जैन परंपरा आणि मी : एक मंथन
*जैन परंपरा आणि मी : एक मंथन*
~~~~~~~~~~~~~~~~~~
>> जैन परंपरा, विचार, धर्म याबाबत माझ्या मनात माझ्या कुमार वयापासूनच एक अजीब असे गूढ आकर्षण-वजा-कुतुहल होते/आहे. त्यातच मला वाचनाचा भयंकर(?) नाद (जणू वेडच) असल्याने जैन परंपरेबद्दल काहीही वाचायला मिळाले तर ती माझी मेजवानीच असे. माझ्या याच वेडा(?)पायी मी "तीर्थंकर" (इंदोर, संपादक-नेमीचंद जैन) आणि "युवादृष्टि" (लाडनूं, राजस्थान येथील आचार्य तुलसी यांच्या मार्गदर्शनाखाली संचालित अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषद चे मुखपत्र : संपादकद्वय : कमलेश चतुर्वेदी व विजयसिंह कोठारी) या दोन हिंदी मासिक पत्रिकांचा नियमित वर्गणीदार-वाचक झालो. सोबतच "JAIN JOURNAL" या कलकत्ता(कोलकाता)हून प्रकाशित होणाऱ्या इंग्रजी त्रैमासिकाचाही नियमित वर्गणीदार-वाचक झालो. (त्यावेळेस माझे वय जेमतेम 21-22 वर्षाचे होते. या तिन्ही नियतकालिकांचे बांधीव खंड मी अजूनही जपून ठेवले असून अधूनमधून त्यांच्यावरील धूळही झटकत असतो.) याशिवाय सुद्धा इतर काही जैन नियतकालिके, पुस्तके, ग्रंथ यांचेही सामयिक वाचन केले. मी रामटेकला असताना तेथील वर्षावासातील जैन मुनींचे प्रवचन ऐकण्याचाही मला योग आलेला होता. तेथून सुद्धा मी काही ग्रंथ विकत घेऊन त्यांचे यथाशक्ती वाचन करू शकलो.
>> त्यामुळे मला जैन परंपरेतील स्यादवाद आणि अनेकांतवाद या दोन महत्त्वाच्या संकल्पनांची तोंडओळख झाली/होऊ शकली. माझी जी भूमिका आहे, ज्या भूमिकेला मी अनुसरून आहे, त्या माझ्या भूमिकेत काही चूक असू शकते आणि दुसऱ्या व्यक्तीच्या प्रतिपादनात/भूमिकेत मात्र सत्य असू शकते. ही संकल्पना म्हणजे थोडक्यात स्यादवाद. आणि एखाद्या गोष्टीचे/प्रश्नाचे/बाबीचे/समस्येचे उत्तर अनेकांगी असू शकते/असते; त्याचे एकच एक उत्तर आहे असे मानणे म्हणजे माझा दुराग्रह झाला. ही संकल्पना म्हणजे थोडक्यात अनेकांतवाद. या दोन्ही जैन संकल्पनांचा व एकूणच जैन तत्त्वज्ञानाचा माझ्या विचारांवर प्रभाव पडला असावा, असे मला आजही जाणवते. म्हणूनच माझ्या वाट्याला अप्रियता/कठोरतम टीकास्त्र आणि कौतुक या दोन्ही अवस्था सतत/आलटूनपालटून येत असतात. तरी DISSENT : THE VOICE OF PROGRESS हे माझे ब्रीदवाक्य असल्याने/त्यामुळेच मी विचलित होत नाही, हे माझे भाग्य(?)च म्हणावे लागेल.
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया.
(09.07.2021)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment