नशा : कवितेची आणि दारू(?)ची : कटूतेला आवतन
◇नशा : कवितेची आणि दारू(?)ची : कटूतेला आवतन◇
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
एक वस्तुस्थिती प्रथमच स्पष्ट करू इच्छितो की, मी प्रामुख्याने, प्राधान्याने, बेसिकली वगैरे वगैरे एक (उत्तम?) वाचक मात्र आहे. तरी माझ्या हायस्कूलच्या शिक्षिका सौ.मंदाकिनी सगदेव यांच्या प्रेरणेने मी 1970-72 पासूनच अनुकरण, अनुसरण, प्रतिक्रिया स्वरूप तथाकथित कविता लिहू लागलो होतो. माझा जीवश्चकंठश्च मित्र प्रभाकर पोचलवार याच्यासोबत संयुक्त कवितेचा (म्हणजे कवितेच्या ओळी आलटून पालटून मी व प्रभाकरने लिहिणे) प्रयत्न व प्रयोग सुद्धा आम्ही त्याकाळी केलेला! तर अशी कवितेची ओळख होत गेलेली. याचा पाया मात्र माझ्या बालपणी माझ्या आईने व तिस-या व चौथ्या वर्गात त्यावेळचे माझे वर्गशिक्षक श्री.सिताराम भूराजी चूटे या एकाक्ष सत्य-शिक्षकांनीच रोवला होता.
हायस्कूलच्या व काॅलेजच्या कालावधीत वर्षभर दररोज नियमित 120 सूर्य नमस्कार आणि पारायणे करण्याच्या अटी आणि शपथेवर मला ज्ञानेश्वरी आणि दासबोध या दोन महान ग्रंथांनी जणू दत्तक घेतले होते. याच कालावधीत योगाचार्य विठ्ठलराल जीभकाटे यांच्या 'स्वानुभवातून योगाभ्यास' या पुस्तिकेने अमर योगप्रेम व मैत्री चा स्वानुभव दिला.
हळूहळू "ललित", "युगवाणी", "तरुण भारत", ची विविध विषय विभाग ही रविवार पुरवणी व "रविवारचा महाराष्ट्र टाईम्स" यांच्या नियमित वाचनाने वसंत आबाजी डहाके व ग्रेस यांनी माझ्यावर गारूड केलं. गोतावळा-आनंद यादव, ठणठणपाळ-जयवंत दळवी, माधव मनोहर व्हाया ललित, हरीशंकर परसाई, शरद जोशी(हिंदी), दुष्यंतकुमार, कमलेश्वर व्हाया सारिका, रामधारीसिंह दिनकर, विष्णू प्रभाकर, लक्ष्मीचंद्र जैन, विजयेंद्र स्नातक, डाॅ.गोपाल शर्मा, मुश्ताक अहमद यूसफ़ी, नूरनब्बी अब्बासी, अनिल सिन्हा, दयावंती, डाॅ.भीमसेन निर्मल, वेदप्रकाश अवस्थी, श्रीपाद रघुनाथ जोशी, शम्सुद्दीन, तोष तनाका(जपान), दयानंद वर्मा व्हाया प्रकाशित मन, सर्वेश्वरदयाल सक्सेना, रघूवीर सहाय व्हाया दिनमान, आरती प्रभू, मर्ढेकर, ग्रेस, वसंत आबाजी, जी.ए., गोनिदा, व्यंकटेश माडगूळकर व्हाया सत्यकथा/मनोरा/मसाप/आलोचना/अभिरुची, वगैरें(?)च्या वाड़्मयादि/साहित्य-वाचनाने केलेल्या गारूडाने व प्रभावाने अक्षरशः झाकोळून जाण्याची अवस्था अनुभवली. त्याचसोबत इब्ने शफी चे शेकडो जासूसी उपन्यास, गुलशन नंदा, राजवंश, गुरूदत्त आदिंचे शेकडो हिंदी पाॅकेट बुक्स चे उपन्यास, एकात्म शेतकरी कुटूंबातील माझे बिनघोर तरी अतृप्त वास्तव्य, दिल्लीच्या विश्वनाथ यांच्या सरिता, मुक्ता मधील हिंदूधर्मातील तथाकथित अनिष्ट प्रथा, रूढी, साहित्य, दैवते यांच्यावर तर्कशुद्धपणे तुटून पडणारे लिखाण, रविंद्र साठे यांच्या ज्ञानेश्वर व सावरकर यांच्या जीवनावरील कादंब-या, राम नगरकर यांची रामनगरी, ... आदि-आदि यांच्या गडद सावलीत मला स्वतःला क्षणभर का होईना विसरण्या(?)साठी "नशे"ची अनिवार गरज भासू लागली व मी तथाकथित कविता लिहू लागलो. कविता-लेखनाची व त्यानंतरची "नशा" मला जो आत्मिक असा अवर्णनीय आनंद प्रदान(!) करायची, तो मला शब्दात पकडता येणे शक्य नाही.
1978 ते 1984 पर्यंत शिक्षक असताना व त्यानंतर 1984 ते 2013 पर्यंत सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागासारख्या ....... शासकीय सेवेत असतानाही, जेव्हा जेव्हा मला "नशे"ची अनिवार गरज भासली, तेव्हा तेव्हा माझ्या कवितालेखनाने माझी ती (नशेची) गरज अगदी शंभर टक्के पूर्ण करून भागवली. मला दारूची कधीही आवश्यकताच भासली नाही. शासकीय नोकरीच्या कालावधीत वरीष्ठांच्या/मंत्र्यांच्या सरबराईच्या प्रसंगी मी कितीतरी प्रकारच्या व "प्रगाढ किंमतीच्या" दारूंची एकेक घूट चव चाखली आहे, पण मलातरी एकही चव आवडली नाही. आणि अशाप्रकारे कृत्रिम नशेवर माझा यत्किंचितही विश्वास सुद्धा नाही. दारू बरी की वाईट, हा माझ्यासमोरचा प्रश्नच नाही, माझ्या समोरचा प्रश्न असा आहे की, प्रत्येकाच्या जीवनात अनिवार्यपणे आवश्यक असलेल्या "नशे"करिता दारू necessary & sufficient आहे काय/असू शकते काय? मला माझे कवितालेखन ज्या आत्मानंदी, परमानंदी, शाश्वत "नशे"ची प्रत्यक्षानुभूति देते ती अनुभूती कोणत्याही दारूची "नशा" मला किंवा अन्य कोणालाही देऊ शकेल/देत असेल काय? माझ्या या (?????) प्रश्नाने माझे काही कवीमित्र नाराज होतीलही, पण त्यांना कवितेच्या नशेपेक्षा दारूची नशा कशी वरचढ आहे/असते हे मात्र दारू चढवल्याशिवाय सांगता येणार नाही!!!
😁😁😁😆😆😆
असो. असोच. 👏👏👏
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया
(16.05.2018/11.05.2020)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment