या फक्त दृश्य पृष्ठभागाइतकाच तथ्यांश धारण करणारा असतो, उर्वरित 5/6 भाग अनिर्णयित/अकथित/अस्पर्शितच राहून जातो. पर्यायस्वरूप परिस्थितीचे/वस्तुस्थितीचे सम्यक व समग्र आकलन शक्य होऊ शकत नाही व अशा अवस्थेत घेतले गेलेले/जाणारे निर्णय अर्थभ्रष्ट तथा अप्रस्तुत ठरणे क्रमप्राप्तच असते.
>> व्यक्तीच्या, समाजाच्या किंवा राष्ट्राच्या नैतिक हिताला धक्का देणारा व/वा बाधक ठरणारा विचारवाद व/वा अशी विचारसरणी, परिस्थिती/वस्तुस्थितीचे मूल्यभान व त्यावरील जननिष्ठा डावलून सरसकट अवलंबिली गेल्यास तो --वाद व/वा ती --सरणी पर्यायस्वरूप अनैतिक व म्हणून पातकी असते, असे महात्मा गांधींच्या विधानात थोडा फरक करून मांडता येईल.
>> म्हणूनच कोणत्याही --वाद व/वा --सरणीचा विचारांध पद्धतीने विरोध न करता व तद्विषयक आकस न बाळगता त्यातही अल्पतम का असेना तथ्यांश असण्याची स्वाभाविक शक्यता लक्षात घेऊन व आपली नैसर्गिक विवेक बुद्धी जागृत ठेवून त्यांच्याशी तेवढ्यापुरता तरी सामंजस्य व समन्वय साधता येतो. पर्यायाने मानवी बुद्धी व ऊर्जेचा अकारण व अस्थानी अपव्यय न होता ती बुद्धी व ती ऊर्जा सकल मानवजातीच्या उन्नयनात्मक विकसनाला साह्यभूत ठरते.
>> अजूनही संपूर्णतः आकलन न झालेल्या मानवी मनाचे अभ्यासक असे सांगतात की, मनस्वी असणे आणि मनाप्रमाणे व्यवहार करणे अशी मानवी मनोवृत्ती असणे म्हणजे एक प्रकारची सर्वोच्च गुलामीच होय. अशी गुलामगिरीप्रणित विचारनिष्ठा ही एकूणच मानवजातीचा संहार करणारी मनोवृत्तीच समजली जाते/जावी. कोणत्याही बाबीचा, मुद्याचा, संकल्पनेचा अतिरेक हा सदैव अनैतिकतेकडे सहज झुकण्याच्या अप्रगल्भ मानवी प्रवृत्तीला पोषकच असतो. कारण आपल्या बुद्धिविषयीचा आदर हा अहंबुद्धिवादाच्या आकर्षणात गुरफटून जाण्याच्या कित्येक पूर्वैतिहासिक तथ्यांना नाकारणे अजूनतरी कोणाला जमल्याचे आढळून येत नाही.
>> अशा या चक्रव्यूहात्मक वस्तुस्थितीच्या माहोलात विचारवाद आणि विचारसरणी या दोहोंतील हिमनगपृष्ठवादी साचेबद्धपणा टाळून/डावलून व उर्वरित तथ्यांश एकवटून ते तथ्यात्मक विचारकण शाश्वत प्रवाही अशा सतत कालसुसंगत विचारधारेत प्रवाहित करून सत्य, प्रेम, करुणा व सहअस्तित्वभाव जागृत करणारा नैतिक असा बुद्धीचा मार्ग निरपवादपणे अवलंबून पुढील वाटचाल करणे, एकूणच मानवजातीला क्रमप्राप्त ठरेल/ठरत आहे. अजूनही बहुतांशी अनाकलनीय असलेल्या मानवी मनाधारित विचारविश्वात इतर विचारांविषयी व एकूणच इतर सृष्टीविषयी कोणतीही छुपी व/वा ठळक वगळणुकीची भावना कशी व का प्रस्फुटित(?) होत असावी हा प्रश्न उपस्थित होत असून या प्रश्नाचे सम्यक समुत्तर वर नमूद वाटचालीतूनच मिळू शकते/शकेल, असेही माझे अल्पबुद्धि-आकलन आहे.
>> म्हणूनच आजच्या या उजाखा*प्रणित सत्योत्तरकालीन संगणकीय युगातील मानवी अस्तित्वरक्षणार्थ कोणतीही एकांगी टोकाची विचार-भूमिका कदापि उपयोगाची ठरणार नसून सामंजस्यात्मक व शांतिपूर्ण सहअस्तित्वभाव जागे ठेवणारी सतत कालसुसंगत अशी विचारधाराप्रणित विचारप्रणाली अवलंबणे परमावश्यकच नव्हे तर अनिवार्य रूपाने क्रमप्राप्तच ठरत आहे/ठरणार आहे, असे माझे अल्पबुद्धि-आकलन आहे. त्यादृष्टीने योगेश्वर कृष्णाचे भगवद्गीतेच्या शेवटच्या अठराव्या अध्यायातील श्लोकार्ध वचन, "...यथेच्छसि तथा कुरु" तथा भगवान पदी पोचलेल्या गौतम बुद्धाचे वचन, "अत्त दीप भव" यांच्या उज्ज्वल आणि दिव्य प्रकाशात 'DISSENT : THE VOICE OF PROGRESS' या माझ्या ब्रीदवाक्याचेही अनुसरण एकूणच मानवजातीसाठी अनिवार्यरित्या क्रमप्राप्त ठरेल/ठरावे, असे हे माझे अल्पबुद्धि-आकलन आहे. (#430)
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया.
(15 ऑगस्ट 2022)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment