मी आणि माझी मराठी

*मी आणि माझी मराठी*
~~~~~~~~~~~~~
>> मार्च-एप्रिल 1972 च्या तत्कालीन अकरावी हायर मॅट्रीक परीक्षेचा निकाल जून-1972 मध्ये लागला. तेव्हा तरुण भारत मध्ये आमच्या नावासहित (उदा. ल.मो.कटरे) निकाल छापून आला होता, हे आज खरेही वाटणार नाही. मी वर्गात पहिला येऊन उच्च प्रथम श्रेणीत (मराठी-संस्कृत मध्ये प्रावीण्यासह) उत्तीर्ण झालो. आणि पुढच्या शिक्षणासाठी गोंदिया येथील धोटे बंधू सायंस काॅलेज मध्ये बी.एससी.(पीसीएम) च्या प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला. गोंदिया येथील टी.बी.टोलीच्या तळवेकर या एका सहृदय अशा टपरी हाॅटेल चालकाच्या घरी भाड्याने रूम(?) घेतली. मी आणि माझा भाचा हेमंतकुमार असे दोघेही आम्ही एकत्रच राहायचो. आमच्या सेवे(?)करिता माझ्या वडिलांनी नोकराची सोय(?) उपलब्ध करून दिली होती. सुरुवातीला लोंढू आणि नंतर बकाराम हा आमच्या सेवेत(?) होता.

>> मॅट्रीक पर्यंत मी आपल्या सवंगड्यांसोबत, वर्गमित्रांसोबत कोणत्या भाषेत बोलायचो हे नीटसे आठवत नसले तरी पहिलीपासूनचा वर्गमित्र बिरेन्द्रसोबत मी हिंदीतच बोलत असल्याने त्यावेळेस माझी बोलचालीची सर्वसाधारण भाषा हिंदीच राहिली असावी असे वाटते. मराठी माध्यमातून (नववीपासून सेमी इंग्रजी/न्यू मॅथ्स) शिक्षण घेऊनही मी मराठी ऐवजी हिंदीत का बोलायचो, याची कारणमीमांसा मला अजूनही कळलेली/उमगलेली नाही. 

>> परंतु काॅलेज मध्ये मात्र मी कधीही मराठीत बोलायचो नाही, हे पक्के आठवते. बी.एससी. प्रथम वर्षात ऐच्छिक भाषा म्हणून मराठी भाषा निवडली असली तरी माझी नियमित बोलचालीची भाषा मात्र हिंदीच होती, हे चांगले आठवते. माझ्यासोबत कोणी मराठीत बोलला तरी मी मात्र हिंदीतच बोलायचो. 

>> या दरम्यान मी मराठी व हिंदीतही काहीबाही लिहायचो. पण माझ्या मराठी लेखनाला सदैव "साभार परत"चीच साथ लाभत होती. आणि त्याचवेळी दिल्ली, पटना, वाराणशी, कलकत्ता(कोलकाता), इन्दौर, लाडनूँ(राजस्थान) सारख्या ठिकाणाहून प्रकाशित होणा-या हिंदी नियतकालिकांतून माझे हिंदी लिखाण मात्र आवर्जून प्रकाशित केले जाई. 

>> याच दरम्यान कधीही, कोणतीही नोकरी न करण्याच्या माझ्या अपरिपक्व(?) निर्णयाला तिलांजली देऊन व श्री.जी.डी.ठाकूर (प्राचार्य, शहीद जान्या-तिम्या जि.प. ज्युनियर काॅलेज, गोरेगांव, तत्कालीन जि.भंडारा) यांच्या आवाहनात्मक विनंतीला मान देऊन मी गणित-विज्ञान शिक्षक म्हणून दि.04.10.1978 ला गोरेगांव च्या त्या शाळा-वजा-ज्युनियर काॅलेज मध्ये रुजू झालो. 

आणि........

मग मला मराठी ने पुन्हा "आपलेसे" केले. तेव्हापासून मी मराठी ला शरण जाऊन हळूहळू हिंदीच्या प्रभावातून (ज्या हिंदीने मला आसरा दिला होता!) बाहेर पडू लागलो. 

>> सुमारे 1968-69 पासून मी ललित मासिकाचा नियमित वर्गणीदार-वाचक असून ललित मासिकातूनच आनंद यादवांच्या गोतावळा ची ओळख झाली आणि मी आमच्या भागातील ग्रामीण बोली कडे व ग्रामीण जीवनाकडे सुद्धा आदरमिश्रित आश्चर्याने पाहू लागलो, माझ्या लिखाणात आवर्जून आमच्या भागातील या ग्रामीण बोलीतील शब्दांचा वापर (पेरणी) करू लागलो / ग्रामीण जीवनानुभांचा उल्लेख करू लागलो. अशातच ललित मासिकात चकवा या झाडीबोलीत सर्वपरिचित असलेल्या शब्दाबद्दल काही 'गंभीर आणि गंमतीदार' चर्चा झाली असता मी त्यावर एक टिपण लिहून ललित कडे पाठविले. आणि महदाश्चर्य म्हणजे माझे ते टिपण ललित च्या 'गंभीर आणि गंमतीदार' मध्ये छापूनही आले. 

>> 1990 मध्ये मी साकोली, जि.भंडारा येथे तालुका सहकार निबंधक म्हणून बदलून गेलो व एका कार्यक्रमाच्या निमित्ताने हरिश्चंद्र बोरकर यांची भेट झाली. या हरिश्चंद्र बोरकर यांनी आमच्या भागातील ग्रामीण बोलीचे "झाडीबोली" असे अगदी समर्पक नामकरण केल्याचे कळले व मी सुद्धा झाडीबोली साहित्य चळवळीतील एक सक्रीय घटकच झालो.

>> मराठी ही मुमूर्षू भाषा असल्याचे विसाव्या शतकाच्या प्रारंभापासून बोलले जाते व सध्या सुद्धा लवकरच मृत होणा-या भाषांच्या यादीत मराठीचा समावेश होऊ शकतो, असे बोलले जाऊ लागले(होते). तेव्हा मराठी कधीच मृत होणार नाही, झाडीबोली सारख्या प्राचीनतम बोली मराठीला अमृतसिंचन करून आणखी टवटवीत व समृद्ध करतील, हे साधार पटवून देण्यासाठी मी डाॅ.हरिश्चंद्र बोरकर यांच्या सोबत झाडीबोली साहित्य चळवळीशी स्वतःला जोडून घेतले आहे. 

>> अशी ही माझी मराठीकरणाची/मराठीकडे पुनर्वळणाची अति संक्षिप्त कथा आहे. 
¤
@ॲड.लखनसिंह कटरे 
बोरकन्हार, जि.गोंदिया 
(08.04.2020//हनुमान जयंती)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन