नावात काय आहे?

*नावात काय आहे?*
~~~~~~~~~~~~
>> माझ्या शालेय जीवनातील (1969-1972) एक आठवण अशी की, आपले नाव लिहिताना आडनाव/सरनेम लिहू नये, कारण त्यामुळे जात कळते, असे समजल्याने मी माझ्या शालेय जीवनापासूनच कधीकधी माझे नाव के.लखनसिंह असेच लिहित असे. ललित, गीतादर्शन, पुरुषार्थ, धर्मभास्कर, पंचधारा, प्रज्ञालोक, कविता-रती, अनुष्टुभ या मासिकांचा वर्गणीदार होताना सुरुवातीला मी के.लखनसिंह हेच नाव वापरत(?) असे.

>> सुमारे 35-40 वर्षांपूर्वी आपापले नाव कसे लिहावे, याबद्दल एक चळवळ(?) उभारण्यात आली होती. त्यानुसार प्रथम आईचे नाव, मध्यभागी वडिलांचे नाव व शेवटी आपले नाव लिहावे अशी ती टूम(?) होती. मी त्याबरहुकुम माझे नाव लिहायला सुरुवात सुद्धा केली होती. त्यानुसार माझे नाव के.एम.लखनसिंह/के.एम.लक्ष्मणाराव (के.एम.= कमलाबाई मोहनलाल) असे व्हायचे. हे नाव मी काही वर्षे वापरले(?) सुद्धा. (माझ्या कार्यालयीन चेम्बरवर बहुधा हेच नाव असायचे!)

>> याच धर्तीवर पण जरा वेगळे, म्हणजे प्रथम आपले नाव, मध्यभागी आईचे नाव व शेवटी वडिलांचे नाव, अशी सुद्धा पद्धत विकसित(!) झाली. त्यानुसार माझे दोन वरीष्ठ मित्रश्रेष्ठ त्यांची नावे अनुक्रमे रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ व संजय मंगला गोपाळ अशी आजही लिहितात. 

>> काॅलेजमध्ये असताना माझे दोन दाक्षिणात्य मित्र होते. एक होता/आहे, के.व्ही.आर.स्वामी (कुमार व्यंकट रमण स्वामी) आणि दुसरा बी.एस.व्ही.जी.शर्मा (बेदुला एसव्हीजी शर्मा/एसव्हीजी चा फूल फाॅर्म विसरलोय). त्यांच्याशी त्यांच्या नावासंबंधाने चर्चा झाल्यावर मी माझे नामकरण बी.के.लक्ष्मणाराव (बोरकन्हारकर कर्रीवारू लक्ष्मणाराव/कर्रीवारू हे दाक्षिणात्य सरनेम असल्याचे कळल्याने) असे केले होते.

>> शेवटी फेब्रुवारी 2020 मध्ये मला माझे नाव लखनसिंह याचा अजून एक अर्थ कळला. तो असा...
👇
□लखनसिंह या शब्दाला काही अर्थ आहे काय?□
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
>  "नावात काय आहे?" असा काहीसा प्रश्न उपस्थित करून नावाचे क्षणभंगुरत्व, क्षरत्व, बिन-महत्त्व विशद करणारे लेखन/विधान/वक्तव्य कोणीतरी(?) पाश्चात्य वगैरे लेखक/विचारक/चिंतकाने केले आहे, असे म्हणतात(!).

>  तरी प्रत्यक्षात मात्र प्रत्येकालाच आपले नाव अतिप्रिय असते आणि त्या नावाची प्रतिष्ठा(!) जपणे सुद्धा प्रत्येकाला आवडतेच आवडते. मी सुद्धा याला अपवाद नाहीच.

>  म्हणूनच मी माझ्या नावाचा, 'लखनसिंह' चा अर्थ काय, याचा खूप वर्षांपासून शोध(!) घेत होतो. पण मला आजवर तसा मनाला पटणारा, सुयोग्य अर्थच सापडत नव्हता. 

>  दि.23 फेब्रुवारी 2020 च्या "लोकसत्ता : लोकरंग" मधील "इतिहासाचे चष्मे" या श्री.हेमंत प्रकाश राजोपाध्ये यांच्या लेखमालेतील 'मिथकांमधलं सत्य' हा अत्यंत महत्त्वाचा व जणू "गागर में सागर"च असलेला लेख वाचताना त्यात पुढील माहिती आढळून आली. 
=> आकाश (द्यौ/द्यू) आणि पृथ्वी यांना माता-पित्यांची उपमा देऊन सृष्टीनिर्मितीविषयीच्या कल्पनांना मानवी स्तरावर आणून मिथकनिर्मिती केल्याचं दिसून येतं. द्यू-पिता म्हणजे आकाश. पृथ्वीच्या गर्भात तो आपले वीर्य पर्जन्याच्या रूपात ठेवतो. त्यातून सुफलन होऊन पृथ्वी सुजल-सुफल होऊन जीवसृष्टीचे मातृत्व मिरवत, ही सृष्टीरहस्याचा वेध घेणारी मनोहारी कल्पना ऋग्वेदात दिसते. सीता म्हणजे पांढुरकी जमीन- म्हणजे पृथ्वीचे प्रतीक. तिच्यात हल- नांगर फिरवून जलसिंचन करत बीजारोपण केल्यावर त्यातून मिळणारे पीक, त्यातून वाढणारे पशुधन इत्यादींना 'लक्ष्मन्' असा शब्द आहे. याची अधिष्ठात्री देवता ती लक्ष्मी. सूर्य या वैदिक देवतेचे एक स्वरुप आहे विष्णू. विश्- व्यापणे या धातूपासून बनलेला हा शब्द. सूर्य आपल्या तेजाने विश्व व्यापतो म्हणून तो विष्णू.  ......"<=

>  वरील विवेचनात येणारी 'लक्ष्मन्' या शब्दाची व्युत्पत्ती मी प्रथमच वाचली. आणि मला माझ्या नावाचा, लखनसिंह मधील 'लखन' चा अर्थ सापडल्याचा आनंदच झाला. 

>  मूळातील लक्ष्मन् हा शब्द कालांतराने लक्ष्मण असा होऊन त्याचा हिंदी अपभ्रंश लखन असा होऊन तो शब्द हिंदीत स्थिर झाला असावा, असा माझा कयास/निष्कर्ष आहे.

>  माझे प्रचलित नाव लखनसिंह असले तरी ते माझे जन्मनाव नसून माझे हे नाव त्याकाळी उत्तर प्रदेशातून इकडे महाराष्ट्रात येणा-या पंडे-बाबा लोकांनी ठेवले आहे. म्हणजेच माझ्या नावात "हिंदीयत" असणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. 

> तसेच दुर्गा भागवत यांच्याद्वारे मराठीत अनुवादित "सिद्धार्थ जातक" च्या पहिल्या खंडातील "सील वग्ग" अंतर्गत 11वी जातककथा ''लक्खण जातक" वाचताना असे आढळून आले की, --- "...पूर्वी मगध राष्ट्रात मगध राजा राज्य करीत असताना बोधिसत्त्व हरीणरूपाने जन्माला आला. पुढे तो शहाणा झाल्यावर अरण्यात हजार मृगांच्या परिवारासह राहू लागला. त्याला लक्खण (लक्षण) व काळ असे दोन मुलगे होते. ... लक्खण मृग शहाणा होता. चतुर होता. योजक होता. कोणत्या वेळी कुठे जावे, कोणत्या वेळी जाऊ नये, हे सारे त्याला नीट माहीत होते. ..." म्हणजे पुरातन बौद्ध साहित्याच्या काळातही माझ्या नावाचे, लखन चे पाली-प्राकृत रूप असलेल्या लक्खण या नावाचे/शब्दाचे प्रचलन होते, असे आढळून येते. 

>  म्हणजे अखेर माझ्या नावाचा (शब्दाचा) अर्थ मला जगातील सर्वात जुना ग्रंथ मानला जात असलेल्या "ऋग्वेदा"त सापडावा, व त्याचे पाली-प्राकृत रूप, लक्खण हे पुरातन बौद्ध साहित्यात, "सिद्धार्थ जातका"त, त्याच्या गुणधर्मा(!)सह😁 सापडावे, हे आश्चर्यच आहे, माझ्यापुरते तरी!

>  तर अशी ही माझी, माझ्या नावाच्या अर्थशोधाची, साठा उत्तराची संक्षिप्त कथा आहे. 
¤
@ॲड.लखनसिंह कटरे, 
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया 
(28.02.2020/13.06.2022)
~~~~~~~~~\\~~~~~~~~\\~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन