तथ्य आणि तर्क : एक आकलन (भाग-एक)

*तथ्य आणि तर्क : एक आकलन* (भाग-एक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
>> काही वैयक्तिक, काही पारिवारिक व काही सामाजिक अशा अपरिहार्य कारणांमुळे तीन वर्षांत पूर्ण करावयाची B.Sc.(PCM) ची पदवी प्राप्त करण्यासाठी मला पाच वर्षे खर्ची घालावी लागली होती. जून-1977 मध्ये मी ही पदवी प्राप्त करून M.Sc.(Physics) मध्ये प्रवेश घेण्यासाठी मी नागपूर येथील PGTD, INSTITUTE OF SCIENCE व HISLOP COLLEGE येथे अर्ज केला असता मला पदवी परिक्षेत Physics या विषयात मिळालेल्या गुणांची टक्केवारी 0.5% ने कमी पडल्याने मला M.Sc.(Phy) ला प्रवेश नाकारण्यात येऊन द्वितीय Preference वरील M.Sc.(Maths) साठी प्रवेश स्वीकारण्यात आला. (पदवी परिक्षेत वर नमूद केल्याप्रमाणे 0.5% गुण कमी पडण्यासाठी आमच्या B.Sc.च्या अंतिम वर्षाच्या फिजिक्सच्या तत्कालीन द्वेषभारित प्राध्यापकाची प्रात्यक्षिक परिक्षेतील स्वार्थजनित व पक्षपाती अवकृपा कारणीभूत ठरली होती. ती एक वेगळीच स्टोरी आहे. असो.) 

>> तथापि मला गणित विषयात पोस्ट ग्रॅज्युएट करण्याची बिलकुल इच्छा नसल्याने माझ्या वडीलांच्या इच्छेखातर मी एन.एम.डी.काॅलेज गोंदिया येथे LL.B. मध्ये प्रवेश घेतला. त्यावेळेस राव सर हे लाॅ विभागाचे प्रमुख होते व त्यांची कायदा हा विषय शिकवण्याची पद्धती अतिशय सुस्पष्ट व लाजवाब अशी होती. आमचे लाॅ चे वर्ग सायंकाळी 6:00 ते रात्री 9:30 पर्यंत चालायचे. बहुतेक विद्यार्थी(?) नोकरीपेशाचे असल्याने ते नियमित वर्ग अटेंड करीत नसल्याचा पूर्वेतिहास लक्षात घेऊन पहिल्याच दिवशी राव सर जे म्हणाले होते, त्याचा सार असा की, तुम्हाला फक्त कायद्याची पदवी घेणे एवढेच महत्त्वाचे वाटत असेल तर तुम्ही वर्ग अटेंड न करताही फक्त पुस्तके वाचूनही उत्तीर्ण होऊ शकाल, कायद्यात काय म्हटले आहे, ते तुम्ही जाणू शकाल. परंतु कायद्यात काय म्हटलेले नाही, कायद्यातील तरतुदींचा Between the lines अर्थ काय असतो, हे मात्र तुम्हाला वर्ग अटेंड केल्याशिवाय समजणे फारच जड व कठीण ठरेल. आणि सफल वकालत करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला कायद्यातील तरतुदीत काय नमूद नाही, त्यातील Between the lines चा अर्थ काय आहे, हे समजून घेणे फक्त आवश्यकच नव्हे तर अनिवार्य सुद्धा असते. त्याला त्यांनी substance and logic/तथ्य आणि तर्क असे नामाभिधान केले होते. त्यामुळेच मी LL.B.च्या तिन्ही वर्षांत जवळपास सर्व वर्ग अटेंड केले होते. पर्यायस्वरूप मला LL.B. (1981) च्या पदवीत नागपूर विद्यापीठातून तृतीय मेरीट (Third Merit) प्राप्त करणे शक्य झाले. आणि पर्यायस्वरूप LL.M. साठी मला U.G.C. ची स्कॉलरशिप सुद्धा ऑफर करण्यात आली होती. परंतु मला त्यावेळेस B.Ed. करणे अत्यावश्यक असल्याने मला ती ऑफर नाकारावी लागली.  

>> दरम्यान ऑक्टोबर 1978 ते एप्रिल 1984 या कालावधीत मी तत्कालीन जिल्हा परिषद भंडाराच्या शिक्षण विभागांतर्गत गणित-विज्ञान शिक्षक म्हणून (प्रारंभी अंशकालीन व 1983 पासून पूर्णकालीन) कार्यरत असताना मी विविध प्रतियोगिता परीक्षांसोबतच UPSC व MPSC च्या परीक्षा सुद्धा देत होतो. प्रथम प्रयत्नातच B.D.O. म्हणूनची ऑफर मला पसंत न पडल्याने मी नाकारली. दुसऱ्या प्रयत्नात महाराष्ट्र शासनाच्या तत्कालीन RURAL WEIGHTAGE संदर्भातील न्यायालयीन निवाड्याच्या गडबड-गोंधळात MPSC द्वारे करण्यात आलेल्या धडधडीत अन्यायाचा बळी ठरलो. तिसऱ्या प्रयत्नात MPSC चे तत्कालीन सन्माननीय सदस्य बॅरिस्टर पी.जी.पाटील यांच्या स्वच्छ व पारदर्शक निवडीनुसार माझी तत्कालीन D.T.O. (District Transport Officer) म्हणून निवड करण्यात आली. तथापि ह्या पदाच्या अंतिम निवडीला न्यायालयाचा स्थगनादेश असल्याने मला न्यायालयाच्या अंतिम निर्णयापर्यंत पदस्थापनेसाठी थांबण्याबाबत किंवा दुसऱ्या प्रेफरन्स नुसारचे पद स्वीकारण्याबाबत MPSC कडून चाॅईसची विचारणा करण्यात आली. 

>> मी तेव्हा देवरी (तत्कालीन जि.भंडारा) येथील जिल्हा परिषद ज्युनिअर काॅलेज व हायस्कूल येथे गणित-विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत होतो. देवरी येथेच एक RTO CheckPost होते, (अजूनही आहे.) तेथील Vehicle Inspectors यांना विचारणा केली असता त्यांनी न्यायालयाच्या अंतिम निर्णयापर्यंत न थांबण्याचा सल्ला दिला, कारण त्या प्रकरणी Vehicle Inspectors च्या पदोन्नतीच्या अनुषंगाने D.T.O.च्या Direct Recruitment ला नकार मिळण्याचीच सर्वाधिक शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. मी यापूर्वीच्या Rural Weightage च्या न्यायालयीन निर्णयाने पोळला असल्याने मी त्यांचा सल्ला मानून दुसऱ्या प्रेफरन्सच्या Probationary Assistant Registrar, Co-operative Societies या पदासाठी चाॅईस कळवून बसलो. व अशाप्रकारे सर्व विहित चाचण्या पार करून मे-1984 मध्ये शिक्षकी पेशा सोडून महाराष्ट्र शासनाच्या तत्कालीन कृषी व सहकार (वर्तमान सहकार, पणन व वस्त्रोद्योग) विभागात परीविक्षाधीन सहायक निबंधक, सहकारी संस्था या तत्कालीन तहसीलदार-समकक्ष अशा वर्ग-2 च्या पदावर रूजू झालो. 

>> माझ्या या प्रवासात लाॅ काॅलेज च्या राव सरांच्या त्या तथ्य आणि तर्क (Substance & Logic) या विचारपद्धतीचे मला चांगले/यथायोग्य उपयोजन करता आले, असे आज मागे वळून पाहता/विहंगावलोकन केले असता वाटून जाते. 
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया.
(13.08.2022)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन