मराठी साहित्य/विचारविश्वातील नकारात्मकता : एक कटू निरीक्षण
*मराठी साहित्य/विचारविश्वातील नकारात्मकता : एक कटू निरीक्षण* ----> @ॲड.लखनसिंह कटरे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
>> नकारात्मक* बाबी, नकारात्मक वस्तुस्थिती, साऱ्याच नकारात्मक गोष्टींचे (वांझ?) उदात्तीकरण करणे म्हणजेच आजचे उत्कृष्ट ते उत्कृष्टतम मराठी साहित्य (कविता, कथा, लेख, नाटक, कादंबरी) होय, असेच विचार मांडणे म्हणजे उत्कृष्टतम वैचारिकता होय, असे सध्या मराठीतील साहित्य व वैचारिक क्षेत्रात मानले जात असल्याचे बहुतेक सर्वत्र आढळू लागले आहे. (सन्माननीय अपवाद अवश्य आहेत. पण त्यांचे प्रमाण किती, हा खतरनाक प्रश्न आहे.)
>> जीवनातील सकारात्मक* बाबींतून, सकारात्मक वस्तुस्थितीतूनही काही उत्कृष्ट साहित्य प्रसवले जाऊ शकते, उत्कृष्ट विचार मांडले जाऊ शकतात, ही गोष्ट सध्या मराठी साहित्य व वैचारिक क्षेत्रातून कालबाह्य ठरवली गेली आहे की काय, अशी साधार शंका यावी असे मराठीतील साहित्यिक/वैचारिक वातावरण(!) आढळून येऊ लागले आहे. आज एखादी व्यक्ती जेवढे जास्त नकारात्मक बाबींचे उदात्तीकरण करेल तेवढे त्याचे साहित्य व वैचारिक क्षेत्रातील उच्च(!) स्थान ठरविण्याची जणू अहमहमिकाच सुरू आहे की काय, अशी सध्याच्या मराठी साहित्य व वैचारिक क्षेत्रातील वस्तुस्थितीचे अवलोकन करता सहज दिसून येते. >> जी व्यक्ती एकरेषीय/एकायामी/एककेंद्री अशी प्राध्यापकीय(?) अनुभवां(?)ची महत्तम पुनरावृत्ती करू शकते/करते, नकारात्मकतेच्या प्रभावाने प्रभावित होऊन तसे पठडीबद्ध लिखाण करू शकते, तीच व्यक्ती आज श्रेष्ठतम साहित्यिक व श्रेष्ठतम विचारक या पदाला पात्र ठरवली जात असल्याचेही मराठीच्या साहित्य व वैचारिक क्षेत्रात बहुतांश प्रकरणी आढळून येत आहे.
>> आजचे बहुआयामी, बहुकेंद्री व व्यामिश्रतम वास्तव टिपणारे साहित्य व विचार (कविता, कथा, लेख, नाटक, कादंबरी, निबंध, संशोधन) जर सकारात्मक पध्दतीने लिहिले/रेखाटले/मांडले गेले असेल तर ते साहित्य व विचार सध्याच्या मराठी साहित्य व वैचारिक क्षेत्रात अग्राह्य व बेकार ठरविले जाण्याचीच अधिकतम शक्यता असते. याउलट यातही नकारात्मकतेची तीव्र फोडणी दिली गेली असेल तर मात्र ते साहित्य व विचार उत्कृष्टतम ठरविले जाण्याची अधिकतम शक्यता असते. वस्तुस्थिती/परिस्थिती जर कटूतम असेल तर त्या वस्तुस्थिती/परिस्थितीशी निपटण्यासाठी नकारात्मकतेची वांझ प्रतिक्रिया म्हणजे उत्कृष्ट साहित्य व उत्कृष्ट वैचारिकता अशीही आज मराठीतील बहुतेक साहित्य व वैचारिक क्षेत्राची समजूत होऊ लागल्याचे दिसून येत आहे.
>> ऋणात्मक जीवनानुभव प्रत्येकाच्याच जीवनात येतातच तसेच धनात्मक जीवनानुभवही येतात. पण अशा धनात्मक जीवनानुभवांचेही नकारात्मकेच्या तीव्र फोडणीसह प्रतिपादन/रेखाटन/लेखन/मंडण केले गेले असेल तरच ते उत्कृष्ट साहित्य/उत्कृष्ट विचार आणि तसे केले नसल्यास मात्र ते सरसकट निकृष्ट साहित्य/निकृष्ट विचार, अशी सध्याची मराठी साहित्य व वैचारिक क्षेत्रातील बहुतांश वस्तुस्थिती असल्याचे दिसून येते. एकरेषीय, एककेंद्री व जुन्या अनुभवांची पुनरावृत्ती असलेले, नकारात्मकतेने वेढलेले (मढवलेले?) साहित्य व विचारच प्रामुख्याने नावाजले जात असल्याचेही सध्या बहुतेक वेळा आढळून येत आहे. ही वस्तुस्थिती एकूणच मराठी साहित्य व वैचारिक क्षेत्रासाठी घातक ठरू लागली असल्याचे काहींचे निरीक्षणही आहे.
>>... आणि माझे हे निरीक्षण सुद्धा नकारात्मकच शिवाय कटू सुद्धा! अशी ही किमया आहे सध्या नकारात्मकतेची!
¤
(*जीवनात सगळेच पूर्ण काळे वा पूर्ण शुभ्र सुद्धा नसते. म्हणूनच मी काळेपणा व शुभ्रता यासाठी अनुक्रमे नकारात्मकता व सकारात्मकता असा सांकेतिक शब्दप्रयोग केला आहे. चूक-भूल देणे-घेणे!) (#385)
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया.
(07.03.2022)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(DISSENT : THE VOICE OF PROGRESS.)
==================================
Comments
Post a Comment