राजकारण आणि मराठी साहित्यिक...!
राजकारण आणि मराठी साहित्यिक...!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
माझे स्व.वडील 1950 पासून काँग्रेसचे सक्रीय कार्यकर्ते आणि सक्रीय राजकारणी. (25.01.2018 ला ते निसर्ग-शरण झाले.) अविभाजित भंडारा जिल्ह्यातील सा-याच राजकारणाचे डावपेच बहुतेकदा आमच्या घरीच/वाड्यातच ठरायचे. आमचे घर गावापासून जरा अलिप्त असून आमच्या गावातील लहान गल्ली आमच्या तथाकथित वाड्यातच संपत असल्यामुळे या घरात चाललेल्या जोरजोराच्याही चर्चा बाहेरच्या कोणालाही चोरून-लपून ऐकता येणे शक्य नव्हते/नसते. म्हणूनच कदाचित व माझे वडील (दारू वगळता अन्य) सरबराई करण्यात "पटाईत" असल्याने राजकारणाचे कुटिल वगैरे डावपेच ठरविण्या/खेळण्यासाठी आमचे घर अगदी "आदर्श" होते. ह्या चर्चा ऐकण्याची मला खूप आवड असायची, पण मला तशी परवानगी नसल्याने मी चापीच्या मागे लपून या चर्चा ऐकत असे. अशा बैठकीतून नुकताच उठून गेलेला मित्र तात्काळ कसा शत्रू होतो, याचे प्रात्यक्षिकच मी तेथे अनुभवत होतो.
या चर्चांदरम्यान गोंदियाचे मनोहरभाई पटेल, सोहनलाल मिश्रा, मेवालालजी,.... आमगांवचे गोपीकिसन अग्रवाल, गौरीशंकर असाटी, रामेश्वरकाका अग्रवाल, आसपासच्या गावातील भालचंद्र रहांगडाले, दयाराम भक्तवर्ती, नारायणभाऊ बहेकार, भरतभाऊ बहेकार,... भंडा-याचे ज्वालाप्रसाद दुबे, .... नागपूरचे नरेंद्र तिडके, नाशिकराव तिरपुडे,.... दिल्ली चे अशोक मेहता,...... इत्यादी राजनेत्यांचा आलटून पालटून (या चर्चेत) सहभाग असे. कदाचित या आडव्या-तिडव्या व कुटिल चर्चांचा माझ्यावर परिणाम होऊन काँग्रेस सारख्या गांधी प्रणित सोज्वळ(!) राजकीय पक्षाच्या राजनेत्यांबद्दल माझ्या त्या कुमारवयात एक अढी निर्माण झाली असावी. पर्यायाने माझा संपूर्ण परिवार काँग्रेसी विचारधारेचा असूनही मी मात्र त्यावेळी पर्याय म्हणून सहज उपलब्ध असलेल्या एकमेव जनसंघाचा समर्थक होऊ लागलो होतो. आणि आणीबाणीच्या काळात, माझे वडील व संपूर्ण परिवार इंदिरा गांधींचे समर्थक असूनही, मी मात्र माझ्या शक्तीनुसार आणीबाणीला लटका-लुटका(!) विरोध करू शकलो होतो. त्यासाठी सुदर्शन क्लब स्थापन करून समविचारी(?)/समवयस्क मित्रांना "आसरा"(?) दिला होता. अर्थात त्याचे फळ आणीबाणीनंतर "मा फलेषु कदाचन..."च ठरले, ही बाब अलाहिदा.
1984 मध्ये MPSC द्वारे निवड होऊन मिळालेले (allot झालेले) D.T.O. चे पद नाकारून मी दुस-या पसंतीचे/ PREFERENCE चे सहकार विभागातील तालुका सहकार निबंधक हे वर्ग-2 चे राजपत्रित पद स्वीकारले. आणि पुन्हा राजकारणाच्या पाठशाळेच्या अनुभवातच शिरलो. महाराष्ट्रात सहकार क्षेत्रातील प्राथमिक उमेदवारी ही राजकारणाची पाठशाळाच मानली जाते(जायची.) या पाठशाळेच्या जहाल, मवाळ, मध्यममार्गी अशा सा-याच सालस, उनाड विद्यार्थ्यां(?)ना कसे सांभाळून घ्यावे, यासाठी माझा तो कुमारवयातील राजकीय चर्चा-अनुभव खूप खूप उपयोगी ठरला. सहकार क्षेत्रामुळे महाराष्ट्रात जितके लहान, मध्यम, मोठे राजकीय पक्ष असतील त्या सर्वांच्या ग्रामस्तरापासून राज्यस्तरापर्यंत सा-याच राजकीय नेत्या/कार्यकर्त्यांशी माझा संबंध येऊ लागला. त्यांना कसे हाताळावे याचे बाळकडू मी कुमारवयातच प्यायलो असल्याने या सर्वांशी माझे कार्यालयीन संबंध सलोख्याचेच राहिले. काही थोडके अपवाद होते, आणि ते अस्वाभाविक सुद्धा नाहीच!
(सहकाराच्या या राजकारणी-पाठशाळेतून गेलेले/आलेले विद्यार्थी(?) 1995 पर्यंत तरी more than 50% प्रामाणिकता,शुद्धता, शुचिता पाळणारे होते, पण 1995 नंतर मात्र हे प्रमाण less than 50% असे घटले असल्याचे माझे अल्पबुद्धीचे आकलन आहे.)असो.
1969 पासूनच मी काहीबाही लिखाण करीत असून मला माझ्या बालपणापासूनच "वाचनाचा जणू भस्म्यारोग" झाला असल्याने मी मराठी, हिंदी व इंग्रजी पुस्तके, नियत/अनियतकालिके आदिंचा ग्राहक/संग्राहक/वर्गणीदार/वाचक होतो/आहे. त्याच "नादात" मी माझे लिखाण यत्रतत्र प्रकाशनार्थ सुद्धा पाठवू लागलो होतो. हिंदी साहित्य जगताचा अनुभव खूप खूप मदतीचा व आश्वासक असला तरी मराठी साहित्य जगताचा अनुभव मात्र माझ्या "त्या बालपणीच्या राजकारण-जन्य अनुभवाचे" पुनरुत्थान करणाराच जाणवत असे.
माझे लिखाण साभार परत येणे हे जवळ जवळ ठरलेलेच असायचे. नागपूर ते पुणे ते मुंबई ते धुळे, मनमाड, आदि ....... ठिकाणाहून प्रकाशित होणा-या नियतकालिकांचा तर असा कदाचित गैरसमजच झाला असावा की, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश च्या चंबल खो-यातील कु~कु~कुप्रसिद्ध डाकू "लाखनसिंगा"चे नाव धारण करणारा हा कुठला दुसरा चंबळचा डाकू मराठीत लुडबुड करायला पाहतोय, याला आवरलेच पाहिजे. (शिवाय माझे आडनाव कटरे, हे सुद्धा काटपीट केल्यासारखे हिंस्रच, त्याबद्दलही शंकाकुशंका असाव्यात!) मला साभार परत आलेल्या माझ्या लिखाणात जे तथाकथित दोष(?) दाखविले/सांगितले जायचे, अगदी तसेच किंवा त्याहूनही "भयंकर" दोषजनित(???) लिखाण मात्र प्रकाशित केले जायचे. त्यासंदर्भात मी साधार विश्लेषणासह प्रत्युत्तर दिल्यावर हे तथाकथित मान्यवर, महान, मानलेले, विद्वान म्हणून नावाजलेले प्रकाशक, संपादक, अधिदेशक, समीक्षक निरूत्तर होऊन मी उत्तरासाठी पाठविलेले कोरे कागद व लिफाफे मला को-या कागदासह परत पाठवत असत. माझ्या भाईभतीजावाद, परिवारवाद, शिष्यवाद, चापलुसीवादाच्या साधार प्रत्युत्तराच्या आरोपाने त्यांचे पितळ उघडे पडत असल्याने त्यांनी मला मुजोर, असभ्यादि ठरवून मला वाळीतच टाकले होते. एकंदरीत मी बालपणी अनुभवलेले "राजकारण" हे महान-साहित्यिक लोक माझ्या समोर अगदी जीवंत करून ठेवत असत/ठेवतात.
मी सहकार विभागात असल्याने अन्य सा-या राजकीय व्यक्तींना व त्यांच्या प्रत्येक चालीला ओळखू शकत होतो, पण माझे दुर्दैव की, या साहित्यकारणातील राजकारण्यांना वेळीच ओळखणे मात्र मला जमले नाही. आजही ही वस्तुस्थिती फारशी बदलली नसून आपल्या मराठी साहित्य जगतात आणखी जोमाने विद्यमान आहे, हे मराठी साहित्य जगताचे दुर्दैवच म्हणावे लागेल!
असे असले तरी काही निर्मळ मनाचे प्रकाशक, संपादक, समीक्षक, मालक(?) सुद्धा मला भेटलेत, हे मी गर्वाने सांगू इच्छितो.
अशा सन्माननीय अपवाद असलेल्या काही आदरणीय मान्यवरांचा इथे उल्लेख मला आवश्यक वाटतो. त्या मान्यवरांपैकी काही नावे अशी--- अनुष्टुभ परिवारातील गो.तु.पाटील सर, प्रभाकर बागले सर, मा.जयप्रकाश लब्धे, // भाषा आणि जीवन चे स्व.अशोक केळकर सर, // आजचा सुधारक चे स्व.दि.य.देशपांडे, रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ, // कविता-रती चे स्व.पुरुषोत्तम पाटील सर, // साधना चे विनोद शिरसाठ, // ग्रंथाली/रुची चे दिनकर गांगल सर, // मराठी साहित्य महामंडळाचे विलास चिंतामण देशपांडे, // उगवाई चे स्व.म.द.हातकणंगले सर, // विचार भारती चे स्व.आनंद यादव सर, // युगवाणी चे स्व.अनिल नितनवरे, // लोकानुकम्पा चे स्व.योगेंद्र मेश्राम, // तरुण भारत चे वामन तेलंग, कुमार शास्त्री, ल.त्र्यं.जोशी, सुधीर पाठक, प्रकाश एदलाबादकर, शैलेश पांडे, शशीकुमार भगत, सुनील कुहीकर, // लोकमत चे सुधाकर गायधनी, सुरेश भट, सुरेश द्वादशीवार, // लोकसत्ताचे प्रवीण बर्दापूरकर, देवेंद्र गावंडे, // महाराष्ट्र टाईम्स चे श्रीपाद अपराजित, मनोज मोहिते, // नागपूर पत्रिकेचे दिनकर देशपांडे, // लोकप्रभा चे स्व.ह.मो.मराठे, // खेळ चे मंगेश नारायणराव काळे, // चपराक चे घनश्याम पाटील, // मुक्त शब्द चे येशू पाटील, // अर्थपूर्ण चे यमाजी मालकर, // ...... अशी काही मोजकी नावे सोडली तर नाव मोठे दर्शन खोटे असणारे, अहंगंडात न्यूनगंड व न्यूनगंडात अहंगंड घुसडून विद्वत्तेचा आव आणणारे, लिखाण आणि वागणूक यात 360° चे विचलन असणारे, प्रत्यक्ष राजकारण्यांपेक्षाही भयंकर कुटील राजकारणी असलेले, परिवार/भाईभतीजा/शिष्यवादाचे पोषक असलेले, परपुष्ट आणि परजीवी कृत्रिम लिखाणाने भारावून जाणारे, तथाकथित साहित्यिक, प्रकाशक, संपादक, समीक्षक, अधिदेशक, मालकच मला जास्त भेटले, हे माझे दुर्दैवच म्हणावे लागेल.
माझ्या या स्वानुभवाच्या सत्य-कथनामुळे एखाद्याला माझे हे लिखाण म्हणजे विषवमन वाटले, तर तो ज्याच्या-त्याच्या वृत्ती/प्रवृत्तीचा भाग आहे, त्यावर मला कोणतेही भाष्य करता येणार नाही.
(माझी पत्नी मध्यप्रदेशातील असून तिची मातृभाषा हिंदी आहे. मध्यप्रदेशातील सागर युनिव्हर्सिटीतून तिने तत्त्वज्ञान, राजनितीशास्त्र, हिंदी आणि संस्कृत या विषयात 1982 साली उच्च द्वितीय श्रेणीतून स्नातक पदवी उत्तीर्ण केली आहे. ती माझ्या संपूर्ण सेवाकाळात महाराष्ट्रातील भिन्न भिन्न स्थानी माझ्यासोबतच राहिली असून ती आता अस्खलित मराठीत सहज बोलू शकते. मी कित्येक आय.ए.एस.अधिकारी पाहिलेत की, जे महाष्ट्राबाहेरून आलेले असतात, त्यांच्या संपूर्ण सेवाकाळात सुद्धा त्यांना अस्खलित मराठी बोलता येत नाही. ळ चा उच्चार त्यांना जमतच नाही, बोलताना पुष्कळदा त्यांना लिंगभेदातील फरक उच्चारता येत नाही. अशा परिस्थितीत मला माझ्या पत्नीच्या मराठीचे कौतुक वाटते. ती माझ्या प्रत्येकच लिखाणाची पहिली वाचक/कठोर टीकाकार असते. माझे वरील लिखाण वाचून ती मला म्हणाली, "इसे कुछ नासमझ लोग विषवमन कहेंगे.......।" म्हणूनच मी वर म्हणालोय/म्हणतोय की, तो माझा प्रश्न नाहीये. एखाद्याला "तसे" वाटलेच तर तो त्याचा प्रश्न आहे/असेल! (1000)
□
@लखनसिंह कटरे, बोरकन्हार-441902,
जि.गोंदिया (विदर्भ-महाराष्ट्र) //03.10.2019//
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment