पाटोदा, जि.बीड : काही मधुरतम स्मरणचित्रे

◇पाटोदा, जि.बीड : काही मधुरतम स्मरणचित्रे◇
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
        08 मे 1986!!! माझा परिविक्षा कालावधी संपल्यानंतर मला तालुका सहाय्यक निबंधक (सहकार,पणन,...) म्हणून पाटोदा (जि.बीड) येथे पोस्टींग मिळाल्याने तेथे रूजू झालो. जवळच्या केजला अशोक भांडवलकर व थोड्याशा दूर असलेल्या गेवराई ला शेषराव चव्हाण असे दोन मित्र मिळाले. आंबेजोगाईला राठोड साहेब उप निबंधक होते, ते ही मित्र झाले. श्रीकांत जेधे सर हे इंग्रजीचे विद्वान, आमचे DDR-कम-पालक होते. 
        पाटोद्याला तेव्हा पाण्याची भयंकर टंचाई, पण संध्याकाळचा वारा मात्र अतिशय सुखद. ऑफीस जवळच किराणा दुकान होते, दुकानदार किसनराव राख सुद्धा सुंदर-मित्र म्हणून गवसले(?). किसनरावांचा त्यावेळी दीडेक वर्षाचा असलेला चिमुकला माझा सखाच झाला होता. ऑफिस इमारतीचे घरमालक गोरे गुरूजी व त्यांची आई माझ्यावर बंधू/पूत्रवत प्रेम करायचे. रेवलकर, झांजे, अण्णा, महाजन, मेहबूब, आणखी एक जीवाभावाचा मुस्लिम कर्मचारी (ज्याचे नाव मला आज आठवत नाही, साॅरी) असे जीव लावणारे कर्मचारी आणि बनीमिया, दगडूमिया, राजू क्षीरसागर सारखे सेवाभावी शिपाई यांच्यासोबत कामकाज आणि "दिवस" मजेत सुरू झाले. पादोद्याचे नवीन बस स्टॅन्ड बांधून तयार असले तरी तोपर्यंत "कार्यरत" झाले नव्हते. ते ठिकाण माझ्या संध्याकाळच्या भ्रमणाचे व मन रमवण्याचे स्थानच झाले होते. या सायंभ्रमणाचे वेळी (सोबत) रेवलकर व अण्णा यांची नियमित साथसंगत असायची! 
      अशातच एके दिवशी खरेदी विक्री संघाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी तेथे गेलो व खुर्चीवर बसता बसताच मला साईटिका चा जोरदार अटॅक आला. मला उभेही राहता येईना, हलता-डुलताही येईना. अचानकपणे मी जणूकाही विकलांगच झालो होतो. थोडीही हलचल केली तरी भयंकर कळ यायची. कसातरी ऑफीसला पोचलो. (पोचवण्यात आलो). निवासस्थानी पोचलो. पण माझी हलचल पूर्णतः बंद झाली होती. (त्यावेळी केवळ सहा महिन्याचाच असलेल्या माझ्या मुलाची एक मोठी शस्त्रक्रिया (कानाखाली 30 टाके लावावे लागले होते) झाल्याने व दर महिन्याला त्याला फाॅलोअप साठी मेडिकल कॉलेज, हाॅस्पिटल, नागपूर येथे न्यावे लागत असल्याने मला पाटोद्याला फॅमिली हलवता आली नव्हती. मी तेथे एकटाच गेलो होतो.) अशा परिस्थितीत माझ्या संपूर्ण "कार्यकलापाची" (आंघोळ घालणे, कपडेलत्ते बदलणे, खानपान, प्रातर्विधी, इ. सर्वांची) जबाबदारी राजूने स्वतःवर आपसुकच घेतली. बनीमिया आणि दगडूमिया यांच्या सोबतीने राजूने मला अक्षरशः सांभाळून घेतले. कर्मचा-यांनीही, विशेषतः रेवलकरने तर मला पुर्ण भावनिक साथ दिली. कितीही पाॅवरफूल(?) पेनकिलर घेतले तरी "दुखण्याचा" अंत होत नव्हता. डाॅ.घुले पुर्ण आपुलकीने उपचार करीत होते. मला सायटिका वरील होम्योपॅथीच्या औषधीबद्दल माहिती होती, पण पाटोद्याला तेव्हा होम्योपॅथीचे औषध उपलब्ध होत नसल्याने बीडवरून ते औषध मागविले. 10-12 दिवसात मी हिंडण्याफिरण्या लायक होऊ(?) शकलो. 
        आज कदाचित बनीमिया, दगडूमिया, अण्णा, तो अनाम(?) मुस्लिम कर्मचारी नसतीलही. रेवलकर व झांजे आजही संपर्कात आहेत. राजू ने 6-7 वर्षापूर्वी फोन केला होता. आजकाल तो बीडलाच असावा, महाजन कदाचित पुण्याला राहत असावेत. मी या सर्वांना सांगू इच्छितो की, मी त्यांना फोनवर का असेना भेटू इच्छितो. त्यांनी ही पोस्ट पाहिली/वाचली तर 8766549828 या नंबर वर माझ्यासोबत अवश्य बोलावे. पाहू या फेसबुक काही कमाल(?) करते काय ते? जय हो फेसबुक!!!
@लखनसिंह कटरे, 
(निवृत्त DDR,) 
बोरकन्हार-441902, 
जि.गोंदिया (विदर्भ-महाराष्ट्र)
~~~~~(05.08.2017/2018/2019)~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन