मला पडलेला एक "गहनतम"(?) प्रश्न...(???)

मला पडलेला एक "गहनतम"(?) प्रश्न...(???)
************************************
      नंदा खरे यांनी त्यांच्या लेखनात वापरलेले मार्सेल नावाच्या शेतक-याचे उद्गार... 'माझे मुलगे शेतावर काम करू इच्छित नाहीत. त्यांना कामांचे ठराविक तास, शनिवार-रविवार आणि इतर सुट्या असं हवं असतं. त्यांना खिशात पैसे हवे असतात खर्चायला. ते पैसे कमवायला गेले आहेत आणि पैशांबाबत पागल आहेत. मला वाटतं की ते चुकताहेत. दिवसभर काही तरी विकत राहणं, आठवड्याला 45 तास कारखान्यात काम करणं, हे माणसाचं आयुष्य नाही. त्याने माणसे अडाणी होतात. ते पुन्हा शेतावर येणार नाहीत. शेत अखेर निकोलला (त्याची पत्नी) आणि मलाच करायचे आहे. जे मरू घातले आहे त्यावर एवढे काम का करायचे? तर माझे उत्तर आहे : काम करणे म्हणजे ज्ञान टिकवून ठेवणे आहे. माझी मुलं हे गमावताहेत. मी खड्डे खोदतो, योग्य ऋतूत रोपे लावतो, हे माझ्या मुलांसाठी उदाहरण आहे, जर त्यांना ते पाहायचे असेल तर. नाही तर ते माझ्या वडलांना, त्यांच्या वडलांना सांगणे आहे की त्यांनी मला दिलेले ज्ञान मी टाकून दिले नाही आहे. त्या ज्ञानाशिवाय मी काहीच नाही.' 
    "शेतक-याचे शेतीपासून उखडले जाणे हे आपल्याला भयावह परिस्थितीकडे घेऊन जाईल हे समजून घेण्यासाठी'' मुंबईहून प्रकाशित होणा-या एका, साम्यवादी की काय(?) अशा, मराठी मासिकाच्या सुप्रसिद्ध संपादकांनी त्यांच्या मे 2017 च्या अंकातील 'संपादकीया'त वरील अवतरण उद्घृत केले असून 'त्या' मताशी/विचाराशी त्यांनी आपली सहमती दर्शविली आहे.
      त्याच संपादक महोदयांनी माझी खालील कविता प्रकाशनयोग्य नाही, भावली नाही म्हणून त्यांच्या मासिकातून प्रकाशनाला स्पष्ट नकार कळविलेला आहे.
ती कविता अशी:-
   □ पितर...
       *******
वाजवीच्या पलीकडे
म्हणे अवाजवी असते.
तेथे कबूतर येतात
दाणे वेचण्यासाठी...
परंतु
सर्व भूमीपूत्रांचे
पितृदोष 'नष्ट' झाल्याने
दाणे टाकणारे कोणीच उरले नसते, 
कबूतरांना दाणे मिळत नाहीत,
काहीकाळ घुटमळतात कबूतर तिथे
मग हळूच
उडून जातात...
"निराश न होता!"
आणि हळूहळू पितृपक्षातही
पितर घरी येण्याचे
म्हणे टाळू लागतात.
वाजवीच्या पलीकडे
म्हणे अवाजवी असते.
तेथे वंशज "कागूर" टाकतात
म्हणून कावळे यायचे 
परंतु आता
अंगण नावाची "वस्तू"
गहाळ झाल्याने
कावळ्यांना उतरण्यासाठी जागाच नसते
कावळे तरी उडत-उडतच कावकाव करतात,
आणि
पितरही फितूर वंशजांना
म्हणे आता जुमानत नाही.
वाजवीच्या पलीकडे
म्हणे अवाजवी असते.
तेथील देवघरात
पितर डोकावून जायचे
राबलेल्या भूमीला
"डोळाभरून पाहायचे."
परंतु आता
भूमीपूत्र परागंदा झाल्याने
पितरही शहाणे झाले म्हणे.
तसे वंशजही 'अतिशहाणे' झालेत,
त्यांनी देवघरच 'वितळवले'
आणि
पितर<><>वंशज असे काही
म्हणे आता उरले नाही......!!!
(□लखनसिंह कटरे)
     ही कविता नंदा खरेजी यांच्या किंवा त्यांनी उद्धृत केलेल्या शेतक-याच्या विचाराने प्रेरित नसली तरी "ते अवतरण" आणि "ही कविता" यात काही आंतरसहधर्मिता (संस्कृतीतील फरक लक्षात घेऊनही) असावी(?) असे मला सकृतदर्शनी वाटते. तरी वरीलप्रमाणे "अवतरण" आवडलेल्या संपादकांनी "ही कविता" नाकारण्यामागचे "खरेखुरे" कारण(?) काय असावे, हा मला पडलेला "गहनतम"(!) प्रश्न आहे. 
(कदाचित लोकलाजेस्तव एखाद्या प्रसिद्ध लेखकाच्या शेतकरी विषयक लिखाणावर सकारात्मक(?) प्रतिक्रिया देऊन शेतक-यांप्रति बेगडी प्रेम(?) दाखवण्याचा तर हा प्रकार नसावा ना? अशी भलतीच (कु)शंका येते.)
    पूर्वग्रहमुक्त व निष्पक्ष विचारश्रृंखलेच्या प्रकाशात कोणी जाणकार यावर मार्गदर्शन करतील तर मी त्यांचा आभारी राहीन.
□ॲड.लखनसिंह कटरे, 
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया.
~~~~~~~~(06.06.2017)~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन