भवभूति : झाडीपट्टीतील एक दुर्लक्षित महाकवी/नाटककार

बोरकन्हार-441902, दि.05/02/2022
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
शतक महोत्सवी विदर्भ साहित्य संघ, नागपूरच्या मा.अध्यक्ष व सर्व कार्यकारिणी सदस्यांना नम्र विनंती-वजा-आवाहन 
===========================
*भवभूति : (झाडीपट्टीतील) एक दुर्लक्षित महाकवी/नाटककार* 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
>> महाराष्ट्राच्या अगदी पूर्वटोकावरील, महाराष्ट्र, मध्यप्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यांच्या (तीन तिगाडा) सीमाक्षेत्रात वसलेल्या झाडीपट्टीतील गोंदिया जिल्ह्याच्या इतिहास-प्रसिद्ध आमगांव तालुक्यातील पदमपूर (पद्मपूर) येथे होऊन गेलेला भवभूति हा महाकवी/नाटककार अजूनही जरा दुर्लक्षितच आहे/राहिलाय. (म.म.वा.वि.मिराशी यांनी भवभूति यांचे (पदमपूर) हे स्थान संशोधनानंतर सिद्ध केले आहे. आजही पदमपूरच्या परिसरात दोन-तीन ठिकाणी तत्कालीन खुल्या नाट्यमंचाचे भग्नावशेष, दगडी खांब वगैरे, पाहता येतात. )

>> राजदरबारापुरती मर्यादित असलेली तत्कालीन नाट्यकला खऱ्या स्वरूपात बहुजनांसाठी मोकळी करणारा, खुले रंगमंच या आधुनिक संकल्पनेचे कदाचित मूळ ठरावे अशा खुल्या दगडी खांबाच्या कायम नाट्य सभामंडपाचे (स्टेज चे) आविष्कार(!) करणारा भारतातील पहिलाच महाकवी/नाटककार म्हणून पुरातत्ववेत्त्यांद्वारे अनुमानित(?) असलेला भवभूति पदमपूर येथील तत्कालीन दगडी नाट्य-सभामंडपाच्या भग्नावशेषात अजूनही दडवूनच ठेवण्यात आला आहे, ही कटू वस्तुस्थितीच आहे. 

>> भवभूतिने त्याच्या मालतीमाधव या नाटकात एक श्लोक लिहिला आहे. तो असा ----

ये नाम केचिदिह न प्रथयन्त्यवज्ञां 
जानन्ति ते किमपि तान् प्रति नैष यत्नः |
उत्पत्स्यते तु मम कोऽपि समानधर्मा 
कालो ह्ययं निरवधिः विपुला च पृथ्वी ||

याचा संक्षिप्त भावार्थ असा की, समकालीन विद्वानांनी जरी भवभूतिच्या रचनांची कदर केली नसेल तरी काळ आणि पृथ्वी अनंत असून भविष्यात कधीतरी/कोणीतरी समानधर्मा गुणग्राहक भेटेल व भवभूतिला न्याय मिळवून देईल. 

>> असे असले तरी आमचा शेजारी भवभूति अजूनही महाराष्ट्रात पाहिजे त्या प्रमाणात चर्चिला, अभ्यासला, नावाजला जाताना दिसत नाही. मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद येथील दूरस्थ विद्यापीठातीलच नव्हे तर नजिकच्या नागपूर, गोंडवाना, अमरावती विद्यापीठातील सुद्धा किती मान्यवर, जाणकार भवभूतिबद्दल व त्याच्या उत्कृष्ट साहित्याबद्दल जाणतात, हा कटू-वस्तूस्थिती-दर्शक एक प्रश्नच आहे. याउलट हिंदी पट्ट्यात विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात भवभूतिच्या काव्याचे/नाटकाचे अध्ययन केले जात असल्याचे दिसून येते. आतातरी महाराष्ट्रातील संस्कृती-अभ्यासकांनी, इतिहासकारांनी, संशोधकांनी, पुरातत्ववेत्त्यांनी भवभूतिचे महत्त्व, त्याचे लिखित साहित्य व त्याचे वास्तव्याचे स्थान अभ्यासून त्याची भविष्यवाणी(?) सत्य ठरवावी असे आम्हा झाडीपट्टीवासीयांना वाटते.

>> भवभूतिचे वास्तव्य असलेल्या झाडीपट्टीतील या पदमपूरच्या परिसरातच कै.श्री.लक्ष्मणराव मानकर गुरुजींनी 1951 साली स्थापित केलेल्या भवभूति शिक्षण संस्थेचे भवभूति कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय असून या महाविद्यालयाच्या नुकत्याच दि.30 जून 2021 ला निवृत्त झालेल्या प्राचार्यांनी (डाॅ.श्रीराम भुस्कुटे यांनी) या महाविद्यालयाच्या प्रांगणात अतिशय दुर्मिळ अशा वनस्पतींची अतिशय देखणी अशी बाग फुलवून एक मिनी पर्यटन स्थळच तयार केले आहे. 

>> अशा या आमच्या शेजाऱ्याला समजून/उमजून घेण्यासाठी *पदमपूर येथे त्याचे भव्य स्मारक (रामटेक येथील कालिदास स्मारकाच्या धर्तीवर) उभारून गोंदिया या जिल्हास्थळी किंवा आमगांव या तालुकास्थळी भवभूतिच्या नावाने एखादे सर्वसुविधासंपन्न नाट्यगृह (सुरेश भटांच्या नावे उभारलेल्या नागपूर येथील नाट्यगृहाच्या धर्तीवर) सुद्धा उभारण्यात यावे अशी आमची मागणी/इच्छा आहे.* तसेच किमान नागपूर व गोंडवाना विद्यापीठात तरी भवभूतिच्या सर्व साहित्याचा सर्वंकष अभ्यास करता येईल अशी अद्यतन व्यवस्था उभारण्यात यावी, अशीही आम्हा झाडीपट्टीवासीयांची इच्छा आहे. आणि *या कामाला विदर्भ साहित्य संघाच्या शतक महोत्सवाचा एक अभिन्न अंग मानून वि.सा.संघाने यासाठी सक्रिय पुढाकार घ्यावा अशी वि.सा.संघाच्या मा.अध्यक्षांना व सर्व कार्यकारिणी सदस्यांना नम्र विनंती-वजा-आवाहन आहे.*

>> वि.सा.संघाने या कामी पुढाकार घेतल्यास महाराष्ट्र शासन, स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती व कुटुंब तथा सर्वसाधारण बहुजन यांचा सुद्धा यासाठी उत्स्फूर्त सहभाग उफाळून येईल याची आम्हाला खात्री आहे. सबब पुनश्च आग्रहाची विनंती आहे की, वि.सा.संघाच्या शतक महोत्सवात या कामाचेही प्राधान्यक्रमाने सूतोवाच करून वि.सा.संघाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी भवभूतिची भविष्यवाणी(?) साकार करण्यात यशस्वी हातभार लावावा.
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
(निवृत्त डीडीआर, महाराष्ट्र शासन), 
(वि.सा.संघाचा आजीव सभासद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचा माजी सदस्य)
बोरकन्हार-441902, ता.आमगांव, जि.गोंदिया.
ईमेल : lskatre55@gmail.com 
चलभाष : 8208557164//7066968350
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन