सांस्कृतिक भांडवल व साहित्यिक : एक संक्षिप्त आकलन

*सांस्कृतिक भांडवल व साहित्यिक : एक संक्षिप्त आकलन*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
@ॲड.लखनसिंह कटरे,
-------------------------------------
>> सुप्रसिद्ध समीक्षक डाॅ.हरिश्चंद्र थोरात यांनी 2019च्या 'मुक्त शब्द'च्या दिवाळी विशेषांकात, साहित्यिकांच्या/साहित्य लेखनाच्या 'सांस्कृतिक भांडवल' या संकल्पने/संज्ञेबद्दल केलेली मांडणी मला माझ्या अल्पबुद्धि-आकलनानुसार खूपच भावली. कारण मी सुद्धा सुमारे 1975 पासूनच माझ्या "सांस्कृतिक भांडवला"शी तडजोड न करता तथा कोणत्याही तथाकथित परंपरेला आणि विचारवाद/विचारसरणीच्या चक्रव्यूहाला शरण न जाता "इतिहास आढळत नाही" अशा प्रकारचे काही ओबडधोबड व बाळबोध(?) लिखाण करू लागलो आहे. 

>> "सांस्कृतिक भांडवल" या संकल्पना/संज्ञेचे नाव किंवा त्याबद्दलची कोणतीही सजग जाणीव मला नसतानाही मी मात्र नैसर्गिक रित्याच या संकल्पनेचा पाईक होतो/आहे, हे मला श्री.हरिश्चंद्र थोरात सरांच्या वर नमूद अप्रतिम मांडणीतूनच कळले. गेल्या चार-पाच पिढ्यात कोणतीही विशिष्ट ऐतिहासिक परंपरा नसलेल्या परिवारातील व क्षेत्रातील माझ्यासारख्या "नव्याने लिहित्या झालेल्या माणसाबरोबर वर्तमानाशी, भूतकाळाशी आणि भविष्यकाळाशी निगडित अशा गुंतागुंतीच्या मूल्यव्यवस्थां''च्या'' अनेकता पुढे" येऊन माझ्यासारख्याच्या लिखाणातून आपले पूर्वपरंपरा-शून्य व स्वायत्त असे सांस्कृतिक भांडवल स्थापू/निर्मू पाहतात, तेव्हा या तथाकथित परंपरेतील तथाकथित प्रस्थापित सांस्कृतिक व साहित्यिक भांडवलदार आमच्या/माझ्या समोर अभेद्य अशी नकारात्मकतेची पोलादी भिंत उभारून तिच्या आड आपल्या मोघम, परंपराग्रस्त, अवास्तववादी, कल्पनारंजकता व एकांगी अनुभववादी क्रियाकलापा(?)तच व्यग्र व मस्त असतात/आहेत, असा माझा "स्वानुभव" आहे.

>> अशा या अवरूद्धलेल्या सांस्कृतिक व साहित्यिक भांडवलदारांच्या मक्तेदारी बाहुल्यात/माहोलात, तथाकथित अभेद्य परंपरा व सर्वंकष अवलंबित्व नाकारून नवा आत्मभानी व स्वायत्त प्रारंभ 'देऊ' पाहणाऱ्या एखाद्या साहित्यिकाला कसे डावलता येईल याची व्यूहरचना तथाकथित श्रेष्ठत्व व प्रस्थापितत्वाच्या अहंगंडाने संपृक्त असलेल्या महाभागांनी रचली असल्याचे पदोपदी जाणवत राहते. आणि अशाप्रकारे परंपरा नाकारून नव्य रचना करू शकणाऱ्या साहित्यिकांची लेखनक्षमता कुंठीत करण्याचे कारस्थान रचले जाते. भिन्नभिन्न स्तरावरील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, ऐतिहासिक व भौगोलिक जीवनानुभवाचे व्यामिश्रतम असे जटिल वेगळेपण विचारात न घेता लिखाणातून अवास्तववादी चित्रणे, कल्पनारंजकता, तत्त्वहीन लेखन व चर्चा, अतार्किक कल्पना सारख्या एकरेखीय, एकदिशात्मक प्रतिमादि यांचे बाहुल्य असलेलेच लिखाण नावाजण्याची अहमहमिकाच सर्वत्र सुरू असल्याचे दिसून येते. एखादा तथाकथित प्रस्थापित प्रकाशक किंवा नियतकालिकाचा संपादक वर नमूद पोलादी बेडी तोडून परंपरा-शून्य व न-परंपरा लिखाणकारांचे लिखाण प्रकाशित करण्याचा प्रच्छन्न बाणा घोषित करतो, पण त्यांचा हा प्रच्छन्न बाणा आभासीच ठरत असल्याची शक्यता(?) वारंवार उद्भवते. आणि अखेर, "समीक्षा केवळ एकाच पायावर उभी नसते तिला गोमेसारखे अनेक पाय असतात, तिला मानसशास्त्र लागतं, मानववंशशास्त्र लागतं, समाजशास्त्र लागतं, इतिहास लागतो, भूगोल लागतो आणि अशा पद्धतीने समीक्षा चालते...इतक्या अंगाने सगळ्या सत्यघटना आपण गृहीत धरून चालत गेलो आणि त्यांच्यावर जर आपण निष्कर्ष काढत गेलो आणि आपल्या आकलनात त्या ठेवत गेलो, तरच काही सिद्धांत आपल्या हातात येतात." या भालचंद्र नेमाडे यांच्या भाष्यातील "समीक्षा" या संकल्पनेच्या जागी "कोणतेही लिखाण" ही संकल्पना ठेवून वाचले तर वर नमूद पूर्वग्रहदूषित वस्तुस्थितीच वारंवार समोर येत असल्याचे आढळून येईल.

>> या संदर्भातील माझेच एक उदाहरण मी देऊ इच्छितो. ते असे की, अशाच परंपरा-शून्य(?), न-परंपरा विचारधारेला अनुसरून, माझ्या वर नमूद सांस्कृतिक भांडवलातून उत्थापित काही कविता व काही "न-कथा" मी काही तथाकथित प्रस्थापित/अभिजनवादी नियतकालिकांतून प्रकाशनार्थ पाठविण्याचे धाडस करू लागतो तेव्हा माझे ते साहित्य सपशेल नाकारले जाते. याउलट रूढी/परंपरानिष्ठ, अनुयायीनिष्ठ, परिवार(?)/परिचय(?)निष्ठ, शिष्यत्वनिष्ठ, पूर्वसूरींच्या पठडीनिष्ठ व प्रस्थापित(?) असलेले/वाटणारे साहित्यच बहुतेक मराठी नियतकालिकांतून प्रकाशित होत असल्याचे, माझ्या/आमच्या निदर्शनास येऊ लागते. शिवाय "या अंकातील मजकुराशी मालक, प्रकाशक, संपादक सहमत असतीलच असे नाही" असे दिखाव्यासाठी लिहूनही "सहमती"चाच दुराग्रह(?) धरून "असहमती"चे लिखाण कोणत्याही धन/ऋण कारणांशिवाय नाकारले जाते, तेव्हा अशा संपादकांचा/नियतकालिकांचा साहित्यिक दांभिकपणाही दिसून येतो. अशाप्रकारे या तथाकथित संपादक/नियतकालिकांच्या क्षुद्र व मानभावी वृत्तीचे दर्शनच बहुतेक प्रसंगी घडू लागते आणि सांस्कृतिक भांडवल ही संकल्पना/संज्ञा कशी एकांगी, एकरेखीय व एकदिशात्मक अहंगंडाने बेमुर्वतपणे राबवली जाते, हे स्पष्ट होऊ लागते.

>> असे हे 'सांस्कृतिक भांडवल' या संकल्पने/संज्ञेवरील माझे संक्षिप्त असे अल्पबुद्धि-आकलन व स्वानुभव मी मांडत आहे. आणि माझे ब्रीदवाक्य "DISSENT : THE VOICE OF PROGRESS" चे अनुपालन करीत आहे. (#540)
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
(10.05.2020/2022)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन