...तो एक मुर्ख : दासबोध/रामदास स्वामी // ...मी एक मुर्ख : आत्मबोध/लखनसिंह कटरे.
*...तो एक मुर्ख : दासबोध/रामदास स्वामी*
*...मी एक मुर्ख : आत्मबोध/लखनसिंह कटरे*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
>> 03/2003 ते 05/2006 पर्यंत मी चंद्रपूर येथे डीडीआर म्हणून कार्यरत होतो. (याच कालावधीत 07/2004 ते 05/2006 पर्यंत माझ्याकडे गडचिरोली येथील डीडीआर पदाचा अतिरिक्त प्रभार सुद्धा सोपविण्यात आलेला होता.) चंद्रपूर येथील कार्यकाळादरम्यान परिस्थितीनुरूप जिल्ह्यातील सर्व (15 ही) कृउबास बरखास्त करून मी तिथे त्या त्या तालुक्यातील सहायक निबंधक/सहकार अधिकारी श्रेणी-1 यांना प्रशासक नेमले होते. आणि सुमारे 40-50% अधिकारी/कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असली तरी, पणन मंडळाची शेतमाल तारण योजना मोठ्या प्रमाणावर राबवून 2004-05-06 या दोन हंगामात धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हंगाम सुमारे रु.2.00-2.50 कोटी चा अतिरिक्त लाभ मिळवून देण्यात सर्व/उपलब्ध कार्यालयीन व फील्डवरील अधीनस्थांसोबत सफल होऊ शकलो होतो. ही सक्सेस स्टोरी अभ्यासण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील एक डीडीआर व काही कृउबासचे पदाधिकारी/अधिकारी सुद्धा चंद्रपूरला येऊन गेले होते. याच कालावधीत केंद्र शासन पुरस्कृत व नाबार्ड द्वारा राबविण्यात आलेल्या ग्रामीण गोदाम योजनेंतर्गत सुमारे 200-250 गोदाम बांधण्यात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष ॲड.बाबासाहेब वासाडे यांना सोबत घेऊन सफल होऊ शकलो होतो. (याची नोंद केंद्र सरकारच्या स्तरावरून घेण्यात आल्याची माहिती मला चंद्रपूरचे तत्कालीन खासदार श्री.नरेश पुगलिया यांनी दिली होती.)
>> कदाचित माझ्या चंद्रपूर येथील या/वर नमूद अल्पस्वल्प कामाची माहिती तत्कालीन मुख्यमंत्री श्री.विलासराव देशमुख यांच्या कानावर गेली असावी. आणि त्याचे फलस्वरूप(?) माझे स्थानांतर शेतकरी आत्महत्येसाठी जगभर कुप्रसिद्ध झालेल्या यवतमाळ येथे डीडीआर म्हणून करण्यात आले. मी 15 मे 2006 ला यवतमाळ येथे डीडीआर म्हणून रुजू झालो असलो तरी डीडीआर कार्यालयात बसण्या(?)साठी मला चार-पाच दिवस लागले. कारण या सर्व दिवसात मला, शेतकरी-आत्महत्याविषयक विविध उपाययोजनांबाबत, विविध ठिकाणी सभांना उपस्थित रहावे लागले होते. मी मे-2008 पर्यंत यवतमाळ येथे डीडीआर असताना, माझ्या दोन वर्षांच्या कार्यकाळात मा.राष्ट्रपती, मा.प्रधान मंत्री, मा.राज्यपाल, मा.मुख्यमंत्री, मा.मंत्रीमहोदय, मा.सहकार सचिव/सहकार आयुक्त, वगैरेंच्या स्थानिक व इतरत्र झालेल्या सुमारे 500-600 भेटी व सभांमध्ये उपस्थित राहून मला शेतकरी आत्महत्येसंदर्भातील सहकार विभागाद्वारे केलेल्या/करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत आढावा सादर करावा लागत असे. (या सर्व कामात यवतमाळचे तत्कालीन जिल्हाधिकारी डाॅ.हर्षदीप कांबळे यांचे सहकार्यात्मक मार्गदर्शन मी कधी विसरू शकणार नाही.) अशा सभांच्या अतिरेकामुळे इतर सहकारविषयक विकास कामांना पुरेसा वेळ देताना माझी तारांबळही उडत असे.
>> अशातच आठ वर्षांपासून बंद पडलेल्या जयकिसान सहकारी साखर कारखाना, बोदेगावचा मला एकल अवसायक नेमण्यात येऊन तो बंद कारखाना पूर्ववत सुरू करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा समूहासोबत सामंजस्य करार करून हा बंद पडलेला साखर कारखाना पूर्ववत सुरू करण्यात मला यशही आले आणि पहिल्याच हंगामात रेकाॅर्ड क्रशिंगचा अनुभव सुद्धा घेता आला. (मी यवतमाळ येथून बदलून जाताच दुसऱ्याच वर्षी हा साखर कारखाना पुन्हा बंद पडला तो आजतागायत बंदच असून भंगार होत चाललाय असे ऐकिवात आहे.)
>> अशातच एका मंत्रीमहोदयांच्या कायदाबाह्य कामाला मी नकार दिल्याने मला त्यांची जबरदस्त नाराजी ओढवून घ्यावी लागली. पर्यायस्वरूप मी अर्ज करून माझे स्थानांतर गडचिरोली या वनबहुल, आदिवासीबहुल व नक्षलप्रभावित जिल्ह्यात डीडीआर म्हणून करण्यास विनंती केली. गडचिरोलीला जाण्यास सहसा कोणीच तयार होत नसल्याने माझी विनंती मान्य होऊन माझे स्थानांतर गडचिरोली येथे करण्यात आले. त्यानुसार मी 02 जून 2008 ला, यवतमाळ येथील दोन वर्षांचा अल्पसा कार्यकाळ गुंडाळून(?), गडचिरोली येथे डीडीआर म्हणून रुजू झालो.
>> गडचिरोली येथील माझा कालावधी विविध जीवघेण्या अपघातांद्वारे बाधित झाला असला तरी त्याच कालावधीत दि.22.11.2008 ला मला तत्कालीन सहकार आयुक्त डाॅ.कृष्णा लव्हेकर यांच्या स्वाक्षरीचे त्यांचे दि.05.11.2008 चे अ.शा.पत्र मिळाले. त्यानुसार माझ्या यवतमाळ येथील डीडीआर पदाच्या कालावधीतील, 2006-2007 या कालावधीतील, माझ्या कामकाजाचा 'अत्युत्कृष्ट' असा सन्मान करण्यात आला व मी माझ्या यवतमाळ येथील कामाच्या समाधानाने काहीसा तृप्त होऊ शकलो.
>> अशी ही माझी "...मी एक मुर्ख" ची आत्मबोध कथा आज सांगण्याची दुर्बुद्धी झाली. असो. आणि क्षमस्व.
@ॲड.लखनसिंह कटरे,
(निवृत्त डीडीआर)//16 जुलै 2022//
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment