सामाजिक आदिमत्व : एक आकलन/टिपण

*सामाजिक आदिमत्व : एक आकलन/टिपण*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
>> पृथ्वीची उत्पत्ती 46 कोटी वर्षांपूर्वी झाली असे सांगितले जाते. त्यावेळेस पृथ्वीवर आकाश, वातावरण, जमीन असले काही फरक नव्हते. त्यावेळेस पृथ्वी म्हणजे एक धूसर आणि अती तप्त असा गोळा होता. जसजशी पृथ्वी थंड होऊ लागली, तसतसे तेथे वातावरणनिर्मिती होऊ लागली, असेही याविषयातील शास्त्रज्ञ आपले निष्कर्ष प्रतिपादित करतात. 

>> अशा या पृथ्वीवर मानवी जीवनाचा प्रारंभ साधारणतः साडेतीन कोटी वर्षांपूर्वी झाला असावा असाही अंदाज वर्तवला जातो. असा तो आदिम मानव ते आजचा मानव ह्या अतिशय कठीणतम प्रवासाची हकिकत आम्ही कमोबेस जाणून असलो तरी त्यातून आम्ही किती शिकलो, किती धडे घेतले, हा लाखमोलाचा प्रश्न आम्हाला अजूनही पूर्णत्वाने सोडवता आलेला नाही, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. या कठीणतम प्रवासातील मानवी मनाच्या प्रबोधनात्मक संवेगाची भूमिका आम्ही विसरत तर चाललो नाही ना, अशी शंका आजही पदोपदी उद्भवते. सामाजिक आदिमत्वाचे शरणार्थी अजूनही या मानवी मनाच्या प्रबोधनात्मक संवेगाला पेलू शकत नसल्याचे आढळून येते. अशा अशक्त व अनगढ समाजमन धारकांची संख्या कोणत्याही समाजात अल्प असली तरी अशा अल्पसंख्यक समाजमनाला प्रबोधित करणे आजच्या या व्हाॅट्सॲप व फेसबुकीय विद्यापीठातील भ्रामक व स्वयंघोषित स्नातक, स्नातकोत्तर व पीएच.डी. धारकांमुळे अतिशय कठीण होऊन बसले आहे. 

>> कालानुरूप कालसुसंगत मानस व सुविचार-संवर्धन होण्यासाठी प्रबोधनात्मक संवेगाला पेलू शकेल अशी मानसवृत्ती परमावश्यकरित्या अनिवार्य असते. परंतु समाजातील काही अल्पसंख्य घटक अल्पबुद्धि-आकलनाने ग्रस्त होऊन अशा प्रबोधनात्मक संवेगाला पेलण्यास स्वतः तर असमर्थ असतातच पण समाजातील अन्य अल्पशिक्षित व अल्पज्ञ घटकांना सुद्धा प्रबोधनापासून बहकवण्याचे अघोरी कृत्य सातत्याने करीत असतात. पृथ्वीच्या व मानवाच्याही उत्पत्तीनंतर पृथ्वीवर सातत्याने काही कायम असेल तर ती बदलाची प्रक्रियाच होय. अशा या शाश्वत व सम्यक बदलाच्या नैसर्गिक प्रक्रियेला ठिसूळ व भ्रामक कल्पनाविलासाद्वारे विरोध दर्शवून कोणत्यातरी भ्रामक/काल्पनिक अस्मितेचा बाऊ करण्यात अशा अल्पसंख्य समाज घटकाचा शिरजोर प्रयत्न असतो. अशा सामाजिक आदिमत्वाने भारित व कुप्रेरित असलेल्या घटकांपासून सुटकेचा मार्ग अशक्य/असंभव नसला तरी अतिशय खडतर असल्याचा सर्वच प्रबोधनकारांचा स्वानुभव आहे. 

>> अशाप्रकारे प्रबोधनात्मक संवेगाला पेलू शकण्याची जेवढी क्षमता महाराष्ट्रातील समाजमनाची आहे तेवढी क्षमता भारतातील, केरळ व बंगाल वगळता, अन्य राज्यांतील समाजमनात बहुतेक प्रसंगी/प्रकरणी क्वचितच/अभावानेच आढळून येत असल्याची कटू वस्तुस्थिती, समाजसेवकांना पदोपदी निदर्शनास येत असते. त्यामुळेच कदाचित महाराष्ट्रासह अन्य राज्यातही (प्रबोधनात्मक संवेगाला पेलू शकण्यात पुरेसा सक्षम नसलेल्या राज्यातही) एखादा समाज सामाजिक आदिमत्वालाच पकडून असेल तर अशा समाजाला प्रबोधनात्मक संवेग पेलण्याठी सजग व सक्षम बनवण्याची प्रक्रिया अतिशय खडतर असते, हे कटू असले तरी परमसत्य आहे. 

>> आपले सामाजिक आदिमत्व जपणे, त्याचे जतन करणे या बाबी आपल्या प्रारंभिक अस्तित्वाच्या अभ्यास आणि प्रवर्तनासाठी जरी अत्यावश्यक असल्या/मानल्या तरी त्याचा काल्पनिक व भ्रामक बाऊ करून त्यांतच समाजाला गुंतवून व गुंगवत ठेवून, सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, भौगोलिक, आर्थिक, (साहित्यिक सुद्धा), आदि बाबींतील प्रबोधनात्मक संवेगाला सपशेल नाकारणे, हे कोणत्याही समाजाच्या ऱ्हासाला व अधोगतीला कारणीभूत ठरणारी कूपमंडूक स्वरूपाची कृती ठरत असते, हा अटळ इतिहास आहे. त्यामुळे प्रत्येकच समाजाने अशा कट्टर, भ्रामक व काल्पनिक स्वरूपाच्या सामाजिक आदिमत्वाला अज्ञानवश शरणागत असलेल्या घटकांपासून व त्यांच्या मिथ्या तथा बहकाऊ वृत्ती/कृतींपासून सावध राहणे, आजच्या या सत्योत्तर* युगात, प्रत्येक सुजाण व सजग समाज घटकासाठी, परमावश्यक ठरत आहे. (शब्दसंख्या #415)
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार, जि.गोंदिया.
(19/03/2022)
(*सत्योत्तर = सत्यासोबत असत्याचे बेमालूम मिश्रण)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन